सर्जनशीलता आणि खेळकरपणा
जोन एरिकसन (१९०२-१९९७) या अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाच्या मानसशास्त्रज्ञ. त्यांनी प्रौढांच्या आयुष्यातील खेळांचे स्थान या विषयावर काम केलेले आहे. एरिक एरिकसन यांच्या ‘व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धांता’मध्ये त्यांची पत्नी जोन यांचाही बरोबरीने वाटा आहे असे एरिक यांनी म्हटले आहे.
‘विझडम ऍन्ड द सेन्सेस’ हे जोन यांचं पुस्तक. त्यांच्या या पुस्तकात त्यांनी सर्जनशीलतेची चिकित्सक, विश्लेपषक अशी मांडणी केली आहे. ‘व्हायटलायझिंग प्रॉपर्टीज ऑव्ह क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी’या प्रकरणात त्यांनी सर्जनशील असण्यासाठीची एक आवश्यकताम्हणून ‘खेळकरपणा’चा विचार केलाय, या प्रकरणाचा हा स्वैर अनुवाद.
‘आरोग्य आणि मनोरंजन यासाठी खेळ’ – याच्या पलीकडे माणसाच्या जीवनात खेळकरपणाचं काय स्थान असतं – याचं उत्तर आपल्याला या मांडणीतून मिळतं. सर्जनशीलता ही काही केवळ दैवी देणगी लाभलेल्या ‘महान’ वगैरे कलाकारांचीच मक्तेदारी नाही; आपल्या चाकोरीत राहूनही, ती थोडी थोडी रुंदावत आपल्यापुरते काही नवे बदल आपण करू पाहत असतोच; हीदेखील एका अर्थानं सर्जनशीलताच असते. रोजच्या दिनक्रमाचा तोचतोचपणा टाळण्यासाठी काही नवं, वेगळं करून बघण्याची, बदलासाठी स्वत:ला मोकळीक देण्याची गरज एरिकसन यांनी या लेखातून मांडलेली आहे.
सर्जनशीलतेतून काहीतरी नवं, वेगळं जन्माला येतं. कोणतीही महान कलाकृती म्हणजे मानवी मर्यादा ओलांडून जाण्याच्या अथक प्रयत्नांना एखाद्या कलाकारानं दिलेला सक्षम होकार असतो. ते एखादं शिल्प, चित्र असेल, एखादी कविता किंवा साहित्यकृती असेल किंवा गायन, नृत्य असं सादरीकरण !
आपल्यातले बहुतेक जण बहुधा एका साच्यात, चौकटीत जगत असतात. या चौकटीची बंधनं तोडून (किमान सैल करून) स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एका खेळकरपणाची गरज असते. ह्या खेळकरपणातून आपल्याला वेगळे प्रयोग करायला, बदल घडवायला प्रेरणा मिळते. आपल्या चौकटीला आपण जेव्हा पहिला धक्का देतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला कदाचित एक छोटीशी फट निर्माण होईल. आधीच फट असली, तर ती थोडी अधिक रुंदही होईल. आपल्या नेहमीच्या सवयींमधे कदाचित थोडं कमी-अधिक होईल. बदलाची एक छोटीशी झुळूकसुद्धा आपल्या रोजमर्रा ताणामधून सुटका देऊ शकते. बदलात धोक्याची शक्यता असते हे मान्यच आहे कारण बदल हा विधायक तसाच विघातकही असू शकतो. पण कोणत्याही एकसंध, हवाबंद साच्यात वाढ मुळी होऊच शकत नाही. त्यामुळे हा धोका असेलही तरी तो स्वीकारायला हवा.
खेळ
खेळ (play) हा शब्द इंग्रजीत वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. (to play a role, to play a game, to play an instrument, to play fast and loose, to play into someone’s hands etc.) (मराठीतही खेळणे, खेळ करणे, खेळ मांडणे, खेळवणे आहेतच.) मध्ययुगीन इंग्रजीमधेे play ह्या शब्दाचा अर्थ नर्तन, जल्लोष, सुखावणं, आनंदासाठी घेतलेली झेप असा नोंदवलेला आहे. (आनंदासाठीच झेपावणं किंवा उडी मारणं हे शरीरानं असू शकतं तसंच मनानंही. एखादं लहान मूल सोफ्यावरून, टेबलावरून किंवा खिडकीतून उडी मारतं किंवा एखाद्यानं उंचावरून जलाशयात सूर मारलेला असू शकतो, किंवा कुणाचं एखाद्या कामात स्वत:ला झोकून देणंही असू शकतं.) आनंदासाठी घेतलेली झेप किंवा उडी (A leap for joy) हा खेळाचा अर्थ मनाला सर्वाधिक भावतो कारण खेळकरपणात अभिप्रेत असलेल्या सगळ्या गोष्टी तो थेट व्यक्त करतो.
एखादी छोटीशी उडी जरी घ्यायची असेल तर त्यासाठी कित्येक गोष्टी जमून यायला लागतात. शरीरमनाचा एक हलकेपणा हवा, जमिनीवर पाय पक्के रोवलेले हवेत, स्वत:ला हवेत उडवल्यावर अल्लदपणे जमिनीवर उतरवता येईल याचा आत्मविश्वाीसही हवा. एकूणच, एक उत्फुल्ल तरलता तनामनात हवी. मर्यादा तर प्रत्येकाला असतातच. कोणताही गंभीर हेतू मनात न ठेवता, दिलेल्या मर्यादेत आपल्याला मुक्त विहार करता यायला हवा. आकाशात गोलाकार घिरट्या घालणारा पक्ष्यांचा थवा जसा कळे न कळेशा संथ हालचालींनी, वार्या च्याच आधारानं वार्याकवर स्वार होतो, तशी काहीशी मनमोकळी वृत्ती हवी. हा आनंदासाठी उडी मारण्याचा अनुभव आपण कसा घेतो, तो टिकवून कसा धरतो आणि आपल्याच आतमधे साठलेला कोंडलेपणा आपल्याच इच्छेच्या आड येऊ नाही म्हणून स्वत:लाच त्यापासून कसे वाचवतो हे फार फार महत्त्वाचं असतं.
दोन/तीन वर्षाच्या मुलांना खेळताना बघा. विशेषत: समुद्रकिनार्यांवर. इथं त्यांच्याबरोबर असलेली मोठी माणसं स्वत:च थोडीशी निवांत, निश्चिंत असतात. त्यामुळे ती मुलांना आपापलं खेळायला देतात. अशा वेळी या मुलांकडे बघितलं तर दिसतं की ती वाळूतल्या एखाद्या शिंपल्याला, एखाद्या लाकडाच्या तुकड्याला अलगद स्पर्श करतात. प्रत्येक गोष्टीला हळूच उत्सुकतेनं, जिज्ञासेनं हात लावून बघतात. शोधक वृत्तीनं चौकस बुद्धीनं त्याची तपासणी करतात. कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय त्या गोष्टींचा मुक्त अनुभव घेतात. एखाद्या रंगीत प्लॅस्टीकच्या तुकड्याशीही त्याला सुंदर, दुर्मिळ शिंपला समजून अतिशय प्रेमानं खेळत असतात. कारण वस्तूंची तुलनात्मक किंमत वगैरे गोष्टी त्यांच्या मनात नसतात. त्यांच्यासाठी ते एक संपूर्ण खुलं जग असतं…. गवत, वारा, लाटा आणि आनंदानं भरलेेलं… एखाद्या साहसासारखं, उत्स्फूर्त आणि चिंतामुक्त.
मुक्त शोध
आपण जिथं ‘असतो’ त्या जागेचा त्या क्षणी मुक्त शोध घेण्यासाठी आपल्याकडे नेमकं काय असावं लागतं – तर वाट दाखवणारी एक तल्लख जाणीव! शिवाय खेळात तल्लीन झालेल्या मुलाचं असतं तसं अविचलित ध्यान हवं आणि काळावेळाचं बांधलेपण अजिबात नको; कारण असं मुक्त खेळणं घाईघाईत कधीच होऊ शकत नाही. घाई आणि खेळ या गोष्टी परस्परांशी विसंगतच आहेत.
खेळाशी विसंगत असलेल्या इतरही अनेक गोष्टी आहेत. त्यांच्यापैकी काहींचा विचार केला तर आपण ‘खेळ’ या संकल्पनेच्या अधिक जवळ जाऊ शकू. परिस्थिती लक्षात न घेता पूर्वग्रहदूषित दृष्टीनं निर्णयापाशी येणं हा माझ्या मते आपल्यासमोरचा पहिला अडथळा असतो. आपल्या पूर्वग्रहांमुळे आपण आपल्या अनुभवाचेही लगेचच गट पाडतो. ते वेगवेगळ्या कप्प्यात टाकतो, त्यांचं वर्गीकरण करतो. (मुलाला सापडलेला रंगीत प्लॅस्टीकचा तुकडा हा रंग, आकार आणि पोत या मुलानं अनुभवलेल्या निकषांवर शिंपल्याइतका आकर्षक होऊ शकतो हे पूर्वग्रहामुळं आपल्याला कदाचित पटणार नाही). त्यामुळं आपल्या मनात आपणच ज्ञानरचना करत जाण्याच्या प्रक्रियेला मर्यादा येतात. तो अनुभवच नाकारला जातो.
समजा आपल्या या छोट्या संशोधकाने त्याला सापडलेले ओंजळभर शिंपले आणि तो रंगीत प्लॅस्टीकचा तुकडा त्याच्या आईवडिलांकडे नेले, तर त्याला त्यांच्याकडून ऐकावं लागेल, ‘‘अरे, हा तर घाणेरडा प्लॅस्टीकचा तुकडा आहे. टाकून दे. हे शिंपले मस्त आहेत, त्याचं बनव काहीतरी. म्हणजे तुला खरी मजा येईल.’’
उत्सुक नजरेनं आणि जिज्ञासेनं जग पाहणार्याे त्या मुलाच्या दृष्टीनं शिंपल्यात आणि प्लॅस्टीकच्या तुकड्यात गुणात्मक फरक फारसा नसतो. पुढे कधीतरी ‘किंमत’ ठरवण्याचा गुण त्याच्या अनुभवांना चिकटणार असतोच आणि तो खेळातला आनंद घालवणारही असतो; पण आज तरी तसं नसतं.
झुळूक खुल्या हवेची
हर्बर्ट रीड ने ‘द इनोसंट आय’ या त्याच्या पुस्तकात म्हटलंय, ‘सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी, समजून घेण्यासाठी जाणिवा/संवेदना मुक्त, खुल्या असाव्या लागतात, ‘नाव देणं’, ‘गट करणं’ हे खूप लवकर सुरू झालं तर जिज्ञासा आणि संवेदनांचं हे खुलेपण उरत नाही. मुलांनी फरक ओळखायला शिकायला तर हवंच. पण स्वत: काहीतरी शोधून गट करायला, वर्गीकरण करायला शिकण्यातही एक मजा असते. मुलांना नेहमी आपापले निकष आपले आपणच ठरवायचे असतात. ही गोष्टही त्यांना कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय करायची असते. मोठी माणसं (पटकन वर्गीकरण शिकवून) ही प्रक्रिया नीरस करून टाकतात.
आपण मोठे लोक वेळ वाचवण्यासाठी म्हणून हे सतत करतच असतो. आपल्याला त्याची सवय झालेली असते. त्यावेळी आपण आपल्या कल्पनांचे दरवाजे बंद केलेले असतात. (हे आपल्या लक्षातही येत नाही.) आपणच केलेलं वर्गीकरण पुन्हा ‘ऐकायलाही’ आपला नकार असतो. (या गोष्टी अशाच आहेत हे आपण गृहीत धरलेलं असतं.) अशा प्रकारे आपण ताठर, बधिर आणि असंवेदनशील बनत जात असतो.
कोणत्याही प्रकारचा लकडा मागे असेल तर तो आपल्याला आरामात वेळ घालवू देत नाही. त्यामुळे ‘असं झालं तर?’ ‘मग काय करायचं?’ ‘कदाचित सगळं बिघडेलही’ – अशा कल्पना मनात डोकावू शकतात. कुणीतरी ‘मागे लागणं’ यात एक प्रकारचा ताणही असतो. तो भयंकर अपेक्षांमुळे, अनंत ध्येयं डोळ्यासमोर ठेवून आखलेल्या भरगच्च वेळापत्रकामुळे आणि त्यातूनच येणार्याड चिंता-काळज्यांच्या ओझ्यामुळे निर्माण झालेला असतो. एकदा असा ताण मनात तयार झाला की सहजपणे काही प्रयोग करणं, खेळकरपणे विचार करणं अशक्यच होऊन जातं.
जे काही करायचं ते स्वयंप्रेरित असायला हवं – ही खेळकरपणासाठी मूलभूत अट. सक्तीमुळं, जबरदस्तीमुळं आपापली सुधारणा उत्स्फूर्तपणे करत राहण्याची उर्मी गोठून जाते. कुणाच्यातरी आज्ञेवरून ‘उडी’ मारता येईलही, पण मग ती केवळ एक शिस्तबद्ध कवायत असेल. ऑलिंपिकमधे खेळणार्याक खेळाडूंचे आक्रसलेले, ताणलेले गंभीर चेहेरे आठवा… आणि त्याचबरोबर नृत्य करणार्यांचचे चेहेरेही डोळ्यासमोर आणा. (म्हणजे हा फरक नेमका लक्षात येईल.)
खेळकरपणा कशासाठी?
सत्ता आणि संपत्ती या दोन निकषांवर यशाचं मोजमाप करणार्याो संस्कृतीत आपण राहतो आहोत. ही सत्ता आणि संपत्ती शक्य तेवढ्या कमी श्रमात आणि कमी वेळेत मिळवायची असते. मग इथं ‘खेळकरपणा’ एवढा महत्त्वाचा का समजावा? मी तरी त्याचे एवढे गोडवे का गातेय? कारण त्याचा संबंध नव्या शोधांशी आहे.
नव्या शोधाशिवाय विज्ञान म्हणजे केवळ तंत्र. कला आणि विज्ञान यात साम्य शोधायचं तर ते मूलभूत शोध, शोधप्रवृत्ती आणि मुक्त विचार यामधे दिसतं, आणि हे साम्यच त्या त्या व्यक्तीच्या ‘खेळप्रवृत्ती’वर अवलंबून असतं. आईनस्टाईन लहान असताना ठोकळ्यांपासून घरं बनवणं, भुरळ पडल्यासारखं होकायंत्राचं तासन्तास निरीक्षण करीत राहणं, धावत्या रेल्वेत उडणार्यार माश्यांची गती कशी मोजता येईल. अशा प्रश्नांवर सतत विचार करणं यात मग्न असेे. त्याचीच परिणती पुढे त्यानं शोधलेल्या सापेक्षता वादाच्या सिद्धांतात झाली. सुरुवातीला आईनस्टाईनला जगाच्या दृष्टिकोनातून एक यश सोडून ‘सगळं’ मिळालं पण स्वत:चं हे सर्जनशील सत्व मात्र त्यानं कसलीही घाई न करता धैर्यानं आणि चिकाटीनं टिकवून ठेवलं.
आपल्या शाळांमधून बुद्धिवादी, तर्कशुद्ध विचारांना उत्तेजन दिलं जातं. ती आजच्या तंत्रयुगाची वरचेवर वाढत चाललेली एक गरज आहे. यातून तंत्रज्ञानावरचं अवलंबित्वही येतं. पण केवळ तंत्रज्ञान आपल्या जीवनाला पुरं पडत नाही. तंत्रज्ञानातून येणार्याक बुद्धिनिष्ठ, तर्कशुद्ध मूल्यांना आणि चिरंतन मानवी मूल्यांना जोडणार्याा एका पुलाची आज नितांत गरज आहे. हा पूल बांधणं कितीही अवघड असलं तरी त्याच्या आधारानं आपल्याला भौतिक संस्कृतीला ओलांडून पार जायला हवं आहे. मुलं त्यांच्या मुक्त जिज्ञासेतून, पूर्वग्रहरहित स्वच्छ जाणिवेतून आपल्याला ही मूल्यं शिकवत असतात.
खेळकरपणे विचार करून कृती करण्यासाठी तणावमुक्त मोकळा वेळ मात्र असायलाच हवा. आणि तो दैनंदिन गरजांसाठीच्या वेळेव्यतिरिक्त उपलब्ध असायला हवा. विसंगत वाटेल पण त्यासाठीही एक शिस्त लागते आणि एक शहाणीवही. म्हणजे उदा. त्यासाठी आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठावं लागेल… दिवस ‘मोठा’ होईल त्यामुळे थोडी अधिक मोकळीक मिळेल. गंमत अशी आहे की वेळ किती मिळतो हे खूप महत्त्वाचं नसतं. सगळ्या संवेदना जाग्या, तरल असणं, कल्पनाशक्ती खेळायला मोकळी असणं, कशावरही सहजपणे विश्वास ठेवण्याइतकं मन खुलं असणं…. अशी एक स्थिती असायला हवी. मगच नवा विचार, नवी जोडणी, नवी रचना करणं माणसाला शक्य होतं.
गोष्टी रचणं, विलक्षण कल्पना करणं हा खेळकरपणाचाच एक गुणधर्म आहे. माणसाला ‘लहानपणानं’ दिलेली ही नैसर्गिक देणगी आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर जिवंत ठेवणं आवश्यक आहे. कल्पनाशक्ती नसती तर आपण आपल्या स्थळकाळाशी जखडून गेलो असतो. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की उच्च साहसं आणि महान कृत्यं ही दुसर्या च कुठल्यातरी जगात घडतात. पण खरं तर, त्यासाठी इतकं दूर जायची काही गरज नसते. एवढं एकच पाऊल पुढे टाकायला लागतं की आपल्याला आपल्याच सवयींना ‘नाही’ म्हणता येईल. स्वत:ला किंचित पलीकडे नेण्याचं धाडस करता येईल.
कल्पनाशक्ती आणि विनोद या दोन्हीत असलेला एक समान, महान गुण म्हणजे दुसर्याि टोकाचं, विरुद्ध बाजूचं, विसंगतीचं भान ! सर्कशीतला विदूषक मोठमोठे बूट आणि ढगळे कपडे घालून संकटांना आमंत्रण देतो… तेव्हा तो त्याचं ते रंगवलेलं हसू आणि डोळ्यातला विश्वास यांच्यासह त्याच्या दुनियेचा राजा असतोच, पण त्याचवेळी त्यानं आपल्याही दुनियेचा ताबा घेतलेला असतो. त्या विरोधाभासातून हसणं आणि रडणं एकाचवेळी जन्म घेऊ शकतं, कारण त्याचवेळी तो विरोधाभास हृदयापर्यंत पोहोचलेला असतो.
खेळकर विचार, भावना आणि कृतींच्या मुळाशी एक मोकळेपणा असतो. तो आपल्या रोजच्या वास्तवाच्या पल्याड बघायला देतो आणि जे आपण पाहतो ते सजगपणे आत घेऊन त्यावर खुलेपणानं विचारही करायला भाग पाडतो. यात संधी घेणं असतं, लक्ष्मणरेषेच्या बाहेर येणं असतं, धाडस असतं, इतकंच नाही तर कधीकधी स्वत:ला मूर्ख बनवणंही असतं.