मुले वाढवताना…
स्त्री- पुरुष समानतेविषयी पतिपत्नींमध्ये एकमत असल्यास त्या दिशेने मुलांना वाढविणे सोपे जाते. सुदैवाने माझे व वसंतचे या बाबतीत सुरुवातीपासूनच मतैक्य आहे. आमच्या अनूच्या जन्मानंतर जेमतेम वर्षाच्या आतच माधवचा जन्म झाला. मुलगा जन्माला आला म्हणून वसंतच्या घरातील जुन्या वळणाच्या वडिलधार्यांनी मुलाच्या पणजोबांवर सुवर्णफुले उधळण्याच्या समारंभाचा प्रस्ताव केला. पण वसंतने त्याला ठामपणे विरोध करणारे पत्र आपल्या घरी पाठवले.
अनू-माधव ६-७ वर्षांची होईपर्यंत समाजप्रबोधन पत्रिकेचा संपादक म्हणून वसंत बहुधा पुण्यालाच वास्तव्य करीत असे. सातारच्या एका महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम मी करत होते. त्यामुळे पति-पत्नींमधील घरकामाची श्रमविभागणी आम्हाला शक्यच नव्हती. अनू-माधव ६-७ वर्षांचे झाल्यावर सर्वात धाकटी मेघना जन्मली. त्यासुमारास वसंतने मुलांसाठी मोकळा वेळ मिळावा म्हूणन संपादनाच्या कामातून अंग काढून घेतले व मेघना तीन-चार वर्षांची होईपर्यंत तरी घरीच राहायचा निर्णय घेतला. त्यामुळे संपादनाच्या कामासाठी त्याला कोरगावकर ट्रस्टकडून दरमहा मिळणारे २०० रु.चे मानधन अर्थातच बंद झाले. याच सुमारास काही तात्त्विक मुद्यानुसार संस्थेने माझ्यावर अन्याय केल्यामुळे मी तडकाफडकी राजीनामा देण्याचे ठरवले. तीन मुलांचे वाढलेले कुटुंब व नवराबायको दोघेही बेकार अशी परिस्थिती त्यामुळे निर्माण होणार होती. परंतु तशाही परिस्थितीत तो अन्याय सहन करीत मी नोकरी करण्यापेक्षा माझ्या राजीनाम्याच्या निर्णयाला वसंतने पाठिंबाच दिला व मला पर्यायी नोकरी मिळेपर्यंत स्वतः काही लेखन वगैरे करून अर्थार्जन करू शकू याची ग्वाहीही दिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी फक्त एका ओळीचे राजीनामापत्र खरडणार होते. त्याच्या ऐवजी त्याने माझ्यावर होणार्या अन्यायाचे एक निवेदन तयार करून ते माझ्या राजीनामा पत्राला जोडले. त्याचा सुपरिणाम होऊन माझ्यावरील अन्यायाचे तर परिमार्जन झालेच पण त्याच प्रकारचा अन्याय माझ्या आधीपासून सहन करणार्यांनाही न्याय मिळाला. अन्यायाचे निवारण झाले खरे पण संस्थेने माझी बदली तडकाफडकी बर्याच दूरच्या गावी केली. आठ महिन्याच्या मेघनाला बरोबर घेऊन मी ताबडतोब तेथे रुजू झाले व अनू-माधवच्या शाळेचे नुकसान होऊ नये म्हणून वसंतने दोन महिने सातारला राहून घर संभाळले.
या नव्या गावी आम्ही चार वर्षे होतो. तेथील शाळेच्या अध्यापनाचा दर्जा अगदी सुमार होता. शाळा घरापासून बरीच लांब होती. मुलांची ने-आण करणारी शाळेची बसही बेभरवशाची होती. त्यामुळे एका वर्षानंतर मुलांना शाळेतून काढून मेघनाला संभाळत अनू-माधवना घरीच शिकवण्याचे वसंतने ठरवले. पहिली दोन वर्षे हा कार्यक्रम बर्यापैकी राबवला गेला. नंतर वेगवेगळ्या समाजप्रबोधनाच्या कामासाठी वसंतचे दौरे परत वाढू लागल्यामुळे चार वर्षांनंतर अनू-माधवना परत शाळेत घालण्यात आले. मेघनाला शाळेत जाण्याची गोडी लागेपर्यंत तिला घरी एकटीला राहावे लागू नये म्हणून एकदोनवेळा वसंतने तिलाही आपल्याबरोबर दौर्यावर नेल्याचे स्मरते. वरील काही अपवाद सोडले तर अनू-माधव-मेघना १२ वी पास होईपर्यंत मुख्यत्वे माझ्याच देखरेखी खाली वाढली.
आजचे युग स्पर्धेचे युग आहे. मुलांशी स्पर्धा करून आपण कोणत्याही बाबतीत त्यांच्या मागे नाही, समान आहोत हे सिद्ध केले पाहिजे असे सांगितले जाते. स्पर्धेतील प्रतिस्पर्धी – भाव जीवनात कडवटपणा निर्माण करतो. या उलट मुलामुलींमध्ये सहकार्याच्या भावनेतून मैत्रीच्या भावनेतून जो गुणविकास होईल तो उभयपक्षी सात्त्विक समाधान देणारा असतो. माझ्या मुलींना मित्र असणे, त्यांना त्यांनी घरी राहायला बोलावणे यात मला कधीच गैर वाटले नाही. माझी मोठी मुलगी अनू तिसरी चौथीत असताना ‘‘अनूला मित्र आहेत’’ म्हणून एकदा तिचा मुंबईचा मामेभाऊ तिला चिडवत होता. तेव्हा तिने चटकन् त्याला सुनावले, ‘‘मग त्यात काय झालं ! माझ्या बाबांनासुद्धा खूप मैत्रिणी आहेत.’’ मुलामुलींमधील मैत्रीभाव परस्परांबद्दल योग्य तो विश्वास निर्माण करण्यास उपयोगी ठरतो असे मला वाटते. मैत्रीमध्ये उच्चनीचभाव नसल्यामुळे माझ्या दोन्ही मुलींच्या मित्रांनी आमच्या घरी भांडी घासण्यापासून कोणतेही हलके काम करण्यात कधी कमीपणा मानला नाही.
आपल्या अंगभूत क्षमतांचा पुरेपूर विकास करण्याची समान संधी मुलगा मुलगी असा भेद न करता आपल्या मुलांना देणे अशी समतावादी माता म्हणून माझी भूमिका राहिली. मुलांमध्ये असलेला कोणताही गुण हा मुलाच्या जातीला किंवा मुलीच्या जातीला शोभत नाही म्हणून त्यांना त्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न मी केला नाही. उलट तो वाढीला लागावा म्हणून उत्तेजनच दिले. गुण हे लिंग-निरपेक्ष असतात अशी माझी धारणा आहे. अनूमध्ये मुळात असलेली निर्भय व साहसीवृत्ती मुलीच्या जातीला शोभत नाही म्हणून तिला मी कधी धाक दाखवला नाही. कोणाच्याही सोबतीशिवाय घरात एकटीने रात्रीसुद्धा गरज पडल्यास राहणे, भल्यापहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत आकाशदर्शनासाठी एकटीने हिंडणे फिरणे किंवा पक्षी निरीक्षणासाठी बर्याचशा निर्जन मोरबनात भरदुपारी एकटीने जाणे, रात्री अपरात्री दारुगुत्ता ओलांडून एकटीने घरी येणे या सर्व गोष्टी ती इतक्या सहजपणे करे की तिच्या मैत्रिणींना तिचा हेवा वाटे. मुलींची अब्रू म्हणजे काचेचे भांडे; ते फार जपावे लागते असा कृत्रिम संस्कार करून त्यांना त्यांच्या पालकांनी निष्कारण भित्र्या बनवले होते. पण अशा धीट अनूलाही एकदा भीतीने ग्रासले होते. त्यावेळी ती चौदा पंधरा वर्षांची असावी. स्त्री-पुरुष मैत्रीचा पुरस्कार करणार्या वसंतबद्दल एका साप्ताहिकात बदनामीकारक मजकूर छापून आला होता. तो वाचून अनू भयभीत झाली. तिची समजूत घालण्यासाठी मी तिला सांगितले, या गावातील लोक आपल्या घराला स्वतंत्रपणे ओळखतात. त्यामुळे कुणीतरी आपल्याबद्दल अपशब्द छापले म्हणून आपल्याला घाबरण्याचे मुळीच कारण नाही आणि झालेही तसेच. आमच्या परिचितांपैकी कोणीच त्या बातमीची दखल घेतली नाही.
पाककलेची आवड ही मुलींची नैसर्गिक आवड मानली जाते. पण अनूपेक्षा माधवलाच लहानपणापासून पुरीसारख्या टम्म फुगणार्या पोळ्या करायला शिकण्याची हौस होती, त्यामुळे मला पोळ्या करायला शिकव म्हणून त्याचे माझ्यामागे सतत टुमणे असे. अशा परिस्थतीत हे काम बायकांचे आहे असे सांगून त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न मी केला नाही. उलट त्याच्या अंगच्या गुणांना सतत उत्तेजनच दिले. शिलाईकामातही लहानपणी माधवला अनू इतकाच रस होता. घरातील शिलाई यंत्रावर आपल्या मनाने आपल्यासाठी पायजमा व हाफ पँट शिवण्याचा यशस्वी प्रयत्न वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्याने केला होता. घरच्या मशिनवर आपल्या मित्रांच्या फाटक्या कपड्यांची दुरुस्तीही तो हौसेने करून देत असे. उलट मुलगी असूनही मेघनाने आत्तापर्यंत एकदाही या शिलाई यंत्राचा वापर केलेला नाही. थोडक्यात सहजप्रवृत्तीने मुलामुलींना वाढू दिल्यास, त्यांच्या गुणविकसनामध्ये जो कृत्रिम भेद केला जातो तो न केल्यास भिन्नता राहील पण त्यात साचेबंदपणा येणार नाही.
शरीरश्रम, अस्वाद आणि सर्वत्र भयवर्जन या तीन मूल्यांवर मानवी जीवनात भर असावा असे मला वाटे. स्त्री-पुरुष समता म्हणजे अशी मूल्यात्मक समता असावी. ही मूल्ये मुलांना वाढवताना त्यांना पटवून द्यावी पण त्याची सक्ती करू नये. उदा. अस्वाद म्हणजे साधेपणा, या मूल्याची सक्ती केली तर छानछोकीची भावना दडपली (Suppression) जाऊन वरकरणी मुले साधेपणाने राहू लागली तरी ‘‘आतील न सुटे गोडी’’ असे जोपर्यंत आहे तो पर्यंत ते खरे परिवर्तन नव्हे. तेव्हा अशी सक्ती न करता त्यांच्या भावनांचे, विचारांचे उदात्तीकरण (Sublimation) होण्यासाठी आपल्या स्वतःच्या आचारात जास्तजास्त शुद्धी घडवून आणून त्याचा प्रभाव मुलांवर कधी काळी पडेल म्हणून अनाग्रही वृत्तीने प्रतीक्षा करणेच श्रेयस्कर. आम्ही दोघेही खादीचे कपडे वापरत असल्यामुळे मुलांनाही त्याच कपड्यांची दीक्षा दिली. एवढेच नव्हे तर फाटलेले कपडेही रफू करून, ठिगळ लावून, दुरुस्त करून शक्य तितके दिवस शाळेत वापरायला हरकत नाही असा साधेपणाचा संस्कार त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला. वयाच्या १३-१४ व्या वर्षी अनूने याविरुद्ध बंडखोरी केल्यावर मी याबाबतीत यशस्वी माघार घेतली. पण न कळत आता तिच्यात तसा बराच बदल घडून आला आहे. ‘खद्दड, फद्दड, रद्दड’ म्हणून नापसंती दाखवणारी अनू आता स्वतःच्या आवडीने सर्वच नाही तरी बरेचसे कपडे खादीचे वापरते. बिनखादीचे पण सुती साधे कपडेच तिला पसंत पडताना दिसतात. कृत्रिम धाग्याच्या कपड्यांवर तर तिचा पूर्ण बहिष्कारच आहे. (आमच्या मुलांचे उच्चमाध्यमिक पर्यंतचे बहुतांश शालेय जीवन मंचरसारख्या ग्रामपंचायतीच्या पातळीवरील लहान गावात व्यतीत झाले. एकच शाळा असलेल्या त्या गावात शालेय मुलीत सधन वर्गाचे प्रमाण जास्त तर शालेय मुलात गरीब वर्गाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कदाचित् अनूला साध्या कपड्यांची लाज वाटू लागली असेल. माधव मात्र, ‘‘माझ्या वर्गातील मुलेही ठिगळ लावलेल्या चड्ड्या वापरतात तेव्हा मलाही तसल्या चालतील’’ असे सांगत असे) कालांतराने मेघनाही अनूसारखीच नटण्यामुरडण्याकडे कल असलेली मुलगी बनली. पण यंदा B.Sc. ची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच M.Sc. ला प्रवेश घेण्याऐवजी तिने स्वतःहून उत्तर प्रदेशातील कौसानीच्या लक्ष्मी कन्या आश्रमात १ वर्ष आश्रमातील मुलींच्या साध्या कष्टाळू जीवनात सहभागी होण्याचे ठरवले. सध्या ती तिथे सूत कताई, घास कटाई, गालिचा बुनाई वगैरेचे शिक्षण घेत आहे व आश्रम कन्यानाही काही विषय शिकवत आहे.
आज अनू माधव तिशीच्या उंबरठ्यावर आहेत व मेघनानेही नुकतीच एकविशी ओलांडली आहे. आई-वडील दोघांनीही आपल्या घराबाहेरच्या कामाची बांधिलकी महत्त्वाची मानल्यामुळे मुलांची उपेक्षा कशी होते याचे चटके अनूमाधवना मेघनापेक्षा जास्त बसले आहेत. ‘‘मी आई झाल्यावर माझ्या आईसारखी मुळीच नोकरी करणार नाही. एक मशिन घेऊन माझ्या बाळांना खूप छान छान कपडे शिवणार.’’ हे अनूचे लहानपणचे स्वप्न आता ती साकार करीत आहे. आपल्या आठ नऊ महिन्याच्या मुलीला तेलमालीश करून उटणे लावून साग्रसंगीत अंघोळ घालताना तिला बघितले की आपण दोनतीन महिन्यातच मुलांचे तेलमालीश बंद करून घाईगर्दीने त्यांच्या अंघोळी कशा उरकत होतो याची आठवण होऊन शरम वाटते.
आपल्या अध्यापनाच्या कामावर अन्याय होऊ नये म्हणून कॉलेजच्या सुट्टीचा काळ Study leave सारखा वापरावा या माझ्या धोरणामुळे आमच्या मोठ्या कुटुंबातील दोन्ही बाजूच्या वडिलधार्यांच्या सेवाशुश्रूषेच्या कामाकडे मला दुर्लक्ष करावे लागले याची बोच मला आहे. आम्हा उभयतातील या कमतरतेची भरपाई गेल्या सात-आठ वर्षांपासून माधव मात्र आपल्यापरीने सतत करत आला आहे. मला जाताजाता तो सुनावतही असतो. ‘तुम्ही दोघांनी आपल्या आप्तेष्टांसाठी काहीही केलेले नाही तेव्हा तुमच्यासाठीही कोणी काही करेल अशी अपेक्षा बाळगू नका.’
मेघनाने मात्र अलीकडेच एका पत्रात लिहिले होते ‘‘आपले आईबाबा इतरांसारखे नाहीत याचे लहानपणी मला खूप दुःख होत असे पण आता मला ती मोठी भाग्याची गोष्ट वाटू लागली आहे.’’
मुलांच्या या प्रतिक्रिया बरेच काही सांगून जातात. मी मात्र माझ्यापुरते ठरवले आहे ‘सहज वागणे जरी ते सदोष’
(सहज कर्म कौंतेय सदोषं अपि न त्यजेत्!)