वाचणं किती मजेचं

संध्याकाळच्या जेवणाबरोबर एक तरी पुस्तक फस्त करणं हा आमचा आवडता उद्योग. पोळीचे, वरण-भाताचे घास भरवताना एकीकडे गोष्ट सांगायची नाहीतर पुस्तक वाचायचं. अशाप्रकारे अनेक पुस्तकांचं पारायण झालं, गोष्टी तोंडपाठ झाल्या. लहान मुलांना आवडतील अशी पुस्तकं शोधत राहणं हा एक छंदच जडला.

एक दिवस पुस्तक वाचून संपतं न संपतं तोच पार्थोनं विचारलं, ‘‘आई, कशासाठी वाचायचं गं? नाहीच वाचलं तर?’’ पाच वर्षाच्या मुलाला समजेलसं उत्तर देऊन मी ती वेळ निभावून नेली. पण या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मी कितीतरी दिवस शोधत होते. का वाचायचं? हे न कळताच वाचत राहण्यात काही अर्थ आहे का असा प्रश्नही मनात उमटायचा. अशातच ‘कजा कजा मरू’ प्रकाशनाचं ‘वाचणं किती मजेचं’ हे मन्रो लीफचं अनुवादित पुस्तक हातात आलं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर अलगद मला सापडलं.

‘आपण वाढतो किंवा मोठे होतो म्हणजे नेमकं आपण काय काय करतो? शरीर ताकदवान होण्यासाठी आपण जसा चौरस आहार घेतो तसंच चांगल्या विचारांसाठी आपल्याला आपल्या मानसिक विकासाकडेही लक्ष द्यावं लागतं. आपण कोणत्या प्रकारचं जेवतो, कशा प्रकारचे विचार करतो, यावरच आपण माणूस म्हणून कसे असणार हे अवलंबून असतं. सुरुवातीला आई-बाबांकडून आणि नंतर नातेवाईक, मित्रपरिवार, शाळेतले शिक्षक, परिसरातील इतर माणसांकडून आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. पण आपल्याला जेव्हा वाचायला यायला लागतं तेव्हा अचानक कितीतरी नवीन मित्रांचे आवाज आपल्याला ऐकू यायला लागतात. आपला नवीन जगाशी संपर्क सुरू होतो. पुस्तकातून आपल्याला हवं ते शिकता येतं. हे शिकलेलं पुढे आयुष्यभर उपयोगी पडतं. याशिवाय वाचायचं आणखी एक कारण म्हणजे केवळ मजेसाठी, आनंदासाठी. पुस्तकातून आपल्याला जंगलातले प्राणी, दुसर्याल देशातली चित्रविचित्र माणसं भेटतात. गोष्टीतल्या पात्रांशी मैत्री करून त्यांच्याबरोबर जगाची सफर करता येते. हे सगळं करताना मज्जा तर येतेच शिवाय आपलं ज्ञानही वाढतं. पुस्तकाची सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे आपण आपल्या खुर्चीवर बसल्या बसल्या हवं तिथं जाऊ शकतो. पुस्तकातल्या पात्रांबरोबर हवी ती मजा करू शकतो आणि वाटेल तेव्हा परत घरी येऊ शकतो. म्हणून तर वाचण्यात खूपच मज्जा येते.’

मन्रो लीफच्या पुस्तकानं मुलांना हे सगळं समजावून दिलंय ते संवाद रूपात. अगदी कुक्कुलं बाळ असताना केलेल्या वॅऽवॅ पासून सुरुवात करून लेखक मुलांना पुस्तकांच्या दुनियेत नेतो. मुलांना उद्देशून जरी हे पुस्तक लिहिलेलं असलं तरी पुढे त्याची भाषा थोडी जड होत जाते. त्यामुळे थोड्या मोठ्या मुलांना (सातवी-आठवीतल्या) हे पुस्तक समजेल, आवडेल असं वाटतं. पालकांसाठी तर हे पुस्तक छानच आहे. मात्र या पुस्तकावर सफदर हाश्मींची ‘किताबे आपके साथ रहना चाहती है’ ही कविता आवर्जून छापायला हवी होती असं वाटलं. वाचणं किती मजेचं आहे हे जाणून घेत असतानाच एका गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावं लागलं. पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना ‘वाचनातला आनंद’ असल्यामुळे स्त्री-पुरुषांच्या भूमिकांकडे साचेबंद दृष्टीने पाहिलं जातं आहे, याच्याकडे डोळेझाक तर होत नाही ना? असा प्रश्न पडला. याच पुस्तकातली काही वाक्य बघू. ‘तुझ्या बाबांना जशी वर्तमान पत्रातून सगळी माहिती कळते, तशी तुलाही.’ ‘तुझ्या आईला सुद्धा तिच्या कुटुंबासाठी, घर चालवण्यासाठी वाचनाची खूपच मदत होते. पुस्तकातली पाककृती वाचून ती नवीन पदार्थ बनवू शकते.’ किंवा ‘मुलींना पण पुस्तकात वाचून विविध गोष्टी शिकता येतील.’ इथे मुलींना पण ‘शिकता येईल?’ ‘पण’चा अर्थ काय? पुस्तक वाचताना आपण मुलांना नकळत साचेबद्ध विचार करायला लावत नाही का? स्त्रियांचे स्थान दुय्यम असल्याची भावना मुलांमधे निर्माण करत नाही का? याचा अवश्य विचार व्हायला पाहिजे. पुस्तकात अशा गोष्टी टाळता आल्या तर बरं होईल.

याच प्रकाशन मालिकेतली आणखी काही पुस्तकं वाचायला मिळाली.

गरवारे बालभवनच्या ‘कजा कजा मरू’ प्रकाशनानं याआधी अंगठ्याची चित्रं, अक्षर चित्रं, पानांचे प्राणी, बियांचे प्राणी यासारखी स्वअध्ययन पुस्तकं प्रकाशित केली आहेत. आता ही नंतरची पुस्तकं आहेत. तसंच तूच का गं माझी आई?, खट्याळ उंदीर, मांजरांची वरात ही अतिशय सुंदर पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत. तीन ते सहा वयोगटातल्या मुलांना आवर्जून वाचून दाखवावीत अशी ही तीन पुस्तकं.

‘वाचणं किती मजेचं’ या पुस्तकाच्याच लेखकाचं ‘बोबक बकरा’ हे आणखी एक पुस्तक. बोबक नावाचं कोकरू, पुढारी बकर्यांाच्या मागे मागे फिरता फिरता वैतागून जातं. शेवटी दुसरे जातात म्हणून आपण एका जागेवरून दुसर्यात जागी जायचं नाही असा निश्चय ते करतं. तर स्वतःचा विचार स्वतः करायचा, असं ठरवतं. ते आता जास्त आनंदी होतं. अतिशय संवेदनशील पद्धतीनं लिहिलेलं पुस्तक म्हणजे कोणत्याही अभिनिवेशाशिवाय, त्याच तरलतेनं अनुकरण करणार्याआ मानसिकतेला दिलेली चपराक आहे.

या मालिकेतलं दुसरं एक पुस्तक म्हणजे ‘पाच चिनी भाऊ’. पाच चिनी भाऊ त्यांच्या आईबरोबर राहायचे. ते दिसायला अगदी एकसारखे पण प्रत्येक भावाचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य असतं. एका भावाला विनाकारण फाशीची शिक्षा होते. त्यावेळी दुसरा भाऊ त्याच्या जागी जातो. दिसायला अगदी एकसारखे असल्यामुळे एका भावाच्या जागी दुसरा आल्याचं कुणालाचं समजत नाही आणि त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे प्रत्येकवेळी ते दिलेल्या शिक्षेतून सही सलामत सुटतात. प्रत्येक वेळी एकेक भाऊ वाचतो आणि शेवटी सगळेजण आणि त्यांची आई मजेत राहतात. अशी ही अतिशय छान गोष्ट मुलांना खूपच आवडेल अशी आहे. मात्र चार भाऊ शिक्षेतून कसे वाचतात ते सांगताना पाचव्या भावाच्या शिक्षेचा उल्लेखच या गोष्टीत नाही.

गोष्ट वाचून दाखवल्यावर लगेचच पार्थोनं विचारलं, ‘आई, पाचवा भाऊ त्याचा श्वास कितीही वेळ रोखून धरणारा होता ना? त्याला तशी शिक्षा झालीच नाही का?’ प्रश्न बरोबर होता. मग मी त्याला म्हटलं, ‘अरे ही गोष्ट मुलांना पूर्ण करायला सोडलेली दिसतेय. चल, आपणच पाचव्या भावाला शिक्षा देऊन गोष्ट पूर्ण करूया.’ मग पार्थोनी आणि मी दोन वेगवेगळे पर्याय घेऊन गोष्ट पूर्ण केली. मुलांसाठी अशी open ended गोष्ट तयार करायला काहीच हरकत नाही असं वाटलं. मुलं स्वतःचं डोकं चालवून गोष्ट मजेत पूर्ण करतात. मुलांच्या पर्यायाबरोबरच आपणही इतर काही पर्याय पुढे ठेवून गोष्ट पूर्ण करू शकतो. मात्र ही गोष्ट मुलांना खूप आवडते हेही माझ्या लक्षात आलं.

‘लाल फुगा’ या पुस्तकात संवेदनशील पण एकाकी मुलगा आणि लाल फुगा यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. पास्कलला ना बहीण ना भाऊ. खेळणार कुणाशी? त्याला खूप वाईट वाटायचं. मांजरीचं, कुत्र्याचं त्यानं घरी आणलेलं पिल्लू त्याची आई घर घाण होईल म्हणून घराबाहेर काढते. त्यांच्या स्वच्छ नीटनेटक्या घरात पास्कल पुन्हा एकदा एकटा होतो. पास्कलचा हा एकटेपणा, त्याला मिळालेल्या मित्रामुळे, लाल फुग्यामुळे कुठल्या कुठे पळून जातो. हा फुगा साधासुधा नाही – जादूचा आहे. तो लहान मुलांसारखाच वागतो. हट्ट करतो, पास्कलनं सांगितलेलं ऐकत नाही, पास्कलच्या मैत्रिणीसमोर त्याची फजिती करतो. पण त्याचवेळी मुख्याध्यापकांनी पास्कलला ऑफिसमधे कोंडून ठेवलेलं त्याला अजिबात आवडत नाही. शेवटी पास्कलला ऑफिस उघडून बाहेर काढेपर्यंत फुगा मुख्याध्यापकांचा पिच्छा सोडत नाही.

लहान मुलांचं भावविश्व समजावून न घेता मोठी माणसं विनाकारण किती जाचक नियम करतात. मात्र त्याही परिस्थितीत मुलांनी स्वतःची लवचीकता वापरून घेतलेला आनंद मोठ्या माणसांना अंतर्मुख करून सोडेल असाच आहे. ‘No body can eat just one’ वेफर्सची जाहिरात बदलून या पुस्तकासाठी ‘No body can read it just once’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. मी स्वतः पार्थोची once more ची मागणी मान्य करून सलग तीनवेळा ही गोष्ट वाचून दाखवली आहे. एकवेळ आपल्याला वाचून वाचून कंटाळा येईल पण मुलांची ‘अजून एकदा, आता शेवटचं’ अशी फर्माईश संपणार नाही.

थोड्या मोठ्या, आठ ते दहा वयोगटासाठी देणारं झाड, जॉनी ऍपलसीड आणि अमर पत्र अशी पुस्तकं आहेत – निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याचे वेगवेगळे पदर दाखवणारी. त्यातलं देणारं झाड हे पुस्तक छोट्या मुलांनाही आवडेल, समजेल असं आहे. झाडं आपल्याला फळं देतात, सावली देतात, घरांसाठी, बोटीसाठी लाकूड, प्राणवायू आणि कितीतरी काय काय… याउलट आपण झाडांना काय देतो? कुर्हािडीचे घाव आणि आगीचे चटके. तरीही झाडं किती प्रेमळ, दयाळू असतात, ते ह्या गोष्टीत सांगितलं आहे. ती देतात आणि देतच राहतात.

मात्र सगळीच माणसं अशी स्वार्थी, निसर्गाला ओरबाडणारी नसतात. त्यातलाच एक जॉन चॅपमन. एकदा जंगलात लांब चक्कर मारून विश्रांतीसाठी जॉनी झाडाखाली बसला. तिथे सफरचंद खाता खाता त्याच्या मनात विचार आला, सगळ्याच सफरचंदाच्या बिया एकत्र गोळा केल्या आणि जागोजागी जमिनीत लावल्या तर लवकरच पूर्ण देश सफरचंदाच्या झाडांनी बहरून जाईल. कुठल्याही सोयी सुविधा नसताना, अनेक संकटांचा सामना करत जॉननं आपलं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. २२५ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या कानाकोपर्याहत जाऊन त्यानं सफरचंदांची लाखो झाडं लावली. लोक प्रेमानं त्यांना जॉनी ऍपलसीड म्हणू लागले. त्यांचं हे वृक्षप्रेम जगभरातल्या निसर्गप्रेमी माणसांना नेहमीच प्रेरणा देईल.
‘अमर पत्र’ नावाचं पुस्तक म्हणजे गेल्या दीडशे वर्षात पर्यावरणावर लिहिलेलं सर्वात सुंदर पत्र आहे. गोर्याय लोकांचं सरकार अमेरिकेतल्या मूळ आदिवासींची जमीन बंदुकीच्या धाकानं हडप करणार होतं. तेव्हा आदिवासींच्या एका प्रमुखानं, चीफ सिएटलनं अमेरिकेच्या राष्ट्रपतींना हे पत्र लिहिलं. हे पत्र म्हणजे उपभोगवादी संस्कृतीला दिलेली एक सणसणीत चपराक आहे.

ही सगळीच पुस्तकं मुळातूनच वाचायला हवीत अशी आहेत. सगळ्याच पुस्तकांत सोपीसोपी आणि भरपूर चित्रं आहेत. या पुस्तकांना ‘पुस्तिका’ म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. पुस्तकांच्या किंमतीही अगदीच माफक आहेत. प्रत्येकी दहा किंवा पंधरा रुपये किंमतीच्या या पुस्तकांचा संच म्हणजे एक उत्तम भेटवस्तू. प्रत्येक मुलाच्या संग्रही असावा असा हा पुस्तक संच आवर्जून खरेदी करावा.