डॉ. कस्तुरी कुलकर्णी

“यात स्वैपाकघर आहे. हे ओट्याखालचे ड्रॉवर्स आहेत, इथे घासायला टाकलेली भांडी आहेत – हा चमचा, ही वाटी, हे पातेलं, आणि बाऊल… मी हळूच स्टूल घेऊन त्यावर चढून नळ सोडून आलीय, हे पाणी वाहतंय. ही आई – गॅस पेटवतीये. गॅसची आग दिसते आहे? आईच्या हातात कुकरची रिंग आहे. हा कुकर आहे. हा डबा उघडलेला आहे, त्यात तांदूळ आहेत. तो बंद असलेला डाळीचा डबा आहे. इकडे दिव्याचं बटन, ही भिंतीवर अडकवलेली कात्री, हा पंखा… आणि ही सगळी वरची शेल्फ, कपाटं…”

मंडळी हळूहळू जमायला लागली. त्यावेळी हॉलमध्ये जमलेल्या माणसांपेक्षा चित्रांची संख्या जास्त होती. सा एकेका चित्राचं भरभरून वर्णन करत होती.

“… हा कांदा आहे, तो चिडलाय. तो कुणावर चिडला आहे माहितीय? या छोट्या लसणावर. आणि लसूण रडतोय कारण त्यानं काहीतरी खोडी केलीय.”

“… ही मोठ्ठी नदी. हा मासा अगदी वर पोहतोय. तो राजा आहे आणि हा मासा या माशाचा नवरीमासा. हा छोटा बाळमासा. हे कासव, ही पाणकोंबडी, वर सगळी पाण्यातली झाडं, कमळ, फुलं,  आकाश, सूर्य…”

  ***

“आई आपण माझ्या चित्रांचं प्रदर्शन करूया ना.” काही महिन्यांपूर्वीच्या या तिच्या उद्गारानी झालेली सुरुवात ते वाढदिवशी घरातल्या हॉलमधलं हे दृश्य! 

***

आम्ही चित्रं अगदी खाली जमिनीपर्यंत लावली होती. त्यामुळे अगदी रांगत्या बाळापासून सर्वांना ती सहज दिसू शकत होती.

सा च्या अगदी बाळवयापासून आम्ही चित्रांची प्रदर्शनं पाहिली आहेत. मोठ्या कलादालनांतली तशीच ओळखीतल्या कलाकार मंडळींची. शाळकरी वीणाताई, सुबोधआबा, चारुशीलाआजी यांची. माझ्या मते ‘कळतं वय’ असं काही वेगळं नसतं; मूल नेहमी कळत्या वयातच असतं. त्याला काय, किती आणि कसं कळतं हे मात्र मोठ्यांनाच कळत नसतं. 

… तर सा पाच वर्षांची झाली हे एक निमित्त! चित्रांचं प्रदर्शन पाहायला हक्काची माणसं असणार होती.

सा ची विविध वयोगटातली मित्र-यादी पाहून एवढ्या सगळ्यांना घरी बोलावलं तर कसं जमणार अशी काळजी आजी-आबांना वाटली नसती तरच नवल. ती व्यक्त व्हायचा अवकाश, सगळ्यांना घरी’च’ बोलवायचं आहे असं सा नं ठामपणे सांगून टाकलं.

मग रात्री जेवणं झाली, की सा, मी आणि आजी-आबा बसून सा नं काढलेल्या चित्रांच्या पसाऱ्यातून मोजकी काही चित्रं प्रदर्शनासाठी निवडणं (त्यातसुद्धा कागदाच्या दोन्ही बाजूंनी काढलेल्यांतून एक ठरवणं महाकठीण!), निवडलेली चित्रं प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये घालणं, सा नं चित्रांचं केलेलं वर्णन समजून घेऊन चित्रांना क्रमांक देणं हे करायचो.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आणि ऐन वाढदिवशी चित्र-प्रदर्शनाची तयारी केली. हॉलमध्ये भिंतीलगत नायलॉनच्या दोऱ्या बांधल्या, त्यावर आजीच्या ४-५ साड्या अडकवून पडदा तयार केला. त्यावर तिची सुमारे पन्नास-एक चित्रं टाचणीनं लावायची होती. मदतीला हक्काच्या श्रुतीमावशी आणि तन्वीमावशी होत्या.

आपण वाढदिवसाला काय काय आणि कसं कसं करूया

या विषयावर मी आणि सा नं खूप वेळा, खूप गप्पा मारल्या. इतक्या विविध कल्पना मांडल्या; अगदी सूर्यनमस्कार घालून दाखवण्यापासून केळीच्या पानावरचा वरणभात असल्या एक-शे -एक तरी भन्नाट कल्पना तिला सुचल्या होत्या. शेवटी शेवटी या विषयावरचे आमचे संवाद इतके वारंवार आणि वास्तव चौकटीला धरून आणि अगदी एकेक तपशील पक्का होईपर्यंत घडायचे, की मला वाटायचं मी कुणा मोठ्या माणसाशी बोलते आहे. त्या संवादांमध्ये खूप प्रेम, विश्वास, स्वप्न रंगवणं, ठरवून एकत्र काही पार पाडणं असं बरंच काही होतं.

  एकदा सा बोलता बोलता म्हणाली, “सगळे केक केक म्हणून नाचत येतील माझ्या वाढदिवसाला; पण केकच नसेल.” तसं म्हणताना तिला खरोखर अगदी गंमत वाटत होती; पण तेवढंच होतं त्यात.

संत्र, मोसंबी, पेरू, सफरचंद, केळी, पपई, स्ट्रॉबेरी अशा सप्तरंगी फळांचे तुकडे द्रोणात होते. चित्रं पाहून आणि त्याबद्दल ऐकून झाल्यावर घटकाभर हा अल्पोपाहार… केकऐवजी काय ते सा नेच सुचवलं होतं.

आस्ते आस्ते सगळे जमले. आता खरी मैफल रंगणार होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सा आणि तिच्या दोन मैत्रिणींनी मिळून ‘हमको मनकी शक्ती देना…’ ही प्रार्थना म्हटली. गेले ३-४ महिने या तिघी माझ्याकडे पेटी आणि गाणं शिकताहेत. आणि गेलं वर्षभर सा मोहनआबांकडे तबल्याला जाते. तिथल्या नादमय वातावरणात रमायला तिला आवडतं. तिथे शिकायला येणारा साहिलदादा वाढदिवशी आला होता. त्यानं उत्स्फूर्तपणे ताल सांभाळून घेत त्यांना तबलासाथ केली, ‘त्रिताला’मधले काही तुकडे, कायदे आणि चक्रधार असेही स्वतंत्रपणे वाजवले. तबल्याबद्दलची थोडी रंजक माहितीही गोष्टरूपात सांगितली. सा नेदेखील तिला तबल्यावर येणारे धिं धिं कत् कत्, तिट, तिरकिट, धा धा तिट… आणि त्रिताल असे कायकाय वाजवून दाखवले.   

      

एकीकडे साऱ्यांसाठी खाऊची तयारी सुरू होती. वाढदिवस घरी, म्हणजे ओघानं खाऊही घरचाच. आजीनं मायेनं केलेला. सा आणि सगळ्याच लहान मुलांना आवडणारा गोड आणि पोटभरीचा शिरा आणि गरम- गरम पोंगल. दोन्हीची गोल मूद. 

पोटोबा झाल्यावर सगळ्यांनी समोरच्या भागात फरशीवर ऐसपैस जागा तयार केली. मुलं छानपैकी मागे सरकून बसली आणि नृत्यासाठी स्टेज तयार झालं. 

गेल्या सहा महिन्यांपासून ‘सा’ भरतनाट्यम् च्या दर्शनामावशीकडे जाते. तिला आवडणारा ‘गिण्-तोम्’ प्रकार तिनं आणि तिथे शिकायला येणाऱ्या मनस्वीताईनं सादर केला. मनस्वीताईनं आणखी काही प्राथमिक प्रकार आणि मुद्रा करून दाखवल्या, औचित्याला साजेसं एक पारंपरिक सादरीकरणही केलं. समोर उपस्थित चिमुकल्या प्रेक्षकांपैकी दोघी-तिघी उठून तिचं अनुकरण करू लागल्या. हे दृश्य कमालीचं विलोभनीय होतं. प्रेक्षकगणातील एक पिंट्या बाळही काही आवडलं, की मध्येच आनंदानं आ… ऊ… असे चित्कार काढत दिलखुलास दाद देत होता.

तृप्तीमावशी  सतार घेऊन आली होती. ती सतार शिकते आहे. हे मोठं आणि आकर्षक वाद्य बघून मुलं हरखून गेली होती. तिनं सगळ्यांना वाद्याची ओळख करून दिली. थोडे अलंकार आणि भूप राग वाजवून दाखवला. त्यावर आधारित ‘देखा एक ख्वाब’ गाणं वाजवलं . ‘चॉकलेटचा बंगला…’ आम्ही सतार आणि पेटीवर एकत्र वाजवायला सुरुवात केल्यावर मुलांनी गाणं म्हणत नाचायला सुरुवात केली. सगळं काही ‘लाईव्ह’ असण्यातली ही मजा न्यारी होती. तन्वीमावशीनं म्हटलेल्या गाण्यावरही मुलं नाचली. छोट्या विहाननं तन्वीमावशीबरोबर एक कविता म्हटली. कार्यक्रम खूप भरगच्च आणि अगदी आखीव नको, त्यात मुक्तता हवी, मुलांचा सहभाग हवा असा विचार होताच, त्यामुळे आणखीही काहीबाही सुचलं होतं ते जाणीवपूर्वक केलं नाही.

लहानथोर श्रोते एकाचवेळी समोर असताना सा गोष्ट सांगितल्याशिवाय कशी राहणार? मस्तपैकी स्टूलवर बसून, सकाळी शाळेत(?) मिळालेली वाढदिवसाची पुठ्ठ्याची टोपी घालून तिनं गोष्ट सांगितली. मग आणखी कुणाला काय काय सांगावंसं वाटायला लागलं. मुलांना हक्काचं व्यासपीठ मिळालं होतं. ज्याला अजिबात नियोजन लागत नाही पण सगळी लहान मुलं एकत्र जमली, की आपोआप होतो तो दंगा, खेळ, पळापळी असंही अर्थातच झालं.

आई, आजी, मावश्या, आत्या अशा सगळ्यांनी सा ला ओवाळलं.

दिवाळी किंवा अशीच काही न काही कारणानी नवीन कपडेखरेदी आधीच झालेली असल्यामुळे पुन्हा आवर्जून वाढदिवसासाठी असे नवे कपडे काही आम्ही घेतले नाहीत. सा नं स्वतःच ठरवल्याप्रमाणे तिच्याकडे असलेली नऊवारी नेसली. 

वाढदिवस यायला किती दिवस उरले आहेत हे शेवटच्या काही दिवसांत मोजणं चालू असे. आदल्या दिवशी सा – “आई मी लवकर झोपले तर सकाळ लवकर होईल ना, म्हंजे वाढदिवस लवकर येईल ना?”

***

खरंतर प्रत्येकच दिवस हावाढ’दिवस असतो. आपण जन्माला आलो यात आपलं काहीही कर्तृत्व नसतं, की त्यात काही अद्वितीयही नसतं; पण काहीही नवं उमलून येणं, नवं जीवन आकाराला येणं हा आनंदोत्सव असतो खरा… तो आनंद सर्वांबरोबर वाटून घ्यावा असं वाटणंही स्वाभाविकच!

या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन अगदी घरगुती आणि अतिशय साधं असं होतं. कोणतीही अनावश्यक वस्तू, खर्च नव्हता. शक्य तितकं पर्यावरणपूरक राहील असा प्रयत्न केला. 

पर्यावरणपूरक याअर्थी सा तिचा एक खास शब्द वापरते. निसर्गी! 

ती सांगते, “आई,  एक निसर्गी जग असतं आणि एक माणसांचं जग असतं. झाडं, नदी,  प्राणी, पक्षी, डोंगर वगैरे निसर्गी जग आणि गाड्या, वस्तू, प्लॅस्टिक, बिल्डिंग वगैरे म्हणजे माणसांचं जग. तिला विघटनशील प्रकारांचे बारकावेदेखील समजतात. तेही ती निसर्गी मानते. उदा. बीटाचा रंग, हळदीचा रंग हे निसर्गी आहेत; मात्र पेटीतले रंग नाहीत.   

 साधेपणावरून एक आठवलं. आदल्या दिवशी रात्री साड्या दोरीवर घालून ‘कसं दिसतं’ ते आम्ही पाहत होतो. त्यावर चित्रं लावायला भक्कम असा आधारही होईल यासाठी काय करता येईल असं आमचं आपापसात बोलणं चालू होतं. सेफ्टीपिना लावत बसण्यापेक्षा कपडे वाळत घालण्याचे चिमटे लावले तर सुटसुटीत होईल; पण दिसायला कसं वाटेल? सा पटकन म्हणाली, “आई आपण चिमटेच लावू. दिसत असेल तर दिसू दे की. घरात असंच असतं. आपण घरी करणार तर घरातल्या वस्तू वापरणार ना, उपयोगाचं महत्त्व!” 

आलेल्या मुलांपैकी एक-दोघांनी विचारलं, ‘रिटर्न गिफ्ट’ आहे का म्हणून. हा प्रश्न अनपेक्षित नव्हताच; मात्र ज्यांचे बोबडे बोलही अजून पूर्ण गेलेले नाहीत, त्या वयाच्या मुलांच्या मनातही हे समीकरण किती पक्कं आहे याचा पुनःप्रत्यय आला.

***

परवा सा, मी आणि तिचा एक १० वर्षांचा मित्र पौर्णिमेच्या दिवशी चांदण्यात शतपावली करत होतो. त्याची एक ताई आहे. बारावीत असल्यामुळे ती आमच्याबरोबर नव्हती. मोठ्ठा वाटोळा चंद्र पाहत पाहत आम्ही चालत होतो. तो म्हणाला, “आत्ता ताई असती तर  खिचिक खिचिक खिचिक कित्ती वेळा केलं असतं.” हे सांगताना तो स्वतः आडवातिडवा होऊन वेगवेगळे अँगल घेऊन काल्पनिक कॅमेऱ्यानं फोटो काढण्याची नक्कल करत होता.

मी त्याला म्हणाले, “तुम्ही दोघं आता तुमच्या डोळ्यातल्या कॅमेऱ्यानं खिचिक खिचिक करा.”

तो – “म्हणजे?”

“म्हणजे चंद्र कसा दिसतोय ते पाहा, डोळ्यांत साठवून ठेवा आणि मग रात्री झोपताना डोळे मिटले, की आठवा.”

सा अनेकदा आम्हाला सांगत असते, ‘हे मनात साठवून ठेव, ते कानात साठवून ठेव…’

हे सगळं मला त्या रिटर्न गिफ्ट प्रकारावरून आठवलं. आपण वाढदिवस अनुभवला का? आपल्याला खरीच मज्जा आली का? तसं असेल तर ते क्षण खास आहेत. मनात साठवून ठेवा. 

दुसऱ्या कुणाबरोबर निर्व्याजपणे त्याच्या आनंदात सहभागी होता येणं… हे किती समृद्ध ‘रिटर्न गिफ्ट’ आहे… नाही का?

डॉ. कस्तुरी कुलकर्णी

dr.kasturi1004@gmail,com

होमिओपॅथिक डॉक्टर, समुपदेशक, शिक्षक, योग तसेच संगीत अभ्यासक. जगजीवनातल्या सगळ्या गोष्टींबद्दल जिज्ञासा असलेली आजन्म विद्यार्थिनी.