प्रयोग आणि खेळ
मी एका नामवंत शाळेत शिकले. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त काही उपक्रम नसले तरी शिक्षक मुलांना मनापासून शिकवत असत असं आठवतं. शाळेला चांगली इमारत, मोठी प्रयोगशाळा होती. विज्ञानाच्या तासाला एकेक वर्ग तिथे जाऊन त्यांना प्रयोग दाखवण्यात येत. समोर बसून पन्नास-साठ जणी ते पाहात असू – निरीक्षण करत असू आणि मग प्रयोग वहीत ते नीट लिहून काढत असू. हवेत ऑक्सिजन २०% असतो, अमुक इतक्या हैड्रोक्लोरिक आम्लात अमुक इतके सोडियम हैड्रॉक्साइड घातले की त्याचे उदासिनीकरण होते. मग ते मोजणं, न सांडता एकत्र करणं, ताटलीत मेणबत्त्या लावणं, तिच्यात पाणी ओतणं – मेणबत्ती विझल्यावर चढलेली पाण्याची पातळी मोजणं सगळं काही शिक्षक करून दाखवायचे. त्यात हुशार मुलींना मदत करायला मिळायची. सगळं नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे ठरल्यासारखं पार पडायचं.
पुस्तकात दिलेलं प्रयोगात दाखवता आलं नाही तर आपलं काहीतरी चुकलं ही १०० टक्के खात्री असायची. इतकी की शाळा संपून कॉलेज, मग इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकल्समधेसुद्धा ‘दिलेल्या सूत्राप्रमाणे उत्तर आलं पाहिजे’, हे मनात इतकं ठसलेलं की प्रयोगातली निरीक्षणं थोडी ‘ऍडजस्ट’ करून उत्तरं बरोब्बर यायचीच.
प्रयोग हा खर्या् अर्थानं करून बघणं जमायचंच नाही. आपल्याला काही वेगळी उत्तरंही सापडण्याची शक्यता आहे असा विचार कधी मनात आलाच नव्हता. सगळं शिक्षण हे ‘सांगितल्याप्रमाणे करून दाखवणे’ यावर व्यवस्थित पार पडलं होतं.
पुढं पालकनीतीत आल्यावर, मुलांची शिक्षणं चालू असताना मला संजीवनीने एक नवीन प्रयोग सांगितला. पूर्वीचा हवेत २०% ऑक्सिजन असतो हाच प्रयोग – थोडा सुधारून वाढवलेला. एकदा एक मेणबत्ती लावून – ती विझल्यावर पातळी मोजायची – नंतर दोन मेणबत्त्या लावून ती विझल्यावर पातळी मोजायची आणि मग तीन मेणबत्त्या लावून. प्रत्यक्ष प्रयोग करून बघितला मुलांबरोबर.
पहिल्या प्रयोगात ग्लासात २०% आकारमानाइतकं पाणी वर चढलं. दोन मेणबत्त्यांनी ३५% चढलं आणि तीन लावल्यावर ४०% ! मुलं म्हणाली, दोन मेणबत्त्या लावल्यावर हवेत ३५% ऑक्सिजन असतो आणि तीन लावल्यावर ४०% !!
नाही… नाही… असं कसं होईल? मग का चढलं पाणी जास्त? तेव्हा डोक्यात एकदम ट्यूब पेटली – हा मूळ प्रयोग भलताच चुकीचा आहे. कितीतरी कारणांनी – एक तर मेणबत्तीच्या ज्वलनामुळे प्राणवायूचा कार्बनडाय ऑक्साईड होणार. तो देखील ग्लासमधेच राहणार. मग आकारमान बदलण्याचं कारण काय? एवढ्याशा आकारमानात वायूंच्या वेगवेगळ्या घनतेमुळे फारसा फरक पडणार नाही. मग?
कारण स्पष्ट होतं – मेणबत्ती जवळची हवा गरम झाली, प्रसरण पावली होती. ती विझल्यावर आणि हवा पुन्हा गार झाल्यावर आकुंचन पावली, त्यामुळे पाणी वर चढलं. दोन – तीन मेणबत्त्या लावल्या तेव्हा जास्त उष्णता निर्माण झाली. जास्त तापल्यानं हवा जास्त प्रसरण पावली होती, म्हणून पाणी जास्त वर चढलं.
अरे बापरे, तीस पस्तीस वर्ष लागली आपल्याला हे समजायला, की शाळेच्या पुस्तकातला छोटासा प्रयोग चक्क संपूर्ण चुकीचा आहे ! जेव्हा वायूचे आकारमान, त्यावर उष्णतेचा परिणाम इ. गोष्टी मी शिकले, तेव्हाच मला हे समजायला हवं होतं. खरं म्हणजे कोणत्याही पुस्तकात छापलेल्या सर्व गोष्टी खर्याे असतात असं काही मी कधीच समजत नव्हते. पण विज्ञानाचं पुस्तक? त्यावर आमची संपूर्ण श्रद्धा ! आपणच इतरत्र शिकलेलं वापरून पाहायची आणि दिलेले प्रयोग नाटकाप्रमाणे किंवा सांगितलेल्या पूजापाठाप्रमाणे पढवलेल्या पद्धतीने न करता, त्याच्याशी खेळायची बुद्धीच कधी झाली नाही. म्हणजे ही केवढी अंधश्रद्धा ! ती देखील छुपी. तेव्हाच वाटायला लागलं – छे हे बदलायला हवं. पुढच्या पिढीपर्यंत आपण ही अंधश्रद्धा अशीच पोचवायला नको.
पण त्यासाठी काय करायचं? पुस्तकात दिलेलं खरंच असतं असं नाही- असं शिकवायचं? का त्यांना सतत निरीक्षण करण्यातली मजा शिकवायची? निरीक्षणाचा अर्थ आपला आपण लावायला शिकवायचा? त्यासाठी मिळून प्रयोग करत राहायचे? मग इकडे तिकडे पुस्तकं शोधायला सुरवात झाली. मध्यप्रदेशच्या ‘एकलव्य’ने तयार केलेली विज्ञानाची पाठ्यपुस्तकं पाहिली. एकलव्य प्रकाशित करत असलेल्या ‘शैक्षिक संदर्भ’ या (विज्ञान) शिक्षकांसाठी असलेल्या द्वैमासिकाचीही ओळख झाली. वर्ष दोन वर्षातले अंक पाहून असं वाटलं की हेच, हेच तर म्हणायचं होतं आपल्याला. विषय कोणताही घेतला, तरी त्या विषयाचा आपल्या जीवनाशी कुठे कुठे संबंध येतो, त्याचे संदर्भ दुसर्याी विषयात कुठे गुंफलेले आहेत, एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत कसं जायचं, सामाजिक वास्तवाशी त्याचं नातं कसं ओळखायचं या दिशेनं द्वैमासिकात मांडणी असे. शिक्षकांनी मुलांना मोकळीक कशी द्यावी? मुलांकडून पाठ करून घेण्याऐवजी समजूत कशी वाढवावी? याची उदाहरणे यात पाहायला मिळत.
जेव्हा असं लक्षात आलं की हे द्वैमासिक केवळ हिंदी असल्याने ते आपल्याकडे वाचलं जात नाही, तेव्हा मग गट जमून असं ठरवलं की पालकनीतीनं हे द्वैमासिक मराठीत सुरू करावं. त्यालाही सहा वर्षे होऊन गेली. या द्वैमासिकात प्राथमिक गटातल्या मुलांसाठीही काही हवं अशी मागणी / सूचना यायला लागल्या, तेव्हा या गटासाठी सुरुवात म्हणून काही पुस्तिका मराठीत काढाव्यात असं ठरलं. त्यासाठी अरविंद गुप्तांनी जगभरातून शोधून काढलेली आणि हिंदीत अनुवाद केलेली पुस्तकं निवडली. ही सहा पुस्तकं आता संदर्भने मराठीत आणली आहेत.
मुलांचं आणि परिसराचं नातं जुळावं, आसपास जे जे असेल ते वापरून मुलांनी प्रयोग आणि खेळ करावेत. ते करताना त्यांना मजा यावी, त्यापुढे जाऊन त्या खेळातल्या निरीक्षणांचे त्यांनी अर्थ लावावेत. कदाचित त्या खेळाचा त्यांनी आज लावलेला अर्थ हळूहळू बदलेल. मुलं मोठी होतील तसा तो अर्थही मोठा होत जाईल. पण त्या सगळ्या खेळण्यात मुलं त्यांना माहीत असलेल्या विज्ञानाचा उपयोग करतील, पुस्तकातल्या विज्ञानाच्या नियमांचा अनुभव घेतील. अशी काही पुस्तकं गुप्तांनी हिंदीत आणली होती.
त्यातली ‘पाण्याशी खेळूया’, ‘तराजूशी खेळूया’ तसेच ‘आरसे आणि प्रतिबिंब’ ही पुस्तकं तर कशाबद्दल आहेत, हे शीर्षकावरूनच स्पष्ट होतं. या सगळ्या पुस्तकात सुरुवातीला अगदी प्राथमिक पातळीवरचे खेळ दिलेले आहेत. पाणी उडवणं, शिंपडणं, वाहू देणं हे करता करता ते मोजणं, त्याची वक्रनलिका बनवणं, त्यात काही विरघळवणं अशा गोष्टी सुरू होतात. मग येतो तरंगणे, बुडणे हा भाग. तो समजण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे छोटे-मोठे असंख्य खेळ इथे सुचवले आहेत. इतक्या बारकाईने ते सुचवलेत की एकेका प्रकरणामधून शिक्षकांना अनेक प्रकल्प सुचतील. मुलांच्या समजेप्रमाणे, ते प्रकल्प व्यापकही होऊ शकतील. त्यामुळे ही पुस्तकं कितवीच्या मुलांसाठी – याचं उत्तर ‘दुसरीपासून ते नववीपर्यंतही उपयुक्त’ असं आहे. पाण्याच्या खेळांमधे भूमितीतलं क्षेत्रफळ येतं – होड्या करून बघताना. थेंब थेंब मोजताना बारकाईने निरीक्षण करावं लागतं आणि शिवाय हातांना कौशल्याच्या कामाचा आणि नेमकेपणाचा सराव होतो. पाण्याचा उपयोग करून भिंगं तयार होतात, तशी नाडीचा वापर वक्रनलिका म्हणून करून घड्याळं. अशाच पद्धतीनं पावसाचेसुद्धा खेळ किंवा प्रकल्प यातून आपल्याला मिळतात.
आरसे- सपाट किंवा वक्र – हा खेळण्याचा फारच छान प्रकार होतो. आरसे वापरून अनेक कोडी तयार करता येतात आणि सोडवताही येतात. पुस्तिकेतल्या कोड्यांमधे केलेला नकाशांचा आणि घड्याळाचा वापर फारच नावीन्यपूर्ण आहे.
तराजूच्या खेळाची सुरवात होते तराजू तयार करून. मग वेगवेगळ्या वस्तूंची वजने करणे, वेगळ्या वजनाच्या वस्तू वापरून तराजू संतुलित करणे, पुढची पायरी म्हणून छानसं टांगणाळं तयार होतं. या पुस्तिकेत पुढे काही उदाहरणे सोडवायला दिलीत. मुलांनी जर तराजूचा खेळ स्वतः, एकट्यानं, लक्ष देऊन खेळला असेल, तर ही उदाहरणं सोडवणं म्हणजे एखादं कोडं सोडवण्यासारखंच इंटरेस्टिंग होतं. आणि उदाहरणं सोडवून झाली की त्या मुलाला तरफेचे नियम आणि गुरुत्वमध्य काढण्यामागची कल्पना म्हणजे अगदी हातचा मळ.
अशाच पद्धतीने परिसरातले प्रयोग हे लहान मुलांना, म्हणजे अगदी चौथीपासूनच्या, बारकाईने निरीक्षण करायला आणि ती निरीक्षणे नोंदवायला शिकवतील. निरीक्षण नोंदवायचं म्हणजे काही फक्त याद्या करायच्या किंवा तक्ते करायचे असं नाही. आपण एखाद्या शेताचा किंवा बागेचा फेरफटका केल्यानंतर त्याचं चित्र-नकाशा काढणं हीसुद्धा नोंद ठेवायची सुंदर पद्धत आहे. या पुस्तिकेत दिलेल्या विविध प्रकारच्या निरीक्षणानंतर विज्ञानातल्या वर्गीकरणाच्या संकल्पनेपर्यंत मुलं जाऊ शकतात.
वर्गीकरणाची संकल्पना सांगणारी सुंदरशी सचित्र कथा म्हणजे विनूचे प्राणी ही पुस्तिका. तशीच आणखी एक सचित्र पुस्तिका म्हणजे अंड्यातून पिल्लू. पक्षी अंडी घालतात, ती उबवतात मग त्यातून पिल्लू बाहेर येतं-इतकं तर सगळ्यांनाच माहीत असतं. पण अंडं फोडून खाल्लेलं असतं, तेव्हा त्यात पिल्लू नसतं. मग हे पिल्लू वाढतं कसं? हेच या पुस्तकात सांगितलं आहे. यातली एक आकर्षक अशी कल्पना म्हणजे विज्ञानातल्या संकल्पनांना साहित्याची असलेली जोड. अंड्यातून पिल्लू पुस्तकात कै. ना. ग. गोरे यांनी लिहिलेली ‘जन्म’ नावाची उत्कृष्ट कथा आहे.
परिसरातले प्रयोग करताना मुलांची नकळत पर्यावरणाशी जवळीक होते. पण त्याचा अर्थ मुलांच्या मनात मुरेल अशी सुंदर कथाही त्यात आहे – अफलातून अलमारी. कोणतेही तात्पर्य किंवा बोध किंवा उपदेश मुलांना देण्याची मग गरजच उरत नाही.
पाणी, तराजू, आरसे आणि परिसर या चारही विषयांच्या पुस्तिका यापूर्वी युनेस्कोच्या एका शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तयार झाल्या होत्या. नॅशनल बुक ट्रस्टने Unesco Source Book for Science in Primary School
हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे, पण ते विज्ञान शिक्षकांसाठी लिहिले आहे.
संदर्भने या पुस्तिका तयार करताना मात्र त्या संपूर्णपणे मुलाला स्वतःच वाचता येतील, त्याप्रमाणे खेळता येईल अशा पद्धतीने केल्या आहेत. शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे ‘दोन शब्द’ दिलेले आहेत. पुस्तिकांचा विशेष असा की हे दोन शब्द पालकांनी वाचले, की त्यांनाही थोड्या काळासाठी शिक्षक होता येईल. कारण वैज्ञानिक अनुभव घेण्या-देण्यासाठी विज्ञान माहीत असायची काहीच गरज नाही.
अंड्यातून पिल्लू
विनूचे प्राणी
पाण्याशी खेळूया
तराजूशी खेळूया
आरसे आणि प्रतिबिंब
परिसरातले प्रयोग.
आपल्या जरूर संग्रही असावा असा या सहा पुस्तिकांचा संच पालकनीतीच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सवलतीची किंमत रु. १००/-