आनंदी हेर्लेकर
डॉ. वासुदेव परळीकर यांच्याकडे इंटर्नशिप करायला लागल्यावर पहिल्यांदा मी ‘सांस्कृतिक मानसोपचार’ (कल्चरल सायकिअॅट्री) या संकल्पनेबद्दल ऐकलं. संस्कृती म्हटलं, की मनात साधारणपणे आपला धर्म, विचार, श्रद्धा, देश, भाषा, सण, परंपरा, रूढी, आपल्या समजुती, मूल्यं अशा गोष्टी येतात. सांस्कृतिक मानसोपचारात याच्या पलीकडे जाऊन व्यक्तीचं ‘असणं’ समजून घेतलं जातं. म्हणजे व्यक्ती स्वतःकडे कशी बघते, पार्श्वभूमीला असलेल्या संदर्भांसकट स्वतःची ओळख कशी उलगडत जाते, तिचं भवतालाशी नातं, स्वतःकडे, स्वतःच्या स्वास्थ्याकडे आणि इतरांकडे, डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन, डॉक्टरांची संस्कृती या सगळ्याचा विचार उपचारांमध्ये महत्त्वाचा असतो. इतकंच काय सभोवतालचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण हेही आपल्या आयुष्याला आणि आरोग्याच्या प्रश्नाला आकार देत असतात असं कल्चरल सायकिअॅट्री मानते. पेशंटला केंद्रस्थानी ठेवून, त्याच्या नजरेतून त्याचं दुखणं, आयुष्य आणि भवताल आपुलकीनं समजून घेणं, त्याचा आदर करणं हा ह्या उपचारांचा गाभा असतो. म्हणजे केवळ आजाराच्या लक्षणांवरून औषधं न देता मानसोपचार आणि बऱ्याच अंशी मानसशास्त्र अशा दोन्ही अंगांनी व्यक्तीचा विचार केला जातो. गेली ४० वर्षं डॉ. परळीकर सांस्कृतिक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांच्या मुलाखतींचं निरीक्षण करताना आजार, त्यांची कारणं यांबद्दल सखोल माहिती मिळाली. शिवाय डॉक्टर आणि इतर तरुण इंटर्नसोबत चर्चा करता आली. यातून मला महिलांच्या मानसिक आरोग्यामागे सांस्कृतिक घटक कसे काम करतात हे समजून घेण्याची संधी मिळाली. माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं हे अमूल्य होतंच, शिवाय माझ्याही आयुष्याबद्दल खूप विचार करायला लावणारं, माझ्या समजुतींवर प्रश्नचिन्ह उभं करणारं होतं.
अशाच काही केसेस आणि त्याबद्दल झालेल्या चर्चांचं सार इथे मांडते आहे.
एक दिवस तिशीतली एक तरुणी आईसोबत आली होती; झोप येत नाही, धडधड होते, चिडचिड होते अशा तक्रारी घेऊन. स्मार्ट, आधुनिक, मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या हुद्यावर काम करणारी, व्यवस्थित कमावणारी…
“हिला ना डॉक्टर, कुठेच तडजोड करता येत नाही. हट्टी आहे फार. पहिलं लग्न टिकलं नाही. मुलगा सात वर्षांचा आहे. दुसऱ्या लग्नाला जेमतेम वर्ष होतंय, तर कुरबुरी सुरू झाल्या आहेत. माहेरी आलीये. परत जायचं नाही म्हणतीये. म्हटलं थोडी फिरून ये, मोकळी हो आणि मग जा परत. माझी मोठी लेक अशी नाही. ती जुळवून घेते. मीपण नाही का इतकी वर्षं संसार केला. खूप काही छान नव्हती परिस्थिती. पण नीट पार पडलं सगळं. माझ्याही काही खूप अपेक्षा नव्हत्या. त्यांचं घराकडे लक्ष होतं हं पण!”
मला त्या आईचं मुलीबद्दल तक्रार करणं, इतरांसोबत तुलना करणं खटकत होतं.
“घराकडे लक्ष देणारा नवरा असेल, तर इतर गोष्टी खटकत नाहीत.” डॉक्टरांनी एका वाक्यात मुलीची व्यथा मांडली.
“हो ना! हिला काय जातं हट्टी आहे म्हणायला? मी आधीपासूनच स्वतंत्र, एकटी राहिलेली आहे. हे होते का तेव्हा माझ्यासाठी? मला नाही आवडत कोणी मला गृहीत धरलेलं. ज्या नात्यामध्ये प्रेम नाही तिथे कशाला राहायचं? मी पार्टनरशिवाय राहू शकते. मला गरज नाहीये कोणाची.” तिनं तणतणत पण आत्मविश्वासानं सांगितलं. हिच्या मनावर झालेले आघात (पास्ट ट्रॉमा) भरून काढण्यासाठी काम करावं लागेल असा मनात विचार आला. प्रेम हवंय पण गृहीत धरलं जायला नकोय ही किती रास्त मागणी होती तिची असं मला वाटलं.
हे सगळं ती आक्रमकतेनं बोलत असली, तरी त्यामागच्या गुंतागुंतीतून तिला मानसिक आजाराला सामोरं जावं लागत होतं हे दिसत होतं. मुलींना कमवायला, घराबाहेर स्वतंत्रपणे राहायला शिकवलं, पण मुलग्यांना आणि आजूबाजूच्यांनाही प्रेम करायला, मुलींचा आदर करायला शिकवलं नाही, तर कशी समानता नांदणार हा प्रश्न पुन्हा एकदा माझ्या मनात तरळला.
त्यानंतरच्या चर्चेतून याची दुसरी बाजू समोर आली.
लहानपणापासून यांत्रिक समानतेवर भर दिल्यामुळे स्त्रियांमध्ये एकांगीपणा, आक्रमकता वाढत आहे. वर्षानुवर्षं झालेल्या अन्यायाविरुद्ध बंड म्हणून पुरुषांबद्दल ‘ते विरुद्ध आम्ही’ ची भाषा वापरली जात असावी. ते असं वागू शकतात, तर आम्ही का नाही, ते कमी कपड्यांत वावरू शकतात तर आम्ही का नाही, ते सिगारेट ओढू शकतात तर आम्ही का नाही… अशा संरक्षण यंत्रणा (आपल्या भावनांना सामोरं न जाता त्यापासून दूर पळण्यासाठी नकळत वापरले जाणारे उपाय) वापरून मुलींचं मानसिक आरोग्य अजूनच धोक्यात येतंय असं वाटलं.
ह्या उदाहरणाच्या विरोधी वाटणारं एक उदाहरण या निमित्तानं सांगते.
तिशीतली एक मुलगी आपल्या नवऱ्याला घेऊन आली होती. लग्न होऊन ११ वर्षं झालेली. १० वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा. गेल्या १० वर्षांपासून नवऱ्याला गंभीर मानसिक आजार. औषधोपचारांनी आजार आटोक्यात असला, तरी तो अजून कमवत नव्हता. हिच्याच नोकरीतून घर चालत होतं. त्याचं औषधपाणी, दवाखाने, मुलाचं शिक्षण याकडे ती जबाबदारीनं, कष्टानं, प्रेमानं लक्ष पुरवत असली, तरी तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली. ‘आता आयुष्यात काही उत्साह वाटत नाही, केवळ मुलासाठी जगते आहे’, असं ती म्हणते तेव्हा तिच्या मानसिक कुचंबणेची कल्पना येते. तिच्यात भावनिक स्वावलंबन, आपल्या आनंदाचा शोध घेणं ह्याबद्दलचं भान जागृत करण्याची गरज मला प्रकर्षानं जाणवली.
मुलगे संत होण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत मुलींना स्वतःचं भावनिक, मानसिक, शारीरिक रक्षण करायला शिकवायलाच हवं. स्वावलंबनाच्या भ्रामक कल्पना आणि असाहाय्य करून टाकणारं परावलंबन याचा मध्य साधता यायला हवा. त्यामुळे केवळ पुरुषांमध्येच नाही तर स्त्रियांमध्येसुद्धा परस्परावलंबन, सहकार्य रुजवण्याची गरज पुन्हापुन्हा माझ्या मनात अधोरेखित होत राहिली.
विशीतली एक उत्साही, आनंदी दिसणारी, चुलबुली मुलगी डॉक्टरांसमोर बसली होती. तिची बडबड, उत्साह आणि आत्मविश्वास बघून ‘हिला काय त्रास असेल?’ असा मला प्रश्न पडला.
“मी चौथीत असताना माझ्या एका जवळच्या नातेवाइकानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. मी आईला सांगितलं तेव्हा तिनं मला याबाबत कोणालाही न सांगण्याबद्दल बजावलं. तिचं म्हणणं हे प्रत्येक मुलीला सहन करावंच लागतं, तू बोललीस तर आपली इज्जत जाईल. पुढे मी नववीत असताना माझ्या जिजांनी माझ्यावर अत्याचार केला. यावेळीही मी माझ्या ताईला आणि आईला सांगितलं. पण पुन्हा आईचं तेच म्हणणं, “याबद्दल कुठे बोलू नकोस, नाहीतर ताईचं लग्न बिघडेल आणि आपले संबंध तुटतील.” मुलीची, घरादाराची इज्जत, त्याबद्दलच्या पितृसत्ताक पद्धतीतून आलेले जाचक, अन्यायकारक विचार इथे स्पष्टच आहेत; पण हे सगळं बोलत असताना पायाची किंचित अस्थिरता सोडल्यास ती फार ताणात आहे असं काही मला जाणवलं नाही. पुढे म्हणाली, “आमच्या सोसायटीचा वॉचमन चांगला नाही. तो मला मेसेज करायचा. नवीन वर्षाच्या रात्री बारा वाजता त्यानं मला शुभेच्छाही दिल्या. मी त्याला ब्लॉक केलं. एकदा दातांच्या उपचारासाठी गेले असताना एक पेशंट माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत होता…” एका डॉक्टरांबद्दल म्हणाली, की मी उपचारांसाठी गेले असता त्यांनी मला अयोग्यरित्या स्पर्श केला, म्हणून मी त्यांच्याकडे जाणं बंद केलं. “मी सुंदर असल्यामुळे अनेकजण माझ्याकडे ‘वाईट’ नजरेनं पाहतात. अशा लैंगिक अत्याचारांच्या आघातांतून बाहेर पडणं खूप कठीण असतं. वरवर वाटतं की आपण पुढे गेलो आहोत, पण प्रत्यक्षात आपण गेलेलो नसतो. एखाद्याशी जवळचं नातं निर्माण झाल्यावर त्यानं मला कंबरेभोवती स्पर्श केला, तर मला भीती आणि अस्वस्थता वाटते. गर्दीच्या ठिकाणी मला असुरक्षित वाटतं म्हणून मी बाहेर पडणं टाळते. पण त्यामुळे एक महिना माझं कॉलेज बुडालं.” तिचं डॉक्टरांकडे येण्यामागचं कारण हळूहळू माझ्या लक्षात आलं. तिच्यावर बेतलेल्या कठीण प्रसंगांतून ती बाहेर न आल्यामुळे आणि तशाच प्रसंगांतून पुन्हापुन्हा गेल्यामुळे तिला ‘अँग्झायटी’चा त्रास होतोय असा मी विचार करत होते.
मात्र त्यानंतरच्या चर्चांतून आणि तिच्या आधीच्या सेशनमधील माहितीतून माझ्या लक्षात आलं, की यातल्या बहुतेक गोष्टी काल्पनिक होत्या. तिला अशा प्रकारे कल्पना करायला आणि त्यात रमायला आवडायचं! माझा विश्वासच बसेना. तिला असं का वाटत असावं? आपली लैंगिकता निरोगी पद्धतीनं व्यक्त करण्याची संधी मिळाली नसेल आणि लैंगिक संबंधाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असाच अनुभव आला असेल, तर असा काल्पनिक मार्ग अवलंबून लैंगिक आनंद मिळवण्याची वृत्ती होऊ शकते. त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं आणि मग डॉक्टरांची मदत लागते.
याला पुष्टी देण्यासाठी वाचलेलं एक उदाहरण सांगते.
एका केसमध्ये एक मुलगी सतत स्वतःवर बलात्कार होतो आहे असा विचार करायची आणि त्यात रमायची. आपल्याशी कोणीच लग्न करणार नाही अशी समजूत करून घेतल्यामुळे बलात्काराच्या मार्गानं तरी लैंगिक सुख मिळेल असं तिला नकळत वाटत असावं. त्या विचारांत अडकल्यानं डॉक्टरांकडे जावं लागलं. अशा पेशंटचा उपचार केवळ निरोगी लैंगिक संबंध करण्याची क्षमता निर्माण करणं इथेच न थांबता, लाजता येणं, लैंगिक संबंधातील रोमान्स अनुभवता येणं इथपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी पेशंटशी गप्पा मारणं, त्यांची संस्कृती समजून घेणं, लैंगिकतेसंबंधीच्या अंधश्रद्धा दूर करणं, त्यांच्या लैंगिक सुखाच्या निरोगी आणि आनंददायी कल्पना काय असतील हे शोधण्यासाठी मदत करणं गरजेचं असतं. सांस्कृतिक मानसोपचार याकामी मदत करतात.
एक ऐन विशीतली तरुणी. हुशार, नीटनेटकी. देवाबद्दल अजिबात वाईट बोलू नये, उलट प्रश्न विचारू नयेत, लैंगिकतेबद्दल शब्दही उच्चारू नये असे अतिशय कडक संस्कार झालेली आणि पितृसत्ताक वातावरणात वाढलेली. ती देवासोबत लैंगिक संबंध करते आहे असे विचार सतत तिच्या मनात येत. या विचारांनी तिचा थरकाप उडायचा. हे विचार येऊ नयेत म्हणून ती जितका प्रयत्न करायची तितके ते विचार तिला जास्त त्रास द्यायचे. या आजारासाठी तिला डॉक्टरांकडे यावं लागलं. तिनं डॉक्टरांना विनंती केली, की त्यांनी तिच्या बाबांना हे समजावून सांगावं की त्यांच्या घरचं वातावरण किती विखारी आणि घातक आहे. हे सांगताना तिच्या हावभावांतून त्याबद्दलचा राग स्पष्टपणे दिसत होता. कल्पेनेतून वास्तवात येण्यासाठी हिला मदतीची गरज आहे असा मी विचार करत होते तेव्हा डॉक्टर म्हणाले, “मनातल्या या कल्पनेला एवढं काय घाबरायचं? आणि त्यांच्याशी लढायचं? आपण देवी आहोत असं समजून या कल्पना एन्जॉय कराव्यात ना!” डॉक्टरांच्या ह्या कल्पकतेनं मी अवाक् झाले. डॉक्टर पुढे म्हणाले, “जोपर्यंत आपल्याला माहीत आहे, की या माझ्या कल्पना आहेत, वास्तव नाही आणि मी त्यात अडकत नाही, त्यातून हवं तेव्हा मला बाहेर पडता येतं, त्यामुळे माझ्या रोजच्या कामांमध्ये किंवा नात्यांमध्येही अडथळा येत नाही, तोपर्यंत कल्पनेत रमून आनंद घेणं यात काही वावगं नाही. खरंतर, आनंदी आणि निरोगी कल्पनांमध्ये रमण्यानं अनेक लैंगिक दुखणी बरी होतात.” हे समजल्यावर आमच्यातील बऱ्याच इंटर्न्सच्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. कारण आपण सगळेच बहुतेक वेळा कल्पनेतच जगत असतो ना!
वरील दोन्ही उदाहरणांतून मला लैंगिकता शिक्षणाचं महत्त्व पुन्हा ठळकपणे जाणवलं.
एक ४० वर्षांची दोन मुलांची आई अतिशय कष्टी अवस्थेत क्लिनिकला आली होती. आपल्यासोबत जे काही वाईट होतंय ते आपल्या वाईट विचारांचं फळ आहे आणि आता काहीतरी वाईट घडेल अशी तिला सतत भीती वाटे. असं काय वाईट केलंय तू, असं विचारल्यावर ती म्हणाली, “मी देवाबद्दल खूप वाईट विचार करते. त्याला मनातून शिव्या देते. हे जातच नाही माझ्या मनातून. मी खूप प्रयत्न करते तसं न करण्याचा पण माझा माझ्या विचारांवर ताबाच नाही.” आणि ओक्साबोक्शी रडू लागली. इतकी बिचारी वाटली ना मला ती! औषधांनी तिला शांत वाटेल; पण तिच्या मनातल्या या कर्म-धर्म सिद्धांतामुळे घट्ट रुतलेल्या भीतीचं काय? धार्मिक कट्टरतेचा व्यक्तीवर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याची ही दोन्ही जळजळीत उदाहरणं आहेत.
देव, श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे आणि त्यात आपण ढवळाढवळ करू नये अशा ठाम मताची मी आहे; पण वरील उदाहरणांमुळे, कोणत्याही जाचक गोष्टींवर प्रश्न विचारणं, चिकित्सक, वस्तुनिष्ठ, तार्किक विचारसरणी रुजवणं, त्यासाठी पूरक वातावरण असणं याची निकड मला अधिक तीव्रतेनं भासू लागली आहे.
एक मुलगी तिच्या बाबांबरोबर आली होती. १८-१९ वर्षांची असेल. शिक्षणासाठी हॉस्टेलला राहायची. दोन महिन्यांपूर्वी तिची आजी वार्धक्यानं गेली. तेव्हापासून ही मुलगी त्या दुःखातून बाहेर पडू शकली नव्हती. सतत रडू येणं, झोप न लागणं… १ महिना कॉलेजलाच गेली नाही. डॉक्टरांच्या औषधानं बरं वाटू लागल्यावर दुसऱ्यांदा भेटायला आली होती. तिचे बाबा म्हणाले, “आता बरी आहे ती. हॉस्टेललापण राहून आली. आता घरी आलीये तर तुम्हाला भेटायला आणलं.” तिची बोलण्याची वेळ आली तेव्हा आधी घळाघळा रडूच लागली. तिला अजून काहीतरी त्रास होतोय हे स्पष्ट दिसत होतं. थोड्या वेळानं शांत झाल्यावर ती म्हणाली, “डॉक्टर, मागच्या आठवड्यात आजीची सेकण्ड मन्थली डेथ अॅनिव्हर्सरी होती. मी पूर्णपणे विसरले. अशी कशी मी आजीला विसरू शकते!” एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर जवळच्या व्यक्तींनी आनंदात राहू नये, त्याच दुःखात राहावं अशा काहीशा समजुती घेऊन ती वावरत होती आणि पूर्णपणे बरी होण्यापासून स्वतःला मागे खेचत होती. तिच्याशी मृत्यूच्या अनिवार्यतेबद्दल, नैसर्गिकतेबद्दल चर्चा केली, आजीच्या आठवणी काढल्या; मग जाताना ती समाधानानं गेली. मृत्यूबद्दल मोकळेपणानं बोलणं, त्याच्याशी संबंधित भावना व्यक्त करता येणं किती महत्त्वाचं आहे आणि तसं झालं नाही, तर होणारा मानसिक त्रास किती गंभीर रूप धारण करू शकतो याचा पडताळा इतर काही केसेसमध्येही आला होता. एखादी व्यक्ती जिवंत असताना तिच्याशी मोकळं, छान नातं असलं, तर ती नैसर्गिकपणे गेल्यावर फारसं दुःख होत नाही. पण तेच जर गोंधळलेलं नातं असेल, नात्यात काही संवाद करणं राहून गेलेलं असेल, तर त्यातून बाहेर पडायला त्रास होतो हेही या निमित्तानं झालेल्या चर्चेतून पुढे आलं. मृत्यूची अनिश्चितताही मनात भीती निर्माण करते. म्हणूनच मग नात्याला प्राधान्य देणं, वेळच्या वेळी नात्यातील संघर्षाचा निचरा करणं कसं महत्त्वाचं आहे यावरही चर्चा झाली. कठीण नात्यांमध्ये मृत्यूमुळे सुटकेचा अनुभव येतो आणि तेही काही वावगं नाही हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवं.
सांस्कृतिक मानसोपचारामध्ये समुपदेशनावरही भर असतो. रुग्णाला औषधानं भावनिक स्थिरता मिळाल्यावर सांस्कृतिक मानसोपचारतज्ज्ञ रुग्णाच्या नकळत संवादातून त्याच्या आजाराबद्दल, स्वतःच्या विचार व भावनांबद्दल जागरूकता व योग्य समज निर्माण करत असतो हेही वरील केसेसच्या निरीक्षणातून जाणवलं. ही सर्व उदाहरणं महिलांची असली, तरी अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या पुरुषांनाही अशाच त्रासातून जावं लागतं हेही इंटर्नशिपदरम्यान अनुभवलं.
स्त्रियांना नक्की काय हवंय, त्यांची घुसमट कुठे होते आहे, मोकळेपणानं जगण्यापासून त्यांना काय मागे खेचतं आहे, समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय याचा अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज या उदाहरणांतून तीव्रतेनं जाणवली. एक प्रश्न मनाला सारखा सतावतो आहे. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य एवढ्या गोष्टी मुलींना आनंदात जगण्यासाठी पुरेशा आहेत का? केवळ मुलींनाच काय, मुलग्यांनाही पुरेशा आहेत का? आर्थिक स्वातंत्र्यासाठी लहानपणापासून केल्या जाणाऱ्या तयारीत इतर महत्त्वाचे मुद्दे नजरेआड होत आहेत का? या संदर्भात एका मैत्रिणीनं एक रील पाठवली होती. त्यात म्हटलं होतं, “औरत की आझादी का दायरा इतना छोटा कर दिया गया है, की वो रोजगारकोही मुक्ती समझ बैठी हैI”
मला वाटतं आर्थिक स्वातंत्र्याचा उंबरठा ओलांडून पुढे आलं, की जे मोकळं आकाश दिसतं तिथे आपण सगळेच धडपडतोय. आर्थिक स्वातंत्र्य स्थैर्य देईल असं वाटत होतं; पण तो भ्रम होता असं आता वाटतंय. स्थैर्य मिळवण्यासाठी वेगळे उंबरठे ओलांडण्याची गरज आहे. त्यासाठी तयार होणं, अभ्यास करणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे.
आनंदी हेर्लेकर

h.anandi@gmail.com
समुपदेशक. मुलांचे आणि एकूणच समाजाचे मानसिक आरोग्य व शिक्षण हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.
