प्रतिसाद
मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. पण बरेच दिवस हा प्रश्न मला पडलेला आहे.
तरुणांना सामाजिक भान देण्यासाठी बाबा आमटेंपासून सोमनाथला शिबिर भरते, आता डॉ. अभय बंग ‘निर्माण’ शिबिरे भरवताहेत. हे थोर लोक त्यांच्या दृष्टीने खूप प्रयत्न करताहेत. शिबिराला जाऊन आल्यावर भावनिक आवेगाने मुलं काही दिवस भारावतात मग हळू हळू उत्साह कमी होऊ लागतो. त्यांच्या काम करण्यात विचारांचा, विवेकाचा पाया नसतो. पालकांनाही सामाजिक काम केलेले नकोच असते.
आपले घर, नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्यासाठीही आहात तेथूनच काम करता येत नाही का? डोळे नीट उघडे ठेवले तर त्यांनाही मदतीची जरूरी असते. आता एक होईल की तुमचे नाव तसे कुठे गाजणार नाही. पण म्हणून त्या कामाचे मोल कमी ठरत नाही. समाजाचे आपण काही देणे लागतो हा विचार या तरुणांच्या मनात कसा रुजवता येईल?
सुमन मेहेंदळे, पुणे
सुमनताईंच्या म्हणण्यात दोन भाग दिसतात. शेजारपाजारच्यांना मदत करणं, गरजेला धावणं ही साधी माणुसकी, चांगलं वागणं आहे. समाजकार्य वगैरे नाहीच. हे प्रत्येक मुलात रुजायला हवं, त्यांच्या सभोवतालच्या मोठ्या माणसांकडून.
मात्र दुसरा मुद्दा वेगळा आहे. तरुणपणी ‘सामाजिक भान रुजावं’ म्हणून मुद्दाम केलेल्या प्रयत्नांमुळे मुलं काही काळ भारावली जातात पण पुढे सारं जगरहाटीप्रमाणे चालतं. असे अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतले असतील. हे असं का होत असेल? असं होऊ नये म्हणून काय करता येईल – याबद्दल नक्की विचार करायला हवा. यापेक्षा वेगळाही अनुभव काहींना येतो. तरुणपणात अशा शिबिरांमधून जे घेतलं, ते पुढील आयुष्यात जरा उशिरानं आकार घेतलेलंही प्रत्ययाला येतं. अशी उदाहरणं कमी असली तरी महत्त्वाची आहेत.
तरुणांमधे सामाजिक भान कसं आणता येईल? आपल्याला काय वाटतं? पालकनीतीसाठी याबद्दल आवर्जून लिहून पाठवावं.
संपादक