चित्राभोवतीचे प्रश्न

श्रीनिवास बाळकृष्ण
प्रश्न : माझा नववीतला मुलगा फक्त चित्रकला शिकण्याचा हट्ट करतो आहे. त्यात त्याला गती आहेच; मात्र तो इतर विषय शिकण्याचे टाळतो. पुढे चित्रकार व्हायचे त्याच्या डोक्यात आहे. पालक म्हणून मी संभ्रमात आहे.
– किशोर काठोले
उत्तर : नमस्कार पालक!
या पिढीच्या फार कमी मुलांना इतके स्पष्ट ध्येय दिसत असते. या वयात त्याने चित्रकार होण्याचे स्वप्न बाळगले आहे, याचा एक चित्रकार म्हणून मला आनंद होतोय. तो रोज चित्र-अभ्यास करत असेल अशी मला खात्री आहे. पण चित्रकार बनण्याच्या पारंपरिक प्रवासात कलामहाविद्यालय हा महत्त्वाचा घटक आहे. आणि तिथे प्रवेशासाठी बारावीत चांगले गुण असणे आवश्यक आहे. बारावीपर्यंत पूर्ण चित्रकला विषय असणारे कॉलेज, बोर्ड नाही (नसावा). त्यामुळे इतर विषयात चांगले गुण मिळवणे आवश्यक ठरते. त्याचा पाया आता नववी / दहावीत पक्का करावा लागणार. त्यामुळे शाळेत शिकवले जाणारे सर्व विषय अभ्यासावे लागणारच.
अर्थात, ही झाली पारंपरिक पद्धत. पुढच्या पिढीला आणखी किती काळ कला महाविद्यालयाची गरज लागेल? इतके मुळापासून शिक्षण घेणे त्यांना गरजेचे वाटेल का? तितका संयम त्यांच्याकडे असेल का? कलेची बदलती माध्यमे कला महाविद्यालये हाताळतील का? जे हाताळतील त्यांच्यासाठी बारावीची अट महत्त्वाची असेल का? एआय ने आपले आयुष्य इतके व्यापलेले असले, की नव्या रचना, नव्या कल्पना करण्यासाठी पायाभूत शिक्षणाचीही गरज उरणार नाही. बहुसंख्यांना हाताने काढलेल्या चित्रांची गरज राहिलेली नसेल. आणि हे चित्र फार लांब नाही, अगदी पुढच्या चार-पाच वर्षांत रुळलेले दिसेल. त्यामुळे पालक म्हणून असलेला संभ्रम कायम राहील. पण एक खरे, की दहावी-बारावीत चांगले गुण मिळवलेला एक आणि केवळ चित्रकला शिकलेला एक असे दोन उमेदवार माझ्यासमोर असतील, तर मी दहावी-बारावी चांगल्या गुणांनी उत्तेर्ण झालेला चित्रकार निवडेन.
याचे कारण अगदी स्पष्ट आहे. चित्रकाराचे व्यक्त होणे सर्वात महत्त्वाचे. आणि अभिव्यक्तीसाठी विषयाची विविध बाजूंनी समज असावी लागते. त्याबद्दलची माहिती, ज्ञान ह्या गोष्टींची गरज असते. त्यासाठी विविध ज्ञानशाखा अभ्यासाव्या लागतात. चित्रकला ही दृश्यकला आहे. दृश्य म्हणजे केवळ रेषा, रंग, आकार, पोत यांची सरमिसळ नाही. यात आकारांचे गणित आहे. रंगांचे विज्ञान आहे. चित्रविषयात इतिहास, भूगोल डोकावतो. चित्राबद्दल सांगताना, वाचताना भाषाही महत्त्वाची. समृद्ध भाषेत चित्र मांडता यावे लागते. तसा पायरीपायरीने तार्किक विचार ठेवावा लागतो, चित्रामागचा प्रवास बोलावा, लिहावा लागतो. चित्रातल्या पात्रांची मनःस्थिती, चित्र काढतानाची मनःस्थिती यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास लागतो. वेगवेगळ्या इझम मागचा आंतरराष्ट्रीय इतिहास व संकल्पना समजणे आवश्यक असते. त्यामुळे दृश्यकलेत महत्त्वाचा नाही असा कोणताही विषय नाही. चित्रकार होऊ इच्छिणाऱ्याला सर्वच विषय अभ्यासणे क्रमप्राप्त आहे. ते सोडून केवळ चित्रकला एके चित्रकला ही कल्पना फारच उथळ असू शकते.
मुलाचे वय पाहता त्याला इतर विषय शिकणे कमी महत्त्वाचे वाटू शकते. याचे कारण शाळेत शिक्षकांनी इतर विषयांचे चित्रकलेच्या दृष्टीने असलेले महत्त्व कधी सांगितलेलेच नसते. त्यामुळे रंजक नसलेल्या विषयांचे परीक्षेव्यतिरिक्त महत्त्व वाटत नाही.
पालक म्हणून ते तुम्हाला सांगावे लागेल.
त्याच बरोबर त्याला अनेक चित्र-प्रदर्शनाला न्यायला हवे. तिथल्या चित्रकारांशी बोलायला हवे. त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या शैक्षणिक विषयांचे मूळ त्याला वेचून दाखवावे लागेल. त्यांनी मांडलेल्या संकल्पना समजून घेण्यासाठी आणखी काही पुस्तके वाचावी लागतील. हे सर्व सहजपणे होण्यासाठी शालेय अभ्यास महत्त्वाचा.
तसेच कलाकाराने आयुष्यात नेहमीच एक ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा. समजा चित्रकार होण्याचे स्वप्न त्याला अचानक बाजूला ठेवावे लागले, तर इतर शाखेतील उच्चशिक्षण, व्यवसाय-शिक्षण घेण्यासाठी शालेय अभ्यास चांगला करणे आवश्यक आहे. भारतासारख्या देशात तर नक्कीच.
प्रश्न : चित्रकार नसलेला, प्राथमिक शाळेतला एक शिक्षक त्याच्या वर्गात चित्रकला कशी शिकवू शकतो?
– मयुरी मोरे
उत्तर : महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार प्राथमिक शाळेत चित्रकला, हस्तकला, संगीत आणि खेळ ह्या अतिरिक्त विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक नेमणे बंद झालेले आहे. सामान्य विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनीच ते विषय शिकवायचे आहेत. त्याचे जुजबी प्रशिक्षण त्यांच्या वर्गात होते. परंतु वस्तुस्थिती अतिशय उद्विग्न करणारी आहे, हे आम्हाला अनेक शाळांच्या भेटींदरम्यान जाणवते. (याकरता आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २०१२ पासून विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कलाजत्रा हा उपक्रम मोफत आयोजित करत असतो.)
वेळापत्रकावर असणारे विषय केवळ कागदावरच राहतात. शिक्षकांनाही अनेक सरकारी कामांना जुंपलेले असल्याने ते त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विषय शिकवण्याला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत कलाशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन, जाणीव ठेवून आपण हा प्रश्न विचारलात हे आश्वासक आहे.
वास्तवात शासन असे निर्णय घेते तेव्हा कलाप्रशिक्षण अभ्यासक्रम घेणारी जुनी कला महाविद्यालये, कला विद्यापीठे यांनी सरकारची कडक शब्दात कानउघाडणी केली पाहिजे. अशा बिनडोक नियमाविरोधात जाऊन दबाव आणला पाहिजे. हे त्यांचे कर्तव्यच आहे. परंतु असे होताना दिसत नाही. असो.
हे इतके सगळे सांगण्याचे कारण, आपली कलेची पार्श्वभूमी नसल्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड जाणार आहे. आपले स्वतःचे कलाशिक्षण शालेय वयापासून नीट होऊ शकलेले नसणार. त्यामुळे मुलांना कलेबद्दल काही शिकवणे, कलेच्या तत्त्वांबद्दल भाष्य करणे टाळावे. त्यापेक्षा प्रदर्शन, संग्रहालय, कला महाविद्यालयातली वार्षिक प्रदर्शने अशा ठिकाणी अभ्यास-सहली आयोजित करा. आपल्या ओळखीतून एखाद्या चित्रकाराला शाळेत मुलांशी गप्पा मारायला, प्रात्यक्षिक दाखवायला आमंत्रित करा; तेही त्याचे योग्य मानधन देऊन, म्हणजे तो कलाकार वारंवार येऊ शकतो. कलाशिक्षणाबद्दल बाजारात काही पुस्तके उपलब्ध आहेत. युट्यूबवर टेड-टॉक आहेत, प्रात्यक्षिके आहेत. ती मुलांना दाखवा.

लक्षात घ्या… तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना एकत्रच शिकायचे आहे. कुणीही कुणाला काहीही शिकवायचे नाहीय. मुलांच्या कल्पना-वाढीसाठी पारंपरिक कलाशिक्षणाचे बोट सोडा. हेच संगीत, हस्तकला, खेळ या विषयांसाठीही करून पाहा.
तुमचा चित्रकार मित्र,
श्री बा.
श्रीनिवास बाळकृष्ण
shriba29@gmail.com
(चित्रकलेसंदर्भातले प्रश्न वाचक या इमेलवर विचारू शकतात.)

चित्रकार, इलस्ट्रेटर आणि कला-मार्गदर्शक. मुलांसाठी सातत्याने चित्रकलाविषयक लिखाण करतात. ‘चित्रपतंग’ समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांना कलासाक्षर करण्याचा प्रयत्न करतात.