मला हवंय…

मला हवंय…
राष्ट्रसंघाच्या बैठकीत कुणी संथालानं सांगावी
एखादी संथाली कहाणी संथालीत
आणि गुलाबांच्या अति नखरेल बागेत बहराव्या
महुव्याच्या फांद्या.
नेपाळी पोरानं छेडाव्या गिटारीच्या तारा आणि
गावीत गीते नेपाळातली कोलकत्यात
झारखंडी आपापले तीरकमठे घेऊन यावेत
आणि झुमूर नृत्याच्या त्या तालावर आपलं हृदय नाचावं.
काश्मिरात कधीच ऐकू येऊ नयेत बंदुकींचे बार
विकृत राजकारण्यांना पुरावा लोकांच्या शब्दांचा मार.
कुणी सलमा खातून व्हावी भाजपा नेत्याची सून
धर्मालाही कळेल माणुसकी त्यातून.
कधी झाड कापलं गेलंच तर
अधिवेशनात श्रद्धांजली वाहिली जाईल
पळसाचे आणि जास्वंदाचे झेंडे संघर्षाचे गीत गातील.
तळे मातीने भरून नष्ट झाले तर
आकाशाने अश्रू वाहावेत.
म्हणावीत ना गाणी सर्वांनीच
दिवस पालटल्यावर.
मंत्र्यांनीही प्रेमात पडावं,
भाषणं देऊच नयेत, गावीत गाणी मनोहर मनभर.
तुम्हाला वाटेल मी मागते आहे भलतंच काही स्वर्गसत्व
मला भूमीवर उतरवून हवं आहे हे विश्ववास्तव.
कबीर सुमन

कवी कबीर सुमन ह्यांची मूळ कविता
‘आमि चाई’ बंगाली भाषेत असून अझीम प्रेमजी विद्यापीठात कार्यरत सुजीत
सिन्हा ह्यांनी तिचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. संजीवनी कुलकर्णी ह्यांनी इंग्रजी
कवितेचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे.
कवी, संगीतकार, गायक असलेल्या कबीर सुमन ह्यांनी पूर्वी पत्रकार म्हणून काम
केले आहे. 2009 ते 2014 ह्या काळात ते तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार होते.
त्यांचे मूळचे नाव सुमन चट्टोपाध्याय. ग्रॅहम स्टेन्स ह्या ख्रिश्चन मिशनरीच्या
हत्येच्या निषेधार्थ त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारला आणि
कबीर सुमन असे नाव धारण केले. ‘तोमाके चाई’, ‘बोशे अंको’ हे त्यांचे बंगाली
भाषेतील अल्बम प्रसिद्ध आहेत.
‘आमि चाई’ ही त्यांची मूळ बंगाली कविता त्यांच्याच आवाजात
ही https://tinyurl.com/aamichai येथे ऐकता येईल.