संस्कृत विरुद्ध Behavioural science
दहावी म्हणून मी संस्कृतचा अभ्यास करत आहे आणि आवड म्हणून इतर पुस्तकं वाचते आहे. बापरे ! नुसतं confusion!! मी पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त वाचत आहे, त्याच्या एकदम उलट संस्कृतमधे वाचायला मिळते. इथे तर माणसांच्या दोनच जमाती आहेत एक विद्वान आणि दुसरा मूर्ख?? गरुड राजा तर कावळा बिचारा मूर्ख ! मला तर प्रश्नच पडतो की कावळ्याला मूर्ख का म्हणतात? बदला आणि सूड ह्यावर रचलेलं आहे आमचं संस्कृत, जसे –
अनर्घ्यमपि माणिक्यं हेमाश्रयमक्षेपते
अनाश्रया न शोभन्ते पण्डिता वनिता लताः॥
‘ज्याचे मोल करता येत नाही असे माणिक देखील सोन्याच्या आश्रयाची इच्छा करते. सोन्याचा आश्रय मिळाल्याशिवाय माणिक शोभत नाही, तसेच आश्रय मिळाल्याशिवाय विद्वान, स्त्रिया व वेली शोभत नाहीत.’
काय पण भाषा आहे, आश्रय मिळाल्या शिवाय स्त्रिया शोभत नाहीत की काय? आत्मनिर्भर स्त्रिया तर मग अशोभनीय झाल्या.
विद्वान… मला तर आजपर्यंत कळलं नाहीये की विद्वान कोणाला म्हणायचं? डिग्री असलेल्यांना, डिग्री नसून आपल्या व्यवसायामधे सफल झालेल्या व्यक्तींना विद्वान म्हणायचं की पोथी पुराण वाचणार्याला विद्वान म्हणायचं? एक स्त्री उत्तम घर चालवते आहे मग तिला विद्वान म्हणायचंय का? एखादा खेळाडू जर आपल्या क्षेत्रात प्रगती करत असेल तर त्याला विद्वान म्हणायचं काय? एखाद्याने जर खूप नाव, प्रसिद्धी आणि पैसा कमवला नसेल पण तो आनंदी असेल तर त्याला विद्वान म्हणता येईल का? विद्वान म्हणजे नेमकं कोण??
उपकारोऽपि नीचानाम् अपकारो हि जायते
पयः पानं भुजङ्गाना केवलं विषवर्धनम्
‘खरोखर दुष्ट माणसांवर केलेला उपकार पण अपकारच ठरतो जसे सर्पांना दूध पाजले तरी त्यामुळे त्यांचे वीषच वाढते.’
आता दुष्ट कोणाला म्हणायचं? खुनी, गुन्हेगार यांना, पण अख्खं behavioural science तर म्हणतं की आपण चांगलंच वागायचं ! आम्ही चांगले वागत राहिलो तर समोरची व्यक्तीपण बदलते. दुष्ट माणूस बदलू शकत नाही असं म्हटलं तर transformation चं काय? व्यक्ती बदलतात ह्यावर माझा पण ठाम विश्वास आहे!
कुसुमस्य बकस्येव हयी वृत्तिर्मनस्विनः
सर्वेषां मूर्ध्नि ता निष्ठेत विशीर्येत वनेऽथवा ॥
‘तेजस्वी व बाणेदार पुरुषाची वृत्ती फुलासारखी दोन प्रकारची असते. सर्वांच्या डोक्यावर तरी बसावे अथवा रानात सुकून नष्ट व्हावे.’
…म्हणजे अशी वृत्ती स्त्रीची नको तर पुरुषाची हवी. कशाला कोणाच्या डोक्यावर? आणि ही वृत्तीतरी काय की टॉपवर राहणार किंवा सुकून मरणार? ही तर जनावरांची वृत्ती झाली, ‘लढा अथवा पळा.’
जातमात्रं न यः शत्रुं रोगं च प्रशमं नयेत
महाबलोऽऽ अपि तेनैव वृद्धिं प्राप्य स हन्यते
म्हणजे, ‘जो मनुष्य रोग आणि शत्रू झाल्याबरोबर त्यांचा नायनाट करत नाही तो कितीही बलवान असला तरी वाढलेल्या शत्रूकडून व रोगाकडून ठार केला जातो.’ कशाला करायचा शत्रूचा नाश?
नाश करण्यापेक्षा माफ करणे श्रेष्ठ नाही का?
नायनाट करणे म्हणजे हिंसा नाही का?
शत्रूला मारणे माझ्या जिंकण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी घालत नाही का??
अवसात्रुटिंत प्रेम नवीकर्तु ईश्वरः
सन्धि न याति स्फुटितं लाक्षालेपेने मौक्तिकम्!!
‘अपमानामुळे तुटलेले प्रेम पुन्हा नव्याने निर्माण करण्यास कोण समर्थ आहे? एखाद्याचा अपमान झाल्यावर त्याचाशी प्रेमसंबंध पुन्हा जोडू शकत नाही जसे फुटलेले मोती लाखेचा लेप लावून कधी ही सांधता येत नाहीत.’
अरे! एकदम विरुद्ध ! मी मागच्या आठवड्यात रुजवेल्टचं पुस्तक वाचत होते. त्यात लिहिलं आहे अपमान वगैरे काही नसते. आपल्याला अपमानित वाटले तरी ती आपली मानसिक अवस्था असते. पुन्हा माफ करून नव्याने संबंध, नाती बनवणे शक्य असते.
नाद्रव्ये निहिता काचित क्रिया फलवती भवत्
न व्यापार शतेनापि शुकवत् पाठ्यते बकः ॥
‘अयोग्य वस्तूच्या बाबतीत केलेली कोणतीही क्रिया कधीही यशस्वी होत नाही. उदाहरणार्थ शेकडो प्रयत्न करूनदेखील बगळ्याला पोपटाप्रमाणे शिकवता येत नाही.’
मला तर हे श्लोक खूपच नकारात्मक वाटतात. सतत परिश्रम आणि कौशल्यपूर्ण प्रयत्न यशाची हमखास पायरी आहे. बदल शक्य नाही म्हटल्यावर प्रयत्नच का करायचे?
उपकार गृहीतेन शत्रुणा शत्रुमुद्धरेत्
पादलग्न करस्थेन कण्टकेनेव कण्टकम्
‘पायाला लागलेला काटा ज्याप्रमाणे हातात असलेल्या काट्याने काढून टाकावा त्याप्रमाणे उपकाराने वश केलेल्या शत्रूकडून दुसर्या शत्रूला जिंकावे.’
काय पण राजकारण? किती हे हरणं-जिकणं? सतत जिंकण्याची ओढ? कशासाठी? मला तर कळतच नाही-वश करून घेणे, आश्रय घेणे, शत्रूचा पराभव, उपकार हे कसे शब्द आहेत? ह्याच्या ऐवजी behavioural science मधे किती छान शब्द आहेत. win-win, Empathy म्हणजे सहअनुभूति role-modelling, patience, forgive, perseverance. म्हणून म्हणते, मी तरी behavioural science च्या बाजूने
आहे ! शंभर टक्के !!