अडीच अक्षरांची पालकनीती!

“ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय|’’ असे आपण
संत कबीरांच्या वाणीचे उद्गार सहज उद्धृत करतो. पण या अडीच अक्षराच्या वाचनाचा मेळ कबीरांनी पंडित होण्याशी का आणि कसा जोडला याचा खरे तर दरवेळी वेगळा शोध घेणे शक्य आहे असे लक्षात येते.

“ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय|’’ असे आपण
संत कबीरांच्या वाणीचे उद्गार सहज उद्धृत करतो. पण या अडीच अक्षराच्या वाचनाचा मेळ कबीरांनी पंडित होण्याशी का आणि कसा जोडला याचा खरे तर दरवेळी वेगळा शोध घेणे शक्य आहे असे लक्षात येते.

पालकनीतीपुरता विचार केला तर प्रेमातून ज्ञान हा प्रवास या नात्यात अगदी खात्रीचा मार्ग आहे. पण प्रेम ‘पढणे’ म्हणजे काय हे उमगलेले नसेल तर या मार्गावरून चालता येत नाही. कवि पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’

असे ते केवळ अनुभवाला कौल लावून समजून घ्यायचे ‘अव्याख्येय’ आहे की शेली म्हणतो त्याप्रमाणे ‘तो एक फारदा भ्रष्ट झालेला शब्द’ आहे की मातृस्वरूप आहे की ईश्वरस्वरूप आहे असे कवीचे किंवा धर्माचे दाखले बाजूला ठेवून आपापल्या अनुभवाला आलेले प्रेमच आपण जरा ‘पढू या’.

माझा शाळेत पहिला नंबर आला होता, रिझल्ट घेऊन घरी आले तेव्हा कोणी नातलग बाई आईशी बोलत होत्या. मी दारापाशी थबकून दाराआड उभी राहिले. ‘काय ग? काय बातमी आहे?’ मी फक्त एक बोट दाखवले. आई हसली. मी वरच्या मजल्यावर पळून गेले. प्लेगसाठीची लस टोचल्यावर मी हात आखडून धरून ठेवला होता. माझ्या मोठ्या बहिणीने हळूहळू तो लांब करून शेकून दिला.

कै. भाऊसाहेब रानडे यांनी माझा आठवीत पहिला नंबर आल्याबद्दल अभिनंदनाचे पत्र लिहिले होते, त्यात पुढे त्यांनी लिहिले होते, ‘तुझ्या वागण्याबद्दल नाराजीचे मत आईंनी माझ्याजवळ सांगितले. अभ्यासाप्रमाणे वर्तणुकीबाबतही नाव ठेवायला जागा राहू नये.’ इ.

अल्काझींच्या नाट्यशिक्षणवर्गाची माहिती माझे वडील त्यांच्या स्नेह्याकडून माझ्यासाठी घेऊन आले होते. (मी त्या वर्गाला न जाता सेवादलाच्या कलापथकाच्या दौर्याला गेले होते.)
‘तू उगीच काही सबबी सांगू नकोस. एक तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे, आणि तू येणार आहेस.’ मैत्रिणीने फोन ठेवून दिला. (या लग्नाला मी गेले होते.)

शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘नोकरी शोधण्यासाठी मुंबईत ये’ अशी तार दोघा मित्रांनी केली. तिथे गेल्यावर कळले की सगळी गंमत होती. मला मुंबईत आणण्यापुरती. (या दोघांपैकी एकाशी मी पुढे लग्न केले.)

दुपारी पडले असताना मुलीने (वय वर्षे तीन) मागून ढुशी दिली आणि चिकटून झोपली. मी काही म्हणायच्या आतच ‘मला काही तुला त्रास द्यायचा नाहीये. पण मला आवडतं तुला चिकटून झोपायला’ असं सांगून टाकलं.

मुलगा लहान असताना मी कॉलेजात शिकवत असे. एक दिवस संध्याकाळी काहीतरी समारंभ होता. मी निघाले तेव्हा मुलगा (वय वर्षे चार) म्हणाला, ‘कशाला ग जातेस?’ ‘काम आहे’. ‘उद्या कर की.’ ‘नाही. आज केलं नाही तर प्रिन्सिपॉल रागावतील.’ यावर थोडं थांबून तो म्हणाला, ‘उद्याच कर. प्रिन्सिपॉलना म्हणावं प्रसाद रागावतो.’ मी विचारलं, ‘तुला यायचंच् का? चल.’ ‘हो.’ मी त्याला घेऊन गेले.

रामकाका वैद्य हे आमचे कौटुंबिक स्नेही. मला मुलगा झाला, तेव्हा ते साठीचे असतील. ते हॉस्पिटलमध्ये आले तेच ओरडत, ‘वहिनी, सुधीर पेढे घ्या. मला इतका आनंद झालाय् – मीच तुम्हाला पेढे देतो आणि आनंदानं उडी मारतो.’ खरोखरी टाळी वाजवून त्यांनी उडी मारली!

अशी यादी प्रत्येकाजवळ असते. यामधूनच ‘ढाई आखर’ जुळवण्याचे तुकडे आपल्या हाती येतात, ती जुळवता आली की आपण ज्ञानी, पंडित होतो आणि शिवाय सहृदय असतो! ही यादी विशिष्ट वयाला किंवा विशिष्ट नात्याला सीमित होत नाही. प्रत्येकाने आपापली यादी तपासली तर हे नक्कीच लक्षात येईल. आता या यादीतली अडीच अक्षरे जुळतात तरी कशी हे पाहू या.
या एकेका उदाहरणात प्रत्येक नात्याचा एक धागा दिसतो आहे. त्यात विचार आहे, ‘वाटणं’ आहे, आवड आहे, करणं आहे, मोकळेपणा आहे, अधिकार आहे, मजा आहे, वेदनाही आहे. पण ते सर्व काही प्रेम आहे. या प्रेमातून ज्ञान झालेच आहे. कौतुक कसे करावे, काणाडोळा कशाकडे करावा, कानउघाडणी कशी करावी, लक्ष कशाकडे द्यावे, कोणत्या शब्दातून काय ‘ऐकू’ येते असे केवढेतरी ‘ज्ञान’ प्रत्येक प्रसंगातून मला मिळाले आहे. त्यामुळेच प्रेम म्हणजे संवेदन, संवाद, सह-सर्वकाही सहत्व. प्रत्येक नाते ही सर्व संभाव्य ‘जागा’ व्यापत नाही. पण प्रत्येक नात्याला ही जागा शोधता आली तर त्याला एक स्वयमेव संपन्नता येते.
यात बाई-पुरुष असा कोणता फरक आहे? मला वाटते कोणताच नाही. या प्रकारचे अनुभव कोण कोणाला देईल यात बाई-पुरुष काही नाही. एरवी राठ असणारा पुरुष प्रेम करताना कोमल असतो किंवा बोबडं बोलतो किंवा शब्दावाचून अवघडतो आणि एरवी शालीन नम्र असणारी कुणीतरी स्त्री संरक्षक पवित्रा घेते तेव्हा कणखर बनते, ‘निश्चयाचा महामेरू’ होते, बारा हत्तीचं बळ दाखवते, पण काही साचेबंद विचारांचा आपल्यावर बराच पगडा आहे, आणि त्यामुळे ही अक्षरे आपण निखळ मानवी संदर्भात ‘पढू’ शकत नाही.

हा साचा प्रेमाचा व्यापक प्रांत संकुचित करून फक्त स्त्रीपुरुषातील लैंगिक आकर्षण आणि व्यवहार या चौकटीत बंदिस्त करतो. हा पैलू मानवी जीवनात नैसर्गिक आणि सामाजिक – सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. पण इतर बाबींप्रमाणेच याही ठिकाणी साचा आला की तारतम्य किंवा विवेक डावलले जातात. ज्या मुलांना फक्त हा साचाच ‘प्रेम’ या शब्दाने दाखवला जातो, त्यांना त्यांच्या गाठी असलेल्या अनुभवातली अडीच अक्षरे वाचता येईनाशी होतात. लैंगिक आकर्षणाची धग आणि इंद्रिय संवेदना लैंगिक प्रेरणेतून मिळणारी ऊर्जा, आवेग आणि दिशा या दोन वैशिष्ट्यांमुळेही ‘प्रेम’ या साच्याला खास मूल्य प्राप्त होते.
पुरुषप्रधान संस्कृतीने हा साचा सरळसरळ पुरुषांच्या सोयीसाठी तयार केला. त्यामुळे स्त्रीचे सौंदर्य, पुरुषाचा पराक्रम यांचे महत्त्व अतोनात वाढले. प्रेमामुळे उजळलेला चेहरा सुंदर होतो याची सूक्ष्मता हरवली. ढोबळपणे सुंदर असणार्या ‘रूपगर्विता’ आणि ढोबळ पराक्रम गाजवणारे पुरुष यांचे एकमेकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न, आडाखे, हिकमती यांच्या भरताडालाच प्रेम म्हणायला प्रारंभ होतो, झाला. या साच्याचा आणखी एक विशेष म्हणजे सौंदर्य आणि पराक्रम यांचेही अवमूल्यन होते. ‘सुंदर’ दिसण्यासाठीचे कृत्रिम उपाय, पुरुष असणे हा एक ‘जन्मसिद्ध’ पराक्रम समजणे ही त्याची टोके. पुरुषांच्या आवडीनुसार बायकांचे पोषाख ठरताठरता अंगप्रदर्शनापर्यंत तथाकथित ‘सभ्य’ किंवा ‘उच्चभ्रू’ आचारही पोचला, फॅशन नावाच्या परिवर्तनशील वर्तुळात स्त्री-पुरुष आकर्षणाचा ‘वापर’ करून घेणारा व्यापारी दृष्टिकोन अनेक हिकमती लढवू लागला. यात प्रेम म्हणजे ‘देणं’ असतं, या ‘काव्यमय’ ओळीला देणं म्हणजे भेटवस्तू, भेटवस्तू म्हणजे घड्याळ, ग्रीटिंगकार्ड किंवा कपडा – ‘आमचा’ माल – असतो. म्हणजेच, प्रेम या भाववृत्तीला मूर्त वस्तूत, कृतीत एका समीकरणाने अडकवले जाते. असे साचे व्यापारीकरणातून येतात, तसेच मनोरंजनातूनही येतात. ते संवेदनशीलतेत वाढ करण्याऐवजी ‘एवढ्या प्रेमाच्या गप्पा करता, मग घेतलंत का मला घड्याळ?’ असा प्रश्न तयार करतात. भेटवस्तू दिल्याशिवाय प्रेम समजेनासे होते. त्यामुळे एखाद्या जाहिरातीत मातृप्रेम एका ‘खास’ पाककृतीवर अडकवलेले असते आणि त्याच्या १४ परी सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात.

माणूस प्रेमभावनेचा अनुभव घेतो, मानवी नात्यांना या आल्हादकारक जोडणीमुळे खास रूप येते, त्यात काही गोष्टी न सांगता समजण्याच्या असतात, काही वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. म्हणजेच प्रेमभावनेचे पूर्ण रूप दोघातील व्यक्त आणि अर्धे उरलेले अव्यक्त अशा अडीच अक्षरांचे असते, त्यातील अव्यक्ताचा शोध म्हणजे प्रेमाची खूणगाठ. अगदी स्त्रीपुरुष आकर्षणाचा पाया असलेले नातेही ‘प्रेम’ होते, तेव्हा विचारांना आणि कृतींना गोडी येते. ती आपण निर्माण करण्यानेच अनुभवता येते. ती काही जमाखर्चाची बाब नव्हे. प्रेमाला एक स्वत्व, खास स्वतःचे वेगळेपण असते, ते नाते फक्त त्या दोघातच ‘असते.’ एकाची जागा दुसरा घेऊ शकत नाही. एक नाते तुटले तर ते तुटले, त्याची भरपाई नाही. वेगळी नाती निर्माण होण्याची शक्यता असते – पण त्या नात्याचे स्वत्व वेगळे असते, हा प्रेमाच्या स्वरूपामधला फार महत्त्वाचा भाग आहे. त्यात तुलना होऊ शकत नाही. ‘मी एवढं केलं, पण तुला त्याचं काही आहे का?’ हा प्रश्नच नात्यात वितुष्ट आल्याचा निदर्शक आहे. गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न, ‘खर्चाचे कलम’ बनल्याचे हे लक्षण आहे.

मानवी नात्यात भावनिक सुरक्षितता, आपुलकी, आधार अशा अनेक गोष्टी गुंतलेल्या असतात आणि प्रेमाची नाती मानसिक आरोग्याचा पाया पक्का करत असतात. पालक म्हणून मुलांच्या विकासात सहभागी होताना मुलांच्या अंगी ‘गोडी निर्माण करण्याची शक्ती’ येते आहे की नाही यावर भर देणे महत्त्वाचे आहे. ज्याला गोडी निर्माण करता येत नाही तो माणूस प्रेमात सहभागी होऊ शकत नाही. तो ‘लाड करून घेणारे गिर्हाईक’ होऊ शकतो. तो ‘जाईल तेथे शत्रू’ होऊ शकतो. तो ‘आनंद नष्ट करणारा (kill joy)’ होऊ शकतो, तो हट्ट करून, डोक्यावर बसून दुसर्यांना नमवून स्वतः उच्चपदस्थाच्या थाटात ‘प्रेम’ नावाचे लॉलीपॉप वाटू शकतो. आपल्या लक्षात येईल की हे सर्व प्रकार पालकांमार्फतही होत असतात. मुलाने काहीही मागितल्याबरोबर ते देण्यासाठी धडपडणारे आईवडील, घरात पाऊल टाकल्याबरोबर करड्या नजरेने फिरणारे पालक, मित्रांसमोर मुलांचा अपमान करणारे किंवा ‘आमच्या जिवावर उड्या मारताय’ हे ऐकवणारे पालक किंवा असंख्य अटीतटी घालून मगच उपकार केल्यासारखे एखादे खाऊ, खेळणे किंवा बरा शब्द बोलणारे पालक ती अडीच अक्षरे मोडून टाकतात किंवा जुळूच देत नाहीत.

या जबाबदारीचे एक रूप स्वतःच्या आणि मुलांच्या संबंधातूनच मुलांना अनुभवता येते, तर दुसरे रूप पालकांच्या इतर ‘प्रेमभावी’ नात्यांमधून मुलांना कळून येते. ही दोन अक्षरे नीट लागली तर मुले आपापल्या प्रयोगाचे अर्धे अक्षर त्यात जुळवू शकतात. मानवी नात्यांची रूढ अर्थाची पकड नको वाटल्याने त्यात सैलपणा आणण्याचे अनेक झगडे झाले. पण निर्बंधाविरुद्धचा झगडा हा नात्याविरुद्धचा लढा नव्हे, हे लक्षात ठेवलेच पाहिजे. नाती बांधता आणि सांभाळता येणं हे मानवी समाजाचं शुभचिन्ह आहे, ते मुलांना सुपूर्द करणं म्हणजे अडीच अक्षरांची पालकनीती!