प्रीती पुष्पा-प्रकाश

मुलं खिदळतच दारात पोहोचली. अनायासे ती घरात होती, तर तीच दार उघडायला गेली. मुलांकडे किल्ली होती; आई घरात असणं त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यामुळे त्यांची जरा धांदलच उडाली. आश्चर्य झालं. लपवाछपवी झाली. आता या प्रसंगातून कसं तरून जायचं यासाठी ‘आखोंहीआखोंमें’ काही संवादही झाला. तिच्या सरळ पृच्छेवर, “तू रागवशील…” असं आल्यावर तिनं थेटच सांगून टाकलं, “जे काही आहे ते न लपवता थेट सांगून टाकलं तर मी नक्की रागवणार नाही, पण नाही सांगितलंत आणि लपवाछपवी करत राहिलात तर मात्र नक्की रागवेन.” याचा योग्य तो परिणाम झाला. छोट्या छोट्या गोष्टींवर छोटंमोठं रागवणारी ती; पण हा प्रसंग कसा शांतपणे हाताळत होती. तिच्या शांतपणाचं तिलाच कौतुक वाटलं. खरं तर ह्यातलं काहीच ती ठरवून करत नव्हती. “पण म्हणजे मी अशी आहे तर!” मनातल्या मनात तिनं हळूच एक उडी मारली.

मुलांनीही सगळं सांगून टाकायचं ठरवलं आणि पुढची गोष्ट बाहेर आली :

“सोसायटीत आम्ही ज्या मुलांबरोबर खेळतो त्यांतल्या काहींची छोटेमोठे फटाके लपवण्याची एक ‘सिक्रेट’ जागा आम्हाला कळली आहे. सगळी मुलं गेल्यावर आम्ही दोघांनी त्यातले काही फटाके घ्यायचं ठरवलं. लपूनछपून, सीसीटीव्ही पासूनही स्वतःला लपवत ते आम्ही घेतले. आता आम्हाला एक रद्दी पेपर दे; आम्ही दोघं आता ते फटाके वाटून घेणार आहोत.”

तिच्या हातातून रद्दी पेपर घेऊन दोघं खोलीत पसार झाली. फटाक्यांची ‘न्याय्य’ विभागणी झाल्यावर आणि स्वतःच्या रोमहर्षक कृत्याचा पुरेपूर आनंद घेतल्यावर ते बाहेर आले. मित्र त्याच्या घरी निघाला होता. आता तिचं मूल तिच्याशी मोकळेपणानं बोलू शकणार होतं; आणि तीही त्याच्याशी! मित्र अगदी जवळचा असला, तरी त्यांच्या दोघांचा म्हणून एक खास संवाद असायचाच असायचा; आणि अजून तरी तो टिकून होता. अजून त्याचं ‘टीन एज’ सुरू व्हायला तसा अवकाश होता. ‘तेव्हाही तो टिकेल अशी आत्ता आशा करायला काय हरकत आहे!’ असा विचार तिच्या मनात डोकावून गेला.

आई-मुलाच्या गप्पा सुरू झाल्या. आई चिडलेली नाहीये आणि आपल्याला जे काही होतंय, वाटतंय ते आपण आईला सांगू शकणार आहोत हा विश्वास त्याला तिच्या असण्यातून मिळाला असावा. ‘हे कृत्य करताना आपण सीसीटीव्हीत दिसलो तर?’ याचं त्याला बऱ्यापैकी दडपण आलेलं होतं. ते थेट प्रक्षेपण त्याच्या एका मैत्रिणीच्याच घरात होत होतं अशीही खरीखोटी माहिती त्याच्याकडे होती आणि त्यामुळेच त्याला भीती वाटत होती. तुम्ही छोटी मुलं आहात, ही गंमत, मस्ती, मज्जा आहे, चोरी नाही… असं काहीबाही सांगून तिनं घटनेचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. कारण एरवी ‘गुणी बाळा’च्या लेबलचं ओझं वागवणारं तिचं मूल कधी नव्हे ते खोडकरपणा करत होतं. इतपत बालसुलभ गमतीजमती हव्यातच की! गप्पांच्या ओघात तो स्वतःहूनच म्हणाला, “आई, आपण दिवाळीला आणलेले फटाकेही माझे पुरते उडवून झालेले नाहीयेत. त्यात आणखी ही भर. आत्ता आणलेले फटाके थोडेच आहेत; फार तर चाळीसएक रुपयांचे असतील. पण आमच्या मित्रांना हे कळलं तर ते आमच्याशी बोलणार नाहीत. आमच्याशी खेळणार नाहीत.” हे म्हणता म्हणता त्याचे डोळे भरून आले. तो हुंदके देऊन रडू लागला. आपण जे काही केलं आहे ते चूक आहे वगैरे भावनेपेक्षाही जे केलं आहे त्यातून मिळणाऱ्या तात्पुरत्या आनंदापेक्षा हिरावला जाणारा आनंद अधिक दीर्घ काळाचा असेल हे नफ्यातोट्याचं गणित त्याचं त्यालाच लक्षात आलं होतं. आपण जे काही केलं आहे ते आपल्या मित्रमैत्रिणींना कुठल्याही प्रकारे कळू नये असं त्याला वाटत होतं. प्रामाणिकपणे त्यांच्यासमोर चूक कबूल केली, तरी व्हायचा तो वाईट परिणाम होईलच याची त्याला जवळपास खात्रीच वाटत होती. घेतलेले फटाके परत ठेवून देणं असा एक पर्याय होता. पर्याय अवघड होता कारण सीसीटीव्हीत तो दिसला, तर मित्रमैत्रिणींना कळण्याची शक्यता यातही होतीच. तरीही हा पर्याय घ्यायचं त्यानं ठरवलं, तर त्याला मदत करण्याचं तिनं कबूल केलं. आणि हे सगळं लपूनछपून न करता वर मानेनं करणं अधिक चांगलं हेही त्याला मान्य झालं. मित्रमैत्रिणींना कळलंच तर त्यांच्याशी काय आणि कसं बोलायचं हे वेळ आल्यावर ठरवायचं, पण निदान आत्ता फटाके परत तरी ठेवायचे इथवर ते चर्चेअंती पोहोचले. 

ज्या मित्रासोबत मिळून ही गंमत केली होती तो फटाके त्यांच्याकडेच विसरून गेला होता. त्याला फोन करून सध्याची मानसिक स्थिती आणि त्यातून काढलेला पर्याय त्यांनी कळवला. मित्रही त्याला तयार झाला. त्यानं प्रत्यक्ष येणं अपेक्षित नव्हतंच; पण तत्त्वतः त्याची मान्यता असणं त्यांना गरजेचं वाटत होतं. ती मिळाली. फटाके घेऊन ते बाहेर पडले.  ‘न घाबरता शांतपणे चालत जाऊया’, असं ती त्याला सुचवत होती आणि स्वतःही ते करत होती. तोही ते जमेल तसं करण्याचा प्रयत्न करत होता. फटाके जिथून घेतले होते तिथे त्यांनी ते ठेवले. शांतपणे घरी गेले. मगाशी असलेली अस्वस्थता आणि आताची शांती ही ढळढळीतपणे समोर दिसत होती.

बऱ्याचदा लपवाछपवीची आपली एक स्वतःची झिंग असते. आपण ‘काय’ लपवतो आहोत ह्यापेक्षा आपण ‘काहीतरी’ लपवतो आहोत याचीच शरीराला आणि मनाला गंमत येत असते. शरीराच्या आत चालू असलेल्या या रासायनिक गमतीसोबतच अस्वस्थताही डोकावते. काही जणांना ही अस्वस्थता पेलवते. त्याचीच मजा येते. काही जणांसाठी मनाची शांती खूप महत्त्वाची असते. रात्रीची शांत, तगमग नसलेली झोप जास्त महत्त्वाची!

त्याला आलेली मजा तिने आईपण बाजूला ठेवून बघितली. ती मजाही त्याला घेऊ दिली. तिचा स्वभाव बघता ‘तू केलंस ती महान चूक आहे. चोरी आहे. शिक्षेस पात्र आहे’, असा ‘रामशास्त्री प्रभुणे’ पवित्रा एरवी तिनं सहजच घेतला असता. पण इथे तो तसा न घेता, तीही त्याच्यासोबत असू शकली. तिच्यापासून लपवण्याइतकी ही गोष्ट त्यांच्यासाठी मोठी होती. तेव्हा ती वेगळ्या तऱ्हेनंच हाताळायला हवी हे तिच्याही लक्षात आलं ते बरं झालं. थोड्या वेळानं मजा ओसरल्यावर त्याला आलेलं परिस्थितीचं भानही तिनं पाहिलं. त्याच्यासाठी मित्रांबरोबर रोज खेळता येणं आणि त्यांनी त्याला खेळण्यात सामावून घेणं हा आनंद नक्कीच मोठा होता. चूक-बरोबर, समाजमान्य-अमान्य ह्या पायावर निर्णय न घेता त्या मूलभूत गोष्टींच्या खांद्यावर उभा असलेला त्याचा स्वतःचा फायदा-तोटा, अल्पकालीन आणि दीर्घकालीन आनंद यावर त्यानं निर्णय घेतला. त्यात आवश्यक तिथे मदत घेतली. आणि अस्वस्थतेतल्या आनंदापेक्षा शांतीतलं समाधानही अनुभवलं.

तो तर मोठा होत होताच, त्यासोबत त्याची आईही वाढत होती!

प्रीती पुष्पा-प्रकाश

jonathan.preet@gmail.com

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून  पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या माध्यमांतले  समोर येईल ते आणि आवडेल ते करण्याचा प्रयत्न करतात.