जीवन गाणे (व्यक्तीपरिचय)

जन्मल्यापासूनच सतत विपरीत परिस्थितीला तोंड देऊनही आयुष्याकडे अतिशय सकारात्मक नजरेनं पाहणारे, आपल्याला जे भोगावं लागलं ते दुसर्याड कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून सतत कार्यरत असणारे देव बोन्द्रे –
यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल.

काही माणसं अनेकदा भेटून समजत नाहीत, काही माणसं चार दोन भेटीत समजतात. पारदर्शी स्वभावाची माणसं मात्र प्रथम भेटीतच बरीचशी समजतात. त्यातलेच एक देव बोन्द्रे. त्यांच्याशी गप्पा मारताना ते चालवत असलेल्या अनेक उपक्रमांचा उल्लेख आला. म्हणून गप्पांच्या ओघात प्रश्न विचारून त्याबद्दल जाणून घेतलं आणि आश्चर्यचकित झाले, तशीच अंतर्मुखही ! वस्तीतल्या मुलांसाठी ते झोकून देऊन काम करतात. दुसर्यां साठी सतत इतकं सगळं करत राहण्यामागची प्रेरणा काय, असं विचाल्यावर ते म्हणाले की, लहानपणी मला जे पोरकेपण अनुभवायला लागलं तसं कोणाला लागू नये ही प्रबळ इच्छा !

जोगेश्वरी पूर्व भागात मेघवाडीत काही चाळी आहेत त्यातल्या एका चाळीत देव राहतात. ‘मॅफ्को’ मध्ये काही वर्ष सेल्स मॅनेजर म्हणून ते काम करीत होते. कंपनीच्या सक्तीच्या सेवानिवृत्तीचा फटका देव यांना बसला आणि नोकरी सोडावी लागली. आता ते जीवन विम्याचे एजंट म्हणून काम करतात.

देवचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचा मृत्यू. वडिलांच्या दिवसकार्यानंतर नातेवाईकांमध्ये बोलणं झालं. ‘या मुलाचं काय करायचं?’ ‘याला कोण सांभाळणार? याची जबाबदारी कोण घेणार?’ प्रत्येकानं काही ना काही कारणं सांगून शेवटी त्याला अनाथाश्रमात ठेवावं असं ठरलं. त्याचवेळी देवच्या आईची मुंबईची मैत्रीण तिथं होती. तिनं सांगितलं, ‘‘मी देवला घेऊन जाते. मी सांभाळीन त्याला.’’

परंतु देवला मुंबईला घेऊन आल्यावर तिला घरातून प्रचंड विरोध झाला. शेवटी स्वतंत्र खोली घेऊन तिनं देवला सांभाळलं. सिनेमा नाटकात पाहतो असा प्रसंग प्रत्यक्ष घडत होता.

आजूबाजूला पारशी लोकांची वस्ती होती. त्यांच्या घरी देवची नवी आई काम करायची. देवची ही आई अशिक्षित होती. तिच्याबद्दल देव म्हणतात : ‘‘डोळ्यात माझ्यासाठी नितांत प्रेम, स्वरात मार्दव, स्पर्शात-माया, आपुलकी जाणवायची. कुठलंही नातं नसताना तिनं ‘आई’ या नात्याचा विश्वास सार्थ केला. ती म्हणायची, ‘माणसं मिळव मग यश आपोआप मिळेल’, हे आपल्या वागण्यातून तिनं मला शिकवलं.’’

आईबरोबर काम करत, पेपर टाकत, अभ्यास करतच देव मोठा झाला. कापडाच्या दुकानात नोकरी लागली. लग्नही झालं. पण आयुष्यानं पुन्हा एक विपरीत वळण घेतलं. आई, पत्नी आणि नवजात मुलगी-तिघीही पाठोपाठ त्यांना सोडून गेल्या. पण पत्नीच्या आजारपणातच अनुपमाशी ओळख झाली होती. त्यांचं अवघं विश्व उध्वस्त होत असताना तिनं त्यांना मानसिक आधार, आत्मविश्वास दिला, सावरलं. काही दिवसांनी घरच्यांचा विरोध पत्करून त्यांच्याशी लग्न केलं. संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यामुळे देवना त्यांच्या मनासारखं काम करायला अवसर मिळाला.

अजिंक्य क्रीडा मंडळ


जोगेश्वरीच्या पूर्वेस असलेल्या मेघवाडी विभागात १९८६ साली देव राहायला आले. अनेक बैठ्या चाळी इथं आहेत. निम्नमध्यमवर्गीय, विशेषत: कष्टकर्यां्ची वस्ती. सामाजिक सुखसोयींपासून वंचित आणि धार्मिक दंगलीचा केव्हा उद्रेक होईल याची शाश्वती नसलेला विभाग. अर्धवट शिक्षण असलेली, गिरण्या, मिल, उद्योगधंदे बंद झाले म्हणून घरी बसलेली माणसं, कुटुंबंच्या कुटुंबं गिळून टाकणारी व्यसनं आणि काळ्याकुट्ट अंधारानं ज्यांचं तारुण्य ग्रासलं आहे अशी तरुण पिढी ही मेघवाडीची १९८६ सालची ओळख होती.

देव मेघवाडीकर झाले आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून काहीतरी करावं असं मनात आलं. मुलांना वळण लावायला पाहिजे. संस्कार व्हायला पाहिजेत यासाठी देवच्या मदतीला ‘अजिंक्य क्रीडा मंडळ’ धावून आलं. देवच्या शेजारच्या चाळीतील काही तरुण मुलांनी ‘सण एकत्र येऊन साजरे करूया’ हा कृतीकार्यक्रम ठरवला होता या मंडळात देव सहभागी झाले. सर्वप्रथम मंडळाच्या कार्यकक्षा रुंदावल्या. ‘सामाजिक बांधिलकी’ म्हणून काम करायचं हे पटवून दिले. आपली पुढची पिढी सक्षम करायची असेल तर आपली मानसिकता बदलायला हवी या विचाराने मंडळातील तरुण झपाटून गेले. वाचनालय सुरू झालं.

छोट्या विद्यार्थ्यांसाठी, मोठ्या विद्यार्थ्यांनी विनामूल्य क्लासेस सुरू केले. मुलांचं आणि पालकांचंही समुपदेशन व्हायला लागलं. विद्यार्थी दत्तक योजना सुरू झाली. चाळीतील वातावरण सौहार्दपूर्ण राहावे यासाठी यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचंही कौतुक होऊ लागले. सहली, परिसंवाद, व्याख्याने, व्यसनमुक्ती कार्यशाळा यांचे चांगले परिणाम दिसू लागले. सण एकत्रपणे साजरे होऊ लागले. त्यातून एकोपा, मैत्री, प्रेम, सामंजस्य निर्माण होऊ लागले. ‘ज्येष्ठ’ नागरिकांचा सत्कार आणि त्यांचा प्रत्यक्ष कामांमध्ये सहभाग असे अनेकानेक उपक्रम ! एकातून दुसरं सुरू होत मार्गी ही लागले. फलद्रुप झाले. त्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांच्या शब्दाचे सामर्थ्य वाढले.

मंडळातील काम करणार्यांहची संख्या वाढली. ‘हे सगळं होतं ते केवळ कार्यकर्त्यांच्या मनातील तळमळीमुळे, कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा या गोष्टींना नाही,’ हे देव यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी दिशा दाखवली आणि मंडळानेच नव्हे तर विभागाने कात टाकली.

पारगप्पा


‘पारगप्पा’ नावाची अभिनव संकल्पना मंडळाने प्रत्यक्षात आणली. मंडळाने वर्गणी काढून एक शेड उभारून पार बांधला. ह्या पारावर दर शनिवारी रात्री एक तासाचे गप्पांचे सत्र चालत असे. एक विषय ठरवायचा, त्या विषयावर मनसोक्त गप्पा मारायच्या हा उपक्रम. विषयाचे बंधन नसायचे. अनेक तरुण विद्यार्थी, समविचारी माणसं यात सामील होत. विचारमंथन होत असे. माहिती दिली/घेतली जात असे. विचारांचे आदान प्रदान होत असे. याबद्दल देव म्हणतात – ‘आम्ही लोकांना नुसतंच बोलतं केलं नाही तर समुदायात कसं बोलावं याचा संस्कार रुजवला. एरवी अबोल असणारी मुलं पारगप्पात भरभरून बोलायची. काय बोलायचं – याची तयारी करून यायची.’’

पथिक व्यक्तिमत्त्व विकास केंद्र


अशी एकेक कामं होत असताना पथिक व्यक्तिमत्त्व विकास केंद्राचे तरुण संचालक समीर सुर्वे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणात देव सहभागी झाले आणि पुरते झपाटून गेले. समीरच्या प्रशिक्षणाने मित्र, समाज आणि स्वतःचा विकास यांच्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. स्नेहसंबंध कसे जपायचे, कसे विकसित करायचे, सुसंवाद कसा असावा या सगळ्याचं प्रशिक्षण दिले. ‘Give the best to the world and the best will come to you,’ हा विचार रुजवला.

प्रशिक्षणाने झालेला स्वतःचा कायापालट देव यांनी विभागातील अनेक शिकलेल्या मुलांपर्यंत पोहचवला. पदवीनंतर चांगली नोकरी लागली की आयुष्याचे सार्थक झाले – ही संकल्पना विकास पारकर, मंगेश सुतार, उदय पोवळे, कृष्णा डेलेकर, उज्ज्वल डेलेकर या विद्यार्थ्यांनी मोडीत काढली. या मुलांनी आपल्या सवयी बदलल्या, विचार बदलले आणि स्वतःत आमूलाग्र बदल घडवून आणला. आयुष्याच्या वाटेवरचे ते यशस्वी पथिक झाले.

दिंडी


हा त्यांचा आणखी वेगळा उपक्रम. अजिंक्य क्रीडामंडळात कार्यकर्त्यांसाठी Time management : वेळ व्यवस्थापन या विषयावर एक सेमिनार आयोजित केला होता. सेमिनार घेणारे श्री. श्याम पाठक यांनी गप्पांचं महत्त्व सांगितलं. ‘आपण आयुष्यात सगळं काही करतो पण मनसोक्त गप्पा मारीत नाही’ ही खंत त्यांनी व्यक्त केली आणि त्याचवेळी ‘दिंडी’ चा पाया घातला गेला. वारकरी ज्या विठ्ठलभेटीच्या ओढीनं दिंडीत मार्गक्रमण करतात, एकमेकांना उराउरी भेटतात त्याप्रमाणे आपणही ठरावीक काळानंतर एकमेकांना भेटण्यासाठी एकत्र जमायचं. एखाद्या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारायच्या. वारकरी भक्तिभावानं दिंडीत जातात आपण एकमेकांना भेटण्याच्या ओढीनं एकत्र यायचं असं ठरलं आणि म्हणून ‘दिंडी’ हे नाव या गप्पांच्या कार्यक्रमाला दिले. या गप्पांबद्दल देव म्हणतात, ‘‘माणसाच्या मनाचा तळ ढवळून काढण्याचं सामर्थ्य या गप्पांमध्ये आहे, हे आम्ही जाणलं.’’ काही दिवसांनी तोचतोचपणा टाळण्यासाठी विषय ठरवून गप्पा होऊ लागल्या आणि गप्पांची खुमारी वाढली. दिंडीचा कार्यक्रम ज्याच्या घरी असतो त्याच्या घरी जणू पंढरपूर अवतरतं. शब्दांचं सामर्थ्य, विषयाचा आवाका किती असतो हे दिंडीत समजले. परमेश्वर, जाहिरात, पर्यावरण, प्लॅस्टिकचा वापर, सणांचे महत्त्व, वैयक्तिक यश, अपयश, फजिती, कौटुंबिक सुख असे कितीतरी विषय दिंडीत झाले. ‘‘डोळ्यांतून पाणी येईस्तोवर विनोदावर हसलो आणि इतरांच्या व्यथेने व्यथितही झालो. शोभादर्शकातील मनमोहक रंग आणि रचना यांनी जसं खूप बरं वाटतं तसं या गप्पांनी मनाला तजेला येतो, टवटवी येते, जगण्याला नवी उमेद मिळते,’’ असं देव म्हणतात.

संसार म्हटला की काळज्या विवंचना असतातच. आयुष्यातले दुःखद प्रसंग विसरून त्यांना हसतमुखाने सामोरं जात देव आजही उत्साहाने काम करताहेत. एक आनंदयात्री यापेक्षा वेगळा कसा असणार.