तराजूच्या एका पारड्यात अपत्यसुख आणि दुसर्या पारड्यात अन्य कोणतंही ऐहिक सुख ठेवलं तर कोणतं पारडं जड राहील हे काय सांगायला हवं? चिमुकली पावलं घरात उमटणार म्हटल्याबरोबर एकूण घराचंच स्वरूप पालटून जातं. दोन अडीच वर्षांच्या ताई-दादापासून ते ऐंशी नव्वद वयाच्या पणजी-पणजोबांपर्यंत सर्वजण त्या नूतन अर्भकाचे विभ्रम कौतुकानं पाहात असतात. बाळाचा पाळणा झोपडीतला असो की बंगल्यातला – भोवतालच्या दुनियेचा तो पाळणा म्हणजे आकर्षणबिंदू असतो. निरागसतेवर प्रेम करावं, निसर्गाच्या नव्या उन्मेषानं मोहून जावं ही निसर्गानं मानवी मनाला दिलेली बहुमोल देणगी आहे.

आई आणि बाबांचं तर बाळ म्हणजे नवं विश्व. बाळ दहा दिवसाचंसुद्धा नसतं पण ‘माझ्या बाळाला मी मोठ्ठा करणार, खूप खूप मोठ्ठा करणार’ असं बाळाचे आई बाबा दोघंही म्हणत असतात. पण मोठ्ठा म्हणजे नक्की काय हे दोघांनाही माहीत नसतं आणि करणार म्हणजे तरी नक्की काय करणार हेही समजत नसतं. बालकाचा विकास कसा घडत जातो, अनुवंश, भोवतालचं वातावरण, त्याची स्वतःची शारीरिक ठेवण या व अशा अनेक बाबींचा बालकाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी कसा संबंध आहे हे अनेकदा माता-पित्यांना ठाऊकच नसतं. आजच्या पदवीप्रिय समाजव्यवस्थेत अभ्यास केला जातो नेमलेल्या (आणि नेमलेल्याच फक्त) पुस्तकांचा. कॉलेज शिक्षणं संपतात आणि मुली बोहल्यावर चढतात. मुलं आर्थिक स्थैर्याच्यामागे लागून ५-६ वर्षात विवाहबद्ध होतात. परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी घर, कॉलेज, क्लास या त्रिकोणात फिरत राहाणं किंवा विषय समजत नाहीतसं लक्षात आलं तर अभ्यासापासून दूर दूर राहात फावल्या वेळाचीही पार उधळपट्टी करणे अशा दिनक्रमातच बौद्धिक परिपक्वता साधण्याचा कालखंड संपून गेलेला असतो. चांगली शिक्षणं पदरात असूनही, लग्न होतं, मूल होतं, पण मूल वाढवायचं, खेळवायचं म्हटलं तर छोट्या बाळांचे साधेसुधे खेळ आई बाबांना येत नसतात. मुलाचे तान्हेपणातले सर्वसाधारण आजार कोणते असतात, बाळ कशामुळे सुदृढ होतं, शाळा कोणती, ती कशी निवडावी याची कल्पना नसते. शाळा या घटकाचा मुलाच्या घडणीशी फार प्रभावकारी संबंध आहे, कोणत्या भाषा, माध्यम त्याला व आपल्याला शिक्षणदायक आहे, यापेक्षा ‘कोणती शाळा’ याचा संबंध प्रतिष्ठेशी जोडला जातो, आणि मग घसरणीला सुरवात होते. अति सुशिक्षित असलेल्या किती माता, किती पिता आवर्जून बालमानसशास्त्र वाचत असतील याची शंकाच आहे. मूल वाढतं, त्याचा विकास होतो ती विकासप्रक्रिया प्रत्येक मातापित्याला माहीत असणं आवश्यक नाही का? दिवस राहिले म्हणजे मग ‘गर्भारपणी मातेने घ्यायची काळजी’ वगैरे साहित्य सुशिक्षित मुली वाचतात, पण ते तेवढ्यापुरतेच. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विकासाचा वेग वेगवेगळा असतो. ५ ते १२, १३ ते १९ या वयातल्या मुलांच्या गरजा वेगळ्या, समस्या वेगळ्या. पण आई आणि वडील दोघंही यंत्रयुगाच्या चक्राला बांधलेले, करिअरच्या मागे ! त्यांना मानसशास्त्र शिकायला, नव्हे किमान वाचायला वेळ तर हवा !

मुलाच्या घडणीत आईवडिलांबरोबर कुटुंबाचाही मोठा वाटा आहे ! आपल्याला कुठं आणि कसं संरक्षण मिळतंय हे मुलं बरोबर समजून असतात. किती हद्दीपर्यंत आपले हट्ट पुरवले जातात हेही मुलांना चांगल समजतं. मात्र, आपण या परिस्थितीचा गैर फायदा घेतो आहोत, ही जाणीव, त्यांच्या जवळ नसते. ही जाण पालकांनी आणून द्यायला हवी. मुलं अनुकरणातून शिकतात, मुलं मैत्रीसाठी वाटेल ते मोल द्यायला तयार होतात, धाडस दाखवावं ही त्यांची एक भावनिक भूक आहे ती भागवण्यापायीच मुलं नको ती संकटं ही ओढून घेतात; कडक शिस्तीपायी मनानं अति दडपलेली तरी होतात किंवा अतिबेफाम तरी होतात असं सारं मानसशास्त्र संसाराला लागल्यावर समजावून घ्यायला सवडच नसते आणि तोवर स्वतःला वळण लावणं किंवा नवे बदल अंगीकारणं हेही आई बाबांना जमेनासं झालेलं असतं. ‘आमचं व्हायचं ते झालं; आता ह्यांना ‘मोठं’ व्हायचंय, ह्यांनी नको का विचार करायला?’ असं तिशीचाळिशीतलं जोडपं म्हणतं ! असं वातावरण प्रतिष्ठित शिक्षितांमध्ये आहे. मग अल्पशिक्षितांमधे तर विचारूच नये. अति मद्यपान किंवा तंबाखूसारख्या अमली पदार्थांच्या सेवनाचा परिणाम – मूल जन्मतःच एखाद्या बौद्धिक वा शारीरिक कमतरतेचा बळी ठरण्याची शक्यता असते. एवढंच काय पण मद्य वा तंबाखूसेवन केलेल्या तोंडानं बाळाच्या तोंडाजवळ जाणं गैर आहे हेही भान अनेक घरात नसतं.

सातवी आठवीत शाळा सोडून आईच्या अर्थार्जनात सहभागी होणार्या असंख्य मुली ! दहावी बारावीच्या पुढं बौद्धिक वा आर्थिक कुवत नसल्यामुळं शिक्षण थांबवलेले किती मुलगे ! ही मुलं संसाराला लागतात. वर्षभरात घरात पाळणा हालतो. ‘मुलाला जन्म देणं ही माझी सामाजिक जबाबदारी आहे म्हणूनच माझे मूल देहानं सुदृढ व्हायला हवं आणि मनानं निकोप वाढायला हवं. या दृष्टीनं मूल मोठं करणं हे आज माझ्यापुढे आव्हानच आहे’ हा विचार या जोडप्यांच्या मनात कसा येईल ! असे विचार उद्भवायला त्यांच्या मनाची भूमी विवाहापूर्वीच तयार नको का व्हायला? आजच्या पालकांना शिकवण्यापेक्षा उद्याच्या पालकांना म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना या गोष्टी शिकवल्या तर वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यासारखे होईल. माध्यमिक शाळेच्या वयातच मुलांना लैंगिक शिक्षण दिलं जावं हे मत आता नवलाईचं राहिलेलं नाही. याबरोबर, शालेय अभ्यासक्रमात, बालमानसशास्त्र व बालसंगोपन या विषयांना विशेष महत्त्व दिलं जावं असं मला मनःपूर्वक वाटतं. कुटुंब आनंदी कसं राहील, कुटुंब सुखी तर बाळ आनंदी, घरातलं बाळ सर्वांचं आहे, ते चांगलं घडावं ही सर्वांचीच जबाबदारी आहे, कुटुंब हा सामाजिक स्थैर्याचा आधार आहे हे विचार शिकवले जावेत. कुटुंबातल्या प्रत्येक घटकानं दुसर्याच्या विकासाला वाव आणि प्रोत्साहन देण्याची जबाबदारी ‘माझी’ आहे असं मानलं आणि हा विचार कृतीत आणला तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. कोणालाच अन्याय सहन करण्याची वेळ येत नाही. कुटुंबातला

प्रत्येकजण दुसर्याच्या अधिकारांची आणि आनंदाची जपणूक करू लागला तर मनःसंयमन वेगळं शिकायला नको आणि नीतिपाठही वेगळे शिकवायला नकोत.

आठवीची मुलं साधारणपणे १३-१४ वर्षाची असतात. शारीरिक आणि मानसिक बदलांच्या दृष्टीनं हे वय म्हणजे महत्त्वाच्या वळणाचं. पदवीपर्यंत जाणार्यांची संख्या थोडी. ११ वी, १२ वी करून छोट्या मोठ्या नोकर्या किंवा रिक्षा चालविण्यासारखे उद्योग करणारा गट मोठा. म्हणून बालमानसशास्त्र आणि बालसंगोपन हे दोन्ही विषय ८वी ते १०वी पर्यंत विशेष महत्त्व देऊन शिकवले जावेत. ११वी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणातही हे दोन्ही विषय अधिक विस्ताराने आणि सखोल शिकवले जावेत. असं वाटतं M.B.B.S. व्हायचं तर प्रवेश परीक्षा द्यावी लागते तशी लग्न करणार्यांना दोघा वधुवरांनाही अशी परीक्षा ठेवली पाहिजे. त्यांना किमान १०-१५ बडबडगीतं म्हणता यावीत, साधी सुधी चित्र काढता यावीत, गोष्टी सांगता याव्यात, कागदाच्या चार वस्तू करता याव्यात, घराची सजावट करण्याचं थोडंफार कौशल्य अवगत असावं. बालशाळा (पूर्वप्राथमिक) आणि घर यातलं अंतरही यामुळं कमी होईल. स्त्री आणि पुरुष सर्वच कामात आनंदानं रस घेऊ लागले तर स्त्रीमुक्तीसाठी कंठशोष करणंही कमी होईल आणि हे व्हायलाच हवं.

माणसामाणसातल्या दर्या भाषणांनी किंवा कायदा करून कमी होतील त्यापेक्षा माणसांची मनं प्रगल्भ होण्यानं, माणूस कृतिप्रवण होण्यानं अधिक लवकर मिटतील.

विवाहपूर्व परीक्षेची कल्पना आपल्या लोकशाही राष्ट्रात हसण्यावारी नेली जाईल पण त्यातलं गांभीर्य लक्षात घेतलं तर शाळेपासूनच बालमानसशास्त्र आणि बालसंगोपन हे विषय विशेष महत्त्व देऊन का शिकवले जावेत ते लक्षात येईल.
बालमानसशास्त्र आणि बालसंगोपन हे विषय केवळ माहितीचे नसून प्रयोग, निरीक्षण यांना अधिक वाव देणारे आहेत. म्हणून ते शालेय अभ्यासात असावेत. एखादं मूल अति हट्टी का होतं, एखादं भित्रं का असतं, कुणी भांडकुदळ तर कुणी प्रेमळ. व्यक्तिमत्त्वात अशी भिन्नता कशामुळं येते, कशामुळे काय घडते, कारणं कोणती, त्यांचे परिणाम काय होतात, ते किती खोलवर जातात – किती दूरवर जातात अशा तर्हेच्या निरीक्षणांमुळे मुलं लहान वयातच स्वतःकडे त्रयस्थपणे-तटस्थपणे पाहायला शिकू लागली तर ती अधिक निकोप वृत्तीची घडू लागतील. समाज कुटुंबांचा बनलेला आहे. सचोटी, उद्यमशीलता, ज्ञानाविषयी आस्था वगैरे गुणांचं कुटुंबात संवर्धन झालं तर त्याचं विकसित रूप परिपक्व व्यक्तिमत्त्वांच्या रूपानं समाजात दिसतं. समाजाचं संघटित स्वरूप टिकवायचं तर कुटुंबातील संबंध निकोप आणि सुदृढ, सामंजस्याचे असणं आवश्यक आहे. कुटुंबाचं स्वास्थ्य केवळ आर्थिक मिळकतीवर अवलंबून आहे की आणखी कशावर? समाजाला हवी असणारी जिज्ञासू, संयत, प्रयत्नशील, प्रगल्भ, प्रामाणिक व्यक्तिमत्त्वं कुटुंबातूनच घडत असतात. कुटुंबे गुणसमृद्ध होत जातील तर समाज गुणसमृद्ध होईल. कुटुंबे अशी घडण्यासाठी बालवयातच मुलांची मनं तशी घडणं आवश्यक आहे.

पालक झाल्यावर मुलांच्या घडणजडणीविषयी शिकविण्यापेक्षा पालक होण्यापूर्वीच – विद्यार्थीदशेतच माणसाचा स्वभाव कसा घडत जातो, वृत्ती कशा घडत जातात, वागण्याला विधायक किंवा विघातक वळण कसं लागतं वगैरे गोष्टी समजणं अधिक उपयुक्त आहे. भौतिक प्रगती आणि भौतिक सुखांच्या साधनांमागे लागणार्या आजच्या समाजात मनं दिसतात बेलगाम चौखूर उधळलेली तरी किंवा कणा मोडलेली तरी; कुणापुढे लाचार तरी किंवा बेगुमान उद्धट तरी. चित्ताची स्वस्थता, चित्ताची एकाग्रता, मनाची निर्मत्सरता कशी साधेल? असं मनच वास्तवाचा स्वीकार समंजसपणे आणि डोळसपणे करू शकते. मानसशास्त्र हे मनाचं शास्त्र आहे. मन कसं घडतं हे सांगणारं आणि मन कसं घडवता येतं हे सांगणारं. मानसशास्त्र हे वर्तनशास्त्र आहे. कथा कवितांमधून मनावर संस्कार जरूर होतात पण त्याहीपेक्षा मनांचा म्हणजेच माणसाच्या वागण्याच्या पद्धतींच्या प्रत्यक्ष निरीक्षणानं मुलांची मनं प्रगल्भ व्हायला अधिक मदत होईल.
म्हणून शालेय आणि कोणत्याही शाखांच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बालमानसशास्त्र व बालसंगोपन हे विषय आवर्जून असावेत असे मला वाटते.