आदरांजली – विद्युत भागवत
विद्युत भागवतांशी ओळख कधी झाली ते मला आठवत नाही. स्त्रीवादी विचारांच्या एक चांगल्या कार्यकर्त्या अशीच त्यांच्याबद्दलची माहिती मला होती. भेटल्या तेव्हा सहज मैत्रीण वाटत. सामाजिक इतिहासाबद्दलचा विशेष विचारही त्यांच्याकडून कधीतरी समजावून घेतल्याचे आठवते. जवळपास तीन दशके त्यांनी स्त्री चळवळीत काम केले. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला अध्ययन केंद्राच्या त्या संस्थापक संचालिका होत्या. महिलांविषयक अभ्यासाला स्वतंत्र अभ्यास-शाखा म्हणून घडवणार्या विचारवंतांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. त्यांचे स्त्रियांच्या प्रश्नांवरील तसेच स्त्रीवादी सिद्धांत आणि सामाजिक इतिहासावरील लिखाण महत्त्वाचे आहे.
देशातील सामाजिक परिस्थितीवर त्यांनी अनेक लेख आणि पुस्तकेही लिहिली आहेत. ‘फेमिनिस्ट सोशल थॉट्स’ हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक आहे. ‘आरपारावलोकिता’ ही त्यांची कादंबरी 2019 साली पुण्यातील हरिती प्रकाशनाने प्रकाशित केली.
‘स्त्री प्रश्नाची वाटचाल’ या पुस्तकाच्या लेखनासाठी त्यांना 2005 सालचा ‘समाजविज्ञान कोश पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच 2006 साली त्यांना ‘महाराष्ट्र सारस्वत गौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यांच्या निधनाने साहित्य, चळवळ आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
पालकनीती परिवारातर्फे विद्युत भागवत ह्यांना आदरांजली.
संपादक, पालकनीती