सुट्टी : एक संधी, पालकांसाठी सुद्धा

“काय आहे यंदा सुट्टीचा प्रोग्राम?’’
‘‘तोच विचार चाललाय. दहा-बारा हॉबी वर्कशॉप, समर व्हेकेशन कँपस्ची माहिती गोळा केलीय. पण माझ्या अन् त्यांच्या वेळा जुळायला पाहिजेत.’’

‘‘हो ना. सुट्टीत नुसता धुडगूस घालतात पोरं घरात. तसे क्लासेसमध्ये पैसे बरेच जातात म्हणा, पण ठीक आहे. नुसता घरात काहीतरी गेम नाहीतर कार्टून पाहात बसण्यापेक्षा बरं. काहीतरी मिळतं तरी.’’

‘‘आमच्याकडे आजोबा उत्साही आहेत मुलांना आणायला – सोडायला, पण ते जाणार म्हणजे दोन्ही वेळेस रिक्षाचा खर्च, त्यामुळे क्लास तरी किती लावणार? सुट्टी म्हणजे खरं तापच आहे डोक्याला.’’
कुठल्याही शाळेपाशी मुलांना आणायला सोडायला आलेल्या आयांच्या घोळक्यात जरा डोकावलं, तर हे किंवा असेच संवाद सध्या ऐकू येतायत. सगळ्यांनाच सुट्टीचा चांगला उपयोग करायचाय, मुलांना चार नवीन गोष्टी मिळाव्यात असं वाटतंय, पण वेळ, मनुष्यबळ किंवा पैसा यांच्यापैकी काहीतरी थोडंसं मागे ओढतंय. परिणामतः एखाद – दोन तास मुलं कुठं तरी वर्कशॉप किंवा क्लासला जाणार आणि बाकी सुट्टीभर टीव्ही – कॉम्प्युटर झिंदाबाद! पुन्हा त्या हॉबी कोर्सेसमधलं चांगलं-वाईट आधी कळायचं कसं?

गेल्या वर्षी याच सार्वत्रिक समस्येवर एक चांगला उपाय शोधलाय, बोरिवलीच्या ‘न्यू अशोक नगर’ सोसायटीनं. ‘इतक्या मुलांच्या पालकांनी प्रत्येकाला वेगळंवेगळं आणायला – सोडायला जायचं. थोडी मोठी मुलं आपली आपण जातात पण ती येईपर्यंत दडपण आहेच आणि जाण्यायेण्यात वेळ जातोच मग त्यापेक्षा आपणच नाच, चित्रकला, स्केटिंग शिकवणार्या एक्स्पर्टस्ना आपल्याकडे का नाही बोलवायचं? त्यांनाही एक गठ्ठा मुलं मिळतील, कदाचित फी थोडी कमीही होईल. सोसायटीत जागा आहेच. दोनशे घरांची सोसायटी म्हणजे तेवढी मुलं आहेतच, नाहीतर शेजारच्या सोसयाटीलाही सहभागी करून घेता येईल आणि आपल्याला जे आणि ज्या दर्जाचं हवंय ते मिळवता येईल. जागा आणि ऑर्गनाईझ करायची क्षमता तर आपल्यात आहेच. एकदा करूनच पाहूया.’ असा विचार करून ‘मिथिला दळवी’नं आणि तिच्या दोन मैत्रिणी ‘रुपा गोडांबे’ आणि ‘सोनाली चेऊलकर’ यांनी थोडी चाचपणी सुरू केली.

एक कल्चरल कमिटी केली. त्यात आणखी काही उत्साही आया आणि नंतर बाबा सामील झाले. म्हणजे थोडक्यात ग्रुप असा झाला, की एक व्यक्ती जिचा एकुणात मुलांच्या विश्वात काम करणार्या चार लोकांशी परिचय होता आणि अशा कार्यक्रमांना लागणारा दृष्टिकोन, निर्णयक्षमता आणि आयोजन कौशल्य होतं. दोन सहकार्यांना पूर्ण समरस होऊन अशा गोष्टींत सहकार्य करण्याची इच्छा होती. काही बाबांचाही अशा धडपडीला सक्रीय पाठिंबा होता, चर्चांना व्यवहार्य स्वरूप देण्यात मदत होती. उपलब्ध वेळाप्रमाणे सहभाग देण्याची तयारी होती. मुख्य म्हणजे ‘एकदा करायचं ठरलंय ना? मग प्रयोग करून बघू. नाही जमलं तर पैसे वाया जातील असा विचार करायचा नाही, नाही तरी ‘मुलांना क्लाससाठी पैसे तर लागलेच असते. मी या प्रयोगांसाठी एवढे पैसे स्पॉन्सर करू शकतो.’ असं स्वच्छपणे म्हणण्याची तयारी होती.
मग गेल्या सुट्टीत पंधरा दिवसांत, या सगळ्यांनी मिळून काय काय केलं असेल? स्केटिंग, नृत्य, संस्कृत बोलायला शिकूया वर्ग, वक्तृत्त्वस्पर्धा, नाटक, नकला आणि चक्क ‘ऍडव्हेंचर स्पोर्टस्!’ आणि शेवटच्या दिवशी एक मे – महाराष्ट्र दिनाला स्टेजवर एक मस्त कार्यक्रम!

सोसायटीतल्या पै आजोबांनी स्केटिंगची जबाबदारी घेतली. स्केटिंगचे प्रशिक्षक येण्याच्या दहा मिनिटं आधी ते तिथे हजर असायचे आणि सगळी मुलं घरी गेल्यानंतर घरी जायचे. विशेष म्हणजे पाळणाघरात जावं लागल्यामुळे ह्या मुलांना स्केटिंग करता येणार नव्हतं, त्यांना पाळणाघरात पोहोचवण्याचीही त्यांची तयारी होती.

नाचासाठी व्यावसायिक कोरिओग्राफर बोलावला होता. या वर्गाचा शेवट एक मेच्या कार्यक्रमानं होणार होता त्यामुळे इतर नाचांच्या जोडीला महाराष्ट्रातील लोकनृत्य म्हणून ठाकर लोकांचा नाचही बसवला होता.

वक्तृत्त्व स्पर्धा, प्रत्येकी दोन मुलांचा गट अशा आठ गटांत त्यांनी घेतली. विषय लोकांकडूनच मागवले होते. भाषेचं बंधन नव्हतं. Old is Gold, सबसे बडा रुपय्या, क्रिकेट असे काही विषय होते. रात्री स्पर्धा चालायच्या. अगदी व्यावसायिक पद्धतीनं टीव्हीवरचे सारेगामासारखे कार्यक्रम चालतात तसं तीन राऊंडज्मधे! या वक्तृत्त्वस्पर्धेनं सोसायटीत हलचल माजवली होती. कारण मग मुलं दिवसभरातल्या उरलेल्या वेळात रिकामटेकडी उरलीच नाहीत ना!

विषयाबद्दलची चर्चा, वाचन, गप्पा याच्यातच वेगवेगळ्या कलांच्या वर्गांनंतरचा वेळ संपायचा, कॉलनीतले सगळे ऐकायला येतात म्हटल्यावर भाग घेणार्यांचं विषयातलं गांभीर्य वाढलं आणि उद्या पुन्हा कालच्या विषयावर, योग्य मुद्यांवर, चुकांवर कट्ट्यावर चर्चा होतीच.

बॅडमिंटनसाठी इंटरनॅशनल मेजरमेंटस्चं बॅडमिंटनचं कोर्ट आखून घेतलं आणि तिथेही मुलांनी खेळायला सुरुवात केली.

यातून मुलांचीही मैत्री वाढली, घट्ट झाली. भूक लागली तर कुठल्याही मित्र-मैत्रिणीच्या घरात जाऊन खायला मागण्याइतका मोकळेपणा वाढला. वक्तृत्त्वस्पर्धा रात्री व्हायच्या. दिवसभर स्त्रिया आणि रिटायर्ड लोकांनी चालवलेल्या ‘शो’ला ऑफिस सुटून घरी आलेल्य पुरुषांची ताज्या दमाची कुमक येऊन मिळायची. जेवणं झाली की सगळे पुन्हा घराच्या बाहेर वक्तृत्त्व स्पर्धांसाठी.

हळूहळू स्पर्धांना येणारा मुलांचा वयोगट लहान मुलांकडून कुमार-किशोरांपर्यंत पोहोचला आणि नवीन कल्पना सुचली, एक मेच्या कार्यक्रमाला नाटक बसवण्याची. नाटकही असं हवं की प्रत्येकाची बुद्धी आणि कला वापरली गेली पाहिजे आणि प्रत्येकाला त्या विषयात इंटरेस्ट वाटला पाहिजे. मग मुलांच्या अफलातून डोक्यातून आयडिया निघाली.

‘सलमान खानला त्या फुटपाथवरच्या माणसाला चिरडल्याबद्दल शिक्षा मिळाली ‘अशोकनगरचा वॉचमन होण्याची’, तर मग काय होईल?’ याच्यावर मुलांनी नाटक केलं.

सलमान खानचं काम एका मुलानं उत्तम केलंच. पण नाटकात काय घडतं, तर कॉलनीतली जी वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण माणसं आहेत ती गेटमधून येतात, सलमान त्यांना अडवतो किंवा कुणाशी बोलतो आणि मग ते काय उत्तर देतील? काय आणि कसं वागतील?’ असं हे धमाल नाटक होतं. शक्यतो सगळ्या भूमिका मुलांनीच केल्या होत्या. कॉलनीतल्या ‘सँपल्स’ ना आपण ‘सँपल’ आहोत हे कळलं, पण त्या नकलेचा राग नाही आला, उलट सर्वांनी धमाल एंजॉय केलं. ही मधल्या वयातली पोरं, यांना एकेकाच्या स्वभावातले बारकावे, परस्परातले हेवेदावे भांडणंसुद्धा छान कळत होती. त्यामुळे त्यांचा पण एक अंडरप्ले नकळत झाला, आणि समजायचा त्यांना नीट समजला.

या सगळ्या कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू म्हणजे ऍडव्हेंचर स्पोर्टस्. एका ऍडव्हेंचर स्पोर्टस् घेणार्या ग्रुपला आमंत्रित केलं होतं. आगाऊ नोंदणी खूप कमी लोकांची झाली होती. गेम्स दोन होत्या. Flying Fox म्हणजे उंच इमारतीवर दोराच्या साहाय्यानं चढायचं आणि Valley crossing म्हणजे दोन इमारतींना दोर बांधून (वीस-पंचवीस मीटर्स उंचीवर) ते अंतर दोराला लोंबकळत पार करायचं. प्रशिक्षण सुरू झालं आणि मग दोन्ही थरारक प्रकार करून पाहायला रांगच लागली. शंभरपेक्षा जास्त लोकांनी त्याचा आनंद घेतला. वयोगट होता पाच वर्षांची चिमुरडी पोरं ते चौसष्ठ वर्षांचे आजोबा. शिवाय पन्नाशीच्या कितीतरी बायकाही होत्या. हा रोमांचक अनुभव सर्वांच्याच अजूनही लक्षात राहिलाय.

एक मेला गेल्या पंधरा दिवसांतल्या स्पर्धांचा बक्षिससमारंभ आणि विविध गुणदर्शनानं समारोप. पंधरा दिवसांपूर्वी ग्रुपमध्ये बिचकत असणारी मुलंसुद्धा, इतकी मोकळी आणि बिनधास्त झाली होती. मनातला भीतीचा आणि अनोळखीपणाचा ‘ब्लॉक’ निघाल्यानंतर सादरीकरणाची कसली भीती? उत्तम नाटक आणि सुंदर नाचांनी – लोकनृत्यांनी या कार्यक्रमाची एक मेला सांगता झाली.

गेलं वर्षभर त्या पंधरा दिवसांची गंगाजळी कॉलनीला पुरतेय. मग दिवाळीत गणपती वगैरे शाडूच्या मूर्ती करणार्याला पोतंभर शाडूची माती घेऊन बोलावलं आणि सगळ्यांनी शाडूत धुडगूस घालत दिवाळीचा मस्त शाडूचा किल्ला बनवला. वर्षातून एकदा गाण्याचा किंवा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम कल्चरल कमिटी आणतेच. पूर्वीचं ओळखदेख नसल्यासारखं एकमेकांशी न बोलता निघून जाण्याचं ‘अपार्टमेंट स्पिरीट’ पुष्कळच संपलंय. मुख्य म्हणजे मुलं एकत्र येतायत, खेळतायत आणि येत्या सुट्टीची वाट पाहताहेत.

यावर्षी मोठ्यांचाही सहभाग वाढलाय असं मिथिला सांगते. मोठ्यांसाठी स्केटिंगचा बेसिकचा वर्ग ते यंदा घेणार आहेत. गेल्या वर्षी बेसिक स्केटिंग शिकलेल्या मुलांसाठी यंदा ऍडव्हान्स स्केटिंग आहे. मुलांसाठी कॉलनीत कुंभार आणि त्याचं चाक बोलावताहेत. नाचामध्ये लेझीम घेतलंय. त्यात तुतारीसुद्धा आहे. कोरिओग्राफरकडे यंदा साल्सा, चाचाचा आणि मिरंगे डान्सची मुलांची मागणी आहे.

मोठी माणसं यंदा नाटक बसवणार आहेत. शिवाय मुलांचे गेल्या वर्षीचे यशस्वी विषय आहेतच. ‘सलमान’ सारखाच एखादा भन्नाट विषय मुलांसाठी असणारच आहे, तर अशी ही कल्चरल कमिटी आता हळूहळू खरंच ‘संस्कृती’ रुजवायला लागलीय.

अर्थात मनुष्य स्वभावाप्रमाणे यात काही अडचणी आहेतच. काही प्रमाणात विरोध, स्केटिंगमधे एखादा छोटा अपघात, ‘काहीतरी टाईमपास करतात’ अशा कॉमेंटस् हेही सगळं आहेच पण त्यापेक्षा मिळालेला आनंद, मैत्र्या, एकी, ऍडव्हेंचर स्पोर्टस्चा थरार, पैकाकांसारख्यांचा आपलेपणा, दहा-दहा मुलांना डोसे करून घालणार्या काकू, वक्तृत्त्वस्पर्धांसाठीच्या चर्चा, तालात थिरकणारी पावलं यांचं पारडं जास्त जड आहे. पैसे कमी पडतील असं कळल्यावर ज्यांची मुलं यात शिकत होती त्यांनी तर न मागता डोनेशन्स दिलीच पण मुलं मोठी झालेल्यांनीही दिली. त्यातही कल्चरल कमिटीनं ‘एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त एक हजार रुपये’ हा नियम पाळला होता. यंदा सोसायटीतले तीन रिकामे फ्लॅटस् त्यांच्या मालकांनी सुट्टीपुरते मुलांच्या ऍक्टिव्हिटीज्ना दिलेत. ‘मे नंतर भाड्यानं देऊ. दोन महिने तुम्हाला त्याचा जास्त उपयोग आहे. तोपर्यंत तुम्ही वापरा.’ हे औदार्य मुंबईच्या भाड्यांच्या आकड्यांचा विचार केला तर खूपच मोठं आहे.

हे जर न्यू अशोकनगर, बोरिवलीत होतं तर इतर ठिकाणी का नाही? मुंबईतली जागांची अडचण, वेळाची कमतरता, प्रचंड अंतर, ऑफिस संपवून आल्यानंतरचा लोकल आणि प्रवासामुळे येणारा थकवा हे सगळं असतानाही इतके सुंदर, उत्साहानं रसरसलेले पंधरा दिवस ह्यां मुलांना मिळू शकले. मग असा विचार सगळ्यांनीच का नाही करायचा!

अनेक सोसायटयांना हॉल असतात, ग्राऊंडस् असतात. कलाकार-ऍड्व्हेंचरवाल्यांची ओळख असते, मुलं रिकामी बसलेली असतात, ज्यांना दोनदोन मुलं आहेत त्यांचे तर क्लासच्या फीसाठी आणखीच पैसे खर्च होणार असतात आणि या सगळ्याचं नीट व्यवस्थापन करू शकणार्या साधनव्यक्तीही जवळपास असतातच.

अशोकनगरवाल्यांनी केलं तेवढं ऑर्गनाईझ्ड नसेल किंवा पहिल्या वेळी नाहीही जमणार तरीही मुलांच्या पदरात काहीतरी पडेलच, मुलांना कुठेतरी आणण्या-सोडण्याचा वेळ वाचेल – मुलांसाठी करीयर सोडून घरी बसलेल्या आयांच्या धडपडीला काहीतरी दिशा मिळेल. पुढच्या वर्षी ही संकल्पना आणखी पुढे नेता येईल. मग, सुरुवात करायची ना? चांगल्या कामाला पैशांची अडचण कधी येत नाही. लागतो फक्त निश्चय. ‘करून पहायचंच’ असा !