झलक खेळघराची
गेल्या महिन्यातली २३ ऑगस्टची संध्याकाळ! पालकनीतीच्या खेळघराचं रूप एकदम बदलून गेलं होतं. खेळघरातली मुलं म्हणजे चैतन्याचा झराच. पाहुण्यांना प्रदर्शन दाखवण्याची, कॉफी देण्याची, माहिती सांगण्याची जबाबदारी त्यांनी टाचा उंचावून घेतली होती. प्रत्येक पाहुण्याला सगळं काही दाखवण्याची, सांगण्याची त्यांची असोशी फार लोभस वाटत होती. निमित्त होतं, ‘झलक खेळघराची’ या कार्यक्रमाचं आणि येणारे पाहुणे होते, नवी-जुनी मित्रमंडळी!
गेली अठरा वर्षं पालकनीती परिवाराचं खेळघर हे वंचित मुलांच्या सर्जनशील शिक्षणासाठी काम करत आहे आणि त्या वाटचालीत मित्रमंडळींचा फार मोठा वाटा आहे. गेली आठ वर्षं खेळघराला सर रतन टाटा ट्रस्ट, मुंबई यांनी आर्थिक मदत केली होती, पण त्यांच्या बदललेल्या धोरणांनुसार यापुढं ही मदत उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्था, कॉर्पोरेटस आणि न्यासांकडूनही अजून भरीव आर्थिक मदत मिळालेली नाही. अशा वेळी ज्यांना हे काम महत्त्वाचं, मोलाचं वाटतं अशा सुहृदांचाच आधार महत्त्वाचा असतो. कामाच्या व्यग्रतेमुळे किंवा वेळेच्या बंधनांमुळे अनेकजण इच्छा असूनही खेळघराला क्वचितच भेट देतात. पण सर्वांनी मुद्दाम वेळ काढून, आपापल्या मित्र परिवारासह येऊन खेळघराला भेट द्यावी, इथलं काम बघावं, मुलांशी गप्पा माराव्यात आणि खेळघरासमोरच्या आर्थिक प्रश्नांवर अनौपचारिक चर्चा व्हावी अशा हेतूनं ‘झलक खेळघराची’ हा विविधांगी कार्यक्रम आखला होता.
२३ ऑगस्टला संध्याकाळी ४ ते ९ या वेळात, कोसळणार्या पावसात ७०-८० मित्र-मैत्रिणी खेळघरात आवर्जून येऊन गेल्या. शैक्षणिक साधनं, मुलांची लिखाणं, चित्रं, कलाकृती इत्यादींचं प्रदर्शन त्यांनी पाहिलं, खेळघरावरच्या फिल्म्स पाहिल्या. मुलांमध्ये आणि खेळघराच्या प्रश्नांमध्येही आवर्जून रस घेतला. निधीअभावी खेळघराचं काम कमी करण्याची वेळ येऊ नये, हे काम तगावं, पुढं जावं, अशी मनापासून इच्छा अनेकांनी व्यक्त केली. निधी-संकलनाच्या दृष्टीनं प्रत्येकजण काय करू शकतो ह्यावरही सविस्तर चर्चा झाली. सहभागींनी वेगवेगळे पर्याय समोर ठेवले, संपर्काचे पत्ते आणि फोन नंबर दिले.
आज कोथरूडमधल्या लक्ष्मीनगर येथील १५० मुलां-मुलींबरोबर खेळघराचं अर्थपूर्ण शिक्षणाचं काम जोमदारपणे चालू आहे. वस्तीतली शंभराहून अधिक मुलं-मुली आत्मविश्वासानं स्वत:च्या पायावर उभी आहेत, प्रसन्न संवेदनशीलतेनं आयुष्य जगत आहेत.
मात्र आता हे काम लहानशा गटाचं आणि एकाच वस्तीतील मुला- मुलींबरोबर केलं जाणारं छोटेखानी काम राहिलेलं नाही. वंचित मुलांचे प्रश्न, मानसिकता, त्यांना नेमकं काय आणि कसं शिकवायला हवं अशा मुद्यांचा खेळघरानं शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे आणि या अभ्यासावर आधारित, वंचित मुलांसमवेत काम करणार्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणाची रचना तयार केली आहे. गेली सात वर्षं अशी प्रशिक्षणं घेतली गेली आणि त्यातून महाराष्ट्रात नऊ ठिकाणी नवी खेळघरं सुरू झाली आहेत. या कामाचा आणि अभ्यासाचा एक दस्तावेजही खेळघरानं तयार केला आहे. ‘आनंदानं शिकण्याच्या दिशेनं…’ ही खेळघराची हस्तपुस्तिका आता छपाईच्या टप्प्यावर आहे. ज्ञानरचनावादावर आधारित, आनंददायी शिक्षण, हीच पालकनीतीच्या खेळघराची सुरुवातीपासून दिशा आहे. (शिक्षण हक्क कायद्यानं हे मान्य केलेलं आहे). त्यामुळे अनेक शाळांकडून, संस्थांकडून खेळघराकडे या प्रशिक्षणाची मागणी होत आहे.
आठवड्याचे पाच दिवस, रोज तीन तास खेळघराचे कार्यकर्ते मुलांसमवेत काम करतात. २० ते २५ मुलांबरोबर एक शिक्षिका काम करते. याखेरीज विषयतज्ज्ञांची मदत असतेच. भाषा, गणित आणि जीवनकौशल्यं यासारख्या विषयांवर काम होतं. आरोग्य, स्वओळख, संवादकौशल्यं, भावनांचं समायोजन अशा विषयांवरील काम मुलांचं व्यक्तिमत्व समृद्ध करते. सर्वधर्मसमभाव, स्त्री-पुरुष समानता, हिंसेला विरोध, सहिष्णुता अशा सामाजिक विषयांवरील चर्चांमधून मुलांच्या जाणिवांचा विकास होतो. याखेरीज सहली, सिनेमा, नाटकं, प्रदर्शनं, पाहुण्यांच्या भेटी, सणसमारंभ, उत्सव अशा अनेकविध उपक्रमांची आखणी केली जाते. कुमारवयीन मुलांबरोबर काम करणं अधिक कौशल्याचं आणि आव्हानात्मक असतं, त्यासाठी विशेष तयारी केली जाते.
एकेका मुलामागे वर्षभरासाठी खेळघराला येणारा खर्च सर्वसाधारणपणे असा आहे – १ ली ते ४ थी – ६०००/-,
५ वी ते ७ वी – ८०००/-,
८ वी ते १० वी- ११०००/-
१० वी नंतरच्या शिक्षणासाठी – २००००/- पर्यंत.
यापुढील काळासाठी निधी पुरवणार्या मोठ्या संस्थांवर संपूर्णपणे अवलंबून न राहता, खेळघर चालवण्यासाठी ज्यावर विसंबून राहता येईल असा काही एक निधी मित्र-मैत्रिणींच्या मदतीनं उभा राहावा असं वाटतं आहे. आपण स्वतः दरवर्षी काही मुलांची खेळघरातील शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेऊ शकता. शिवाय आपल्या मित्र, सहकारी, नातेवाईक यांनाही खेळघराची ओळख करून देऊ शकता. अधिक लोकांपर्यंत खेळघर पोचलं तरच हे आव्हान पेलता येणार आहे.
खेळघर संपर्क – ९८२२८७८०९६
०२०-२५४५७३२८