बडबड गीतांच्या निमित्ताने…
‘मामाच्या घरी येऊन’ – ‘ज्या’
माझ्या मुलीनं ओळ पुरी केली.
‘तूप रोटी खाऊन’ – ‘ज्या’
‘तुपात पडली’ – ‘आजी!’
माशीच्या ऐवजी आजीला तुपात पाडून वर ही ही करून हसलीसुद्धा! आपण काहीतरी गंमत केली हे समजून सव्वा वर्षांच्या सूनृतानं मग बाबाला, नानांना, बाउईला (बाहुलीला) अशा अनेकांना तुपात पाडलं. तिला आवडेल अशा खेळाचा यातूनच शोध लागला. तिला माहीत असलेल्या गाण्यात, गाण्यातल्या शब्दाच्या जागी दुसराच शब्द घालायचा! (मला तर भाषाशास्त्राच्या तासाला ट्रान्सफॉर्मेशनल जनरेटिव ग्रामर शिकले, त्याचीच आठवण झाली.)
अक्षरओळख होण्याच्या कितीतरी आधीपासून मुलं गाणी ऐकत असतात. यातली काही गाणी कुणी नव्या कवींनी (किंवा कवी म्हणवून घेणार्या कुणीही) लिहिलेली असतात तर काही वर्षानुवर्षांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत येऊन पोचलेली असतात.
आकर्षक कव्हर, मोठा टाईप, आत चार चित्रं, कमी किंमत म्हणजे मुलांचं पुस्तक अशा समजुतीनं ‘बालवाङ्मय’ नावाखाली भरमसाठ पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. ना धड अर्थाची गंमत, ना शब्दांची, ना धड बरं यमक, कल्पना वगैरेचा तर मागमूसही नाही अशी गाणी बिनधास्तपैकी ‘छान छान गाणी’ वगैरे नावांखाली छापलेली आढळतात. त्यामुळे निवड करण्याचं काम आपल्यावर आलेलं आहे.
‘मुलांची गाणी’ असं म्हटलं तरी त्यात समजून घेण्याच्या कुवतीनुसार शब्दसंपत्तीप्रमाणे वेगवेगळी गाणी वेगवेगळ्या गटात मोडतील. अगदी छोट्या बाळांनाही आवडतील अशी पारंपरिक गाणी सुदैवानं मराठीत भरपूर आहेत. थोड्या मोठ्या मुलांकरता गाणी शोधताना अर्थ, कल्पना, भाषेच्या गमती असे निराळे निकष लावावे लागतील.
अगदी महिना सव्वामहिन्याचं बाळसुद्धा आपल्याला गाणं ऐकायला आवडतंय हे छान व्यक्त करतं. गाणं म्हणणार्याकडे ते नजर स्थिर करून बघतं. हातपाय हलवतं. रडायचं थांबतं. गाण्याच्या नादात गुंगुन जातं. पुढे थोडं मोठं झाल्यावर ‘चांदोबा चांदोबा’ ‘डोल बाई डोलाची’… ‘इथे इथे बैस रे मोरा…’ ‘अडगुलं मडगुलं’ ‘लव लव साळुबाई…’ वगैरे म्हणायला आपण सुरुवात केली की बाळ ठेका पकडून मान हलवतं, हात उंचावतं, टाळ्या वाजवतं, उसळ्या मारतं. बाळाच्या आनंदासाठी आपणही सगळं विसरून वेडेवाकडे हातवारे, चेहरे करतो आणि ते करायलाही हवंच. भीड काढून टाकून. गाणी ऐकायला, त्यांच्या ओळी पुर्या करायला तिला आवडतं. तिचा प्रतिसाद खरंच भरघोस आहे. तिला आवडणारं गाणं ‘पलऽत’ असं सांगून ती परत म्हणून घेते. त्यावर डुलत नाचते, उड्या मारते, हातानी ताल धरते. तिच्या बडबडीला, आपण बोललेलं समजून घेण्याच्या कुवतीच्या वाढीसाठी गोष्टींची गाण्यांची नक्कीच मदत होते.
नुकतेच सूनृता (आपण एक म्हटल्यावर तिनं दोन म्हणायचं असे) अठरापर्यंतचे आकडे ओळीनं न चुकता म्हणाली. ती चारेक महिन्यांपूर्वीच वर्षाची झाली. तिला कुणी बसून आकडे म्हण असं शिकवलेलं नाही. मग लक्षात आलं की ‘एक दोन तीन चार – राने झाली हिरवीगार’ असं आकड्यांशी यमक जुळवलेलं एक गाणं तिची आजी तिला म्हणून दाखवते. त्यामुळे सूनृता आकडे सहज म्हणू शकली. ती ‘दोन दोन’ असं ‘खूप’ या अर्थानं म्हणते. आणि काहीही ‘मोजतेस का’ असं विचारल्यावर ‘तीन दोन पाच् (च चहातला)’ म्हणते. म्हणजे आकडे शिकवण्याच्या वाटेवर ती सध्या बागडतेय् असं म्हणायला हरकत नाही. आकड्यांची नावं तिला ठाऊक आहेत. आकडे म्हणजे काय ही संकल्पना तिला अजून ठाऊक नाही.
या वयाच्या मुलांना पारंपरिक गाणी जरूर म्हणून दाखवावी. त्यात नादाची आणि काही प्रमाणात अर्थाचीही गंमत असते. जोडीला नवीन बडबडगीतंही सापडतील. कुसुमाग्रजांची ही छोटीशी कविता बघा-
‘हा माझा सोबती – त्याचं नाव चंदू
हा माझा भाऊ – त्याचं नाव बिंदू
ही माझी ताई – तिचं नाव जाई
ही माझी आई – तिला नावच नाही.’
अगदी छोट्या मुलांसाठी गाणी शोधताना ती धारदार तर्कावर काटेकोरपणे घासत बसण्यात अर्थ नाही. त्यांना शब्दांची, यमकांची, गंमत, यांची मजा अनुभवू द्या. मात्र यमकाच्या नादात याला हाण, त्याला मार, भांडण कर, त्रास दे असली मूल्य मुलांना सांगितली जात नाहीत ना याची खात्री करून घ्यायला हवी.
अगदी छोटं बाळ लांबलचक गोष्ट ऐकताना कंटाळून जाईल. त्यामुळे लांबीला कमी असलेल्या, नाद, लय, यमक यावर भर असलेल्या छोट्या गाण्यांचं महत्त्व या बाळांकरता जास्त आहे.
थोड्या मोठ्या मुलाची ऐकण्याची, समजून घेण्याची, एकाग्रतेची कुवत वाढलेली असते. गोष्टी ऐकायला त्यांना भलतंच आवडतं. तरीही गाण्यांचं महत्त्व राहतंच. आता अर्थाला, कल्पनांना जास्त महत्त्व येतं. भाषेची गंमत समजायला लागते. तुलनांची, रचनेची गंमत चाखायला आवडते.
मुलांना वाटणार्या कुतुहलापायी पडणार्या प्रश्नांची आणि काल्पनिक उत्तरांची कवितांमधे अगदी रेलचेल दिसते. काही कल्पना खरोखरच छान असतात. ताराबाई मोडकांच्या या ओळी पहा –
थेंबा थेंबा थांब थांब दोरी तुझी लांब लांब
आकाशात पोचली तिथे कशी खोचली?
किंवा राजा मंगळवेढेकरांच्या ‘वेडगाणी’ कवितेतला भाग –
दिल्लीमधल्या माणसाचे नाक इतके लांब
की शेंडा हलवून मद्रासच्या मुलाला म्हणतो थांब…
…पुण्यामधल्या भटजीने एकदा ढेकर दिला
तो चीनमधला चाऊ माऊ दचकून पळून गेला –
मुलांच्या आयुष्यातलेच विषयही काही कवितांमधे आढळतात. पद्मिनी बिनिवाले यांची एक कविता पाहू या –
पेन्सिल कागदावर ओढल्यावर दोन रेघा मारल्यावर
एक निघाली पाऊलवाट दोन बाजूला जंगलदाट
मग मोठं वर्तुळ काढलं पाण्यचं छान तळं झालं
तळ्याच्या काठावर दोन त्रिकोण डोंगर नाही म्हणेल कोण?
मुलांना ठाऊक असलेल्या गाण्यांवर किंवा गोष्टींवर आधारलेल्या गाण्यांची मजा आणखी वेगळी –
जुना भटो फणस आणतो. लीलावती भागवतांचा नवा देशावरून पेरू आणतो, कोकणातून आंबे आणतो, काश्मिरातून सफरचंद आणतो. विंदा करंदीकरांच्या गाण्यातल्या कुंभकर्णाला रावणानं नाकात तोफा डागल्यावर मग जाग येते आणि झोपेत स्वप्नही झोपेचंच पडल्यामुळे तो खूश होतो!
जसं मोठ्यांच्या साहित्याच्या बाबतीत विषय ‘कसा’ मांडला आहे, हे महत्त्वाचं ठरतं तसंच ते मुलांच्या साहित्याच्या, पर्यायानं गाण्याच्या बाबतीतही ठरतं. मुलांच्या हातीही लागू नये अशा काही कविता असतात. एक उदाहरण पाहू या.
भिकार्याची झोळी – त्यात घातली पोळी
पोळी काही पुरेना – भिकारी काही जाईना
भिकार्याच्या पाठी – उगारली काठी
भिकारी लागला जायला – नको नको म्हणायला.
आपण मुलांना समाजातल्या समस्यांचीही ओळख करून द्यायला हवी हे कबूल. पण कोणत्या पद्धतीनं?
एका गाण्यातली कल्पना अशी की मांजर, कुत्रा वगैरे सर्वांचा बाळाच्या जेवणात वाटा आहे. हे गाणं लिहिणार्या व्यक्तीनंच पुढच्याच कवितेत असं लिहिलंय् –
‘बाळाच्या आईनं हाणली काठी
सपकन बसली बोकोबाच्या पाठी.’
आता छोट्या बाळानं यातून नेमकं शिकायचं तरी काय? माऊला आपल्या खाऊतला घास द्यायला की काठीनं हाणायला?
मुलांच्या कविता, गाणी कशी नसावीत याची आणखी कित्येक उदाहरणं देता येतील. किमान विचार करू शकणार्यांना आणखी यादी देत बसण्याची गरज नाही. या लेखात चांगल्या कवितांचीही सगळी उदाहरणं देता आलेली नाहीत. पण हे नक्की की सुदैवानं मराठीमधे मुलांकरता थोडी का होईना पण उत्तम गाणी काही जणांनी लिहून ठेवली आहेत. त्या वाटेवर मुलांना आणून सोडण्याचं काम मात्र आपण पालकांनी जाणीवपूर्वक करायला हवं.