भाषा कोणती, बोली कोणती…?

दिल्ली विश्वविद्यालयाच्या भाषाविज्ञान विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक रमाकांत अग्निहोत्री यांचा एक सुंदर हिंदी लेख ‘शैक्षिक संदर्भ’ मधून हाती आला. यात ‘हिंदी भाषा’ ही उदाहरणादाखल म्हणता येईल. मूळ मुद्दा आहे ‘भाषा आणि बोली’ संदर्भात. मराठीच्या बाबतीतही तितकाच समर्पक.

अध्यापक स्वतःला प्रमाणीकृत भाषेचे रक्षक मानून चालतात. पण प्रश्न आहे तो आकलनाचा आणि दृष्टिकोनाचा. पहिली गोष्ट अशी की मूल शाळेत येते ते आपल्या भाषेमध्ये प्रवीण होऊन. त्यांना अवगत झालेली भाषा व्याकरणयुक्त असते. दुसरी अशी की त्याची भाषा ही शालेय शिक्षणाचे माध्यम होऊ शकलेली नाही, हा त्या मुलाचा दोष नाही. तो राजकारण आणि सत्ता ह्यावर अवलंबून असलेला प्रश्न आहे.
प्रत्येक सामान्य व्यक्ती आपली भाषा उत्तम तर्हे ने जाणते आणि बोलूही शकते. जर ती व्यक्ती आपल्याला आपली भाषा चांगली येते असे समजत असेल तर त्या समजुतीत काही वावगे किंवा अस्वाभाविक नाही. खरे तर हेच आहे की प्रत्येक जण आपल्या भाषेबद्दल पुष्कळ काही जाणत असतो. परंतु जाणणे वेगळे आणि आपण जाणतो ह्याची जाणीव असणे वेगळे. सामान्य माणसाला आपल्याला भाषेचे ज्ञान आहे ह्याविषयीची जाणीव बहुतकरून नसते. त्या जाणिवेच्या अभावाचा परिणाम असा होतो की त्याला त्याच्या स्वतःच्या भाषेच्या ज्ञानाविषयी काही सांगता येत नाही, बोलता येत नाही. एकीकडे आपल्या भाषेचे पूर्ण व्याकरण आपल्याला अवगत आहे असे जर आपण म्हटले तर ते काहीसे चमत्कारिक वाटेल. परंतु ते अगदी खरे आहे. दुसरीकडे भाषेच्या संबंधी लोक जे काही सांगतात, म्हणजे त्यांचे जे काही समज आहेत त्या समजांना आधार नाही. अशा निराधार समजांमुळे सामाजिक, मानसिक आणि शैक्षणिक नुकसान झालेले आढळून येते. आपण सगळ्यांनी भाषेची प्रवृत्ती समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ह्या नुकसानातून वाचण्याचा काही मार्ग निघू शकेल.

व्याकरणाची समज किती
आपल्या भाषेविषयीचे आपले ज्ञान परिपूर्ण आणि त्रुटिरहित असते. आपण आपली भाषा समजण्यात चूक करीत नाही, आणि केलीच तर लगेच दुरुस्त करून घेतो; आणि दुसर्या ची बोलताना चूक झाली तर ती आपण ताबडतोब त्याच्या लक्षात आणून देतो.
आपण नित्य नवीननवीन वाक्ये बोलू आणि समजू शकतो. एवढेच नाही तर कोणत्या सामाजिक संदर्भात कसे बोलले पाहिजे, काय बोलणे योग्य होईल हेही आपणाला माहीत असते. पण ही जी आपली भाषेच्या विषयीची क्षमता आहे तिची चर्चा फक्त भाषाविज्ञान जाणणार्यां पर्यंतच सीमित राहिली आहे; आणि भाषावैज्ञानिक आपसात जे बोलतात ते साधारण माणसाच्या डोक्यावरून जाते. एक उदाहरण घेऊ या.
‘गीता खाना खाता है’ हे वाक्य बरोबर नाही. हे प्रत्येक हिंदी बोलणार्याखला समजते. थोडा विचार करून तो हेही सांगू शकेल की गीता हे नाव स्त्रीलिंगी आहे त्यामुळे क्रियापदाचे रूपही स्त्रीलिंगीच वापरले पाहिजे. ते पुल्लिंगी असू शकत नाही. (भारतामध्ये अशा अनेक भाषा आहेत की ज्यात कर्ता स्त्रीलिंगी असो की पुल्लिंगी, क्रियापदावर त्याचा परिणाम होत नाही. इंग्रजी हीसुद्धा अशीच एक भाषा आहे.) परंतु खालची दोन वाक्ये पहा. त्यांना हा नियम लागू होत नाही.
मोहन ने खाना खाया|
गीता ने खाना खाया|
मोहन पुल्लिंगी आहे आणि गीता स्त्रीलिंगी तरी दोघांनी ‘खाया’.
गीता ने खाना खाई असे म्हणणे चूक आहे. ह्या बाबतीत संदेहात पडलेल्या हिंदी भाषी माणसाचे लक्ष पुढील दोन वाक्यांकडे वेधले –
मोहन ने रोटी खाई|
गीता ने रोटी खाई| तर तो सांगू शकेल की कर्त्याच्या नंतर जर ‘ने’ हा विभक्ति – प्रत्यय आला तर क्रियापद कर्माप्रमाणे चालते.
म्हणजे कर्ता कोणीही असो, पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी, त्याच्या पुढे ‘ने’ आल्यास ……खाना खाया| (खाना पुल्लिंगी आहे.)
रोटी खाई (रोटी स्त्रीलिंगी आहे. वगैरे)
पण खालच्या दोन वाक्यांच्या बाबतींत हिंदी भाषी काय म्हणेल!
मोहन ने गीता को मारा|
गीता ने मोहन को मारा| अशाच समस्यांना घेऊन भाषा-वैज्ञानिक भाषेशी झुंजत असतात. आता हेच पहा ना –
गीता मोहन को मारती है| हे तर बरोबर आहे, पण
गीता ने मोहन को मारी| चूक आहे.
असे वाक्य जर एखाद्या हिंदी भाषी माणसाने ऐकले तर त्याला लगेच समजते की कोणी हिंदी भाषी नसलेला हिंदी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्यावरून असे स्पष्ट समजते की प्रत्येक व्यक्ती आपल्या भाषेचे व्याकरण उत्तम तर्हेाने जाणते. पण त्या भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास करणे, किंवा पारिभाषिक शब्दांचा वापर करून त्यावर बोलणे, संभाषण करणे ह्या
अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. इतकेच नाही तर ती कठीण गोष्ट आहे. एवढ्याचसाठी आमच्याकडे म्हणतात – मोक्षार्थे व्याकरणमधीतव्यम्| (मोक्ष मिळवावयाचा असेल तर व्याकरणाचे अध्ययन करा.)
असो. ज्या ज्ञानाला पायाच नाही किंवा असे म्हणू शकता की ज्याचा आधार अवैज्ञानिक समज आहे अशा ज्ञानाची आम्हाला चर्चा करावयाची आहे. प्रत्येक साधारण माणूस अशा म्हणजे बिनबुडाच्या समजाचा आधार घेऊन अनेक निर्णय घेत असतो, निष्कर्ष काढत असतो, लोकांना निरनिराळ्या वर्गांत किंवा श्रेणींमध्ये वाटून देतो. त्यांपैकी काहींशी प्रेमाने व्यवहार करतो, तर काहींचा तिरस्कार करतो.
हे जे निराधार समज आहेत त्यांचे नीट आकलन करून घेणे आवश्यक आहे. त्यावाचून गत्यंतर नाही, आपली सुटका नाही.

कोणती भाषा कोणती बोली
एक मुख्य समस्या आहे भाषा आणि बोली ह्यांची. कोणत्याही सामान्य व्यक्तीला विचारा, ती पूर्ण विश्वासाने सांगेल की भाषेचे व्याकरण असते. बोलीचे नसते. भाषेची लिपी असते, बोलीची नसते. भाषेचे क्षेत्र विस्तृत असते तर बोलीचे स्थानिक किंवा संकुचित. भाषा प्रमाणीकृत असते. परिष्कृत असते. बोली तशी नसते. जिचा प्रयोग साहित्यात, पत्रव्यवहारात, कार्यालयांत किंवा कचेर्यांचत होतो ती भाषा, आणि जी सामान्यजनांच्या संभाषणात असते ती बोली. भाषेत शुद्धाशुद्धतेचा मुद्दा उद्भवतो. बोलीमध्ये तो नसतो. तेथे सगळे चालते वगैरे, वगैरे.
वास्तवात ही सारी विधाने चूक आहेत. समाजासाठी अत्यंत हानिकारक आहेत. भाषेच्या दृष्टीने पाहिले तर भाषा आणि बोली ह्यांत काही फरक नाही. दोन्हींचे व्याकरण असते. दोन्ही नियमबद्ध आहेत. भाषा कशाला म्हणावयाचे आणि बोली कशाला हा प्रश्न राजकारणाचा आहे, सामाजिक आहे. धनिक आणि सत्ताधारी जी बोलतात तिला भाषा म्हणण्याचा प्रघात आहे. तिचेच व्याकरण लिहिले जाते, शब्दकोश केले जातात. तिच्यातच साहित्य लिहिले जाते. शाळांमधून शिक्षणाचे माध्यम म्हणून तीच बोली प्रमाणीकृत भाषा म्हणून ओळखली जाते आणि तिच्याशी मिळत्याजुळत्या, संभाषणासाठी वापरल्या जाणार्यात प्रकारांना बोली म्हटले जाते. भाषा आणि समाज ह्यांच्या ह्या नात्याला नीट समजून घेतले पाहिजे.
‘भाषा’ ही एक सशस्त्र बोली आहे असे जे म्हटले जाते ते ठीकच आहे, असे म्हणावयाला हरकत नाही. मुख्य प्रश्न वास्तव दृष्टिकोनाचा आहे. एका गरीब मुलाच्या भाषेला प्रमाणीकृत भाषेच्या मापदंडाने नेहमी मोजणे हे कितपत योग्य आहे?

एकच मापदंड काय म्हणून?
व्याकरणाचा प्रश्न घ्या. हिंदीचे स्वतःचे व्याकरण आहे. पण ब्रज, मैथिली आणि अवधी ह्यांचेही आपापले व्याकरण आहे. जे हिंदीच्या व्याकरणापेक्षा वेगळे आहे. हिंदीच्या व्याकरणाला प्रमाण मानून ब्रजमध्ये लिहिलेल्या वाङ्मयाची परीक्षा करणे कितपत योग्य होईल? गेली अनेक शतके लोक संस्कृत, ग्रीक, लॅटिन ह्यांना आधारभूत मानून सर्वच भाषांमध्ये कारक विभक्तींची आठ रूपे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदीच्या व्याकरणाच्या प्रत्येक पुस्तकात संस्कृतप्रमाणे हिंदीमध्येही आठ विभक्ती आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न दिसेल. परंतु वास्तवात हिंदीमध्ये तीनच विभक्तींमध्ये नामांच्या रूपात फरक होतो. पहा –
‘लडका’ इत्यादि
कारकविभक्ती एकवचन बहुवचन
कर्ता लडका लडके
कर्म/अन्य लडके लडकों
संबोधन हे लडके! हे लडकों!
‘किताब’ इत्यादि
कारकविभक्ती एकवचन बहुवचन
कर्ता किताब किताबें
कर्म/अन्य किताब किताबों
संबोधन हे किताब! हे किताबों!
हिंदीच्या कारकविभक्तीची आणि वचनांची समज येण्यासाठी त्याहून अधिक माहितीची गरज नाही. ह्या मापदंडाने (व्याकरणाच्या नियमांप्रमाणे) हिंदीच्या दुसर्याम बोलींना जोखणे इष्ट नाही. हिंदीमधले ‘नन्द का नन्दन कदम्ब के पेड़ के नीचे धीरे धीरे मुरली बजाता है|’ हे वाक्य ब्रज भाषेत – ‘नन्द को नन्दन कदम के तरुतर धीरे धीरे मुरली बजावै|’ असे होईल.
मैथिलीमध्ये कोकिल विद्यापतीने त्याला असे म्हटले आहे – ‘नन्दक नन्दन कदमक तरुतर धीरे धीरे मुरली बजाव|’
(पहा: किशोरीदास बाजपेयी, हिंदी शब्दानुशासन; १९५८, पृष्ठ ५८२)
मैथिलीचा नियम आहे की ‘नन्द’ आणि ‘नन्दन’ ह्यांच्यामधला जो संबंध आहे तो दाखविण्यासाठी ‘क’ चा प्रयोग करावयाचा. ब्रजमध्ये तोच ‘को’ ने आणि हिंदीमध्ये ‘का’ ने व्यक्त करतात. त्यामुळे
हिंदी : नन्द का नन्दन
ब्रज : नन्द को नन्दन
मैथिली : नन्दक नन्दन
किंवा मैथिलीमध्ये नेहमीच ‘नन्द का नन्दन’ म्हणणे बरोबर होणार नाही. वरच्या उदाहरणावरून हे लक्षात येईल की हिंदी-ब्रज-मैथिली कधी एकमेकीत मिसळून जातील आणि कधी आपले वेगळे, स्वतंत्र रूप दाखवतील हे सांगणे कठीण आहे.
आपण जर मैथिली, सिंधी, कोंकणी, नेपाळी किंवा मणिपुरी ह्यांना ‘भाषे’चा दर्जा देऊ इच्छित असाल तर तो प्रश्न राजकीय आहे. भाषिक नाही.

सत्तेशी जोडलेला प्रश्न
व्याकरणामुळे उद्भवलेला शुद्ध-अशुद्ध हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतो. विशेषतः अध्यापक म्हणजे शिक्षक स्वतःला शुद्ध आणि प्रमाणीकृत भाषेचे संरक्षक मानतात. मी पहिल्यानेच सांगितले आहे की हा प्रश्न समजुतीचा आणि दृष्टिकोनाचा आहे. पहिली गोष्ट- मूल जी भाषा घेऊन शाळेत येत असेल ती भाषा पूर्णपणे व्याकरणयुक्त असते. दुसरी गोष्ट- त्याची बोली शिक्षणाचे माध्यम होऊ शकली नाही ह्यात त्या मुलाचा काही दोष नाही. हा राजकारण आणि सत्ता ह्यांच्या क्षेत्रातला प्रश्न आहे. तिसरी गोष्ट- प्रमाणित भाषा शिकताना मूल ज्या चुका करते त्यांना काही आधार असतो. कोठल्याही आधाराशिवाय किंवा मनातल्या व्यवस्थेच्या अभावी त्या चुका होत नसतात. त्यांच्यामागे व्यवस्था असते, व्यूहबद्धता असते. चौथी गोष्ट अशी की शिक्षकाने चूक दाखवून दिल्यावर मुले ती चूक ताबडतोब दुरुस्त करीत नाहीत. पाचवी गोष्ट – कोणतेही मूल कोणतीही भाषा शिकताना (मग ती पहिली दुसरी किंवा दहावी असो) चुका केल्याशिवाय शिकत नसते.
साहित्याचाच प्रश्न घ्या. नेहमी असे म्हटले जाते की जिच्यामध्ये शिष्टसाहित्य लिहिले जाते ती भाषा आणि बाकीच्या सर्व तिच्या बोली. साधारणतः माणसे असेच समजतात की खडी बोली ही हिंदीची प्रमाणीकृत भाषा आहे आणि साहित्य तिच्यातच लिहिले जाते. वृत्तपत्रे, कार्यालये, कचेर्याि, ह्यांत तिचाच उपयोग होतो. ब्रज, अवधी, मैथिली तिच्या उपभाषा (बोली) आहेत.
काय गंमत आहे. अवधी, जिच्यात राम चरितमानस लिहिले गेले. ब्रज, जिच्यात सूरदासानेच नाही तर अनेक हिंदुमुसलमान लेखकांनी आपल्या थोर रचना केल्या आणि मैथिली, जिच्यात विद्यापतीसारखा श्रेष्ठ कवी होऊन गेला, आज हिंदीच्या जननी मानल्या जाण्याऐवजी तिच्या बोली मानल्या जात आहेत. जेव्हा सत्तेचे आणि राजकारणाचे केन्द्र कनौज होते, तेव्हा साहित्याची श्रेष्ठ भाषा होती ‘अपभ्रंश’. खडी बोली, ब्रज, ह्यांचे तेव्हा जे काय रूप असेल – त्या बोली मानल्या गेल्या. त्याचप्रमाणे जेव्हा राजकारणाचे आणि सत्तेचे केन्द्र ब्रजक्षेत्र होते तेव्हा ब्रज ही शिष्ट साहित्याची भाषा झाली, आणि दिल्ली मेरठची खडीबोली तिची बोली म्हणवली गेली. शासनाचे केन्द्र दिल्ली-मेरठकडे सरकले तर ब्रज, अवधी तिच्या बोली म्हणवल्या गेल्या. खरे तर भाषा आणि राजकीय सत्ता ह्यांचा परस्परसंबंध समजण्याचा सवाल आहे. हा सवाल समंजस दृष्टिकोन बनविण्याचा आहे. जो वैज्ञानिक आणि विधायक असेल. म्हणून साहित्याच्या आधारावर भाषा आणि बोली ह्यांच्यामध्ये फरक करता येत नाही.

कोणतीही बोली, कोणतीही भाषा
लिपीचा प्रश्न घ्या. लोक नेहमी अशा गोष्टी करतात की भाषेचा आणि लिपीचा जणू काही जन्मजात संबंध आहे. खरे पहिल्यास जगातल्या सर्व भाषा एकाच लिपीमध्ये लिहिल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे एकच भाषा लिहिण्यासाठी जगातल्या सगळ्या लिपी वापरता येतात. उदाहरणादाखल हिंदी आणि इंग्रजी भाषा आणि देवनागरी आणि रोमन लिपी घ्या.
हिंदी (देवनागरी)
मोहन खेल रहा है|
हिंदी (रोमन)
Mohan Khel rahaa hai
इंग्रजी (रोमन)
Mohan is playing.
इंग्रजी (देवनागरी)
मोहन इज प्लेइंग|
भारतातल्या अनेक भाषा देवनागरीमध्ये लिहिल्या जातात आणि एक संस्कृत भाषेसाठी भारतातल्या पुष्कळ लिपींचा उपयोग होऊ शकतो. असेही नाही की लिपी असल्यासच एखाद्या भाषेत साहित्यनिर्मिती होऊ शकते. ऋग्वेदासारख्या साहित्याला अनेक शतके लिपीची गरज पडली नाही. सार्याा भारतात त्याचे पठण एकाच प्रकारे होत असते. गावागावामध्ये रामचरितमानस नित्य गायले-ऐकले जात असते-लिपीची त्यासाठी आवश्यकता नाही. भाषा प्राचीन आहे. लिपीचा शोध कालचा-अलीकडचा-आहे. लिपी असणे वा नसणे ह्यावरून भाषा आणि बोली ह्यांत फरक करणे योग्य होणार नाही. आपण काही मित्रमंडळी मिळून अगदी सहजपणे एक नवीन-वेगळी-लिपी बनवू शकता. अशा लिपीला शासनाचा पाठिंबा कितपत मिळेल हा प्रश्न अलाहिदा. संथाली आज कितीतरी लिपींमध्ये लिहिली जाते – देवनागरी, रोमन, बंगाली, उडिया आणि ओलचिक्की. ह्यांच्यामधली कोणती लिपी प्रमाणित होईल हा प्रश्न राजकीय स्वरूपाचा आहे. अजून द्वंद्व (झगडा) चालू आहे.
‘विस्तृत क्षेत्र आणि व्यापक प्रयोग’ ही सुद्धा एक गंमतच आहे. पुन्हा पुन्हा सांगा की हिंदीचे क्षेत्र विस्तृत आहे, प्रयोग व्यापक आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स लावा, वर्तमानपत्रांत मोठमोठ्या जाहिराती छापा, रेडियो-टीव्हीवर तिचाच वापर करा-आणखी काय काय करा- त्याची गणतीच नाही. संवैधानिक राजभाषा (घटनेप्रमाणे राज्यकारभाराची भाषा) येथपासून तिचा दर्जा राष्ट्रभाषेपर्यंत वाढवा आणि म्हणा की हिंदी झाली ‘भाषा’ आणि मैथिली, बुन्देली आणि भोजपुरी ह्या सार्याभ तिच्या ‘बोली’. ह्या बोली बोलणार्यां ची गणना हिंदी भाषकांमध्ये करा आणि म्हणा की कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत करोडो लोक हिंदीभाषी आहेत. अरे, जरा धीर धरा, लक्ष द्या, विचार करा – अखेरीस हिंदी कोठे बोलली जाते? प्रमाणित हिंदीचा वापर कोठे कोठे होतो?
काय तुम्ही आणि तुमची दोस्तमंडळी घरी किंवा आपसात हिंदीत बोलता की तुम्ही भोजपुरी, अवधी, मैथिली, मघई, बुन्देली, ब्रज ह्यांच्यापैकी एकीमध्ये बोलता? प्रमाणित हिंदी कदाचित मेरठ, अलाहाबादमध्ये आणि बनासरच्या काही भागात बोलली जात असेल. काय चम्बा आणि हमीरपुर (हिमाचल) रोहतक आणि भिवानी (हरियाणा) जैसलमीर आणि सवाई माधोपुर (राजस्थान) छपरा आणि वलिया (बिहार) तसेच छिन्दवाडा आणि रायपूर (मध्यप्रदेश) येथे प्रमाणित हिंदी बोलली जाते?
मी जेव्हा घरात हिंदी बोलतो, तेव्हा माझी खाली दिलेलली वाक्ये ऐकून लोक मला हसतात. पण जेव्हा त्यांची मुले तसेच बोलतात तेव्हा ते ओशाळतात.
मैंने बाजार जाना है|
(मले बाजारले जायाचं हाये)
मेरे को काम है| (मले काम व्हय)
अशी ही अनागर वाक्ये आहेत.
मुझे एक कौली दे दो|
जरा सब्जी को छेडा दे देना|
जे पंजाबी म्हणून माझी थट्टा करतात ते हे विसरतात की राजकारणाचे आणि सत्तेचे केन्द्र आता दिल्ली झाले आहे. आता हिंदी येथलीच चालेल. ही हिंदी चालू द्यावयाची नसेल तर जे लाखो पंजाबी लोक आपली मातृभाषा हिंदी सांगतात त्यांची किंवा ज्यांची मातृभाषा हिंदी गणली जाते त्यांची संख्या हिंदी भाषकांमधून वगळा.
स्पष्ट आहे की लिपी, व्याकरण, साहित्य, विस्तृत क्षेत्र आणि व्यापक प्रयोग ह्यांच्या आधारावर भाषा आणि बोली असा फरक करणे अशक्य आहे. मग, तरीही, हा असा फरक का केला जातो? आणि तो फरक इतका गंभीरपणे केला जातो की आम्हाला हिंदीला ‘भाषा’ आणि ब्रज-बुन्देलीला ‘बोली’ म्हणताना कसलाही संकोच वाटत नाही. हिंदीला एक प्रमाणीकृत भाषा आणि ब्रज, अवधी इत्यादींना तिच्या बोली बनविण्याचा जो खटाटोप सतत चालला आहे त्याच्याकडे जास्त लक्षपूर्वक पाहिले पाहिजे आणि त्याला नीट समजून घेतले पाहिजे.