संवादकीय – मे २०२४
शिक्षणशास्त्राचे अनेक पैलू आहेत. त्यातले काही विज्ञानाच्या कक्षेत मोडतात, काही मानसशास्त्राच्या, काही तत्त्वज्ञानाच्या, तर इतर काही समाजशास्त्राच्या वगैरे… काय शिकवले पाहिजे, किंवा काय शिकण्यायोग्य आहे हे समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असून ते कालानुरूप बदलत असते. शिक्षण हे अंतिमतः जीवनासाठी किंवा जगण्यासाठी व्यक्तीला तयार करण्यासाठी असेल, तर सभोवतालच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक बदलांचा परिणाम लोकांच्या जीवनावर आणि पर्यायाने शिक्षणावर होणे अपरिहार्य आहे. किंबहुना या बदलांशी जोडून घेऊ शकले तरच ते शिक्षण अर्थपूर्ण ठरते. हे खरे मानले, तर आज आपल्या आजूबाजूच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक बदलांकडे बघता शिक्षणाचे, विशेषतः शालेय शिक्षणाचे, उद्दिष्ट काय असावे असे आपल्याला वाटते?
थोडे अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून पाहू. आज तंत्रज्ञान, इंटरनेट घराघरात, अगदी आपल्या हाताशी येऊन पोहोचले आहे. त्यामुळे माहितीचा प्रचंड साठा सर्वांसाठीच खुला झाला आहे. मग भारंभार माहितीचा साठा तोंडपाठ असणार्या व्यक्तीचे वेगळेपण किंवा महत्त्व काय राहील? जुन्या काळात अशी साधने नसताना जास्तीत जास्त माहीत असणार्या व्यक्तीला किंमत होती. पण शिक्षणासंदर्भात त्याच चष्म्यातून आज विचार करून चालेल का?
थोडीशी तीच गत भारंभार संकल्पना पाठ्यपुस्तकातून आणि इतर माध्यमातून समजावून सांगण्याबद्दलदेखील आहे. आपण पाहतोच, की बरेचदा शिक्षक आणि पालक पाठयपुस्तक पूर्ण करण्याच्या विचाराने झपाटलेले दिसतात. एखाद्या धड्यातील एखादा परिच्छेद शिकवायचा नाही हे शिक्षकांना तर अमान्य असतेच; पण पालकदेखील असे काही निदर्शनास आल्यास त्याबद्दल शिक्षकांना जाब विचारतात. एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर पुरतील अशा सर्व संकल्पना शाळा / कॉलेजमध्ये शिकवणे खरेच शक्य आहे का? नवनवीन संशोधनांमुळे सर्व विषयांच्या, क्षेत्रांच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. त्याला प्रतिक्रिया म्हणून जर आपण वरच्या वर्गांच्या संकल्पना अजून अजून लहानवयातच मुलांना शिकवायचा चंग बांधला, तर ते विद्यार्थ्यांसाठी तर भांबावून टाकणारे आहेच पण मर्यादित वेळेत ते बसवता बसवता कोणतीच संकल्पना नीट न समजण्याचा धोकादेखील त्यात आहे. वेगाने बदलणार्या जगात आपण मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी काय आणि किती शिकवू शकणार आहोत? अशा वेळी काय करता येईल?
तिसरा भाग आहे तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या येऊन ठेपलेल्या स्फोटाचा. भाषांतराचे, संकलनाचे, चित्र काढण्याचे, व्हॉइस ओव्हरचे… एवढेच काय तर प्रोग्रामिंगचे कामही आता चॅट जीपीटीसारखे तंत्रज्ञान करू लागलेले आहे. अगदी सर्जनशील म्हणवल्या जाणार्या क्षेत्रांमध्येदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उपजीविकेची साधने आत्ताच कमी होणार असतील, तर मुलांना नक्की काय शिकवले तर ती येणार्या काळात स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील?
मुलांनी त्यांच्या पुढील आयुष्यात सामाजिक, राजकीयदृष्ट्या सजग नागरिक व्हावे असे वाटत असले, तरी सध्या आपल्यावर येऊन आदळणार्या खर्या-खोट्या माहितीतून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या चित्रांतून, व्हिडिओंमधून वाट काढणे त्यांना शक्य व्हावे यासाठी काय करता येईल, अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत जाणार्या जगामध्ये स्वतःच्या मूल्यांचा, भावनांचा, वर्तनाचा विचार त्यांना करता येईल यासाठी काय करावे, असे अनेक प्रश्न पालक, शिक्षक म्हणून आपल्यासमोर उभे राहतात. अशा वेळी शिक्षणव्यवस्थेचा भर संकल्पना आणि माहिती यांवरून बदलून विचारांची आणि मूल्यांची बैठक निर्माण करण्याकडे वळवणे गरजेचे वाटते. ते कसे घडवून आणता येईल याचा शोध घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या अंकातून केलेला आहे.