अर्ध्या हळकुंडाचं पिवळेपण
परिवर्तन हा दिवाळी अंकाचा विषय. सगळीकडे झपाट्याने बदल होत चाललेले असताना शालेय शिक्षणातल्या बदलांची चर्चा नेहमीच होत असते. शिक्षणामध्ये खरंच बदल होतायत का? कशा प्रकारचे? कधीपासून असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरं हुडकण्याचा हा एक छोटा प्रयत्न….
क्षण म्हणजे बदल.’ अशी शिक्षणाची व्यापक व्याख्या केली जाते. ही व्याख्या इतकी सर्वसमावेशक आहे की काहीही घडलं तर कुणाचं न् कुणाचं, कसलं तरी शिक्षण झालंय असं म्हणता येऊ शकतं. आपण आपल्या चर्चेसाठी सध्या औपचारिक शिक्षणाकडे, त्यातही भारतातल्या औपचारिक शालेय शिक्षणाकडे जास्त लक्षपूर्वक पाहू.
आपल्या देशात आज आपण ज्याला आधुनिक औपचारिक शिक्षण म्हणतो ती व्यवस्था वासाहतिक काळात ब्रिटिशांनी सुरू केली. खेड्यांमधून राहणार्या, हातात विविध कौशल्यं असणार्या लोकांच्या भारतासारख्या देशामधून इंग्रजांना हवं ते, हवं तसं काम करणार्या लोकांची मोठ्या प्रमाणावर गरज होती. कसलाही विचार न करता वरिष्ठांचं म्हणणं ऐकून त्यांच्या हुकुमाची अंमलबजावणी करणारे लोक मोठ्या प्रमाणावर तयार झाले. ‘पुस्तकी’ ज्ञानातून पंडित निर्माण होण्याच्या या प्रक्रियेतून साहजिकच अनुभवातून कौशल्यं आत्मसात करणारा बहुजन समाज बाहेर फेकला गेला.
इंग्रजांचा हेतू साध्य झाला पण त्यांना नको असणार्या विचारसरणीचे काही लोकदेखील याच शिक्षणातून तयार झाले. राष्ट्रीय विचारसणीच्या या लोकांनी स्वातंत्र्यचळवळीचा एक भाग म्हणून ‘राष्ट्रीय’ शिक्षण देणार्या शाळा काढल्या. भारतीय शिक्षणक्षेत्रातला हा एक मोठ्ठा बदल होता. पण इतिहास, संस्कृती, भाषा याबाबत वेगळेपणाचा आग्रह धरणार्या या शाळांमधल्या ज्ञानाचं स्वरूप कसं होतं? ज्ञान कशाला म्हणायचं, त्याचं आकलन कसं करून द्यायचं, कितपत आकलन झालंय ते कसं तपासायचं या तीनही बाबतीत ब्रिटिशांची शिक्षणव्यवस्था या राष्ट्रीय शाळांसमोरचं ‘रोल मॉडेल’ होती. ज्या विदेशी शिक्षणपद्धतीत शिकूनदेखील काही लोक राष्ट्रीय विचारसारणीचे बनले त्यांच्या स्वदेशी शाळांमधून शिकलेले लोक मात्र मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशांच्या सेवेत (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) रुजू झाले. परिवर्तनाचं एक आवर्तन पूर्ण झालं !
शिक्षण आणि बदल यांचा संबंध ‘आधी कोंबडी की आधी अंडं’ यांच्यासारखा वाटतो. समाज बदलून त्याचं प्रतिबिंब शिक्षणात उमटतं की शिक्षणच समाजाला बदलवतं? याचं उत्तर सोपं नाही पण दोन्ही बाजूंनी होकारार्थीच आहे. शिक्षण
समाजाला बदलवतं असं शासकांचं म्हणणं असतं तर समाज शिक्षणपद्धत बदलवतो असं बाजारपेठेचं म्हणणं असतं. मार्केट बदललं की शिक्षणाला बदलावंच लागतं कारण नव्या मार्केटमध्ये जुनं शिक्षण कुचकामी ठरतं. गेली पंधरा एक वर्षं आपणही आपल्या देशात हे पाहतो आहोत. शिक्षणातून बदल घडवता येतात हे शासनकर्त्यांचं ठाम मत असतं. ते तसे घडवता येतात पण ज्यांना आपण बदल म्हणतो ते खरोखरीच ‘बदल’ असतात का?
उदाहरणार्थ – ७० – ८० वर्षांपूर्वी टायपिंग शिकणार्यांची पतवंडं आज कॉम्प्युटर शिकतायत. हा शिक्षणातला बदल आहे की नाही? मला वाटतं हा फार मोठा बदल नाही. त्या त्या काळात ते ते शिक्षण उपयुक्त होतं / आहे इतकंच. पण बहुतांश लोक ते तितक्याच ठोकळेबाजपणे घेत होते / आहेत.
दुसरं एक उदाहरण. बायकांचं समाजातलं स्थान उंचावण्यासाठी शिक्षणाचा वापर प्रमुख साधन म्हणून करायला हवा असं आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. ‘नव्याने तयार केलेले अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं, शिक्षण-अधिकार्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम यातून स्त्रियांना समाजात योग्य स्थान मिळवून दिलं जाईल’ असं १९८६ साली ठरवण्यात आलं. त्यानंतर एक पिढी शिकून प्रौढ झाली. नवी पुस्तकं, नवी चित्रं, नवे अभ्यासक्रम आले पण फरक काय पडला? फरक न दिसण्याचं कारण बदलाची प्रक्रिया सावकाश घडणारी असते इतकं साधं नाहीय. जेव्हा आपण शिक्षणात बदल केल्याचं सांगतो तेव्हा मूळ मुद्याला हात घालण्याचं धाडसच आपण करत नाही. वरवरच्या बदलांना मूलभूत बदल मानायची इतकी सवय आपल्याला झालीय की मूलभूत बदलांविषयी कुणी बोललं तरी आपल्याला धक्का बसतो.
देश स्वतंत्र झाल्यापासून आपण स्वदेशीकरणाच्या नावाखाली शिक्षणात अनेक बदल करतो आहोत. पण निष्पन्न काय झालंय? २००५ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार ‘स्वातंत्र्यानंतर या देशात स्वदेशीकरणाच्या नावाखाली शिक्षणाचं ब्राह्मणीकरण झालंय. दलित – बहुजन समाजाचं जीवन, आचार – विचार, भाषा यांचं कसलंही प्रतिबिबं आपल्या शिक्षणात दिसत नाही.’ मग शिक्षणात बदल झालेत म्हणजे नेमकं काय झालंय? ब्रिटिशांनी दिलेलं शिक्षणदेखील सवर्णांना साजेसंच होतं. मग तोच गाडा आपण पुढं ओढतोय ना?
शारीरिक कष्ट करून देशाची उत्पादकता वाढवणारा बहुसंख्य बहुजन समाज या देशात असताना केवळ नेमून दिलेलं पुस्तकी ज्ञान निरर्थकपणे डोक्यात भरलेल्यांना आपण ज्ञानी समजतो. त्यांना समजेल, उपयोगी पडेल अशी या देशातल्या शिक्षणाची पद्धत आपण बनवलीय. त्यालाच शिक्षणातला बदल मानायला लागलोय. कोणताही बदल एका साच्यात बसवायचा प्रयत्न केला की त्याची एक व्यवस्था बनते अन् ती व्यवस्थाच समाजातल्या पुढच्या बदलांचं नियंत्रण करते. समाजातल्या बदलांचं नियंत्रण करणारी ब्राह्मणी व्यवस्था आपणच अशाप्रकारे जोपासलीय.
स्वातंत्र्यानंतरदेखील ‘बहुजन हिताय’ अशा बदलांना, लोकांमधल्या ज्ञानसाठ्याला आपल्या शिक्षणव्यवस्थेनं सतत नाकारलंय. आपोआपच श्रमजीवी बहुजन समाज शिक्षणापासून अन् त्यातून घडू शकणार्या बदलांपासून वंचित राहिलाय. तरीही आपण आजच्या शिक्षणाला कालाच्या तुलनेत बदललेलंच मानतो ! कमीत कमी शारीरिक श्रम करणार्यांना जास्तीत जास्त ज्ञानी, सत्ताधारी मानायची पद्धत जातीव्यवस्थेनं आपल्याकडं निर्माण केली अन् शिक्षणव्यवस्था त्या पद्धतीचीच री ओढतीय, मग बदल घडणार कसे?
म्हणजे मग काहीच बदल होत नाहीयेत का? होताहेत, नक्की होताहेत. पण हे बदल old wine in the new bottle सारखे आहेत. निरुपयोगी माहिती साठवायला लावण्याऐवजी विचार करायला लावेल, श्रमप्रतिष्ठेवर भाषणं देण्याऐवजी शारीरिक श्रम करायला लावेल असं शिक्षण आपल्याकडं अजून आलेलंच नाहीय. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरदेखील बहुसंख्यांना उपयोगी पडेल असं शेतीचं शिक्षण शाळांमधे आलं नाहीए मग बहुजनांना शाळा आपल्या कशा वाटणार? शिक्षणातून येणार्या बदलाची फळं सगळ्यांना चाखायला द्यायची असतील तर सर्वसमावेशकतेला साजेसे बदल शिक्षणात करायला नको?
‘झाले तेवढे बदल पुरे झाले, काय साधायची ती प्रगती यातून साधता येईल’ असा एक मतप्रवाह समाजात कायम असतो. रोमन इंजिनिअर ज्युलिअस फ्रंटीनस म्हणतो ‘‘जगाची आता पुरेशी प्रगती झालीय. याहून जास्त प्रगती होण्याची काही शक्यता नाही.’’ आपणही म्हणतोच ना की, ‘बापरे ! जग किती बदललंय. याच्या पुढं काय? काही असणं शक्यच नाही. मग ज्युलीअस फ्रंटीनस असं म्हणतो तर त्यात काय नवल? त्याच्या विधानाचं वैशिष्ट्य असं की ते विधान इसवी सनाच्या पहिल्या शतकातलं आहे.
बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे, पण निसर्गाचा, मानवनिर्मित समाजाचा, त्यातल्या समकालीन उतरंड व्यवस्थेचा नाही. विषमतेवर आधारित व्यवस्थेला ती व्यवस्था टिकवून ठेवणारं शिक्षणच हवं असतं. तेच तिच्यासाठी उपयुक्त असतं. पण त्यामुळं विषमतेचे बळी असणार्यांचा रोष वाढण्याचा धोका संभवतो. तो धोका टाळायचा असेल तर बदल होतायत हे दाखवावं लागतं. आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीत होणारे बदल हे असेच दिखाऊ, वरकरणी, तपशिलाचे असतात. गाभ्यातले नाहीत. या देखाव्यालाच मूलभूत बदल मानणं हे नुकसानकारक अन् चुकीचं आहे.
बहुजनांच्या फायद्याचे, शिक्षणाला खरोखर सगळीकडे नेणारे बदल व्हायचे असतील तर ज्ञानाच्या व्याख्येपासून सगळीकडे परिवर्तन व्हावं लागेल. बहुजन समाजाच्या ज्ञानाचा, अनुभवांचा साठा औपचारिक शिक्षणात आणावा लागेल. पाठांतरावर आधारित अल्पजीवी माहितीला ज्ञान म्हणण्याची सवय सोडावी लागेल. अन्यथा वरकरणी बदलांच्या नादात आपण मूलभूत बदल हरवून बसू. अर्ध्या हळकुंडाच्या पिवळेपणाच्या नादात सूर्यप्रकाशाचं पिवळेपण हरवून कसं चालेल?