मुलांना रस वाटेल असं थोडंसंच काहीतरी…

– मधुरा मणेर

Magazine Cover

आज चौथीच्या वर्गात आम्ही Natural Things Around Us’ वर काम करणार होतो. २-३ इंग्लिश गाणी म्हणून मुलं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. Natural म्हणजे काय, things कशाला म्हणायचं, Around आणि round मधला फरक काय अशी चर्चा झाली. मग 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 असं म्हणायला लावून त्यांचे चार गट केले. आणि मग एकेक गट घेऊन आम्ही निघालो भटकायला ! तोपर्यंत बाकीच्या गटांनी वर्गात बसून वेगळं काम करायचं होतं. आपल्या सभोवतालच्या जितक्या म्हणून नैसर्गिक गोष्टींची नावं आठवतायत त्यांची त्यांनी इंग्लिशमध्ये यादी करायची होती.

वातावरण मस्तच होतं. झिरझिर पाऊस आणि गार हवा. मुलं बागडत बागडत निघाली. फार लांब जायचं नव्हतंच. शाळेच्या भोवतीनं एक फेरफटका मारायचा होता फक्त. आणि करायचं एकच होतं, आसपास दिसणार्‍या सगळ्या नैसर्गिक गोष्टींची इंग्लिशमध्ये नावं सांगणं. Tree, leaves, flowers, birds, butterfly असे नेहमीचे शब्द सगळ्याच गटांकडून आले. काहीजणांनी जरा वेगळे शब्दही सुचवले: branches, raindrops, वगैरे. याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं असे प्रश्नसुद्धा येत होते. त्यातूनच मग वेलाला climber, सालीला bark, डबक्याला puddle, चिखलाला mud अशा नव्या शब्दांची ओळख झाली. परवा शाळेत पायरीवरून घसरून पडले तेव्हा चौथीचाच एकजण ओरडला, ‘‘ताई, तुम्हाला mud लागलंय!’’ म्हटलं, चला ! याला तरी हा नवा शब्द नीट समजलाय!

DSC04040.JPG

जमिनीच्या भेगांना cracks म्हणतात हे समजल्यावर एकीला crack cream ची जाहिरात आठवली. अशी जोडणी केल्यामुळे नवे शब्द लक्षात रहायला खूपच मदत होते. याशिवाय connections long leaves, pointed leaves, smooth leaves, rough leaves अशा वैशिष्ट्य सांगणार्‍या थोड्या शब्दांचीपण चर्चा झाली. आता पुढचं काम असं होतं की हे सगळे जुने-नवे शब्द आठवून गटामध्ये बसूनच वहीत लिहून काढायचे. हे सगळं होईतो तास संपला.

पुढच्या तासाला सगळ्या गटांच्या सगळ्या शब्दांचं फळ्यावर एकत्रीकरण केलं. फिरायला जायच्या आधी केलेल्या याद्यांमध्ये त्यावेळी न दिसणार्‍या गोष्टी, म्हणजे moon, stars, lake, river असे शब्दही आता आले होते. जवळजवळ साठेक शब्दांची फळ्यावर गर्दी झाली. मुलांच्या चार गटांना सांगितलं की आता यातले १० -१२ शब्द, साधारण एका प्रकारात मोडतील असे, निवडा. सगळ्यांचं निवडून झालं तेव्हा आपसूकच पावसाळा, उन्हाळा, रात्र आणि झाडाचे वेगवेगळे भाग असे चार विषय त्यातून तयार झालेत असं लक्षात आलं. आता पुढच्या तासाला हे सगळे शब्द येतील असं एक चित्र गटामध्ये तयार करायचंय असं सांगितल्यावर मुलं फारच खूश झाली. आणि जे पाहिजे ते साहित्य वापरा असं म्हटल्यावर तर उत्साह आणि सर्जनशीलतेला उधाणच आलं.

पुढच्या तीन तासिका मुलं त्यांच्या चित्रांवर काम करत होती. (चित्रकलेच्या सुशांतसरांनी उदारपणे त्यांचेही काही तास दिल्यामुळे फारच मदत झाली.) काय काय वापरलं त्यांनी ! पानं, फुलं, काटक्या, पेपरमधली रंगीत चित्रं… गुलमोहराच्या कळ्यांची आवरणं चिकटवून त्याच्या शेंगा बनवल्या, काटक्यांची सालं काढून त्यापासून घरटं बनवलं, पुठ्ठ्याचा किडा बनवून त्याचे पाय दुमडून तो झाडावर चिकटवला आणि अजून बरंच काही.

एकमेकांपासून एकदम वेगळी आणि सुरेख अशी चार चित्रं तयार झाली. ती आम्ही वर्गामध्ये लावली. इंग्लिशच्या पुढच्या तासाला मी सर्व शब्दांच्या चिठ्ठ्या बनवून घेऊन गेले. सगळी चित्रं समोर ठेवली. एकेकजण उठून यायचा, एक शब्द उचलायचा, तो वाचून, अर्थ समजावून घेऊन चित्रामध्ये शोधून तिथे ती चिठ्ठी चिकटवायचा. अशा सगळ्या चिठ्ठ्या लावून झाल्या. ही सगळी चित्रं वर्गात पुढचे दोन आठवडे होती. अधून मधून आम्ही उजळणी करायचो. शब्दांशी संबंधित काही खेळ घ्यायचो. त्यातले कुठले शब्द एखाद्या पुस्तकवाचनाच्या वेळी आले तर एकमेकांना आठवण करून द्यायचो.
DSC04688.JPG

नुकतीच या सगळ्या शब्दांवर आधारित चाचणी घेतली. मराठी शब्द पाहून त्यांचे इंग्लिश शब्द लिहिणं, शब्दाचा अर्थ समजावून घेऊन त्याचं चित्र काढणं, ऐकून शब्द लिहिणं अशा वेगवेगळ्या गोष्टी चाचणीमध्ये होत्या. जवळजवळ सर्वच मुलांनी बरोबर उत्तरं लिहिली. स्पेलिंगच्या बर्‍याच चुका असल्या तरी त्या शब्दांचे उच्चार आणि अर्थ मुलांना माहीत आहेत हे कळत होतं.

मुलांना रस वाटेल असं थोडंसंच काहीतरी वर्गात द्यायची फक्त गरज असते. मग त्यांचा उत्साह आणि शिकणं पहातच रहावं.

कमला निंबकर बालभवन, फलटण
R_madhuraa@gmail.com