पेरेंटिंग फ्रॉम द इनसाईड आउट

हेमा होनवाड
मेरी हार्टझेल प्राथमिक शिक्षण आणि बालमानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत. मुले आणि पालक-शिक्षकांसोबत त्या दीर्घ काळ काम करत आहेत. त्यांच्या बालवाडीत मुलांचे भावविश्व, त्यांच्याबद्दल आदर आणि सर्जनशीलता याला महत्त्व दिले जाते. स्वतःच्या बालपणात डोकावून बघू शकणारे पालक त्यांच्या मुलांच्या निकोप वाढीसाठी योग्य पर्याय निवडू शकतात असे त्या अनुभवातून मांडतात. डॉ. डॅनियल सीगल हे बालमानसोपचारतज्ज्ञ असून मन, मेंदू आणि नातेसंबंध यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. मेंदूविज्ञान आणि बालमानसशास्त्र या विषयांवरची त्यांची पुस्तके पालकांसाठी उपयुक्त आहेत. या दोघांनी पालकांसाठी कार्यशाळा घेतल्या. त्या अनुभवांतून ‘पेरेंटिंग फ्रॉम द इनसाईड आउट’ हे पुस्तक आकाराला आले.
आपल्याला बालपणी आलेल्या अनुभवांचा अर्थ आपण कशा प्रकारे लावतो, त्याचा खोलवर परिणाम पुढे मुलांना वाढवताना होत असतो. ‘पेरेंटिंग फ्रॉम द इनसाईड आउट’ हे पुस्तक पालक म्हणून स्वत:कडे डोळसपणे का आणि कसं पाहावं ते उलगडून दाखवतं. त्यातून आपल्या विचारांना एक नवीच दिशा मिळते.
आपल्याला आपली मुलं छान बहरायला हवी असतील, तर आधी स्वत:बद्दल खोलवर विचार करून स्वत:ची खरीखुरी, निखळ ओळख करून घेण्याची निकड लेखकांनी त्यांच्या संशोधनातून मांडली आहे. यामुळे केवळ मुलंच बहरतात असं नाही, तर आपणही पालकत्वाचा सर्वार्थानं आनंद घेऊ शकतो.
पुस्तकात एकूण नऊ प्रकरणं आहेत. त्यापैकी पहिल्या तीन प्रकरणांविषयी मी इथे सविस्तर लिहिणार आहे. त्यातून पुरेशी उत्सुकता ताणली जाऊन तुम्ही पूर्ण पुस्तक वाचायला घ्याल हे नक्की!
प्रकरण पहिलं
आपल्या स्मृती कशा तयार होतात?
आपले पूर्वानुभव आपल्या जीवनाला कसा आकार देतात?
आपल्या आयुष्यातल्या पूर्वीच्या दु:खदायक अनुभवांमुळे मनात गाठी तयार होतात. त्या वेळीच ओळखून सोडवल्या नाहीत, तर मुलांबरोबरच्या सहप्रवासात त्या स्पीड-ब्रेकरसारख्या अडथळे आणून त्यांच्या मनातही गाठी निर्माण करू शकतात. त्यामुळे मग आपण सगळेच आनंदाला पारखे होऊ शकतो.
मुलांच्या एखाद्या वागण्यामुळे भावना उद्दीपित होऊन आपण विवेकाला रजा देतो आणि तीव्र प्रतिक्रिया देतो. अशा वेळी क्षणभर थांबून, ही धोक्याची घंटा आहे आणि आपल्याला स्वत:चा शोध घेण्याची गरज आहे, या वास्तवाकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता असते.
‘स्मृती’ या विषयावर सातत्यानं चालू असलेल्या संशोधनातून आपल्यासमोर नवनवीन बोध, अंतरंगाचं यथार्थ ज्ञान आणि सूक्ष्म दृष्टी उलगडते आहे. बालपणीच्या दु:खद, असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या अनुभवांमुळे मेंदूमध्ये काही प्रक्रिया घडून आपल्या मनामध्ये गाठी तयार झालेल्या असतात. त्याकडे आपण सपशेल दुर्लक्ष तरी करतो किंवा त्याबद्दल विसरून जातो. आपला प्रवास मागल्या पानावरून पुढे तसाच चालू राहतो. पुढे स्वत: पालक झाल्यावर मुलांना वाढवताना एखाद्या प्रसंगी आपण अत्यंत तीव्र प्रतिक्रिया देतो. आपली प्रतिक्रिया इतकी तीव्र कशी आणि का झाली तेच आपल्याला समजत नाही. ही धोक्याची घंटा ओळखून आपण स्वत:चा शोध घेण्याची संधी साधायची असते. ही वाट एका निरोगी आनंददायी नात्याकडे नेणारी असते.
वाचकाला सहज कळावं म्हणून पुस्तकात काही उदाहरणं दिलेली आहेत. लहान मुलांच्या डॉक्टरांचं एक उदाहरण आहे. ही स्त्री-डॉक्टर बालरुग्ण विभागात इंटर्नशिप करायची. छोट्या बाळांच्या रक्ताचा नमुना घेण्यासाठी तिला बाळांना नसेत अनेकदा सुई टोचावी लागायची. बाळं कळवळून रडायची. त्यांच्या दु:खाला आपण कारणीभूत आहोत ही भावना तिला खूप त्रास द्यायची. अपराधीपणा वाटायचा. पुढल्या काळात तिला पदवी मिळाली. त्या त्रासाचं पूर्ण विस्मरण झालं. मात्र वेळच्या वेळी समजून उमजून त्या भावनेचा निचरा न केल्यामुळे पुढल्या काळात तिचं स्वत:चं बाळ रडू लागलं, की ती अतिशय घाबरून जायची. तिची अस्वस्थता इतकी वाढायची, की तिथून पळून जावं असं तिला वाटू लागायचं. यावर वारंवार सखोल चिंतन केल्यावर एक दिवस तिला हॉस्पिटलच्या आयसीयूमधल्या बालरुग्ण-विभागातला जुना अनुभव आठवला. त्यामुळे मनात बसलेली गाठ तिनं अलगद सोडवली. आणि मग, बाळ कितीही रडू लागलं तरी पळून जाण्याची गरज नाही, आपण कुशीत घेऊन बाळाला शांतवू शकतो हे तिला उमगलं.
व्यक्त आणि अव्यक्त स्मृती आणि त्यांचा आपल्या भावनांवर, प्रतिक्रियांवर कसा परिणाम होतो, तेही या प्रकरणात विशद केलेलं आहे. डोळसपणे स्वत:चा शोध घेण्यासाठी उपयोगी ठरतील अशा काही कृतीही प्रकरणाच्या शेवटी पालकांसाठी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर संशोधनानं सिद्ध केलेले शास्त्रशुद्ध सिद्धांत, वाचकाला कार्यकारण भाव स्पष्ट व्हावा अशा रीतीनं सविस्तर मांडलेले आहेत.
प्रकरण दुसरं
वास्तवाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
आपल्या आयुष्याची ‘कथा’ आपण कशी रचतो?
आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी आपण कथांची रचना करतो. माणसाला गोष्टी सांगायला आणि ऐकायला आवडतात. आपण वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही स्तरांवर गोष्टी रचतो आणि सांगतो. आलेले अनुभव समजून घेता यावेत, त्यांचा अर्थ लावता यावा या हेतूनं माणूस गोष्टी रचतो आणि इतरांशी जोडलं जावं या इच्छेखातर त्या तो इतरांना सांगतो. अशा रीतीनं तो ‘आपला’ असा एक समूह निर्माण करतो. हा माणसाचा सह’ज’ स्वभाव आहे. आपल्या प्रत्येकाच्याच काहीना काही गोष्टी रचलेल्या असतात. त्यांच्यामुळे आपण स्वत:ला अधिक खोलातून जाणून घेऊ शकतो. इतरांशी आपण कसे बांधले गेलेलो आहोत हेही आपल्याला उमगतं आणि नात्यांतली गुंतागुंतही लक्षात येते. मोठ्यांसारखीच मुलंही आपल्या अनुभवांचा अर्थ लावायची धडपड करत असतात. आपले स्वत:चे अनुभव आणि त्यांचा अर्थ आपण कसा लावला, ह्याची गोष्ट मुलांना सांगितली, तर तीही त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू लागतील. त्यातून मोठेपणी ती संवेदनशील, चिंतनशील व्यक्ती बनतील.
केवळ फिनिश भाषा जाणणाऱ्या तीन वर्षांच्या आनिकाचं उदाहरण लेखकांनी दिलेलं आहे. आनिका नुकतीच मेरीबाईंच्या बालवाडीमध्ये जायला लागलेली होती. मनमोकळी, सगळ्यांमध्ये सहज मिसळणारी असल्यानं तिला खेळताना, वेगवेगळ्या कृती करताना भाषेची अडचण फारशी जाणवली नाही. पण एक दिवस खेळताना ती पडली. गुडघा फुटून रक्त येऊ लागलं. बाई तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होत्या पण आनिकाचं रडणं काही थांबेना. सहकारी व्यक्तीला आनिकाच्या आईला फोन करायला सांगून बाई आनिकाशी इंग्लिशमध्ये बोलू लागल्या; पण आनिकाला तर फक्त फिनिश समजत होतं. साधारणपणे ‘नेमकं काय झालं? तू कशी पडलीस? कुठे लागलंय? आपण आईला फोन करूया हं!’ अशा घटनाक्रमांची गोष्ट तयार झाली, की हळूहळू मुलं शांत होतात असा बाईंचा अनुभव होता. मग ही भाषिक दरी ओलांडण्यासाठी त्यांनी आजूबाजूला असलेल्या बाहुल्या, खेळातला टेलीफोन घेऊन त्यांच्या मदतीनं आनिकाशी बोलायला सुरुवात केली. एक छोटी बाहुली म्हणजे आनिका खेळत होती. ती खेळता खेळता पडली. मग बाई रडण्याचं नाटक करू लागल्या. आता हुंदके देणं थांबवून आनिका बाईंचं निरीक्षण करू लागली. मग शिक्षिका-बाहुली आनिका-बाहुलीशी हळू आवाजात बोलू लागली; आनिका पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. मग बाईंनी खेळातला फोन घेऊन आईला फोन लावला. आता रडायचं थांबून आनिका काय चाललंय ते कुतूहलानं पाहू लागली.
गुडघ्याला लागल्याची आणि आईला फोन करण्याची गोष्ट बाईंनी बाहुल्या वापरून अभिनयाच्या माध्यमातून आनिकाला पुनःपुन्हा सांगितली. ‘मम्मा’ आणि टेलिफोन हे दोन शब्द तिला नीट समजले. तीच गोष्ट परत परत पाहिल्यामुळे नेमकं काय झालं आणि आता काय होणार आहे हे कळलं. त्यामुळे तिला आलेला ताण कमी झाला. आता थोड्याच वेळात आई येणार हे समजल्यामुळे छान सुरक्षित वाटू लागलं आणि ती पुन्हा खेळायला लागली. आई न्यायला आल्यावर बाहुल्या आणि खेळातला टेलीफोन घेऊन ती बाईंकडे गेली. आईच्या समोर ती गोष्ट तिला पुन्हा ऐकायची होती आणि आईलाही दाखवायची होती.
मोठी माणसं त्यांच्या अनुभवाची कथा नेहमी शब्दांतून इतरांना सांगतात. मुलांना मात्र चित्रं, बाहुल्या, पपेट्सच्या माध्यमातून रचलेली गोष्ट पटकन समजते. त्यातून त्यांच्या मनावरचा ताण दूर होतो.
याच प्रकरणाच्या पुढच्या भागात मेंदूची डावी आणि उजवी बाजू कशा प्रकारे काम करतात, एकमेकांशी सहकार्य कसं करतात हे आकृती देऊन सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. हा विचार मनात चांगला रुजावा यासाठी पालकांना सहज करून पाहण्यासारख्या कृतीही या आणि इतर प्रकरणांमध्ये दिलेल्या आहेत.
प्रकरण तिसरं
आपल्या भावनांकडे सजगपणे पाहता यावं ह्यासाठी काय करायला हवं ते तिसऱ्या प्रकरणात सविस्तरपणे दिलेलं आहे. बागेतले रंगीबेरंगी किडे गोळा करून तुमचं पिल्लू उत्साहानं तुम्हाला दाखवायला येतं. तुम्ही मात्र घरभर सैरावैरा फिरणाऱ्या किड्यांची कल्पना करून घाबरून किंचाळता, “हे काय आणलंस घरात? जा, आधी बाहेर फेकून ये ते किडे!”
“पण आई ग, एकदा बघ ना ग कित्ती चकचकीत हिरवे पंख आहेत त्यांचे!!”
तुम्ही त्याच्या हातातली बाटली घेता आणि त्याचं बखोट धरून फरफटत बाहेर नेऊन बाटलीतले किडे त्याला बाहेर सोडायला लावता. वर आणि ‘किड्यांची जागा इथे बाहेर असते, घरात नाही!’ अशी कडक शब्दांत ताकीद देता. यामुळे त्या मुलाच्या सगळया आनंदावर, उत्साहावर विरजण पडतं. किडे पकडून घरात आणले की आई रागावते. त्यातून आपण ‘चांगला’ मुलगा नाही अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. याऐवजी, ‘आहा! बघू बघू! किती मस्त वेगवेगळे रंग आहेत या किडयांचे! कुठे सापडले रे तुला? मला दाखव… चल, आता आपण त्यांना पुन्हा बागेतच सोडू या. त्यांना तिथेच राहायला आवडतं कारण ते त्यांचं घर आहे ना’, अशा तऱ्हेनं पालकांचे मुलांशी सूर जुळले, तर ‘आपल्याही भावना महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या पालकांना त्या समजतात’ हा संदेश मुलांपर्यंत पोचतो. म्हणजे मी ‘चांगला’ असणार. पालकांनी मुलांच्या भावना ओळखल्या आणि शांतपणे ऐकून घेतल्या, तर मुलांशी त्यांचे सूर जुळून येतात.
भावना जाणवून देणाऱ्या आणि अनुभवांचा अर्थ लावणाऱ्या मेंदूतल्या जोडण्या (सर्किटस्) एकच असतात. घेतलेला अनुभव चांगला की वाईट हे त्या अनुभवावर आणि त्यामुळे जाणवलेल्या भावना पालक कशा तऱ्हेनं ऐकतात, मुलांशी त्यांचे सूर जुळतात की नाही यावर अवलंबून असतं. ही भावनांची, स्वीकाराची आणि सहभागाची प्रक्रिया घडत असताना मेंदूचं काम कुठे आणि कसं चालू असतं याची सविस्तर माहिती पुस्तकात अत्यंत सोप्या भाषेत दिलेली आहे.
हे पुस्तक वाचताना एक लक्षात घेतलं पाहिजे, की पहिल्या पानापासून शेवटपर्यंत झपाट्यानं वाचून ‘झालं वाचून!’ असं म्हणून कपाटात ठेवून देण्यासाठी हे पुस्तक नाही आहे. त्याची आपल्याला वेळोवेळी पारायणं करावी लागतील. पालकांना ‘स्व’ची ओळख व्हावी म्हणून प्रत्येक प्रकरणामध्ये काम दिलेलं आहे. स्वतःच्या आत डोकावणं सोपं जावं म्हणून काही उपक्रम, प्रश्नावल्या दिलेल्या आहेत. त्या सोडवत सोडवत, आपला पालकत्वाचा प्रवास समृद्ध व्हावा म्हणून, हे पुस्तक पुरेसा वेळ घेऊनच वाचलं पाहिजे.
आज माझ्या मुलांनी पन्नाशी पार केलेली आहे; तरी आजही स्वत:बद्दल, पालक म्हणून, यातल्या कित्येक गोष्टी मला नव्यानं उमगल्या आहेत असं वाटतंय. त्याबद्दल एकमेकांशी बोलताना आम्हाला खूप मजा येणार आहे हे नक्की!
हेमा होनवाड
hemahonwad@gmail.com

निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक. त्यांना प्रवास, ट्रेकिंग आणि कलांची आवड आहे.