‘Kes’ एक अस्वस्थ करणारा अनुभव

बहुसंख्य मुलांना शाळेत जायला आवडत नाही. त्यांचं मन शिक्षणात रमत नाही. काही वेळा तर शाळेमुळेच मुलांचा शिकण्यातला रस संपून जातो, इतकी ती निराश होतात. असं का होत असेल?
एकूणच कुटुंबव्यवस्थेविषयी आणि शिक्षणव्यवस्थेविषयी मुळातून विचार करायला लावणारा एक चित्रपट ‘केस’. या चित्रपटाबद्दल एक लेख आणि त्या निमित्तानं जेन साही यांनी शिक्षणाबद्दल लिहिलेला एक लेख इथे देत आहोत. जेन साही बंगलोरजवळ एका खेड्यात ‘सीता स्कूल’ ही एक वेगळी प्रयोगशील शाळा चालवतात.

‘केस’ हा एक चांगला सिनेमा बघण्याची संधी नुकतीच मिळाली. जुलैमधे बेंगलोरची ‘सीता स्कूल’ बघायला आम्ही खेळघराचे कार्यकर्ते गेलो होतो. तिथे श्रीमती जेन साही यांनी आम्हाला हा सिनेमा आवर्जून दाखवला. त्यातली भाषा, वेगळ्या उच्चारांमुळे आम्हाला समजत नव्हती तर हा दुवा सांधण्याचंही काम त्यांनी केलं.

दिवसभराची दमणूक, पोटात भूक… यामुळे त्यावेळी आम्हाला खरंतर सिनेमा बघायची तितकीशी इच्छाही नव्हती. पण त्या सिनेमानं आम्हाला असं काही खेचून घेतलं की तो संपल्यावरही, त्यातून बाहेर येणं जमेना.

१९७० च्या सुमारास उत्तर इंग्लंडच्या परिसरात आपल्याला हा सिनेमा घेऊन जातो. कोळशाच्या खाणींच्या सान्निध्यात वसलेलं हे एक गाव. इथल्या निम्न आर्थिक गटातल्या प्रत्येक तरुणाचं ‘खाण कामगार’ होणं हे अपरिहार्य भविष्य जणू ठरूनच गेले आहे. कथानायक बिली कास्पर, चौदा वर्षे वयाचा एक कुमारवयीन मुलगा, आई आणि मोठ्या भावासमवेत राहतोय. बिलीच्या घरातलं वातावरण वसतीगृहातल्या भकास वातावरणापेक्षा वेगळं नाही. प्रत्येक जण आपापल्या व्याप-चिंता-ताणांत मग्न. केवळ सोय म्हणून ते एकत्र राहताहेत. निर्दयी भावाचा छळ बिलीला केवळ अंगात तेवढी ताकद नाही म्हणून सहन करावा लागतोय. आईला या कशाशी फारसं देणंघेणं नाही. घरात साधं बोलणंही होऊ शकत नाही. चिडचिड, वाद, आततायीपणा ह्या सगळ्याला बिली वैतागलाय. तो घराबाहेरच राहाणं पसंत करतो.

बिलीचं दुसरं विश्व त्याची शाळा! इमारत, मैदानं, वाचनालय इ. सुविधांनी ती तशी सुसज्ज आहे. पण तिथं मुलं आणि शिक्षक जणू दोन जगांत वावरताहेत. शिक्षक शिकवण्याचं काम करताहेत… ते मुलांपर्यंत पोचतं की नाही ह्याच्याशी त्यांना फारसं कर्तव्य नाहीये. नाईलाज म्हणून मुलं वर्गात बसताहेत. वर्गात जे चालतं त्यात त्यांना अजिबात रस नाहीये. नि म्हणूनच त्यांना ज्यात रस आहे त्या गोष्टीही ते कसलाही विधिनिषेध न बाळगता करताहेत. प्रश्न फक्त शिक्षकांना गंडवण्याचाच आहे. त्यात त्यांची मास्टरी आहे. बिली या मुलांत असतोही आणि नसतोही. वर्गातला, मुलांच्यातला त्याचा कोरा-निर्विकार चेहरा खूप काही सांगून जातो. तो शाळेत रमत नाही. तिथली भाषा, वातावरण, संस्कृती सारं त्याला खूप परकं वाटतं. तो सतत नापास होतो. शाळेच्या मते त्याचं अपयश हे फक्त त्याच्या नाकर्तेपणामुळे अटळ असतं. त्यात इतर कुणाचा, कशाचा संबंध असेल अशी शंकाही कुणाला नसते.

अर्थातच मुलं शिकत नाहीयेत, नियम पाळत नाहीत, दंगा घालतात. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक वैतागत आहेत. नि या समस्येला कारणीभूत ही बेशिस्त-बेजबाबदार मुलं आहेत असं त्यांना ठामपणे वाटतं. त्यामुळे ते अधिकाधिक कडक नियम, शिक्षा, दंड यांचा अवलंब करताहेत. शिक्षकांची भावनाशून्यता, विक्षिप्तपणा, स्वत:ला श्रेष्ठ समजण्याची वृत्ती यामुळे मुलं आत्मविश्वास गमावत आहेत. प्रतिकाराला प्रवृत्त होताहेत…

बिलीचं जगणं, एकटेपण, उदासीनता सिनेमात विविध प्रसंगांतून आपल्यासमोर येतात…

एका रात्री बिली झोपलाय. उशिरा त्याचा भाऊ दारू पिऊन येतो. बिलीला उठवून त्याचे बूट काढायला लावतो. मगरूरीनं त्याला स्वत:ची सेवा करायला भाग पाडतो.. अपरंपार तिरस्कारानं बिलीचं मन भरून येतं. पण तिथंच… त्याच्या शेजारी झोपावंही लागतं. बिली पहाटे उठतो. सायकल घेऊन दूध टाकायला जातो. इकडे तिकडे रमतो… मग शाळेला जायला उशीर होतो. मग त्यावरून बोलणी, शिक्षा भोगणं. त्यात सिगारेट ओढणार्या मुलांच्या कंपूत ओढला जाऊन पकडला जातो. मग मुख्याध्यापकांचे लेक्चर.. कडवट.. तिरकस..छड्या… शाळेच्या ग्राऊंडवर, ड्रेस योग्य नाही म्हणून अवमानकारक वागणूक… शिक्षा.

बिली आता या सर्वाला सरावलाय. ते त्याच्या मनापर्यंत पोचतच नाही.

असाच तो निरूद्देश, रस्त्यांवरून भटकत असताना अचानक त्याला एक पक्षी दिसतो. वारंवार दिसतो. त्याच्या मनात कुतूहल निर्माण होतं. तो त्याचं घरटं शोधून काढतो. त्याच्या आठवणीनं त्याला झोप येत नाही. तेव्हा रात्री उठून, धाडसानं उंचावरच्या त्याच्या घरट्यापर्यंत चढतो. आता त्याला एकच ध्यास लागतो. हा पक्षी कोण? तो काय खातो? कसा जगतो? त्याची वैशिष्ट्य काय? नि मग हा ध्यास त्याला कामाला लावतो. पक्ष्याचं बारकाईनं निरीक्षण… पुस्तकांमधून माहिती काढणं (मग त्यासाठी पुस्तक चोरायचीही तयारी) कुणाकुणाला त्याबद्दल विचारणं नि एका बाजूला प्रत्यक्ष पक्ष्याशी, केस्ट्रेलशी दोस्ती साधण्याचा प्रयत्न. त्याला तर्हेकतर्हे्चं खायला घालणं, त्याला हाकेला ओ द्यायला शिकवणं, ठरावीक तर्हेकने उडायला शिकवणं. ह्या सार्याात बिली इतका रमतो की पूर्वी संपता न संपणारा वेळ कसा भुर्रकन उडून जातो हे त्याचं त्यालाच समजत नाही.

आता बिलीचा चेहराही हलायला लागतो. केस्ट्रेल दिसला की, न दिसला की. नवं काही शिकला की. बिली खुलतो… आनंदात राहायला लागतो. एकदा एखादी गोष्ट मुलांना स्वत:ला करावीशी वाटली, त्यात त्यांचं मन रमलं की मग ती अजिबात मागेपुढे बघत नाहीत. मग त्या संदर्भात नवं जाणून घेण्यासाठी, कौशल्य आत्मसात करण्यासाठी वाटेल तेवढी मेहनत घ्यायला तयार असतात. पण शाळेच्या दायर्यावमधे मात्र ‘त्यांचं मन रमतंय की नाही’ हे समजून घेण्याच्या भानगडीत कोणीच पडत नाही.

त्याच्या शाळेत एक सहदय शिक्षक असतात. त्यांना बिलीच्या ह्या पक्षीप्रेमाचा शोध लागतो. वर्गात कधी एक शब्दही न बोलणार्या बिलीला ते वर्गात ह्या त्याच्या छंदाबद्दल सांगायला प्रवृत्त करतात. आणि बिली भरभरून बोलतो… ते बिलीचा पाठपुरावा करतात, त्याला मदत करतात. तरीही त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा असतात.

एके दिवशी बिलीला टेबलावर चिठ्ठी मिळते. त्याच्या खाणकामगार भावाला रेसच्या संदर्भातली गुप्त माहिती मिळालेली असते. बिलीनं त्या नंबरवर पैसे लावून भावासाठी पैसे कमवावेत असा हुकूम चिठ्ठीत असतो. बिली केसच्या नादात ते सारं विसरून जातो. खाणीच्या अतिशय अप्रिय विश्वातून बाहेर पडायची त्याच्या भावाची एकुलती एक संधी हुकते. तो भयानक संतापतो. आणि हे सारं केसमुळे झालं असा विचार करून… तो केसला संपवतो.
बिली उध्वस्त होतो… भावाशी भांडतो…खूप रडतो… पण शेवटी त्याला समजून चुकतं की याचा काही उपयोग नाही. ‘आता केस नाही नि हे मला स्वीकारायलाच हवं.’ अतिशय शांतपणे तो केसला शोधून काढतो नि एका शांत जागी त्याचं कलेवर दफन करतो. केसचं जीवन इथे संपलं. बिलीचं हृदय विदीर्ण झालं आहे. आपणही अत्यंत उदास होतो.

पण बिली आता मोठा झाला आहे. वास्तवाचा जाणतेपणानं स्वीकार करायला शिकला आहे. थोड्याशा का होईना प्रेमभर्याण अनुभवांतून नकळत त्याचं मन प्रगल्भ बनलं आहे. आता कदाचित… तो आयुष्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीनं पाहील. कुणी सांगावं…कदाचित व्यवस्था अधिक मानवी व्हावी ह्यासाठी मार्गही शोधेल !