शिकविण्यातल्या आनंदाचं रहस्य
शिक्षक व्हावंसं मनापासून वाटणं आणि तसं झाल्यावर शिकविण्यातला आनंद निवृत्तीपर्यंत टिकणं ही तशी अभावानंच दिसणारी गोष्ट. अशा एका शिक्षकाचं मनोगत आपल्यासमोर ठेवावंसं वाटलं. प्रा. सतीश बहादूर हे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ‘चित्रपट रसग्रहण’ हा विषय शिकवत असत. तिथून निवृत्त झाल्यावरही हा विषय अनेक व्यासपीठांवरुन शिकवत, मांडत आले आहेत.
आताचा आणि या पुढचा जमाना हा दृक् श्राव्य प्रतिमांनी भारलेला असणार आहे. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी लहान थोर सर्वांनाच दृक्श्राव्य माध्यमाची जाण असणं आवश्यक आहे. नृत्य, नाट्य, साहित्य, चित्रकला यांच्या अभ्यासाप्रमाणे चित्रपटांचाही यंत्रतंत्राधिष्ठित कला म्हणून अभ्यास व्हायला हवा, प्रेक्षकांनीही सुजाण व्हायला हवं, इतकंच नाही तर भाषा-साहित्य, गणित हे विषय आवर्जून शिकवले जातात, तसं चित्रपट रसग्रहणही अभ्यासक्रमात यायला हवं असं त्यांना वाटतं. त्या दृष्टीनं या विषयाचं बीज भारतीय चित्रपट प्रेमींसाठी रुजविण्याचं महत्त्वाचं काम प्रा. बहादूर यांनी केलं आहे. प्रा.बहादूर यांचा शिकविण्याचा विषय बहुसंख्य वाचकांना अपरिचित असला तरी शिक्षक म्हणून त्यांनी स्वत:ला कसं घडवलं, शिक्षक म्हणून काय करायचं-काय करायचं नाही त्याची निवड करणं हे, कुठल्याही शिक्षकाला मार्गदर्शक ठरेल.
मला स्वतःबद्दल बोलण्याचा नेहमीच संकोच वाटतो. या लिखाणातही तसा अवघडलेपणा जाणवेल कदाचित. कारण हे सगळं माझ्या वर्गातल्या अध्यापनाविषयीच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित आहे.
मी प्रथम एक कबुली देऊन टाकतो. माझं माझ्या विषयावर, चित्रपटावर प्रेम आहे. या प्रेमातच कदाचित माझ्या आयुष्यभराच्या अध्यापनाचं रहस्य दडलेलं आहे. वर्गात रसग्रहण शिकवताना मी एका अर्थीं या प्रेमाचाच अन्वय लावत होतो आणि त्याच प्रक्रियेत विद्यार्थ्यांना माझ्या एका पद्धतीचा वापर करून सहभागी करून घेत होतो. त्यामुळे ते आपापल्या परीने चित्रपट समजून घेऊ शकत होते आणि त्याच्या प्रेमातही पडू शकत होते.
मी चित्रपटाच्या मानव्यशाखेतील शिक्षक आहे, म्हणजे होतो. आता माझं वय ८० झालं आहे. मी चित्रपट रसग्रहणाचा प्राध्यापक म्हणून १९८३ पर्यंत फिल्म इन्स्टिट्यूमध्ये काम केलं. केवळ मनोरंजनाच्या चित्रपटउद्योगापेक्षा एका नवचित्रपटकलेचा भारतात उदय व्हावा या उद्देशाने इन्स्टिट्यूटची स्थापना १९६१ मध्ये झाली. आम्ही चित्रपट निर्मितीच्या विविध शाखांमधले अभ्यासक्रम – म्हणजे पटकथालेखन, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, ध्वनिमुद्रणतंत्रज्ञान आणि अभिनय… असे सर्व प्रकार घेत होतो. माझे अध्यापन या सगळ्याला पूरक होते. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटातील श्रेष्ठ कलाकृतींच्या मार्फत तंत्रज्ञान – कला जाणिवांना समृद्ध करण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळे माझ्या अध्यापनाचा गाभा म्हणजे जगभरातले श्रेष्ठ चित्रपट असत.
पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपटकलेचे शिक्षण तंत्रदृष्टीबरोबर कलादृष्टीतून व्हावे अशी कल्पना होती. सुरुवातीच्या काळात जवळजवळ वीस वर्षे नेहमीचा खडूफळा आणि जोडीला उदाहरणादाखल फिल्म दाखवण्याची व्यवस्था अशाच प्रकारे वर्गातील अध्यापन चालत होते. चित्रपटकलेचं शिक्षण देण्याची कोणतीही मळलेली वाट नव्हती. मुलांसमवेत चित्रपटकलाकृती उलगडण्याचं काम करता – करता ती वाट निर्माण झाली. फिल्म इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त चित्रपटप्रेमींसाठीही चित्रपट रसग्रहणाचे अभ्यासक्रम आम्ही घेत होतो. अशा प्रकारे अक्षरशः हजारो उत्साही चित्रपटप्रेमींशी आमचा संवाद झाला. १९९५ सालापासून मी काहीसा दूर झालो आहे. जुन्या शिक्षकांनी क्रमशः मावळावे हे उचितच.
मी माझा वर्ग विद्यार्थ्यांशी जिवंत संवादाची जागा म्हणूनच वापरला. त्यासाठी मी स्वतःला तसं घडवलं. माझ्यासमोर जिवंत विद्यार्थी आहेत आणि मी जे काही करीन त्यातून काही शिकण्याची आशा त्यांनी धरलेली आहे. किती उघड गोष्ट आहे ना ! शिक्षक म्हणून माझं अस्तित्वच या विद्यार्थी समक्षतेत सामावलेलं आहे. या विश्वासामुळे मला या काळात एक सवय लागली. शिकायला उत्सुक असणार्या विद्यार्थ्यांना आदराने वागवण्याची. मग माझी अध्ययन अध्यापनातील परस्परक्रिया आपोआपच मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने प्रेरित झाली. माझ्या बाजूने मी विश्वास बाळगला की विद्यार्थी विषयाचे आकलन तर करू शकतातच पण सतत पुढे जात राहण्यासाठी आपापला मार्गही शोधू शकतात. या वर्गात काय घडेल याप्रमाणेच काय घडणार नाही याविषयी मी घेतलेल्या काही निर्णयांचा वाटाही माझ्या शिक्षकपणाच्या घडणीत तेवढाच महत्त्वाचा आहे. माझ्या विद्यार्थीदशेत आणि नंतर इतर शिक्षकांचं निरीक्षण करताना शिक्षणाला अडथळा करणारे काही प्रकार बघून मी अस्वस्थ होत असे. हे अडथळे शिक्षकांनी वापरलेल्या काही कळीच्या रीतींचे असत. एकापाठोपाठ एक बड्या विचारवंतांची अवतरणं सांगून विद्यार्थ्याला दबावाखाली टाकून नामोहरम करणं, भारदस्त वाटणारे पािरभाषिक शब्द फेकून साध्या गोष्टी जटिल करून ठेवणं, हा विषय समजण्यासाठी हे सारं काही पेललेच पाहिजे असा धाक विद्यार्थ्यावर घालणं, आपल्याला काही कळत नाही आणि शिक्षकांना सर्व उत्तरं माहीत आहेत असंच मुलांना भासवणं, त्यांनी शिक्षकाला आदर दाखवलाच पाहिजे अशी अपेक्षा करणं इ. विद्यार्थ्यांना जर आपलं आपण शिकू शकतो असं वाटलं तर ते आपला मान ठेवणार नाहीत ही कल्पना. मग आपल्याला विद्यार्थ्यापेक्षा कसं जास्त माहीत असतं हे सतत ठसवत राहणं, स्वतःच्या आवाजावर प्रेम करणं. स्वतःविषयी स्वतःच्या परदेशवारीविषयी सतत मुलांना सांगत राहणं हे चालतं. सर्वांनाच परिचित वाटतंय् का हे सारं? मी पुनरुक्ती
करतो. मला माझ्या अध्यापनात यापैकी काहीही नको होतं.
माझा वर्ग म्हणजे मुलांना चित्रपट समजून घेण्याचं, एका शोधाची पायवाट चालून बघण्याचं आवाहन असे. याचाच अर्थ – मला माझी ज्ञानाची पातळी मुलांच्या पातळीशी जुळवून घ्यावी लागत असे. त्यासाठी मी तीन गोष्टी केल्या. १) माझी शिक्षक म्हणून तयारी, २) मुलांबद्दल वर्गात असतानाचं माझं आकलन आणि
३) वर्गातील प्रत्यक्ष कामाचं नियोजन. याचे काही पैलू आधोरेखित करतो.
१. माझी शिक्षक म्हणून तयारी
चित्रपटशिक्षकाला चित्रपटांचा केवढा प्रचंड व्यापक साठा आटोक्यात ठेवायचा असतो. किती देश, किती प्रकार, किती कलावंत, किती वेगवेगळे राजकीय दृष्टिकोन गेल्या शंभराहून अधिक वर्षं इतिहासात जमा होत राहिले. चित्रपटांविषयीच्या लिखाणाचंही तेच. चित्रपटाचे सैद्धांतिक आणि इतिहासकार, भाषावैज्ञानिक, सांस्कृतिक, मानववंशशास्त्रज्ञ, मार्क्सवादी विचारवंत, मनोविश्लेषणवादी, स्त्रीवादी विचारवंत अशा सर्वांची पुस्तके आहेत. त्यात भर घालूया, चित्रपटविषयक नियतकालिकं आणि रोजच्या वर्तमानपत्रातील रकाने यांची त्यातच समीक्षेचा बुरखा घालून वावरणारं, ‘प्रायोजित’ प्रसिद्धीतंत्राचा भाग म्हणून येणारं लेखन. गोंधळ उडतो. ह्या सगळ्या प्रकारांची माहिती ठेवावी लागते. अशा परिस्थितीत मी संशोधन विद्वानापेक्षा माझं शिक्षक म्हणून कार्यक्षेत्र वेगळं आहे याची मनाशी खूणगाठ बांधली. माझी कर्मभूमी म्हणजे माझा वर्ग परिसंवाद, परिषदा, संशोधन, ग्रंथालय किंवा लेखक प्रकाशक यांचे वर्तुळ… या सर्वांपेक्षा माझा वर्ग आणि तिथलं काम वेगळं आहे. यामुळे माझी शिकवतानाची स्वतःची मुख्य तयारी म्हणजे चित्रपटमाध्यमाच्या स्वरूपाविषयी एक मुलभूत संकल्पनाव्यूह माझ्याच मनाशी तयार करणं. त्याबरोबरच सतत तपासत राहून या संकल्पना जेवढ्या साध्यासुध्या करत नेता येतील तेवढ्या करत राहणं. याच प्रयत्नात मी सगळी शिक्षकी हयात कारणी लावली. ती आता माझ्या जगण्याची एक सवयच बनून गेली आहे. ‘मूलभूत संकल्पनांच्या प्रकाशात पहा आणि अजून सोपं अधिक साधं काय आणि कसं सांगता येईल ते पहा…’ एवढाच माझा स्वतःला आदेश होता. ही मूलभूत संकल्पनांची चौकट
माझं शिकवणं ज्या कोणत्या समूहासाठी असेल त्याच्या पातळीशी सुसंगत मांडणी करायला मदत करते.
तीच गोष्ट चित्रपटांच्या निवडीबाबत. माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी मी काही जगविख्यात श्रेष्ठ कलाकृती एखाद्या क्रमिक पुस्तकाप्रमाणे निवडल्या. माझं वर्गातलं शिकवणंही त्याच चित्रपटांभोवती गुंफलेलं असे. अभिजात कलाकृती मानवी परिस्थितीचं दर्शन घडवण्यासाठी चित्रपट माध्यमाचा उपयोग करतात. सामाजिक ऐतिहासिक बदल झाले तरी ते दर्शन जीवनाच्या खोल अर्थाला स्पर्श करतच राहतं. काही उदाहरणं सांगायची तर बॅटलशिप पोटेमकिन, (रशिया १९२५), सिटिझन केन – (अमेरिका १९४१), पाथेर पांचाली (भारत १९५५), वीक एंड (फ्रान्स १९६८) इ. मला मूळ चित्रपटातील आविष्काराचा अन्वय अगदी छोट्यातल्या छोट्या तपशीलापर्यंत लावून तयार ठेवावा लागत असे. एखादा चित्रपट मला पुरेसा उलगडल्यावर मगच मी तो वर्गात मुलांबरोबर अभ्यासासाठी घेत असे.
२. विद्यार्थ्यांविषयी माझी धारणा
शिकण्याची इच्छा आणि उत्सुकता असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल मी नेहमीच आदर बाळगतो. माझ्यासमोरच्या विद्यार्थीसमूहाकडे मी या इच्छेच्या पातळीच्या दृष्टीने नजर फिरवतो. माझा अनुभव असा आहे की साधारणपणे एक तृतीयांश विद्यार्थी खरे जिज्ञासू असतात. त्याचप्रमाणे आणखी एक तृतीयांश नसते तरी चालण्याजोगं असतं. काही जण एखाद्या मित्राबरोबर नुसतेच आलेले असतात. काहींना फक्त सिनेमा कधी सुरू होतो एवढंच जाणून घ्यायचं असतं तर काही वेळा तर वर्गात गारवा चांगला आहे म्हणूनही त्यांच्यापैकी काही तिथे उपस्थित असतात. आणि मग उरलेले एक तृतीयांश तळ्यात – मळ्यात असतात. शिकवताना माझं लक्ष पहिल्या एक तृतीयांशांवर असतं. नवीन विद्यार्थीगण समोर आला की माझी माझ्या मनाशीच ही विभागणी सुरू होते. हां. याचा अर्थ मी भेदभाव करतो असा मात्र नाही. पण एखादे दिवशी वर्गात त्या बाहेरच्या वर्तुळातला एखादा दिसला नाही तर मी लक्ष देणार नाही. पण पहिल्या जिज्ञासूपैकी कोणी दिसला नाही तर मला ते जाणवेल. मी त्याबद्दल चौकशीही करीन. माझं शिकवणं कसं चाललंय् याचं माझं मूल्यमापन या पहिल्या गटाच्या निरीक्षणाच्या आधारे चालतं. जर मला असं दिसलं की तळ्यामळ्यातले काही मधल्या अंगणावर येऊ बघताहेत तर ती मी माझ्या कामाची पावती मानून त्याबद्दल आनंदी असतो.
या सगळ्याचा वर्गातील शिस्तीवर काय परिणाम होतो? खरं तर मी शिस्तीच्या नावाखाली चालणारे बाह्योपचार… म्हणजे उपस्थिती, उशिरा वर्गात येऊ न देणं. इ. कधीच महत्त्वाचे मानले नाहीत. हजेरी घेण्याबद्दल तर मला तिटकारा आहे. आता प्रशासनाला जर ते लागत असेल तर एक कागद फिरवणं मी पसंत करतो. तेवढं पुरे. मग खोटेपणाचं काय? असल्या प्रश्नांचं मूळ भारतीय शिक्षणपद्धती आणि शिक्षणसंस्था यांच्या रचनेतील गुंतागुंतीत आहे. ते सारं दुखणं एखादी खोटी हजेरी देण्यापेक्षा फार व्यापक आहे. ज्यांना शिकायचं आहे त्यांना शिकवणं हे माझं शिक्षक म्हणून आद्य कर्तव्य आहे. अशांचा जो गट असतो तो माझ्या वर्गात वेळेवर उपस्थित असतो न चुकता. वर्ग संपल्यानंतरही त्यांचं शिकणं चालूच असतं.
३. वर्गातील प्रत्यक्ष कामाची योजना
होय. मी केव्हाही शिकवण्याच्या योजनेविना वर्गात जात नाही. त्या त्या दिवसाचा सकाळचा वेळ मी अगदी प्राथमिक मुद्यांचीही मनाशी उजळणी करतो. मला ते अगदी तोंडपाठ असले तरी. मूलभूत तत्त्वांच्या ज्या साध्या-सोप्या मांडणीचा माझा सतत प्रयत्न असे तो प्रत्यक्षात आणण्याच्या कल्पना मला याच तयारीच्या वेळी सुचत. मी पुष्कळ वेळ कागदावर व्यूह दाखवणार्या रेघोट्या काढून हे आणखी सोपं कसं करता येईल? आणखी..? एक कागद संपला, दुसरा सुरू. त्या गिरगिटण्याच्या शेवटी एका कागदावर आजचे मुद्दे ठळक अक्षरात ठरावीक अनुक्रमात लिहून बरोबर ठेवण्याची मला सवय होती. महत्त्वाचा एखादा मुद्दा राहूनच गेला असं होऊ नये यासाठी ही खबरदारी. जर मी ओव्हरहेड प्रोजेक्टर वापरत असेन तर त्याच्या पारदर्शिका बनवून ठेवाव्यात का? एखादं नवं टिपण मुलांना तासाच्या शेवटी उद्याच्या तयारीसाठी द्यावं का? आजच्या कामासाठी मी खास कष्ट घेतले आहेत हे लपवण्याचा प्रश्नच नसतो.
माझी आदर्श योजनेची कल्पना, ९० मिनिटांचे सत्र तीन विभागात सारखे विभागावे. १. नव्या संकल्पना आधी झालेल्या भागाशी जोडून पुढे जाणे, २. फिल्म, त्यातील ठरावीक अंश किंवा स्लाइड्स…त्या दिवशीच्या कामातील मुद्दे विशद करण्यासाठी. जे ‘क्रमिक’ म्हणून निवडलेलं साहित्य असेल ते शक्यतो दोनदा दाखवण्याची योजना. यामुळे दुसरी वेळ आधी सांगितलेले संकल्पनात्मक मुद्दे त्याचवेळी लक्षात आणून देण्यासाठी उपयोगी पडते. ३. प्रश्नांसाठी वेळ. हा विद्यार्थ्यांशी संवादाचा गाभा. यासाठी माझा ठरावीक साचा नाही. मला केव्हाही प्रश्न विचारलेले चालतात. मुलांच्या मनात प्रश्न हळूहळू आकाराला येतात. त्याला ठरावीक काळ-वेळ नसते. आपली आणि आपल्या प्रश्नाची बूज राखली जाईल याचा भरवसा मुलांना वाटावा हे शिक्षकाचं कामच असतं. कधी कधी माझ्या वर्गाची सुरुवात मी ‘चला आजचं काम सुरू करू या. तुमच्या मनात काही प्रश्न चुळबूळ करताहेत का? तर आत्ता विचारा’ अशा प्रकारे करतो. तसे एखाद दोन प्रश्न हाताळतानाच मी त्या दिवसाच्या नव्या मुद्याकडे विचारधारा वळवत असे. हे मला शक्य होई कारण व्याख्यानांसाठी चित्रपटमाध्यमाविषयींच्या संकल्पनांची जी मूलभूत चौकट मी वापरत असे तिचा आधार घेऊन त्या प्रश्नांची जागा मी निश्चित करू शकत असे. काही वेळा मी एखादी नवी संकल्पना सांगितल्याबरोबर लगेचच प्रश्नांना वेळ देत असे. ‘ही संकल्पना नीट कळली ना? किंवा या संकल्पनेबद्दल काही शंका किंवा प्रश्न आहेत का?’ असे थेट प्रश्नही मी विचारत असे. या टप्प्यावर प्रश्न आले की मूळ संकल्पनेमधील काही भागाची नव्या उदाहरणांसहित पुनरावृत्ती करता येई. वर्गातील अध्यापनात मूळ संकल्पना विशद करण्यासाठी अगदी साध्या घरगुती उदाहरणांचा, गोष्टींचा वापर हा मला तर गाभ्याचाच भाग वाटतो. प्रश्नांसाठी ठेवलेल्या राखीव वेळी तर प्रश्न विचारता येतातच. एक पुस्ती जोडतो. अशा प्रकारच्या संवादातून पुढे जाणार्या शिक्षणप्रक्रियेला वेळ कधीच पुरत नाही. त्यामुळे मी मुलांना तासाव्यतिरिक्त केव्हाही मला भेटण्याची मोकळीक ठेवत असे.
मी सर्व प्रकारच्या प्रश्नांचे स्वागत करतो. उच्च वैचारिक किंवा अगदी बाळबोध, गंभीरपणे विचारलेले किंवा गमतीखातर विचारलेले… मला फरक पडत नाही. माझा मुख्य भर त्या प्रश्नातून जो कळीचा मुद्दा पुढे येतो तो सर्व वर्गाच्या लक्षात यावा असा असतो. मग एक प्रश्न विचारणारा विद्यार्थी आणि मी यांच्यापुरता हा संवाद सीमित होत नाही. मी सर्व वर्गालाच त्या प्रश्नाच स्वरूप ओळखण्याचे प्रयत्न करायला सांगत असे. उत्तराची घाई करण्यापेक्षा जर प्रश्न काय, कोणता याची मांडणी नीट झाली तर उत्तराच्या दिशेने जाण्याची एक योग्य पायरी आपण चढलेली असते. अशा वेळी मी फळ्यावर किंवा ओव्हरहेड प्रोजेक्टर असल्यास त्याच्या स्लाइडवर प्रश्नकर्त्याने वापरलेले मुख्य शब्द सर्वांसाठी लिहीत असे. काही वेळा मी आकृतीसारखी मांडणी करून काही नाती दाखवत असे आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का? हे सतत विचारत असे. पुष्कळदा विचारलेला प्रश्न मूलभूत संकल्पना वापरून पुन्हा मांडला की अधिक सोपा होई आणि उत्तराकडे नेणारी वाट खुली होई.
मला जर कधी माणसांची नावं, चित्रपट, त्यांचा काळ याबद्दल अडायला झालं तर मी सरळ आत्ता ही माहिती माझ्याजवळ नाही असे सांगत असे. अनमानधपका मारून काहीतरी ठोकून देणं हे मी कधी केलं नाही. पुष्कळदा वर्गातल्या एखाद्या विद्यार्थ्याला ते माहीत असतं आणि तोच ते सगळ्या वर्गाला सांगतो.
शैक्षणिक साधनं वर्गात वापरणं हे भारतात नेहमीच कठीण असते. फळा असला तर खडू नसतात, अगदी ओव्हरहेड प्रोजेक्टर हजर असला तर त्याची वायरच तोकडी असते. तुमचं फिल्मवरचं व्याख्यान अकरा वाजता ठरवलेलं आहे. पण तीच स्थानिक भारनियमनाची वेळ निघते… अशा समस्या अगदी सर्वोत्तम मानल्या गेलेल्या संकुलांमध्येही उद्भवतात. आणि त्यांना सोपी उत्तरं नसतात. मी तर वेळेआधी जाऊन आपल्याला लागणारी सामग्री आणि व्यवस्था आहे की नाही, हे बघणं हे व्याख्यानाच्याच पूर्वतयारीचा भाग मानावा असा सल्ला देईन. त्यातूनही घोटाळा झालाच तर आपली दुसरी योजना तयार हवी. हे मी उपरोधाने म्हणत नाही. भारतातील वर्गामधलं वास्तव मान्य करतो आहे. माझी ही शिकवण्याची पद्धती यशस्वी झाली कारण याचा निर्णय करायला माझ्याजवळ वर्गात उजळणारे चेहरे एवढंच साधन आहे. किंवा काही वेळा असेही प्रसंग घडतात. एखादा वयस्क दिसणारा इसम सहज येतो आणि
माझा विद्यार्थी असल्याची ओळख करून देतो. बोलता-बोलता तो स्वत:ची चित्रपट अभ्यासाची किंवा चित्रपटनिर्मितीची सुरुवात कशी माझ्या अमुकतमुक व्याख्यानापासून स्फूर्ती/प्रेरणा घेऊन झाली ते सांगतो. ते अमुक-तमुक
व्याख्यान कुठेतरी केव्हातरी दिलेलं असतं. किंवा मी पूर्वी केव्हातरी केलेली टिपणं किंवा साधनं शिक्षणात कुठेतरी अजून वापरली जातात असं कळतं. माझ्या शिक्षणपद्धतीभोवती एक ठाम तांत्रिक चौकट उभी करण्याचा प्रयत्न मी केला नाही. मी वेगळीच गोष्ट करत राहिलो. शिकायला उत्सुक असणार्यांना शिकवण्यात सुखानं मग्न राहिलो.
‘सीक्रेट्स ऑफ गुड टीचिंग’, आय. एफ. सी. ए. आय. बुक्स हैदराबाद २००६
या पुस्तकासाठी लिहिलेल्या मूळ लेखाचा हा अनुवाद केलाय श्यामला वनारसे यांनी. हा लेख ‘वास्तव रूपवाणी’ या मासिकाच्या नोव्हेंबर २००६ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.