दुकान दुकान उपक्रम
आमच्या पाचवी-सहावीच्या गटात एके दिवशी वर्गात गेल्यावर थोडी गंमत झाली. त्या दिवशी मुलांना अभ्यास करायचा नव्हता. ताई तर सर्व नियोजन करून गेली होती. मुले सुरुवातील काही म्हणाली नाहीत. पण प्रार्थना झाली, गप्पा झाल्या. त्यानंतर मात्र मुलांनी ताईला लाडीगोडी लावायला सुरुवात केली.
“ताई आज तुम्ही काय घेणार आहात? सांगा ना. आज अभ्यास नको, आपण काहीतरी मज्जा येईल असे करूयात का?” सगळ्यांचा एकच गोंधळ. ताईने “ठीक आहे .” म्हटल्यावर वर्गात शांतता पसरली. आता पुढे कोण बोलणार म्हणून मुले एकमेकांकड़े पाहू लागली. मग इंदूने सांगितले,” ताई, आज आम्हाला सगळ्यांना दुकान दुकान खेळायचे आहे. खेळू का? प्लीज़,प्लीज़ प्लीज़ ताई !” ताईचे उत्तर येईपर्यंत मुले शांत बसली आणि ताई हो म्हणताच सगळी मुले उड्या मारू लागली.
ताई थोडा वेळ थांबली. कारण मुलांच्या डोक्यात काय आहे, ती एकमेकांशी काय व कशी बोलतात, वागतात त्याचे ताई निरीक्षण करत होती. नक्की दुकान दुकान म्हणजे मुलांना काय खेळायचे आहे हे तिने समजून घेतले.
मुलांनी लगेच आपापले गट केले आणि गटामध्ये आपण कोणत्या वस्तूचे दुकान मांडायचे याविषयी ती बोलायला लागली. यानंतर त्यानी ठरवले की आपल्या वर्गात असणाऱ्या वस्तूंचा वापर करूनच आपले दुकान प्रत्येकाने मांडायचे. मग यात मुलांनी बस्करांचे, वहीचे, पुस्तकांचे, पझलचे, खुर्चीचे, पेन-पेन्सील आणि रबरचे अशी वेगवेगळी दुकाने मांडली. दुकानात ठेवायला वेगवेगळ्या वस्तू गोळा केल्यावर मुलांच्या लक्षात आले की आपण दुकानात जाणार तर आपल्याकडे पैसे हवेत. खरेदी विक्री करायची पण पैसे नाहीत असे कसे चालेल. आपल्याला पैश्यांशिवाय कोणती वस्तू विकत घेता किंवा देता येणार नाही. हे समजल्यावर गायत्री, अप्सरा आणि पूजा यांनी कागदी पैसे बनवण्याची जबाबदारी घेतली. त्यावेळी त्यांनी बाकी सर्व मुलांना सूचना दिली की ‘तोपर्यत तुम्ही आपापली दुकाने नीट लावून घ्या. आम्ही तुम्हाला पैसे आणून देतो.’ मुले त्याप्रमाणे काम करू लागली आणि आपापल्या दुकानालीत वस्तूंच्या किमती ठरवू लागली. या मुलीना लगेच कागदी पैसे बनवण्याची कल्पना सुचली म्हणून मुलांना दुकान दुकान खेळता आले. विचार,चर्चा करून पैसे बनवायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी २००० च्या नोटेपासून ते सुट्ट्या नाण्यापर्यंत विचार केला हे खूप भारी वाटले! हे पैसे सर्व दुकानदारांना आणि ग्राहकांना किमान सारखे मिळतील याचाही मुलीनी विचार केला.
तोपर्यंत दुकानदारांनी दुकाने मांडली. आपले दुकान छान कसे दिसेल, दुकानात विक्रीसाठी कोण बसेल आणि दुकानाबाहेर उभे राहून मार्केटिंग कोण करणार हे सगळे मुलांनी आपापसात ठरवून घेतले. त्यानंतर ती आपापल्या वस्तूंचा प्रचार करायला लागली. या सर्व गोष्टी मुले अगदी मनापासून करत होती. प्रत्येकजण आपल्या वस्तूच्या विक्रीसाठी प्रयत्न करत होता. भाव कमी जास्त करण्यासाठी मुले घासाघीस करत होती. ती आधी बोलून बघायची, दुकानदाराने ऐकले नाही तर “जातो दुसऱ्या दुकानात “ असे म्हणून चक्क पुढे निघून जायची.
पुस्तकाचे दुकान खूप छान मांडले होते. पाहूनच त्या दुकानात लगेच जाण्याची इच्छा होत होती. त्या दुकानात दोन मुले होती होते. त्यातील एक जण पुस्तके विकण्याचे काम करत होता आणि दुसरा चक्क पुस्तक वाचत बसला होता. त्यामुळे बरेच ग्राहक त्या दुकानात जात होते असे दिसले. त्यावेळी वाचणारा मुलगा वचन सोडून ग्राहकांसोबत छान गप्पा मारत होता. यामुळे दुकानातली वातावरण निर्मिती उत्तम जमली होती आणि त्यामुळे अनेकांना पुस्तके खरेदी करावेसे वाटत होते. शेवटी सर्व दुकानदारांनी आपल्याला किती फायदा झाला हे देखील पहिले. ग्राहकांनी आपले किती पैसे खर्च झाले हे देखील पाहिले. मुलांची इच्छा आणि ताईची साथ यामुळे हा उपक्रम ताईचे पूर्वनियोजन नसूनही मुलांच्या इच्छा अणि प्रयत्नातून खूपच भारी झाला.
स्वतः ठरवले की मुले सर्व जबाबदारी घेउन ती उत्तम रित्या पार पाडतात याचा आम्हाला पुन्हा अनुभव आला.
दिपाली जगदाळे .पालकनीती परिवार ,खेळघर ,पुणे