व्यक्तिमत्त्व विकास?
(….) व्यक्तिमत्त्व विकासाचे फार विकृत पैलू सध्या दिसायला लागलेत. समोरच्या माणसावर आपली छाप पडणं, कोणत्याही प्रश्नाला न बिचकता चटपटीत उत्तर देता येणं, अस्खलित (?) इंग्लिश बोलता येणं, कुठेही बुजायला न होणं, कोणत्याही मर्यादा (inhibitions) नसणं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्त्व अशी समजूत होते आहे. स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपलं आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. हे कुठलं शिक्षण आहे? का हा दिखाऊपणा, उथळपणा मुलांच्या माथी मारायचा?
विकासाच्या नावाखाली आपण मुलांना ‘‘असामान्य’’ करायच्या मागे आहोत. ही आपली लाडकी मुलं, देशाचे भावी आधारस्तंभ, ही विकसित व्यक्तिमत्त्वं मोठी होऊन नेमकं काय करणार आहेत?
डॉक्टर होऊन सामान्य माणसाच्या खिशातला पैसा उपसून बंगले उभारणार आहेत? बिल्डर होऊन सामान्य माणसाला रडवणार आहेत? वकील-न्यायाधीश होऊन सामान्य माणसाची फरपट करणार आहेत? राजकारणी होऊनही सामान्य माणसाच्या नरडीवर पाय देणार आहेत? अभ्यासक, संशोधक होऊन परदेशात स्थायिक होऊन स्वतःच्याच माय मातीवर थुंकणार आहेत?
ज्या मुलांना शाळेत बुटाला पॉलिश नसलं तर शिक्षा होते; स्वच्छ इस्त्रीचे कपडे नसले तर दंड होतो, ती मुलं जेव्हा पायात न घालणार्या – अनवाणी धूळ भरल्या पायांना भेटतील, अंगावरच्या फाटक्या चिरगुटांना पाहतील तेव्हा त्यांना त्या मागची माणसं दिसणार आहेत?
आपण कोणते डोळे त्या मुलांना देतो आहोत? कसलं मन देतो आहोत? चैन-उपभोग-मौज-स्वार्थ यांनी भरलेलं बालपण त्यांना मिळालं तर ती चांगली माणसं होणार तरी कशी?
आणि ही आपापल्या पोटची पोरं वरवर जावीत अशा महत्त्वाकांक्षा बाळगणारी पालकांची आतडी ज्यांना पालकच नाहीत अशा मुलांसाठी कधी तुटणारच नाहीत का? आपल्या मुलासाठी शंभर रुपये पाकिटातून निघतात तेव्हा त्यातले पाच दहा इतर गरीब मुलांसाठी खर्च करायची बुद्धी पालकांना कधी होणारच नाही का? आणि ही जाणीव पालकांना नसली तर ती मुलांमधे येणार कुठून?
ज्या देशाशी, ज्या इतिहासाशी, ज्या थोर माणसांशी आपली नाळ जोडलेली आहे त्यांच्यातलं काय सत्त्व आज आपल्या जगण्यात उरलंय? गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगातला एक तरी आपल्या वागण्यात डोकावतो? आगरकर फुल्यांचे आपण वारस कोणत्या समाज सुधारणेचा ध्यास घेतो? कृष्णमूर्तींना महान मानणारे आपण आपल्या रोजच्या जीवनात कोणती साधना करतो?
व्यक्तिमत्त्वविकासाच्या दिखाऊ, पाश्चात्य, शहरी, निरुपयोगी फॅडांपासून पालकांनी दूर राहायला हवं. ही पैशांनी विकत घेता येणारी गोष्ट नाही. त्यासाठी आतूनच मूल विकसित व्हायला हवं. त्याला त्याच्या त्या त्या वयातल्या जबाबदार्यांची जाणीव हवी. देशातल्या गरिबांचा मनापासून कळवळा हवा. काही थेरं नाकारण्याची ताकद हवी. त्यासाठी स्वतंत्र विचार हवा, विशाल मन हवं.
असा विकास घडायचा तर पालकांना आणि शिक्षकांना, राजकारण्यांना आणि समाजधुरीणांना सर्वांनाच आपण काय करतो आहोत, कसे वागत आहोत याचं भान हवं. मुलं शिबिरातून शिकतात त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्या माणसांकडून नकळत शिकतात. तेव्हा व्यक्तिमत्त्वविकास हा शब्द पोरांच्या पाठीमागे लावून देण्याआधी स्वतःच्या मनात पेरण्याची जबाबदारी मोठ्या माणसांची आहे.
श्रीमती शोभा भागवत, (एप्रिल १९८९ संपादकीयमधून)