अशीही एक परीक्षा !
शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याप्रमाणे शिक्षणाच्या पद्धती आपण आत्मसात का करू नयेत, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. या संदर्भात मी जेव्हा माझ्या सहकार्यांशी चर्चा केली तेव्हा मुलं अभ्यास करत नाहीत (?), कॉप्यांचे वाढते प्रमाण, वर्गातील नीरस वातावरण, बेशिस्त यासारख्या गोष्टी पुढे आल्या. या सगळ्यात नवीन प्रयोग करू इच्छिणारे शिक्षकसुद्धा नेहमीच्याच वाटेने जात राहतात असा माझा आजवरचा अनुभव.
चाकोरी बाहेर जाण्याचा प्रयत्न-
वर्गात बसून विचार करत असताना मला एक कल्पना सुचली. त्यादिवशी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वर्गात चाचणी परीक्षा होणार होती. सर्व विद्यार्थी परीक्षेच्या तयारीने आले होते. त्यांच्या चेहर्यावर ताण स्पष्ट दिसत होता. वर्गात एकूणच गंभीर वातावरण होते.
वर्ग बारावी, विषय – ‘ऍनिमल हजबंडरी इन पोल्ट्री फार्म’, विद्यार्थी संख्या – २५, वेळ – ४० मिनिटे, स्थळ – शासकीय इंटर महाविद्यालय, कल्याणपुरा, झाबुआ – म.प्र.
सुरवातीला मी मुलांना सांगून टाकलं, ‘‘तुम्ही सर्व स्वतंत्र आहात, मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ देऊ नका. हवे असल्यास तुमच्या सोईनुसार तुम्ही बसू शकता.’’ असे मी सांगताच वर्गात एक प्रकारचे चैतन्य आले. यामुळे इतर वर्गांना त्रास होईल असेही मला वाटले. आता यापुढे काय करायचे, हे माझे ठरले नव्हते पण काहीतरी वेगळे करायचे हे मनाशी पक्के ठरविले होते. मुलांना मी सांगण्यास सुरवात केली – ‘‘सर्वांनी पाठ्यपुस्तक व वहीचे एक पान घ्या. धड्याखाली दिलेल्या स्वाध्यायाव्यतिरिक्त सर्वांनी चार प्रश्न स्वतः तयार करून लिहा. पहिले दोन प्रश्न ३-३ गुणांचे व नंतरचे दोन २-२ गुणांचे असतील.’’ हे ऐकताच सर्वांना आनंद झाला. वर्गातला तणाव एकदम संपला.
मुलांनीच प्रश्न पत्रिका तयार केल्या –
अभ्यासाची नावड असलेल्या विद्यार्थ्याच्यातसुद्धा बदल दिसू लागला. सर्वजण पुस्तके उघडून वाचू लागले.
प्रश्नपत्रिका काढणं त्यांना वाटलं तेवढं सोपं नव्हतं. काही जण विचार करताना डोके खाजवत होते तर काही जण शून्यात नजर लावून होते. प्रश्न तयार करण्यासाठी मी आपापसात बोलण्याची मुभा दिली होती. खूप खलबतं, चर्चा, चिंतन, विचार-मंथन झाल्यानंतर प्रत्येकाने शेवटी स्वतःची प्रश्नपत्रिका तयार केली, त्यावर स्वतःचा अनुक्रमांक लिहून ती मला दिली.
मी प्रश्नपत्रिका वाचल्या, मला त्या खूप चांगल्या वाटल्या. विद्यार्थ्यांनासुद्धा चांगले वाटले कारण त्यांच्या दृष्टीने हे मोलाचे काम होते. पुढे काय करावयाचे या बाबतीत मी अजूनही निश्चितपणे निर्णय घेतलेला नव्हता. मनात उत्स्फूर्तपणे जे सुचत गेले ते मी करत गेलो. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये मला चित्रकला कौशल्यावर आधारित प्रश्नांची उणीव जाणवली.
स्वतः तयार केलेलीच प्रश्नपत्रिका आपण सोडविणार आहोत असा विद्यार्थ्यांचा समज होता. मी प्रश्नपत्रिका अदला-बदल करून वाटप केले आणि ज्याला जी प्रश्नपत्रिका मिळाली आहे ती त्यांना सोडविण्यास सांगितली. सर्वांनी आपल्या उत्तरपत्रिकेत युनिट २ मधील कोणतेही एक चित्र काढा, याला गुण नाहीत पण चित्र काढले नाही तर मात्र २ गुण कमी केले जातील असे मी सांगितले. परीक्षा दहा गुणांची होती. घड्याळ पाहिल्यावर मला परीक्षेसाठीची नेमून दिलेली वेळ कमी वाटली. मी मधल्या सुटीची दहा मिनिटे उपयोगात आणावयाचे ठरविले.
सशर्त खुली पुस्तक परीक्षा-
सर्वांना मी आपली इतर विषयांची वह्या पुस्तके खाली व फक्त शास्त्र या विषयाची पुस्तके वर्गाबाहेर ठेवलेल्या बाकावर ठेवण्यास सांगितले.
‘‘तुम्हाला उत्तरे लिहीत असताना काही अडले तर तुम्ही फक्त दोन वेळा वर्गाबाहेर जाऊन पुस्तकं पाहू शकता.’’ हे मी सांगताच मुलांमधे आनंदाची लकेर उमटली. ‘‘पण जितक्या वेळा बाहेर जाऊन पुस्तक पाहाल तेवढ्या वेळा दोन गुण कमी होत जातील.’’ यावर ‘‘आम्ही किती वेळा बाहेर गेलो हे तुम्हाला कसे कळणार? आम्ही एकमेकांवर लक्ष ठेवू’’, असे संवाद झाले. ‘‘एकमेकांवर लक्ष ठेवण्यात तुमचा वेळ जाणार. त्यापेक्षा जो जितके वेळा वर्गाबाहेर जाईल तो आपल्या उत्तरपत्रिकेवर १+१+१+…. असे लिहील.’’ असा तोडगा मी सुचविला. विद्यार्थी खरे लिहितील का? असा प्रश्नही आपल्या मनात येईल. पण मला वाटतं विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून पाहायला हरकत नाही.
सर्वजण उत्तरपत्रिका लिहू लागले. आता माझे काम फक्त विद्यार्थ्यांचे निरीक्षण करावयाचे होते. वर्गात तणाव, भीती नव्हती. दुसर्याच्या प्रश्नपत्रिकेत डोकावून पाहण्याबद्दल हटकणे नव्हते. मी थोडा वेळ वर्गाच्या बाहेरही गेलो होतो. मी वर्गात डोकावून पाहिले तर सर्व जण कामात मग्न होते, मधेच काही अडले तर बाहेर जाऊन पुस्तक पाहत पुन्हा लिहीत असत. संपूर्ण वर्ग शांत होता. वर्गात पाच मुले अशी होती की ती एकदाही वर्गाबाहेर गेली नाहीत, एक मुलगा तीन वेळा गेला. परीक्षा झाली. सर्वांनी प्रश्नपत्रिकांना उत्तरपत्रिका जोडून मला दिल्या.
अशी झाली पेपर तपासणी-
मधल्या सुटीत चहा घेतल्यानंतर मी प्रयोग-शाळेत पेपर तपासणार होतो, तेवढ्यात ‘‘पेपर तपासण्याचे काम सुद्धा मुलांनी का करू नये?’’ असा विचार माझ्या मनात आला.
दुसर्या दिवशी मी वर्गात गेलो. प्रत्येकाला आपल्याला किती गुण मिळतात याची उत्सुकता होती. पेपर तपासून झालेले नाहीत असे सांगितले. ‘‘तुम्ही प्रश्नपत्रिका तयार केली आहे, म्हणजे कोणत्या उत्तरास किती गुण हे तुम्हाला माहीत आहेच.’’ ‘‘आम्ही कसे पेपर तपासणार?’’ सर्व जण एकसुरात ओरडले. ‘‘पुस्तके समोर ठेवून उत्तरपत्रिका तपासा.’’ मी सांगितले.
ज्याने जी प्रश्नपत्रिका तयार केली आहे त्याला ती उत्तरपत्रिका तपासण्यास दिली. आणि उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू झाले. ‘‘जर तुम्ही एखाद्या उत्तराचे गुण कमी करत असाल तर ते का कमी करत आहात ते लिहा. उत्तर चुकीचे वाटेल तेथे दुरुस्त करा. चित्र अपूर्ण असेल किंवा चित्राला योग्य ठिकाणी नावे दिली नसतील तर ते तुम्ही पूर्ण करा.’’ माझं निरीक्षण चालूच होतं. संपूर्ण वर्गात अभ्यासमय वातावरण होते. आपल्या कामाकडे प्रत्येक जण अतिशय गांभीर्याने पाहात होता. उत्तरास किती गुण मिळायला हवेत? गुण कमी केले तर ते का? चित्र चांगले नाही. अक्षर सुधारायला हवे, नावे नीट दिलेली नाहीत, खूप छान आहे. असे लिहिता लिहिता सर्वांनी उत्तरपत्रिका तपासल्या. त्यानंतर मी सर्व उत्तरपत्रिका एकत्र करून पुन्हा विद्यार्थ्यांना वाटल्या. ज्याने ज्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासली आहे त्याने त्या मुलाजवळ जाऊन बसावे व विचार – विनिमय करावा, असे सांगितले.
ही संपूर्ण प्रक्रियाच मला खूप सकारात्मक वाटली. सर्व विद्यार्थी चर्चेत इतके गुंगून गेले की मधली सुट्टी केव्हा संपली ते कळलेच नाही. ‘खूप लिहावयाचे होते’, ‘हे असे पण लिहिता आले असते.’ ‘हे का लिहिले नाही?’ ‘बरोबर आहे’, ‘चित्र सुंदर आहे.’ ‘अक्षर सुधारा.’ ‘प्रश्न खूप चांगला आहे.’ अशी अनेक प्रकारची वाक्ये वर्गात ऐकू येत होती. काही विद्यार्थी गुण वाढवून घेण्याबाबतीत आग्रही होते. अशा वेळी पुस्तक पाहून गुण वाढवून दिले जात होते. उत्तरांची तुलना करण्याकरता मुले एकमेकांच्या वह्या पाहत होती.
हा प्रयोग आपण वर्गात किंवा आपल्या पाल्यासाठी करू शकता. या प्रयोगावरून माझ्या लक्षात आले की मुलांना आवडेल अशा पद्धतीच्या वापराने, रूढ पद्धतीत सकारात्मक बदलांनी काही शैक्षणिक प्रश्नांची उत्तरे मिळायची शक्यता आहे. फक्त त्यासाठी हवी थोडी सृजनशीलता आणि ती तर सर्व शिक्षकांमध्ये असतेच खरं तर सर्वांमध्येच असते.
(शैक्षिक संदर्भ, सप्टें.-ऑक्टो. ९९ मधून साभार)