संवादकीय – फेब्रुवारी २०१५

इलेक्ट्रिक मोटरने ‘पवनचक्की’ तयार करता येते आणि केवळ फुटभर लांबीच्या प्लॅस्टिकच्या पेटीतल्या तीन सेलवर ती चालते हे बघून प्रचंड उत्तेजित होणाऱ्या ऐंशीच्या दशकातल्या पाचवी सहावीच्या मुलांना- आताच्या प्रौढांना, त्यांच्या शाळकरी मुलांना सहजगत्या टच स्क्रीन मोबाईल हाताळताना बघून त्याहूनही जास्त उत्तेजित व्हायला होते. ‘आमचा मुलगा ना बाप आहे मोबाइलचा, तो किडा आहे त्यातला, सगळं कळतं त्याला, आम्हाला जे येत नाही ते तो करतो त्यात!’ असे आणि गर्विष्ठ कौतुकाचे उद्गार सहज आसपास कानी पडतात. काय करतात ही मुले फोनवर? बहुतांश वेळा व्हीडिओ गेम्स खेळतात. तेही विध्वंसक… धावत जाऊन काही तरी तोडणे, मारणे, फोडणे, गोळ्या झाडणे, बॉम्ब-सुरुंग लावणे… यातील अगदीच सौम्य म्हणजे गाड्यांची किंवा तत्सम शर्यत (त्यातही मारझोड असतेच). एका गेमने तर कळस केला. त्यात तुम्हाला स्क्रीनवर गायीचे सड दिसतात आणि आपण तिचे दूध काढायचे. अगदी धारा काढल्यासारखा आवाज आणि बादलीत दूध भरते. आपण नुसते सडांवरून बोटे फिरवायची. काय साध्य करू पाहताहेत हे गेम्स?

नव्वदीच्या काळात गिअरच्या सायकली आल्या. वाटले, रस्ते या सायकलींनी भरून जातील. युरोपात ते झाले. भारतात नाही झाले. टेलिफोन नंतर घरातल्या घरात कॉर्डलेस फोन आले. नंतर आले पेजर. अमेरिका-युरोप पेजरमय झाले. पण आपल्याकडे टेलिफोननंतर निवडक घरात कॉर्डलेस आले आणि त्यानंतर मोबाइल फोनचा स्फोट झाला. टीव्हीच्या रिमोटबद्दलही अनभिज्ञ असणाऱ्यांच्या हातात मोबाइल फोन आणि मग स्मार्ट फोन आले. पण त्याच्या स्मार्टनेसबरोबर आपण काय करायचे हे मात्र आले नाही. आपली सर्व प्रकारची समज आणि शैक्षणिक दर्जा तोच राहिल्याने तंत्रज्ञानाले जेवढे प्रश्न सोडवले तितकेच, किंबहुना जास्तच आणि गंभीर स्वरूपाचे नवीन प्रश्न निर्माणही केले.
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉन टूबी आणि लिडा कॉस्मिडेज म्हणतात, “आपल्या आधुनिक कवटीत अश्मयुगीन मेंदू राहतो.” आपण जर आपल्या उत्क्रांतीकडे नजर टाकली तर तीस लाख वर्षे आपण शिकारी आणि रानोमाळ भटकून उपजीविका करीत होतो. त्यानंतर दहा हजार वर्षे आपण शेती केली. याच्या तुलनेत औद्योगिकीकरणाची फक्त दोनशे ते अडीचशे वर्षे आणि त्यातही संगणक तर केवळ साठीचाच! उत्क्रांतीच्या काळात आपल्या मेंदू आणि शरीराला खूपच संथ बदलाची सवय राहिलेली आहे. नैसर्गिक निवड प्रक्रियेने हजारो वर्षे घेतली माकडापासून मानवापर्यंत पोहोचायला.

यंत्रयुगाने आणि आताच्या संगणक युगाने घेतलेल्या वेगाला जुळवून घेऊन योग्य ते अनुकूलन कसे करायचे हे आपल्या मेंदूला माहीत नाही. टूबी आणि कॉस्मिडेजच्यामते आपल्या जुन्या मेंदूला वीज विरहित, शुद्धीकृत साखर विरहित आणि शाळा विरहित वातावरणात जगण्याची सवय आहे. हे खरेच आहे. असे पहा, आपण पाहिलेला चेहरा पुन्हा पाहिल्यास हा ओळखीचा आहे असे आपल्याला कळते पण शिकलेले वाचलेले शब्द आठवताना मात्र अडचण जाणवते.
मानवाचा मेंदू हा शरीराच्या प्रमाणात इतर प्राण्यांच्या तुलनेने मोठा आहे. हृद्याची धडधड, श्वासोच्छवास, नियंत्रित हालचाल, प्रतिक्षिप्त क्रिया, झोप आणि भुकेची साखळी या गोष्टी प्राणी आणि मानव दोघांमध्ये दिसतात. या सर्व क्रिया उत्क्रांतीच्या शिडीवर खालच्या पायरीवर असणाऱ्या जुन्या मेंदूच्या आहेत. मात्र केवळ सस्तन प्राण्यांच्या मेंदूत निओकॉर्टेक्स हा भाग आहे व त्यातही मानवी मेंदूमध्ये तो सर्वाधिक उत्क्रांत झालेला आहे. यामुळे मानवाला एकाग्रता, आकलन, कार्यकारण भाव, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि स्मरणशक्ती यांसारख्या जटिल आणि प्रगत क्रिया (Higher order functions) शक्य होतात. ढोबळपणे आपण या गोष्टी एकत्र करून समज आणि शहाणपणात धरतो. दुर्दैवाने आपले शिक्षण हे कायमच फक्त
स्मरणशक्तीस चालना देणारे आणि मेंदूच्या इतर सर्व प्रगत क्रियांना स्पर्श न करणारे असे राहिले आहे.

आपल्या चालू शिक्षण व्यवस्थेत तंत्राबरोबर शहाणपण देण्याची तजवीज नाही. आपल्या शिक्षणाचे ते प्रयोजनच नाही. आताच्या शिक्षणात मेंदूच्या प्रगत क्रियांना चालना देणाऱ्या कार्यक्रमांचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे. या क्रियांची उत्तुंग कामगिरी हीच वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे मेंदूचे प्रशिक्षण असेल.

विध्वंसक गेम्स ऐवजी सृजनात्मक विचार करणे, स्पर्धाविरहित विचार करणे यांची मुलांकडून अपेक्षा करणे अगदीच अशक्य नाही. दर्जा उंचावण्यासाठी आणि यशासाठी स्पर्धा आवश्यकच हे चुकीचे गृहीतक आपण मान्य करून बसलो आहोत. ते बदलायला हवे.

तंत्रज्ञानाचा सुज्ञ आणि काळजीपूर्वक वापर करायला शिकवणारे शिक्षण ही आजची गरज आहे. भयंकर आवाजात विविध उत्सवांत नाचणारे युवक, संगणकावर भविष्य पहाणारे लोक, वेगवान, अत्याधुनिक वाहने घेऊन नियम न पाळता चालवणारे वाहनचालक, आणि महागडा स्मार्ट फोन घेऊन रेल्वेरुळावर शौचास बसणाऱ्या आपल्या लोकांकडे पाहून ही गरज आणखीच तीव्रतेने जाणवते.