वेदी लेखांक २०

तर्हेतर्हेची घरं
युद्धामुळे मला बरेच वेळा सुट्टी मिळायची आणि मी खूप वेळा घरी जायचो. प्रत्येक वेळी मी वेगळ्याच घरी जात असे. त्याचं कारण म्हणजे डॅडींची सारखी बदली होत असे. पंजाबमधल्या एका गावाहून दुसर्या गावाला. मी तीन वर्षांचा होतो तेव्हापासून आठ वर्षांचा होईपर्यंत त्यांची बदली गुजरात, अमृतसर, लाहोर, मुलतान, अंबाला, लाहोर, रावळपिंडी अशी झाली. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांना राहायला सरकारी बंगला मिळत असे. मला आठवतंय त्याप्रमाणे डॅडीजी आणि ममाजी एका जागी काही फार दिवस राहात नसत. त्यांनी माझ्या सगळ्या भावंडांना निवासी शाळांमध्ये घातलं होतं. पॉम, निमी, उमी दिदी जायच्या लाहोरच्या सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये आणि ओमभैय्या नेहमीप्रमाणे बिशप कॉटन स्कूल शिमला इथे. त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून ही व्यवस्था केलेली होती. बर्याच वर्षांनंतर मी डॅडीजींना विचारलं होतं की त्यांनी ममाजी आणि मुलांना ११ टेंपल रोड या आमच्या लाहोरच्या घरातच का ठेवलं नाही. तसं केलं असतं तर सगळी मुलं घरी राहून शाळेत गेली असती. त्या वेळी आमचे इतर बदलीवाले नातेवाईक असं करायचे. मुलांना घेऊन बायका शहरात राहायच्या आणि मुलांचे वडील बदलीच्या ठिकाणी जायचे. तेव्हा डॅडीजी म्हणाले होते. ‘‘इंग्लिश बोर्डिंग स्कूल पद्धतीवर माझा आहे तितका त्यांचा विश्वास नसेल किंवा त्यांना तसं शिक्षण परवडत नसेल. शिवाय मला तुझी आई माझ्याबरोबर असलेली आवडत असे. त्यामुळे जिथे जाईन तिथे आम्हाला घर थाटता येत असे.’’

पण बरेच वेळा असं व्हायचं की सुट्ट्यांमध्ये जाण्यासाठी आम्हाला ‘घर’ नसायचंच. खरं म्हणजे आमच्या ११ टेंपल रोड लाहोर या घरातल्या काही खोल्या डॅडीजींनी आमच्या कुटुंबासाठी ठेवल्या होत्या. बाकीचं घर भाड्यानं दिलेलं होतं. पण त्या खोल्यांमध्ये बहुतेकवेळा आमची आत्या परमेश्वरीदेवी आणि तिची पाच मुलं राहात असायची. ही मंडळी कधीच खोल्या रिकाम्या करून देत नसत. त्याला अनेक कारणं देत असत. त्यापैकी एक म्हणजे ११ हा आकडा त्यांना शुभ वाटायचा. ही आनंद कुटुंबातली आते भावंडं कायम शाळा, कॉलेज, नोकरीची प्रवेशपरीक्षा अशा कसल्या ना कसल्या परीक्षांना बसत असायची. त्यामुळे त्यांना शुभशकुनांची खूपच गरज पडायची.

अशा सगळ्या परिस्थितीमुळे आम्ही मुलं सुट्टीत आमच्या आजोळी राहायला जात असू. ममाजींचे वडील, त्यांना आम्ही बाबूजी म्हणायचो आणि आईला माताजी म्हणायचो. हे आजी आजोबा १६ मोझांग रोड इथे त्यांच्या मोठ्या बंगल्यात राहायचे. हे घर टेंपल रोडच्या अगदी जवळ होतं. त्यांच्या घराला मोठं लॉन होतं. खूप नोकरही होते. ड्रायव्हर, पाणक्या, माळी, स्वयंपाकी असे होते शिवाय एक हरकाम्या आणि एक झाडूवालासुद्धा होता. या घराला तशा खूप बेडरूम नव्हत्या पण कितीही माणसं आली तरी त्यांची अंथरुणं घालायला जागा असायचीच. बाबूजी आणि माताजींच्या मुलांपैकी कोणी ना कोणी पाहुणी त्यांच्या कुटुंबियांना, नोकरमाणसांना घेऊन कायम येत असायची. त्यांचा मुक्कामही बरेच दिवस असायचा. त्यामुळे त्या बंगल्यात कायमच कसलातरी सण समारंभ चालू आहे असं वाटायचं.

मोझांग रोडच्या घरातल्या मुक्कामातलं मला सगळ्यात काय आवडत असेल तर हकीमजींची रोजची फेरी. हे युनानी पद्धत वापरणारे डॉक्टर होते. त्यांच्या बुटांचा आवाज ओळखीचा झाला होता. संध्याकाळ झाल्यावर ते येत आहेत हे मी बरोबर ओळखत असे. ते सैलसर पंप शू वापरत असत. त्या बुटांना नाड्या नसल्यामुळे त्यांना ते पायात पकडून ठेवावे लागत असणार. त्यांच्या दमदार चालीचा आवाज आम्हाला अगदी राजेशाही वाटायचा. त्यांची चाहूल लागली की आम्ही मुलं धावत व्हरांड्यात जाऊन आमचे हात त्यांच्यापुढे करायचो.
‘‘माझी नाडी आधी बघा हकीमजी.’’
‘‘माझी आधी बघा नाडी.’’
‘‘नाही नाही माझी आधी.’’

एका मागून एक ते आमची मनगटं हातात घ्यायचे. आमची नाडी बघायचे आणि आम्हाला जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात बांधलेलं चूर्ण द्यायचे. आम्ही ते चूर्ण मनसोक्त खायचो मग आमच्या तोंडाला त्याचा वास येत असे. असं झालं म्हणजे आमची तब्येत अगदी ठणठणीत आहे असं समजावं असं हकीमजी सांगायचे. आम्हाला कुठे खाजत असेल, दुखत असेल, रक्त येत असेल तर ते एक हिरव्या मलमाचा लपका द्यायचे. हे मलम लहानशा पॉंड्स कोल्ड क्रीमच्या बाटलीतून मिळायचं. हे हिरवं मलम मग आम्ही लावायचो आणि दुखणं थांबण्याची वाट बघायचो.

‘‘ढोंगी आहे हा. तो डॉक्टर नाहीये. नुसता वैदुबुवा आहे. त्याच्यासारख्या माणसांना तुरुंगात टाकलं पाहिजे. उपायापेक्षा अपायच करतात हे लोक.’’ डॅडीजी म्हणायचे.

आम्ही डॅडीजींबरोबर असलो म्हणजे आमचा त्यांच्यावर विश्वास बसायचा. पण जेव्हा हकीमजी त्यांच्या राजेशाही बोटांनी आमची नाडी बघायचे आणि त्यांचं हिरवं मलम आम्हाला द्यायचे तेव्हा आमचा ममाजींवर विश्वास असायचा. त्यांना वाटायचं हकीमजी हे लाहोरमधले सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहेत. आमच्या आजोळच्या सगळ्या मेहरा मंडळींचा त्यांच्यावर विश्वास होता. महान डॉक्टराला मिळणारे सगळे अधिकार त्यांना १६ मोझांग रोडच्या घरात मिळायचे. न कळवता केव्हाही घरात यायची त्यांना परवानगी होती. दारावर टकटक न करता बायकांच्या भागातही जायची त्यांना परवानगी होती.

हकीमजींचं चूर्ण आणि हिरवं मलम मिळेपर्यंत ते मला फारसे आवडत नसत. माझी दृष्टी गेल्यानंतर मला परस्पर मोझांग रोडच्या घरी आणलं होतं. इथे ममाजी मला पकडून डोळ्यात झोंबणारे औषधाचे थेंब घालायच्या. मी ओरडायला लागलो म्हणजे त्या म्हणायच्या, ‘‘हे हकीमजीचं औषध आहे. चूप… चूप… झोंबणं कमी होईल आता. हकीमजी म्हणतात या औषधानं तुला परत दिसायला लागेल.’’ यानंतर मला कसली गरज पडल्यावर ममाजींना हाका मारायचं मी बंदच केलं. त्याऐवजी मला बाथरूमला वगैरे जायचं असलं तर मी अजमेरोला हाक मारायचो. ती जर हाकेच्या अंतरावर नसेल तर मी माझ्या धाकट्या मावशीला, धरममावशीला हाक मारायचो. धरममावशी धावत यायची. पण तिचं लग्न झालं आणि ती तिच्या घरी निघून गेली. मग मी पुष्पामावशीला हाक मारायचो. पण….. संत्र्याच्या सुधारसाचा प्रसंग होईपर्यंतच.

पुष्पामावशी आरशाच्या टेबलासमोर बसली होती. मला संत्र्याच्या सुधारसाचा वास आला म्हणून मी पळत तिच्याकडे गेलो. ‘‘मला देतेस थोडा?’’ मी विचारलं.

‘‘जा तिकडे. तू म्हणजे नुसती कटकट आहेस.’’ ती म्हणाली. तिचं डोकं खाली वाकवलेलं असणार. आणि ती तिच्या हातांनी संत्र्याचा सुधारस करत असणार – मी मनात म्हणालो. ‘‘तू संत्र्याचा सुधारस करत्येस का? मला हात लावू दे.’’ मी तिच्या मांडीवर चढत म्हणालो. तिनं माझ्या पालथ्या हाताला काही तरी लावलं. मी त्याचा वास घेतला. माझी खात्रीच झाली. ती संत्र्याचा सुधारसच करते आहे. मी टेबलाकडे हात नेला एक छोटी बाटली हाताला लागली तिला संत्र्याचा वास येत होता. ती उचलून मी तोंडाला लावली. आणि मला ठसका लागला.

‘‘अरे अरे काय करतोस?’’ ती ओरडली. ‘‘तू माझं नेल पॉलिश पितो आहेस. आणि माझ्या सगळ्यात आवडत्या साडीवर थुंकतो आहेस.’’ तिनं माझ्या थोबाडीत मारली. मी तिच्या पोटात गुद्दा मारला.
त्यानंतर मी तिला फारसा कधी हाका मारत नसे. मारली तर ती म्हणत असे ‘‘मी तुझी नोकर नाहीये. विमलाला हाका मार.’’ विमला ही ममाजींची तिसरी बहीण होती. तिला हाक मारायला मला आवडत नसे. मला पाहिलं की ती रडायला लागायची आणि म्हणायची, ‘‘बिच्चारं पोर ते. देव तुझ्यावर दया करो.’’

पुष्पामावशी आणि विमलामावशी पॉमदीदीपेक्षा थोड्याच मोठ्या होत्या. पण आम्ही मोझांग रोडला राहायला जायचो तेव्हा त्या आमच्यावर दादागिरी करायच्या आणि सारख्या चिडवायच्या. त्यांनी आमची टोपणनावं ठेवली होती. पॉमदीदी होती लाल मिर्ची. कारण आमच्यापैकी कुणाचा कुणी अपमान केला, तर चूक बरोबर अशी बाजू कळायच्या आधीच पॉमदीदी खूप संतापायची. निमीदीदी होती ठब्बूराणी. ती राणीसारखी सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची. उमीदीदी होती पाणीपुरी. कारण तिची जीभ जरा तिखटच होती. ती फटकळपणे बोलायची. ओमभैय्या होता प्रिन्स ऑफ वेल्स आणि मी होतो मास्तरसाहेब. कारण मला वाचता येत नसलं तरी मी अभ्यासू दिसायचो. बाळ उषाला मात्र असं नाव ठेवलेलं नव्हतं.

डॅडीजी म्हणायचे अशी नावं ठेवणं हा समाजातल्या उच्चभ्रू रिकामटेकड्या मंडळींचा वेळ घालवण्याचा उद्योग असतो. आणि ते थोडं बरोबरही होतं. बाबूजींना ब्रिटिशांनी किताब दिलेला होता आणि त्याशिवायही ते श्रीमंत होते. पुष्पा आणि विमलामावशी कायम फॅशनेबल बायकांसारख्या वागायचा प्रयत्न कसा करतात हे दाखवून द्यायची एकही संधी माझ्या मोठ्या बहिणी सोडायच्या नाहीत. त्यांना आम्ही आंटी म्हटलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. इंग्रजी पद्धतीनं हाका मारणं कसं ऐटबाज वाटतं असं त्यांना वाटायचं. त्यांच्या भावांना आम्ही अंकल म्हणावं असंही त्यांना वाटायचं. पुष्पाआंटी तिची नखं वाढवून त्यांना नेल पॉलिश लावायची, सेंट आणि लिपस्टिकही लावायची. मेहता कुटुंबातल्या मुलींना हे काहीही करायची परवानगी नव्हती. अख्ख्या मेहरा आणि मेहता खानदानात पुष्पाआंटी इतकं कुणीच सुंदर नव्हतं. तिची दागदागिने, कपडेलत्ते, सेंट वगैरेमधली आवडनिवडही उच्च प्रतीची होती अशी एकूण समजूत होती.

‘‘किताब, पैसा आणि फॅशन यांना आम्ही काहीही किंमत देत नाही.’’ उमीदीदी आमच्यातर्फे पुष्पामावशीला बोलायची. ‘‘आमचे डॅडीजी सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना केवढा मान असतो. बाबूजींनी कितीही पैसा ओतला तरी तो त्यांना विकत घेता येणार नाही.’’

‘‘पण बाबूजींनी किताब आहे. हे तुम्हाला विसरून चालणारच नाही. कळलं का पाणीपुरी बाई !’’ पुष्पाआंटी म्हणायची. ‘‘मी तुला आंटी म्हणते कारण मला ममाजींचा मान राखायचा आहे. तू माझी आंटीच नाहियेस. तू माझा मान ठेवत नाहीस, मी तुझा मान ठेवणार नाही.’’

‘‘माझे पाय चाटायचीसुद्धा तुझी लायकी नाही. तुम्ही मेहता लोक म्हैसबुद्धीचे आणि पराठ्याच्या अंगाचे आहात.’’ पुष्पाआंटी म्हणायची. सगळ्या मावश्या पचायला हलकं असं गाईचं दूध प्यायच्या. आम्ही पचायला जड असलेलं म्हशीचं दूध प्यायचो. ते लोक हलक्या फुलक्या पोळ्या खायचे. आम्ही जाडे भरडे पराठे खायचो. डॅडीजींनी त्यांच्या कामाच्या दरम्यान खूपच कुपोषण पाहिलेलं होतं. त्यामुळे ते आमच्या आहाराबद्दल खूपच जागरूक होते.

‘‘भित्री मांजर होण्यापेक्षा मी म्हैसबुद्धीचीच बरी.’’ उमीदीदी म्हणायची. या मावश्या कायम त्यांच्या नाजूक पचनाबद्दल आणि डोकेदुखीबद्दल बोलायच्या. आमची कधीच कसली तक्रारच नसायची. ‘‘या घरातल्या आदबशीर लोकांबरोबर राहायची तुमची लायकीच नाही. तुम्ही सगळे मेहता एकसारखे आहात. गुंड मवाली नुसते ! तुमचे बलवंतकाका आणि राजकंवरकाका वाया गेलेले आहेत की नाही?’’ आंटी पुष्पा म्हणायची.

बलवंतकाका अगदी शांत माणूस. पण त्यांना कॉलेजचं शिक्षण काही जमलं नाही. तो काळ सगळा फुकट गेला आणि शेवटी ते पॅराशूटच्या कारखान्यात टेलर म्हणून काम करायला लागले. राजकंवरकाका तापट आणि भांडकुदळ होते. त्यांनीही कॉलेजातला काळ वाया घालवला होता. नंतर ते सतत एका पोलीस ठाण्यावरून दुसर्या पोलिस ठाण्यावरचे प्रमुख म्हणून फिरत राहिले.

‘‘आम्ही मेहता जे करतो ते उत्तमच करतो. आम्ही गुंड मवाली असलो तरी आम्ही सगळ्यात उत्तम गुंड मवाली असतो. आम्ही अपयशी असलो तर सगळ्यात उत्तम अपयशी असतो. आणि तुमच्या नशिबानं आमच्यासारखे म्हैसबुद्धीचे आणि पराठ्यासारख्या अंगाचे लोक तुमच्याजवळ आहेत, नाहीतर मॉंजींचे पाय, हात आणि पाठ चेपायला दुसरं कोण मिळालं असतं तुम्हाला !’’

मॉंजी म्हणजे माताजींची आई. आमची पणजी. त्या खूपच पूर्वी विधवा झालेल्या होत्या. त्या बहुतेक वेळा बाबूजींकडेच राहायच्या. त्यांना शिवदास नावाचा एकुलता एक मुलगा होता. त्यानं खरं म्हणजे त्यांच्या म्हातारपणची काठी व्हायचं. पण तो फारसं काही करत नसे. त्यांच्याजवळ स्वतःचे असे काही पैसे नव्हते. त्यामुळे त्या घरातली खूपशी कामं करून कुटुंबाला मदत करायच्या. नव्या गोधड्या, रजया शिवायच्या किंवा जुन्या रजया उसवायच्या, त्यातला गुठळ्या झालेला कापूस काढून तो पिंजून घ्यायचा आणि पुन्हा रजयांमध्ये शिवायचा. बाबूजींना सकाळच्या नाश्त्यासाठी रोज ओट्सची खीर लागायची. ती सुद्धा जरा भरड रवा काढून करावी लागायची. मॉंजी सकाळी उठून जात्यावर तो दळून, काढून द्यायच्या. त्या लठ्ठ होत्या आणि त्यांना कायम कुठेना कुठे दुखत असायचं. कधी कधी इतकं दुखायचं की त्यांना हलताच यायचं नाही. आम्ही त्यांना हकिमजींचं हिरवं मलम हातापायाला लावायला मदत करायचो.

हातापायांना बँडेज बांधायला, ते ओढून घट्ट करायलासुद्धा आम्ही मदत करायचो. असं केलं की त्यांना थोडं बरं वाटायचं. मग त्या पालथं झोपायच्या आणि आम्ही त्यांच्या पाठीवर उभं राहायचो. मच्छरदाणीच्या दांडीचा आधार घेऊन आमचं सगळं वजन त्यांच्या अंगावर पडणार नाही याची आम्ही काळजी घ्यायचो. त्या सांगतील तसं तसं चवड्यावर चालून आम्ही त्यांचे हात, पाय, पाठ चेपून देत असू. चुकून आमचं सगळं वजन त्यांच्या अंगावर पडलं तर त्या कसल्या ओरडत असत.

आमच्या मावश्या स्वतःला फार नाजूक, फॅशनेबल समजायच्या त्यामुळे हे अंग चेपायचं हलकं काम करायला त्यांना आवडत नसे. पण आम्हाला सलग तासभरसुद्धा हे काम करता येत असे. शहरातल्या जुन्या गजबजलेल्या भागातल्या मंदिरात मॉंजी नियमित जात असत. तिथे त्यांच्याबरोबर जायलाही या मावश्यांना कमीपणा वाटायचा. ओमभैय्या सोडून आम्ही मेहता मंडळी आनंदानं त्यांच्याबरोबर जायचो. त्या आमच्यासाठी काहीबाही वस्तू घ्यायच्या. माझ्यासाठी फुगा, माझ्या बहिणींसाठी काचेच्या बांगड्या. फुगा आणि बांगड्या अगदी स्वस्तातल्या म्हणजे एक आण्याला डझनभर असायच्या. तरीही मावशांना आमचा हेवा वाटायचा आणि आम्हाला रागवायची त्या एकही संधी सोडत नसत.
-०-
कधी कधी आमची मावश्यांबरोबर भांडणं इतकी विकोपाला जायची की त्या आमच्याशी चांगल्यासुद्धा वागतात ते आम्ही विसरूनच जायचो. त्या आमच्यासाठी भेटवस्तूही आणायच्या आणि आमचं कौतुकही करायच्या. पण भांडणात ते सगळं विसरून आम्ही निघून जायची धमकी द्यायचो. आम्ही दरवाजाच्या दिशेनं चालायलाही लागायचो. मग त्या धावत आमच्या मागे यायच्या. कारण त्यांना बाबूजी आणि डॅडीजींची भीती वाटायची.

‘‘डॅडीजींच्यात घाबरण्यासारखं काय आहे?’’ उमीदीदीनं एकदा ममाजींना विचारलं.

‘‘तुम्ही मुलं वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळत मोठे झालात. तुम्हाला कसली भीती म्हणून वाटत नाही. पण आम्ही आईच्या दुधावर वाढलो. ती कायमच बाबूजींना घाबरायची. त्यामुळे आम्ही सगळे घरातल्या कर्त्या पुरुषाची भीती मनात घेऊनच वाढलो.’’