काळोखातील चांदणं
पुण्याजवळच्या चिखलगाव इथल्या ‘साधना व्हिलेज’ या मतिमंद मुलांसाठीच्या संस्थेत मेधा टेंगशे पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून अनेक वर्षे काम करत आहेत. हे काम अवघड तर खरंच. त्यातही कधीकधी भेटीला येणारं चांदणं हाती येत नाही, निसटून जातं. आणि त्या असहाय्यतेमुळे मन खंतावत राहतं.
‘ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही म्हातार्याग झालात की, मी आपल्या केंद्रातल्या मुलांची काळजी घेईन. मी तुमच्या ‘खुर्ची’वर बसणार….’
शाळेतून आल्या-आल्या एवढंच प्रकाश माझ्याशी बोलला आणि धावत-धावत आपल्या खोलीत निघूनसुद्धा गेला !… मी त्याच्याकडं अनिमिषपणे पाहात राहिले…
प्रकाश !…आमच्या संस्थेत गृहमाता म्हणून काम करणार्या सुशीलामावशींचा मुलगा !… तेरा वर्षांचा, गव्हाळ रंगाचा, नाकीडोळी नीटस असलेल्या प्रकाशच्या चेहर्याकवर नेहमी अकाली प्रौढत्वाचा भाव असायचा – त्यामुळं केंद्रात येतानाच बालपणातला निरागसपणा आपल्या मनाच्या अडगळीत टाकून आलेला!.. आई-वडिलांच्यातील बेबनावामुळं दहाव्या वर्षापासूनच शेतमजूर, बांधकाम मजूर अशी कामं करत, तो आईला आणि आपल्या धाकट्या बहिणीला पैशाची मदत करायला लागला. आमच्याकडे आल्यावर जुलमाचा रामराम म्हणून तो शाळेत जायला लागला अन् इंग्रजी, गणित ह्या न बधणार्यात विषयांबरोबरच मराठी विषयदेखील परीक्षेत त्याला हुलकावणी देऊ लागला तसं त्यानं एकदा तिमाही परीक्षेच्या निकालानंतर सरळ प्रगती पुस्तकावर आपल्या आईची ‘पालक’ म्हणून करावयाची सही स्वत:च केली अन् प्रगतीपुस्तक वर्गशिक्षकांकडं सुपूर्द केलं- त्यांना काय शंका आली कोण जाणे, पण त्याच्या प्रवेश-अर्जावरील आईची पालक म्हणून असलेली सही आणि प्रगतीपुस्तकावरची सही निरखली- त्याच्या आईकडं विचारणा केली अन् मग आईनं (माझ्या नकळत) त्याला बदड बदड बदडलं-त्याला ओढतच ती माझ्याकडं घेऊन आली-म्हणाली-‘ताई, बघितलं का, कसा बापाच्या वळणावर चाललाय ते?…’ तेव्हा अकरा वर्षाच्या प्रकाशनं हे केलं असेल, ह्यावर माझा विश्वासच बसेना-मी खातरजमा करून घेण्यासाठी त्याला विचारलं – ‘प्रकाश, आईची सही तू केलीस?…’ प्रकाश काहीच बोलला नाही- मीही त्याला समजावून सांगत, समज दिली- त्यावरही तो काही बोलला नाही. पण तेव्हापासून तो मला अधिकच टाळायला लागला एवढं मात्र खरं!…
ह्या घटनेला एखादं वर्ष उलटलं- मधल्या काळात मी त्याला मुद्दाम भेटायला बोलवत असे-त्याच्यावर एखादं छोटं काम सोपवत असे- इतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रकाशला वाव, संधी मिळेल असा प्रयत्नही चालू ठेवत असे-मग मात्र हळूहळू, गाळ खाली बसावा आणि वरचं निवळशंख पाणी दिसावं-तसं झालं-त्याचा धुमसणारा तापटपणा, बेदरकारपणा, धाकट्या बहिणीला मारायची वृत्ती कमी झाली!…. तो चित्रं काढू लागला- आमच्या केंद्रात येणार्या पाहुण्यांना, पुढं येऊन, स्वत:हून आपली ओळख करून देऊ लागला….एरवी तो साधं बोलताना चाचरत असे-आता हळूहळू केंद्राच्या कार्यक्रमात दोनचार मिनिटाची भाषणं करू लागला…
त्याच धिटाईनं अन् उत्साहानं त्यानं भविष्यकाळात केंद्राची जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली असावी…
दरम्यान मराठी, गणित ह्या दोन विषयांतील प्रगती सोडून, बाकीच्या विषयातले त्याचे गुण समाधानकारक होते- त्याला शाळाही आवडू लागली होती… एकुलता एक का असेना, त्याला एक मित्रही झाला होता…
वार्षिक निकाल लागला अन् तो काठावर पास झाला- केंद्रातल्या सगळ्यांना तो पास झाल्याचा आनंद झाला होता… त्याच्या आईनं पेढे वाटले- मला एक पेढा देत अगदी खाजगी आवाजात त्या म्हणाल्या –
‘‘ताई, मला जरा बोलायचंय…’’
मी म्हटलं – ‘बोला…’
सुरूवातीला प्रकाशच्या आईनं थोडेसे आढेवेढे घेतले अन् मग हळूच मला म्हणाल्या – ‘‘ताई, मला सारखं वाटतंय- आपल्या (म्हणजे मतिमंद) मुलांच्यात राहून, प्रकाशच्या डोक्यावरही परिणाम झालाय – परीक्षेत नंबर काढेना- मी काही सांगितलं तरी, ऐकत नाही!…मी त्याला मारून मारून कंटाळले… तो लहान असताना, मी मजुरीला जाताना, त्याला अफू खायला घालायची त्यामुळं आधीच त्याचं डोकं चालत नाही.. त्यात परत इथं…’’ त्या एकदम् गप्प झाल्या.
मी म्हटलं, ‘‘सुशीलामावशी, आपल्यासारख्या मुलांबरोबर राहणार्याल, तुमच्यासारख्या कितीतरी स्त्रिया अशा अनेक संस्थांत राहताना मी पाहिल्या-त्यांची मुलं व्यवस्थित शिकली- आपापल्या पायावर उभी राहिली… तुम्ही अजिबात वेडंवाकडं मनात आणू नका- शिवाय प्रकाशमधला नवीन बदल तुम्ही पाहिलाय ना?…’
त्या मला अडवत म्हणाल्या- ‘‘पण ताई, मला पण हे काम झेपत नाही !… सारखं डोकं गरगरतंय…कधी कधी फार थकल्यासारखं होतं…’’ मला त्यांचं म्हणणं समजलं-मी त्यांना डॉक्टरांकडं जाऊन यायला सांगितलं- त्या संस्थेच्या तसंच इतरही डॉक्टरांकडं जाऊन आल्या-सर्व डॉक्टरांचा निरोप त्यांनी आणला-
‘‘सगळं अगदी सुरळीत आहे, – गरज वाटली तर अधून-मधून विश्रांती घ्या-थोड्या शांततेनं, विसाव्यानं ताजतवानं वाटेल…’’
सुशीलामावशींना डॉक्टरांचा सल्ला पटला नसावा, मानवला नसावा, त्या एके दिवशी म्हणाल्या-
‘‘ताई, मला दुसरीकडं काम मिळालं… मी इथं केंद्रातल्या मुलांना भेटायला मात्र वरचेवर येईन…’’
त्यांच्या निरवाानिरवीच्या बोलण्यात नवीन काही नव्हतं – चोवीस तासांशी बांधून घेण्यापेक्षा, आठ तास काम करून आपलं स्वातंत्र्य (स्वतंत्र राहण्याचं!…) अबाधित ठेवू इच्छिणार्याय अनेक महिला कार्यकर्त्या काम सोडून जाण्याचा अनुभव आमच्या गाठीशी होताच. मी निमूटपणानं मान डोलावली…
सुशीलामावशी सामानाच्या आवरा-आवरीला लागल्या – तसं त्यांच्या नकळत प्रकाश हळूच माझ्याकडं आला अन् दबक्या आवाजात मला म्हणाला –
‘ताई, आई गेली तरी, मी इथं राहिलो, तर चालेल?’…
मी समजुतीनं, त्याला कसंबसं हसत म्हटलं – ‘‘तू मोठा झालास की परत ये…’’ त्याचा हात हातात घेतला – त्यानं आपला हात पटकन् सोडवून घेतला अन् तो काहीच न बोलता निघून गेला!
सुशीला मावशींचं दोन महिन्यांपूर्वी पत्र आलं. त्यांनी लिहिलं होतं –
‘‘प्रकाश कामाला लागलाय – तो जवळच असलेल्या एका डॉक्टरकडं कामाला जातो – फरशी पुसणं – केर-वारे तसंच सिस्टरना मदत करतो… थोडा मोठा झाला की, त्याचा मामा त्याला गाडीचं लायसन घेऊन देणार आहे.
ताई, तुमच्या पायाच्या पुण्याईनं माझी चिंता मिटली….’’
तेव्हापासून-रस्त्यावरून जाताना कुठलाही ट्रक बाजूनं जाऊ लागला की, माझे डोळे प्रकाशला शोधू लागतात – खरं तर, त्या ट्रकमधल्या प्रत्येक ड्रायव्हरमध्ये मला प्रकाश दिसायला लागतो अन् त्या ट्रकला ओलांडून पुढं जाणं अशक्य होऊन जातं.