भूमिका
एखादी कल्पना मनात उपजते तेव्हा त्याचं तात्कालिक असं एखादं कारण असतं आणि ही विचारांची वाटचाल मात्र फार आधीपासून सुरू होती असं लक्षात येतं.
गर्दीच्या रस्त्यावरून हातातल्या जड पिशव्या सावरत जाणारं ७-८ वर्षांचं पोर. चेहर्यावर समजूतदार मोठेपणा, गरिबीनं शिकवलेला. हातातली जड पिशवी भारानं काहीशी फाटते, आतले तांदूळ बाहेर सांडू लागतात. मुलगा थांबतो. तांदूळ न सांडवता पिशवी नेता येईल का, प्रयत्न करतो. ते जमत नाही. गर्दी त्याला डावी-उजवी घालून पुढं सटकते. तत्त्व म्हणून ‘मदत करणं’ हे सर्वांना मान्यच आहे, पण कुणी केली नाही. बरोबरच्यांना विचारलं, तर म्हणाले, ‘लक्षातच आलं नाही.’ किंवा –
उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षित आईवडील आणि त्यांची लाडकी लेकरं, सहसा १ते२ येवढीच. ही माणसं सार्वाजनिक ठिकाणी वागताना बघावी. एकतर मुलांकडे (विशेषत: वडिलांचं) पूर्ण दुर्लक्ष, नाहीतर प्रचंड कौतुक. विशेषत: दुसर्याच्या तुलनेत स्वत:चं लेकरू कसं भलतंच हुषार आहे हे सिद्ध करणं हाच जणू सगळ्या-मग कुठलाही असो-कार्यक्रमाचा हेतू. साहजिक माणसं या विषयात इतकी भावनाप्रधान-नाजूक असतात की, जरा टोकलं, किंवा नकळत काही विरोध झाला, तरी एरवी समजूतदार असणारे हे लोक एकदम विचित्र वागतात-चिडतात.
आणखी एक प्रसंग. फुटपाथवर आईच्या (बहुधा ती त्याची आई असावी) मांडीवर डोकं टेकून झोपलेलं ४-५ वर्षांचं पोरगं. ऐन उन्हाची वेळ-अंग भाजत होतं. पण तक्रारीचा आवाज नाही. चेहर्यावरचे भाव तर इतके भयाण!
सगळी परिस्थिती समजून त्याला निमूट शरण जाणारे हे
भाव वृद्धाश्रमात वृद्धांच्या चेहर्यावर पाहिले, तर वाईट वाटलं तरी त्यांची संगती लावता येते, पण इथे येते एक अस्वस्थता-कमी न होणारी.
आपले हात अत्यंत थिटे असतात. ह्याची कल्पना आहेच. तरी या सर्व प्रकाराचं कारण एकच आहे, ‘जबाबदार पालकत्वाचा सार्वजनिक अभाव.’
यासाठी कायदे नाहीत. असू शकते फक्त नीती. ह्यातूनच ‘पालकनीती’ ही कल्पना मनात रुजली-आपल्या सर्वांच्याच मदतीनं आज मूर्त स्वरूपात आली.
पालकत्व हा आपल्याकडे सर्वात उपेक्षित विषय आहे. (सर्वात जिव्हाळ्याचा असूनही) मराठीत तर माहिती देणारं फार थोडं साहित्य उपलब्ध आहे. अनेक मासिके पाक्षिकांनी खास बालसंगोपनावरचे विशेषांक काढले असले तरीही, मुख्यत: आहार, दुपट्यांवरचं भरतकाम आणि अनुभवाच्या पातळीवर गोड-सुंदर-गुलाबी-शोनूलं छोटूलं-मी अगदी याची वाटच पाहात होते याच्यापुढे फार थोडे जाताना दिसतात.
सामाजिक पालकत्व ही कल्पना तर समजुतीच्या पातळीवरही फार थोड्यांपर्यंत पोचते. म्हणून या पहिल्या अंकातच त्यावर एक स्वतंत्र लेख समाविष्ट होणार होता, पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नाही. पुढील अंकात तो येईलच.
असा दावा मला आजही करायचा नाही, की ह्या विषयांतलं मला काही विशेष कळतं, पण ह्या विषयावर अधिकाधिक बोललं जावं, त्यातून काही विचार तयार व्हावे, अधिक जाणीवपूर्वक विचार करण्याचा प्रयत्न व्हावा ही इच्छा आहे.
त्यासाठी एखादं व्यासपीठ असावं-हाच पालकनीतीचा हेतू. इसापानं सोप्या नीतीकथा सांगितल्या. त्या इसापनीती म्हणून प्रसिद्ध झाल्या. आता पालकांची नीती पालकांनीच-आपणच ठरवायला हवी. समजावून घ्यायला-द्यायला हवी.
पालकनीतीत सर्व स्तरातील-वर्गातील पालकांच्या प्रश्नांचा अनुभवांचा-अडचणींचा-कल्पनांचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. तरीही मी आणि मला सहजी भेटलेले माझे सहकारी हे मध्यमवर्गीय असल्यानं आमच्या लिखाणांत या वर्गाचे प्रश्न मुख्यत: येतील ही माझी मर्यादा मला मान्य आहे.
घराच्या भिंती मुलांना चित्र काढायला देऊन टाका म्हणणारी मी, भिंती-दारं-छप्पर नसलेल्या घरी राहणार्या मुलांचा विचार करू शकेन का, हा प्रश्न मलाही पडलेलाच आहे. म्हणूनच पालकनीती आपली सर्वांची आहे. आमच्या मध्यमवर्गीयांना एरवी न समजणार्या काही गोष्टी कुणी समजावल्या तर ते स्वागतार्ह आहे.
पालकनीतीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी-
(१) मासिकांत जाहिरातींसाठी लेखनाची जागा वाया घालवली जाणार नाही.
(२) ‘पालकनीती’ चा अंक सर्वांपर्यंत पोचावा ही सामाजिक गरज ओळखून प्रथम तुम्ही स्वत: आणि तुमचे स्नेही यांना अंक मिळण्यासाठी-जास्तीतजास्त वर्गणीदार करण्यासाठी-तुमच्या मदतीची गरज आहे
(३) पालकनीती हे कुठल्याही प्रकारे पैसे मिळवायचं साधन ठरू नये ह्याची दक्षता सुरवातीपासूनच घेतलेली आहे. तेव्हा, जेवढे जास्त वर्गणीदार असतील तेवढा अंक अधिक मोठा-चांगला काढणं मला आणि माझ्या सहकार्यांना शक्य होईल.
-०-
पत्रकारिता हा आमचा व्यवसाय नाही. परंतु जे सांगावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं ते मात्र अत्यंत प्रांजळ आहे, मनापासून आहे आणि या सर्वांमधून तुम्हा सर्वांशी संवाद साधायची इच्छा आहे, याच संवादासाठी हे माध्यम आम्ही निवडलेले आहे.
पालकनीती ही कल्पना सर्वसाधारण सर्वांनाच आवडली. परंतु त्या संदर्भात पालकत्वाची व्याप्ती थोडी स्पष्ट करणं गरजेचं वाटतं आहे. मुख्यतः ० ते १८ या वयोगटाचं पालकत्व या ठिकाणी अभिप्रेत आहे. वय वर्षे १८ च्या पुढील मानव स्वतंत्र सामाजिक आयुष्य जगण्यासाठी लायक असतो, निदान असायला हवा, असं मानून ही मर्यादा ठरवली आहे.
याखेरीज ७० वर्षांचा पाल्य व त्याचा ३५-४० वर्षांचा पालक असाही एक पालकत्वाचा किंवा अवलंबित्वाचा उलटा प्रकार दिसतो. त्याचाही विचार अपरिहार्य आहे.
तरीही या पद्धतीनं ‘तुकडे’ करून पालकत्वाचा विचार होत नाही. त्यासाठी संपूर्ण घर, एवढेच नाही तर संपूर्ण समाजाचाही विचार या संदर्भात होणे आवश्यक आहे. व्यक्तिव्यक्तीगणिक स्वभाव बदलत असल्याने प्रत्येकाचे अनुभव सारखेच असतील असे नाही, पण वागणुकीचे काही संकेत निश्चित व्हावेत ह्या विशिष्ट विषयासंदर्भात त्याला पालकनीती म्हणता येईल.
व्यक्तिव्यक्तींनी समाज बनत असतो. समाजपरिवर्तन वगैरे एक व्यक्ती करू शकत नसली तर समाजाचा घटक म्हणून आपल्या नकळतही ती समाज घडवत असते. ‘आजूबाजूला काहीच प्रामाणिक नाही मग आपण तरी कशाला प्रामाणिक राहायचं?’ अशी एक सर्वसाधारण सिनिक प्रतिक्रिया समाजाबद्दल असते. पण समाजाचा घटक म्हणून प्रत्येक व्यक्ती स्वतःशी व समाजाशीही प्रामाणिक राहिली तरी चित्र बदलू शकेल.
एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू नामशेष होत चाललेली आहे. मुलांची संख्याही कमी होत चाललेली आहे. कुटुंबाचा आणि देशाचा विचार करता हे आवश्यकच आहे. विशेषतः सुशिक्षित समाजात तर मुलांची संख्या १ ते २ एवढीच असते. अशा वेळी मुलांच्या निकोप वाढीसाठी त्यांनी समवयस्कांच्या बरोबर दिवसामधला काही वेळ राहणं गरजेचं आहे. पूर्वी चाळींमधून, मोठ्या वाड्यांमधून हे आपोआप घडत असे. मुलांच्या ह्या गरजेचा विचार करून पुण्यात गरवारे बालभवन हा उपक्रम चालतो. बालभवन हे केवळ क्रीडांगण नसून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी चाललेली एक अनौपचारिक धडपड आहे. सामाजिक पालकत्वाचा तो एक वस्तुपाठच आहे. ‘बालभवन’च्या संचालिका आणि बालमानसशास्त्राच्या अभ्यासक श्रीमती शोभा भागवत ह्यांची लेखमाला ह्या अंकापासून क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत.
मुलांचा विचार करताना आपणही ‘माणूस’ असतो. माणूसपणाच्या आपल्या मर्यादा असतात. व्यवसाय किंवा इतर घराबाहेरच्या व्यापांपैकी काहींचे मानसिक ताण असतात त्यांचाही परिणाम मुलांवर अपरिहार्यपणे होणारच असतो. परंतु पालकत्वाची जाणीव संपून न जाणं हे महत्त्वाचं. सुनिता बहुलेकर ह्या महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या १८/१९ वर्षाच्या मुलीच्या अनुभवाला एवढ्यासाठीच इथं सामावलं आहे.
बालकांच्यासाठी पुस्तकं, नाटकं, चित्रपट, कार्यक्रम अशा माध्यमांतून जे काही नवीन प्रयोग केले जातात, काही वेगळे प्रयत्न केले जातात त्यांची ओळख करून देणारं ‘माध्यम’ हे सदर या अंकापासून सुरू करत आहोत. ‘पालकनीती’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी जास्तीत जास्त वर्गणीदार होण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.
पालकनीती सर्व समाज बदलवून टाकेल असा भ्रम आम्हाला नाही, परंतु त्यामुळे पालकांचा दृष्टिकोन थोडा अधिक डोळस झाला तरी ते तूर्त पुरेसे आहे.