पढतमूर्ख माहूत
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरील वेताळाला खांद्यावर टाकून तो पुन्हा वाट चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘राजा, मला तुझ्या चिकाटीचे कौतुक वाटते. महाराष्ट्रदेशीचे विद्यार्थीदेखील अशाच चिकाटीचे आहेत. तेथे शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामागे परीक्षांचा सपाटा लावल्याचे कानी आले. त्यामुळे आठवलेली एका पढतमूर्ख माहुताची कथा वाटेत सांगतो. तेवढीच करमणूक होईल. नीट लक्ष देऊन ऐक.’’
‘‘राजा सरस्वतीचंद्राला हत्तींची भारी आवड होती. तो गजवनात पाण्यासारखा पैसा ओतत असे. परंतु हत्ती अपेक्षेप्रमाणे आकाराने मोठे होत नव्हते. ते शल्य राजाला कुरतडत होते. एकदा राजाने गजवनातल्या सर्व माहुतांची सभा घेतली आणि उपाय विचारला.
‘‘सर्व माहुतांत रामू वयाने ज्येष्ठ होता. रामूने तराजूत न मावणार्याा हत्तीचे वजन करून दाखविले होते. तेव्हापासून रामूच्या बुद्धिमत्तेवर राजाचा दांडगा विश्वास होता. तो म्हणाला, ‘‘हुजूर, हत्तींची गुणवत्तापूर्ण वाढ होण्यासाठी त्यांच्यावर लहानपणापासून काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. पिलांचे वय, वजन, उंची, सोंडेची लांबी, अशा बारकाव्यांच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या पाहिजेत.’’ राजाने लगेच तसे फर्मान काढले. रामूकडे देखरेख सोपवली.
रोजच्या रोज वय, लांबी, उंची मोजून तपशील नोंदणे किचकट आणि वेळखाऊ होते. वजन करण्यासाठी सर्व हत्तींना रोज नदीकाठी नेले जाई. खास तयार केलेल्या होडीत एका हत्तीला उभे करून होडीचा बुडालेला भाग दाखविणारी खूण केली जाई. हत्ती उतरवून त्या खुणेपर्यंत होडीचा भाग बुडेल येवढे दगड होडीत टाकावे लागत. सर्व दगड होडीतून उतरवावे लागत. नंतर एकेक करत त्यांचे तराजूत वजन केले जाई. सर्व दगडांच्या वजनाची बेरीज केली की हत्तीचे वजन समजे. ते नोंदले जाई. नंतर दुसर्यार हत्तीच्या वजनाचा सोहळा साजरा होई. सगळ्या हत्तींची आणि पिलांची वजने झाल्यावर वरात माघारी निघे. मोजमापे अचूक असावीत म्हणून कोणत्याच हत्तीला वाटेत झाडपालादेखील खाऊ दिला जात नसे. गजवनात आल्यावर प्रत्येक हत्तीला आडवे पाडून लांबी मोजायचे नाटक यथासांग पार पडेपर्यंत संध्याकाळ होई. मग कोठे पिलांच्या पुढ्यात कणकेचे चार गोळे पडत. तोपर्यंत हत्तींची भूक मेलेली असे. मोठे हत्ती कशी तरी वेळ निभावून नेत. परंतु सर्व माहुतांची आणि हत्तीच्या पिलांची दिवसभर तगमग होई. कधी हत्तीचे एखादे पिलू वाटेतच राम म्हणे. साहजिकच आईचे पित्त खवळे आणि एखादा माहूत पायाखाली येई. परंतु चतुर वाणीने राजाला कह्यात ठेवणार्याा रामूविरुद्ध कोण बोलणार?
दसरा थोड्या दिवसांवर आला. तेव्हा राजा गजवनात आला. राजाचे हत्ती आणखीनच दुबळे झाले होते. राजाने रामूला फैलावर घेतले. रामू म्हणाला, ‘‘हुजूर हत्तीची काही पिलं आणि त्यांच्या आया मोजमापं करताना खळखळ करतात. त्यांना जंगलात सोडून द्यावं म्हणतोय. रोजच्या मोजमापांत चांगल्या प्रकाराने पास होणार्या पिलांवरच फक्त लक्ष दिलं, तर काम फक्कड होईल. हुजूरांची परवानगी असावी. परवानगी मिळाली, तर पुढच्या दसर्यापर्यंत निवडक हत्तींची वाढ दर्जेदार होईल. परंतु यंदादेखील काळजीचं कारण नाही. दसर्यावच्या शाही मिरवणुकीसाठी आम्ही काही हत्ती नव्याने पकडून आणले आहेत. त्यांची पाहणी करावी. दिल खूष होईल.’’ राजाने नवे हत्ती पाहिले. ते तर चांगले धष्टपुष्ट आणि बलाढ्य दिसत होते. गजवनात जन्मलेले आणि माहुताच्या दररोजच्या परीक्षांना सामोरे जाणार्याा हत्तींची वाढ मात्र निकृष्ट दर्जाची होती.
‘‘विक्रमादित्या, रोजच्या रोज परीक्षा घेऊनही गजवनातल्या हत्तींची वाढ निकृष्ट का राहिली याचे उत्तर माहीत असून ते दिले नाहीस, तर महाराष्ट्रदेशीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांप्रमाणे तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायावर पडतील.’’
विक्रमादित्य म्हणाला, ‘‘राजा सरस्वतीचंद्र पढतमूर्ख माहुताच्या आहारी गेला. म्हणजे राजाही पढतमूर्खच म्हटला पाहिजे. हत्तींच्या वाढीची गुणवत्ता सततच्या मापनाने सुधारत नसते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षांनी फार तर समजेल, परंतु सुधारणार नाही. हे शहाणपण महाराष्ट्रदेशी येईल तो सुदिन!’’ विक्रमादित्य राजाचे मौन भंग पावले. नेहमीच्या चिकाटीने तो झाडांकडे माघारी फिरला. गुणवत्तांचे वेताळ झाडाझाडांवर उलटे लटकत होते, महाराष्ट्रदेशीचे असंख्य विद्यार्थी ‘लायक्ली क्वश्चडनसची ऍन्सरस’ घोकत होते आणि परिक्षांच्या तंत्रांचे क्लासाक्लासांतून दळण घरंगळत होते. सगळीकडे भविष्य अंधारून आले होते. परंतु क्लासाक्लासातून मात्र रोशनी तेज होती.