संवादकीय – डिसेंबर २००६

वीस वर्षांपूर्वी ‘पालकनीती’ सुरू झालं, तेव्हापर्यंत मराठी समाजात हा विषय मुख्यतः इंग्रजी पुस्तकांमधून येणारा असाच होता. अर्थात काही, म्हणजे फारतर १५-२० पुस्तकं होती. त्यातली काही सहजी मिळत नसत. पण मिळणारी हाताच्या बोटावर मोजता येणारी. शिवाय काही चांगली पुस्तकंही होती. ती सामान्यपणे स्त्रियांनी लिहिलेली होती. हीही एक उल्लेखनीय बाब. तरीही समाजात, त्यातल्या बोली-वातावरणात त्यांचा उल्लेख क्वचितच होत असे. मुलं नेहमीप्रमाणे सरळ साधी वागताहेत तोवर दुर्लक्ष करा, जरा जादापणा करताना दिसली तर ठोका. एरवी शाळा, खाणं पाहिलं की झालं. इतकीच ह्या विषयाची जाण होती.

इंग्रजी न येण्यानं कमीपणा वाटण्याचा किंवा येत असल्यानं सर्वज्ञानी समजण्याचा अनुभव काहींच्या गाठीशी आला होता. ह्यातून थोड्या श्रीमंत मध्यमवर्गीय घरांमध्ये मूल इंग्रजी-माध्यमाच्या शाळेत घालायची एक टूम या काळात जोरदारपणे आली. ह्या कृतीनं आपण पालकपणाचं जवळजवळ सगळंच काम करून टाकलंय असंही मानलं जाई. गरीब, मध्यमवर्गीय घरांमध्येही ‘इंग्रजी माध्यमाचा निर्णय योग्यच आहे’ ह्यावर दुमत नव्हतं. पण मुलाला झेपलं नाही तर
आपल्याला पैशानं ते निभावणं परवडायचं नाही, एवढीच तांत्रिक शंका त्यांना येत असे. काही पड खात, काही धाडस करत.

ह्याशिवाय त्या काळात आणखी एक विशेष गट उदयाला येत होता. ह्या गटाला आपलं मूल ही पुढंपुढं नेण्याची गोष्ट वाटे. ते आपापल्या कुवतीनुसार भल्याबुर्याा मार्गानं आपलं मूल पुढे न्यायला धडपडत. गंमत अशी की हे करताना मूल काही नवीन शिकेल, त्याला अनुभव, आत्मविश्वास येईल हा मूळ हेतू नसे. हेतू असे- मुलाचं (पर्यायानं आपलंही) चारचौघात कौतुक व्हावं. इतर गोष्टी ‘बाय प्रॉडक्ट’ म्हणून झाल्या तरी चालतील, पण खरा हेतू ‘पुढंपुढं’चा.
त्याआधी अनेक घरात मूल कितवीत शिकतं हेही पालकांना, विशेषतः वडलांना माहीत नसे, त्या तुलनेत ही प्रगतीच मानावी लागते.

पालकत्वाबद्दल आवर्जून मांडणी करणारे काही लोक दिसू लागले, तेव्हा एकतर ह्या ‘पुढंपुढं’ पालकांनी आणि मूल मागेमागे पडतंय असं वाटणार्यां्नी, ते उलट उत्तर देतं, अभ्यास करत नाही अशा तक्रारींसाठी ह्या लोकांना विचारायला सुरवात केली. अर्थात असं फारच थोड्या पालकांना प्रत्यक्ष जमलं. काहींच्या मनात ती इच्छा असे आणि पुढे विसरून जाई.

शिक्षक-पालक संघाचं एक त्रैमासिक हे त्या काळात पाहिलेलं एकमेव ‘पालकत्व’ विषयक नियतकालिक. पण ह्यानंतरच्या काळात पालकत्वाला अक्षरमंचावर बरे दिवस आले. म्हणजे अक्षरशः बक्कळ लिहिलं गेलं. अगदी कसंही, काहीही – पण लिहिलं गेलं. त्यात काहींचं चांगलं लिखाण होतं. उदाहरणार्थ, शोभा भागवत, लीलाताई पाटील आणखीही काही लेखकांचा समावेश होतो.

शाळाशाळांमध्ये – विशेषतः श्रीमंत शाळांमध्ये एव्हाना ट्रेंड कौन्सलर्स आल्या. अपवादांनी स्वतःला निश्चित वगळावं, पण सामान्यपणे त्यांचा दर्जा न बोलण्याजोगाच होता.

एकंदरीनं ह्या सगळ्या घडामोडींनी ‘पालकत्व’ हा विषय जरा वरच आला. सुजाण पालक हा परवलीचा शब्द झाला. पालकांचे गट झाले. शाळांमध्ये पालकांच्या सभा होऊ लागल्या. काही ठिकाणी तर वडील-पालकही त्या सभांना येऊ लागले. अर्थात त्यासाठी शाळा तशी सक्तीही करत. ह्या सभांमध्ये तज्ज्ञांची भाषणं ठरवली जात, होत. ‘राहुल अभ्यासात मागे पडतो, सुस्मिता धाकटीला मारते’ वगैरे अडचणीही पालक मांडत.

एका अर्थानं हे बरं घडत होतं, अजूनही घडतंच. पण त्यात एक अंतर्गत अडचण असते. शाळा जेव्हा अशा सभा बोलावते, तेव्हा त्यामागे शाळेचे स्वतःचे हेतूही असतात – शाळेची लोकप्रियता वाढवणे, शाळेच्या कार्यक्रमांसाठी पालकांची स्वयंस्फूर्त (म्हणजे फुकट) मदत मिळवणे, पालकांच्या संसाधनांचा – म्हणजे गुणांचा आणि पैशांचा शाळेला वापर करून घेणे. शिवाय मुलांच्या ‘गृहपाठ’ नामक अभ्यासाची जबाबदारी पालकांवर टाकणे, पालकांनी स्वीकारणे. ह्या हेतूंना तज्ज्ञांनी प्रोत्साहन द्यावं आणि पालकांना पटवावं अशी इच्छाही असते. काही तज्ज्ञ ती पुरीही करतात आणि लोकप्रिय ठरतात. पालकांचं खरंखुरं प्रबोधन जर ह्या कार्यक्रमांमधून झालंच तर ते शाळांना अनेक जाब विचारू लागतील आणि ते शाळेला आवडतंय, स्वागतार्ह वाटतंय असं अगदी क्वचितच दिसतं. आता पालकत्व आणि त्याला जोडून बालशिक्षण ह्या विषयावर पुस्तकंच काय नियतकालिकांची कमतरता म्हणून नाही. पण तरीही गुणात्मक दृष्टीनं हा विषय आजच्या काळाच्या संदर्भाला धरून वर गेलेला आणि व्यापक अर्थानं समाजाच्या विचारधारेत पोचलेला नाही हे स्पष्टपणे दिसतं.

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये तर अगदी क्षीणपणे पण एक वेगळाच फरक त्यात दिसतो. ‘पालकत्व हा विषय इतका उदोउदो करण्याचा, फाजील महत्त्व देण्याजोगाच मुळात नाही. त्याला उगाच चढवलं जातंय’, अशीही एक बारकीच मांडणी केली जाते आहे. ह्या विषयावरची अमाप पुस्तकं उपलब्ध झाली, एकमेकांशी स्पर्धा करत मासिकं सुरू झाली. व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस गल्लोगल्ली लागले, सुजाण पालक मंडळं रजिस्टर झाली. पण ह्या सगळ्यातून बालकांचं जीवन समृद्ध होण्याचा प्रयत्न निसटतच राहिला. भद्रतेचा आग्रह समाजानं स्वीकारलेला दिसतच नाही. त्याउलट दिखाऊ हिशोबी, पुढेपुढे करणारा सत्तेचा खेळ मुलांपर्यत पोचलेला दिसू लागतो. ह्या परिस्थितीचा त्रास जाणवून आलेली ही प्रतिक्रिया आहे असं मला वाटतं. तिचा राग येत नाही, पण ती पटतही नाही.

पालकत्व हा वेगळ्यानं समजावून घेण्याचा असला तरी जीवनापेक्षा वेगळा विषयच नाही. आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडं कसं बघतो, ह्यावरच त्याची बैठक आधारलेली आहे. आपण स्वतः जेव्हा ह्या बनेल जगात जगायचं तर असंच बनेलपणे जगावं लागेल हे म्हणत असलो तर मग मुलाला पुढंपुढं करण्याचे अनंत परिश्रम करूनही मूल वेळ आल्यावर आपल्याला टिचकीनं उडवतं ह्याचा राग करून कसं चालेल?
अनेक मुलांजवळ स्वतःची चांगुलपणाची, न्यायाची जाणीव असते. परिस्थितीच्या वादळवार्यागतही मुलं ती जपून वाढवतात. ह्यावर पालकांनी विश्वास ठेवला तरी तेवढ्यावरच विसंबू नये. आपण स्वतःही एका समज आल्याच्या वयापासून आपलं मूल असतोच. आपली स्वतःची वैचारिक, नैतिक वाढ आपण स्वतः किती जाणीवपूर्वक, कल्पकतेनं करतो, त्याचा आनंद घेतो ह्यावर आपल्या पालकत्वाच्या क्षमतांचा कस प्रथम लागतो. ह्या क्षमता आपल्याजवळ आहेत ना, ह्याची जाणीव करून घेऊन नंतर त्या मुलाबाळांपर्यंत पोचवण्याचं कसब घडावं.

त्यासाठी स्वतःला जागं ठेवावं लागतं, आपण एका नव्या जिवाला इथं आणलंय, आणि त्याला नुसतं पंखाखाली नाही तर मोकळं उडायचंय. इतर अनेकांसह जगायचंय, स्वतःच्या कुवतीत जग फुलवायचंय हे कधीही विसरता येत नाही. त्यासाठी आपल्याकडे वेळ आहे ना, हिम्मत आणि इच्छा आहे ना, हेही पहावं लागेल. ही जाग ज्यांच्याजवळ आहे किंवा मिळवण्याची हिम्मत आहे, त्यांना पालकपण साधलं असं मानायला हरकत नाही. असं माझं मत आहे.
नवर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!