भाषा घरातली आणि शाळेतली
ज्या ठिकाणी मुलाची घरची भाषा शाळेतील भाषेपेक्षा बरीच वेगळी असते तिथे सुरुवातीच्या काळात दोन्ही भाषांतून मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यातील वारली मुलांशी संवाद साधताना ‘काय कसं काय चाललंय?’ असं विचारण्याआधी ’कशिक गोठ?’ असं म्हटलं की मुलांचे चेहरे उजळतात. मग हळूहळू मुलं ‘काय कसं काय चाललंय’ या प्रश्नालाही प्रतिसाद द्यायला लागतात.
अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि भाषातज्ज्ञांच्या मते, मुलांच्या घरात वा परिसरात विपुल प्रमाणात बोलली जाणारी भाषा ही मुलांच्या आरंभिक शिक्षणाचे माध्यम म्हणून सर्वोत्तम ठरते. कारण या भाषेवर मुलाने शाळेत येण्यापूर्वीच बरेच प्रभुत्व मिळवलेले असते. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर कोकणात, खानदेशात, मराठवाड्यात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा आणि प्रमाण लेखी मराठी यात बरेच अंतर आहे. आदिवासी भागातल्या स्थानिक भाषांच्या बाबत हे अंतर खूपच मोठे आहे. अशा परिस्थितीत शाळेत माध्यम म्हणून वापरली जाणारी मराठीची प्रमाण बोली व मुलाची घरची बोली यात असणारे अंतर हा एक मह्त्त्वाचा शैक्षणिक मुद्दा ठरतो. त्यामुळे शिक्षकांनी जाणीवपूर्वक मुलांच्या घरातील भाषेचा वापर सुरुवातीला शिकवताना करावा असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेले दिसते. परंतु, बरेचदा असे आढळून येते की, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित असलेल्या समाजांत हा विचार सहजासहजी स्वीकारला जात नाही. या समाजाच्या दृष्टीने प्रमाण भाषा, जी बहुधा समाजातील संपन्न, प्रबळ व सत्ता जवळ असणारी भाषा असते, ती शिकणे याला प्राधान्य असते. ही भाषा वंचित समाजाच्या दृष्टीने प्रबळ वर्गात मिसळण्यासाठीचे, सत्ता केंद्राच्या जवळ जाण्यासाठीचे प्रमुख साधन
असते. पिढ्यान्-पिढ्या आम्हाला मागास ठेवणे हाच प्रमाण भाषा न शिकविण्याच्या मागील राजकीय हेतू आहे असा त्यांचा विचार असतो. या प्रकारचा विचार करण्याला त्यांच्या स्वत:च्या भक्कम अनुभवाचा आधार असतो आणि आपल्याला जो त्रास झाला तो निदान आपल्या मुलांना तरी व्हायला नको अशी कळकळही असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात घरच्या भाषेचे नेमके स्थान काय असावे, घरच्या भाषेपासून शाळेच्या भाषेपर्यंतचा मुलाचा प्रवास सुकर कसा होईल या प्रश्नांचा
ऊहापोह करणे गरजेचे बनते.
लहान मुले त्यांच्या आसपास बोलली जाणारी भाषा जवळजवळ आपसूकच बोलायला लागतात. त्यासाठी कोणी जाणीवपूर्वक नियोजन करण्याची गरज नसते. जेव्हा मूल भाषा शिकते तेव्हा ते केवळ शब्द शिकत नाही तर हे शब्द कसे वापरले तर अर्थपूर्ण बोलता येते हे देखील मुलाला अवगत होत असते. थोडक्यात आसपास बोलल्या जाणार्या भाषेच्या व्याकरणाच्या नियमांसह मूल भाषा शिकते. जेव्हा मूल सहा वर्षांच्या आसपास शाळेत येते तेव्हा ते बरीच भाषा बोलत असते. आपल्या गरजा भागवण्यासाठी, विचार किंवा कल्पना मांडण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मूल भाषेचा प्रभावी वापर करत असते. अर्थातच बर्याचदा ही भाषा मुलाच्या घरात परिसरात बोलली जाणारी असते आणि ती लेखी प्रमाण भाषेपेक्षा वेगळी असते. अशावेळी घरची समृद्ध भाषा घेऊन येणार्या मुलांना हळूहळू प्रमाण भाषेची ओळख कशी करून द्यायची याचा विचार करायला हवा. मुलाचा हा प्रवास शक्य तितका सहज व्हावा म्हणून काय काय करता येईल हे आता पाहू या.
1. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुलाच्या घरच्या भाषेचा शाळेत स्वीकार होणे गरजेचे आहे. म्हणजे एखादं मूल जर वढ्याला लई पानी आलया असं म्हणालं तर त्याचे म्हणणे चूक आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. मुलाच्या घरच्या ग्रामीण भाषेत हे अगदी योग्य वाक्य आहे. त्यामुळे अशा बोलण्याबद्दल मुलाची चेष्टा होणार नाही याची काळजी आपण शिक्षक म्हणून घ्यायला हवी.
2. मुलांचं असं बोलणं आपण जसंच्या तसं स्वीकारून प्रमाण मराठी भाषेतला पर्याय मुलांसमोर ठेवू शकतो. वढ्याला लई पानी आलया असे मुलाने सांगितले तर शिक्षक ओढ्याला खूप पाणी आलंय का? मग तू कसा पोहचलास शाळेत? असा लेखी मराठीला जवळचा पर्याय वापरून संवाद साधू शकेल. अशा प्रकारे संवाद साधत राहिल्यास मुलांना प्रमाण भाषा आपोआप ओळखीची होत राहील.
3. मुले आपले अनुभव लिहिताना, वर्णन करताना अनेकदा घरच्या भाषेतील शब्दसंपत्ती वापरतात. ही शब्दसंपत्ती वापरायला त्यांना आडकाठी करू नये. उदाहरणार्थ, मांजर उंदराचा पाठलाग करते आहे या चित्राचे वर्णन मुले मांजरान उंदराचा काढा घेतलाय असे करू शकतील अशावेळी त्यांची अभिव्यक्ती जशीच्या तशी स्वीकारणे गरजेचे आहे.
4. ज्या ठिकाणी मुलाची घरची भाषा शाळेतील भाषेपेक्षा बरीच वेगळी असते, तिथे सुरुवातीच्या काळात दोन्ही भाषांतून मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ठाणे जिल्ह्यातील वारली मुलांशी संवाद साधताना काय कसं काय चाललंय?
असं विचारण्याआधी कशिक गोठ? असं म्हटलं की मुलांचे चेहरे उजळतात. मग हळूहळू मुलं काय कसं काय चाललंय या प्रश्नालाही प्रतिसाद द्यायला लागतात.
5. ज्या भागातील भाषा प्रमाण मराठीपेक्षा बरीच वेगळी असते त्या भागातील मुले प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची घरची भाषा वापरतात. एका वारली मुलाने लिहिलेले हे उत्तर पाहा.
प्रश्न: माकडाने लाकूड कशाने कापले?
उत्तर : माकड लाकूड करवतीखाल कापेल.
हे उत्तर मुलाने स्वत:च्या शब्दात व स्वत:च्या भाषेत दिले आहे हे महत्त्वाचे. पुस्तकातील वाक्य जसेच्या तसे बघून लिहिण्यापेक्षा स्वत:च्या भाषेत समजून लिहिण्याला आपण महत्त्व द्यायला हवे.
6. अनेकदा मुलांच्या घरच्या भाषेत प्रमाण लेखी भाषेतील काही वाक्यरचना वापरल्या जात नाहीत. अशावेळी आपल्याला या रचना मुलाला लक्षात आणून द्याव्या लागतात. उदाहरण म्हणून आपण पुन्हा एक वारली भाषेतील वाक्य पाहू या. पोरां घरां जाधेल या वाक्याचा अर्थ मुले घरी गेली, मुले घरी जात होती किंवा मुले घरी गेली होती यापैकी कोणताही असू शकतो. तो आपण संदर्भाने समजून घ्यायचा असतो. अशा मुलांना प्रमाण मराठीतील या तीनही वाक्यात काय सूक्ष्मभेद आहे हे समजावून द्यावे लागते.
7. अनेकदा मुलांच्या घरच्या भाषेत प्रमाण भाषेतील काही वर्ण नसतात. जे वर्ण घरच्या भाषेत नसतात ते वर्ण उच्चारणे मुलांना अवघड वाटते. अशावेळी त्यांच्या लिखाणात चुका होऊ शकतात. वारली मुले अनेकदा शाळा ऐवजी शाडा किंवा गाडी ऐवजी गाळी असे लिहिताना दिसतात कारण ड व ळ असे दोन स्पष्ट उच्चार या भाषेत नाहीत. त्यामुळे नेमका कोणता वर्ण वापरावा यात मुलांचा गोंधळ होतो. नंदुरबार जिल्ह्यातील कोकणी पावरी भाषेत छ ऐवजी स चा वापर होतो अशा वेळी बोलताना वा लिहिताना मुले छत्री ऐवजी सत्री असे लिहू शकतात. पावरीमध्ये काही ठिकाणी स चा ह होत असल्याने बरसात ऐवजी वरहात असा शब्द सहजच मुले वापरतात. या सर्व बाबींकडे चुका म्हणून न पाहता मुलांच्या अडचणी म्हणून पाहणे गरजेचे आहे. मुलांसमोर त्यांचे काम तपासून दिल्यास या अडचणी निश्चित कमी होतात.
मुलाच्या घरच्या भाषेपासून सुरू झालेला हा प्रवास अनेकदा प्राथमिक शाळेच्या चौथ्या पाचव्या वर्गापर्यंत चालू राहतो. मुले घरची भाषा व शाळेची भाषा यांची सरमिसळ करताना दिसतात. त्यांचे लिखाणही अशा संमिश्र भाषेत असू शकते. या बाबींचा स्वीकार करणे हे मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत मह्त्त्वाचे असते. अशा प्रकारच्या लिखाणाचा एक नमुना आपण पाहू या.
एका गावमेहे रोहीत नावाओ पोर्यू राहात ओता. त्याचे तिन दोस्त ओते. सुट्टीच्या दिवशी ते एकी जागो चिंच खायला गेले.
हे वाक्य नंदुरबार जिल्ह्यातील पावरी मातृभाषा असणार्या एका मुलाने लिहिले आहे. गावात ऐवजी गावामेहे, नावाचा ऐवजी नावाओ, मुलगा ऐवजी पोर्यू असा पावरीचा प्रभाव त्याच्या लिखाणावर स्पष्टपणे दिसतोय. या मुलाने क्रियापदे मात्र मराठीतील वापरलेली दिसतात. अशा प्रकारचे मिश्र भाषेतील लिखाण ही घरच्या भाषेकडून शाळेच्या भाषेकडे येण्याची मह्त्त्वाची पायरी आहे. आता पुष्पा या मुलीने गणपतीच्या सणाबाबत लिहिलेला हा मजकूर वाचा.
गणपतीचा सण
आम्हाला शुक्रवारपासून सुट्टी लागली होती. जाणेमामासांचे गणपती आणला होता.
दुसर्या दिवशी जाणेमामासांचे आरती केली आणि गणपती मखरात बसवला.
आणि आम्ही घरी नाष्टा कारायला आळू. तेवढ्यात सुलभाने सांगितले
चल ताईसांचे पावण्या जाऊ. आम्ही ताईसांचे गेळू ताईसांचे गेळू
ताईने सांगितले तुम्ही जेवता का? आम्ही सांगितले की आम्ही जेवत नाही.
मग ताईसांचे गणपती बसला होता. रात्री परत आम्ही दादा मी ताई
सुलभा आका मामी असे आम्ही पत्ते खेलत. त्याच्यात मी जिंकळू
मी पैसे मोजले तर मला पन्नास रूपये आले. ते मी ताईक पैसे दिले,
आम्ही घरी आळू. नाष्टा केला. आमचे गऊर बसली होती. गुरूवारी आमची
गउर घालवाय सांगितले. मी आणि दिदी गउर घालवाय गेळू
मग आम्ही गउर घालवून घरी आळू.
पुष्पा वाडा तालुक्यातील एका खेड्यात राहणारी मुलगी आहे. तिच्या लिखाणावर घरच्या भाषेचा प्रभाव कसा दिसतो आहे हे पाहूया. पुष्पाने जाणेमामांकडे, ताईकडे या शब्दांच्या ऐवजी जाणेमामासांचे, ताईसांचे असे शब्द वापरले आहेत. म्हणजे मराठीतील कडे या शब्दयोगी अव्यया ऐवजी तिने सांचे हे घरच्या भाषेतील अव्यय वापरले आहे. गेलो या क्रियापदाऐवजी गेळू असे क्रियापद वापरले आहे. यात ल चा ळ करणे व ओ चा ऊ करणे ही देखील पुष्पाच्या घरच्या भाषेची वैशिष्ट्ये आहेत. आता पुष्पाने केलेले हे वाक्य पाहा. रात्री परत आम्ही दादा, मी, ताई, सुलभा आका, मामी असे आम्ही पत्ते खेलत. प्रमाण मराठीचा विचार केला तर हे वाक्य अपूर्ण वाटेल. कारण आम्ही पत्ते खेळत होतो असे क्रियापद वापरावे लागेल. परंतु पुष्पाच्या घरच्या भाषेत असे सहाय्यक क्रियापद वापरले जात नाही. त्यामुळे तिने ते वापरलेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. अर्थातच, असे बारकावे लक्षात येण्यासाठी मुलाच्या घरची भाषा शिक्षकाला थोडीफार तरी माहिती हवी. पुष्पाने केलेल्या या रचनांवर तिच्याशी शिक्षकांनी चर्चा करायला हवी. या रचनांना चुका न म्हणता मराठी मध्ये आपण हे वाक्य असे लिहितो असे सांगायला हवे. तरच पुष्पाच्या लिहिण्याचा उत्साह भंग होणार नाही. घरची भाषा चुकीची, कनिष्ठ, अशुद्ध आहे असे म्हणणे हे मुलाच्या आत्मसन्मानाला मोठाच धक्का पोहचवते. ते टाळून मुलाचा शाळेच्या भाषेकडे येण्याचा प्रवास कसा आनंददायी होईल हे पाहणे हे शिक्षक म्हणून आपल्या समोरचे मोठे आव्हान असते आणि ते पेलायची पहिली पायरी म्हणजे मुलाच्या घरच्या भाषेचा पूर्ण स्वीकार करणे व शिक्षणाच्या प्रक्रियेत तिला आदराचे, प्रमाण बोलीच्या बरोबरीचे स्थान देणे ही असेल.
लेखकाचा परिचय: नीलेश निमकर हे ‘क्वेस्ट’ या शिक्षणसंस्थेचे संचालक, गेली वीस वर्षे आदिवासी मुलांसाठी भाषा आणि गणित विषयांधले काम. शिक्षकांच्या निरंतर व्यावसायिक विकासासाठी कार्यरत.