आधुनिक शिक्षणाचा प्रारंभ

अरविंद वैद्य

आधुनिक ह शब्द सापेक्ष आहे. जो पर्यंत पुढचे काही येत नाही. तोपर्यंत आज जे आहे ते आधुनिककच! मानवी समाज सतत प्रगत होत आहे. मानवी संस्कृतीचा उत्पादन-उत्पादन साधने आणि त्यातून तयार होणारे नातेसंबंध हा मूलाधार. या मूलाधारावर आधारित आणि सुसंगत असा संस्कृतीचा वरचा डोलारा जन्माला येतो. मूलाधार सतत बदलत असतो. तसाच वरचा डोलाराही बदलतो. शिक्षण व्यवस्था ही ह्या डोलार्‍याचा एक भाग आहे. उत्पादन साधने आणि त्याचे नातेसंबंध ह्या मूलाधारातील आंतरविरोध कधी कधी एवढे तीव्र बनतात की समाजात एक क्रांतिकारक घुसळण होते. आणि एक नवीन समाज रचना तयार होते. त्यावर आधारलेली संस्कृती, मूल्ये, संस्था, कला, शिक्षण हा डोलाराही मग क्रांतिकारकपणे बदलतो. आज जगात सर्वसाधारण मान्य असलेली समाज रचना कोणती? मोठे उद्योग, यंत्रे, विज्ञान ह्यांची भांडवली उत्पादनाची रचना. अशा रचनेशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती म्हणजे आधुनिक शिक्षण पद्धती होय.

भांडवली समाजरचना युरोपात प्रथम तयार झाली. इ.स.च्या 17व्या-18व्या शतकात तेथे उत्पादन क्षेत्रात प्रचंड आंतरविरोध तयार झाला. नव्या काळाची गरज आणि त्यासाठी नव्या मूल्यांचा उद्घोष रेनेसान्स मध्ये झाला. हे आपण मागे पाहिले आहे. नंतर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. जगभराच्या व्यापारातून धनिक बनलेला शहरी नव उत्पादक मध्यमवर्ग आणि जुना सरंजामी वर्ग ह्यांच्यातील तो संघर्ष होता. हा संघर्ष पुढे शंभरवर्षे म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तराधार्यापर्यंत चालला आणि आधुनिक भांडवली समाज रचना जन्माला आली व त्याला संवादी अशी शिक्षण व्यवस्था तयार झाली हे ही आपण पाहिले आहे. भारतात इंग्रजांचे राज्य स्थापन होण्याच्या क्रमात, म्हणजे गेल्या शतकात, युरोपप्रमाणे क्रांती न होता सरंजामी रचना मोडू लागली. व मुंबईसारखी नवी व्यापारी-औद्योगिक शहरे वाढू लागली. त्यानंतर म्हणजे 1850 नंतर खर्‍या अर्थाने आधुनिक शिक्षणाची सुरवात भारतात झाली. असे असले तरी कोणतेही शिक्षणाच्या इतिहासाचे पुस्तक उघडले की आधुनिक शिक्षणाचा इतिहास इ.स.1600 पासून म्हणजे युरोपियनांच्या आगमनापासून सांगायला प्रारंभ होतो. युरोपियन लोक ज्या देशातून आले तेथेच जर ह्या काळात आधुनिक शिक्षण नव्हते तर हे लोक भारतात आधुनिक शिक्षण एवढ्या आधी कसे सुरू करणार? तेव्हा युरोपातही सरंजामी अर्थव्यवस्थाच होती आणि भारतातही. 17व्या आणि 18व्या शतकात या युरोपियनांनी जे शिक्षण सुरू केले ते आधुनिक नव्हते तर मध्ययुगीनच होते. एवढे मत नोंदवून या काळाचा आढावा घेऊया.

(1) पोर्तुगीजांनी केलेले प्रयत्न: पोर्तुगीज लोक पंधराव्या शतकाच्या शेवटी (1598) भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावर आले. हळूहळू भारताच्या संपूर्ण किनार्‍यावर त्यांनी व्यापरी केंद्रे उभी केली. मुंबई, दीव, दमण, गोवा, सिलोन, चिलगाव, हुगळी ही त्यांची केंद्रे होत. या ठिकाणी त्यानी पोर्तुगीज, युरेशियन्स आणि ख्रिस्ती धर्मात जाणारे भारतीय यांच्या मुलांसाठी शाळा काढण्यास सुरवात केली. या शाळांमधून मुख्यत्वे ख्रिस्ती धर्म, देशी स्थानिक भाषा, पोर्तुगीज, वाचन, लेखन, गणित हे विषय शिकवले जात. उच्च शिक्षणासाठी त्यांनी ख्रिस्ती महाविद्यालयेही काढली त्यातून लॅटिन भाषा, ख्रिस्त धर्म, ग्रीक तर्क, संगीत हे विषय शिकवले जात आणि त्यामध्ये प्रामुख्याने धर्मगुरू तयार होत. सेंट झेविअर हा ह्या काळात भारतात आलेला महत्त्वाचा मिशनरी. त्यानेच बांद्रा (मुंबई) येथे 1575 मध्ये सेंट अ‍ॅन्स युनिव्हार्सिटी स्थापन केली. कोचीन येथे छापखाना सुरू केला. त्याने विस्तृत भागात गोवोगावी धर्मपुस्तके पोचविली. डी-नोबिली हा याच काळातला एक मिशनरी. तो पेहराव इ. बाबतीत पूर्ण भारतीय झाला होता. पोर्तुगीजांनी 1575मध्ये गोव्याला सुरू केलेल्या ख्रिस्ती महाविद्यालयात तीनशे विद्यार्थी शिकत. ख्रिस्ती धर्माने प्रभावित होऊन अकबर बादशहाने आग्र येथे ख्रिस्ती महाविद्यालय सुरू केले होते.

(2) डच, फ्रेंच आणि डेनिश लोकानी केलेले प्रयत्न: इंग्रज आणि पोर्तुगीजा व्यतिरिक्त भारतात आलेले युरोपिअन म्हणजे डच, फ्रेंच आणि डेनिश होत. त्यांनीही आपापल्या वसाहतींमधून पोर्तुगीजांप्रमाणे धर्मप्रचार हे लक्ष्य ठेवून शाळा-कॉलेजे काढली. या तीनही लोकांच्या वसाहती भारतात फार काळ टिकल्या नाहीत. यांच्या पैकी डेनिश लोकांनी धर्मप्रसाराचे काम अधिक खोलात जाऊन केले असे दिसते. 18व्या शतकाच्या प्रारंभी ह्या मिशनरीजनी सुमारे 50,000 हिंदू आणि  मुसलमान लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. हे मशिनरी तमीळ, तेलगू भाषा शिकले. बायबलचे ह्या भाषांतून त्यांनी भाषांतर केले. हे ग्रंथ छापण्यासाठी त्यांनी छापखाने टाकले. शिकवण्यासाठी ट्रेंड शिक्षण असावेत म्हणून शिक्षणाचे महाविद्यालय काढले. आशयाचे दृष्टीने नाही तरी पद्धतीच्या दृष्टीने डेनिश लोकांना आधुनिक शिक्षणाची भारतात सुरूवात करण्याचे श्रेय देता येईल.

(3) इंग्रजांनी केलेले प्रयत्न: भारतात आलेल्या युरोपियनांपैकी इंग्रजांनी ह्या देशात स्वतःचे राज्य तयार करून ते शंभर वर्षे चालविले पण प्रारंभी ते व्यापार करण्यासाठीच आले होते. ईस्ट इंडिया कंपनी मसाल्याच्या बेटांवर मार खाऊन 1626मध्ये भारतात आली. त्यांनीही अन्य युरोपियनांप्रमाणेच आपापल्या वसाहतींमध्ये ख्रिस्ती धर्म शिणिावर बरेच लक्ष केंद्रीत केले. 500 टनापेक्षा अधिक मोठ्या प्रत्येक जहाजावूरन एकतरी पाद्री भारतात गेलाच पाहिजे असा कायदाच 1698मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने केला. भारतातील तरुणांना धर्म शिक्षण घेण्यासाठी कंपनी इंग्लडला पाठवी. भारतात परतल्यावर त्यांनी धर्माचा प्रसार करावा अशी अपेक्षा असे. पीटर हा त्यातीलच एक तरुण. भारतात पाठवावयाच्या धर्मप्रसारकांसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत अरेबिक विषय सुरू करण्यात आला होता.

1780 मध्ये अशी एक घटना घडली की कंपनीला ख्रिस्ती धर्म शिक्षणाप्रमाणे मुस्लीम आणि हिंदू धर्म शिक्षणाकडेही लक्ष द्यावे लागले. त्या वर्षी ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून भारतात ब्रिटीश कायद्याच्या जागी भारतीय कायदा लामू केला. त्यामुळे मुस्लीम कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मौलवी तर हिंदू कायद्याच्यासाठी  हिंदू पंडित ह्यांना महत्त्व आले. इ.स. 1781मध्ये कलकत्ता येथे कलकत्ता मदरसा आणि इ.स. 1791मध्ये बनारस संस्कृत कॉलेज स्थापन झाले. ह्या दोनही संस्था लौकरच नावारूपाला आल्या. कारण येथून बाहेर पडणार्‍या विद्याविभूषिताना कंपनीच्या राज्यात नोकर्‍या होत्या. अशा रीतीने ह्या कॉलेजमधील आशय जरी मध्ययुगीन असला तरी त्याची रचना आणि कार्यपद्धती हळूहळू आधुनिक होऊ लागली होती. याच सुमारास युरोपमध्ये फ्रेंच राज्यक्रांती होऊन गेली हेाती. जुनी सरंजामशाही सपविणार्‍या नव्या भांडवली रचनेचे वारे वाहू लागले होते. रेनेसान्सचे आधुनिक विचार युरोपातल्या शिक्षणव्यवस्थेने आत्मसात केले होते. हा काळ ‘संधिकाल’ होता.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 1600साली स्थापन झाली व 1626 मध्ये कंपनी भारतात आली. त्या वेळी भारतात झालेले ब्रिटिश अधिकारी हे युरोपियन मध्ययुगीन विचारांचे होते. 1791पर्यंत या अधिकार्‍यांचा युरोपातील परिसर पूर्ण बदलून तो आधुनिक व्यापारी भांडवलदारी झाला होता. भारत मात्र अजूनही पूर्णपणे सरंजामी रचनेतच होता. हा काळ म्हणजे महाराष्ट्रातील पेशवाईचा किंवा कर्नाटकच्या हेदर टिपूचा काळ. त्या काळाचे बरेच चित्रण अनेक टी.व्ही. मालिकांनी आपल्यासमोर ठेवलेले आहे. त्या काळात आधुनिक शिक्षणाची सुरूवात होऊच शकत नव्हती. वर सर्व युरोपियन लोकांनी केलेल्या प्रयत्नांचे जे चित्रण आले आहे त्यावरून ही गोष्ट पुरेशी स्पष्ट होते. युरोपियनांच्या प्रयत्नामुळे इथे ख्रिश्‍चन ह्या एका नव्या धर्म शिक्षणाची भर पडली. पूर्वी हिंदू, बौद्ध, मुसलमान धर्म शिक्षण होते आता आणखी एक धर्म वाढला एवढेच. येथील सरंजामी रचनेची चौकट एवढी भक्कम होती की धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती लोकांनीही आपापल्या जाती कायम ठेवून धर्म बदलले. मुसलमान धर्माच्या बाबत भारतात हेच झाले होते. तेव्हा आशयाच्या दृष्टीने अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत तरी भारतातील शिक्षण मध्ययुगीनच होते. रचनेच्या दृष्टीने युरोपियन आधुनिक (त्या काळचा) ढाचा समोर ठेवून शाळा, कॉलेज त्यांची रचना, ट्रेंड शिक्षक इत्यादी काही गोष्टी त्यांनी आणल्या हे मान्य केले पाहिजे.

एकोणिसावे शतक सुरू झाले तेव्हा उत्तर भारतात कलकत्ता हे केंद्र धरून, दक्षिण भारतात मद्रास हे केंद्र धरून आणि पश्‍चिम किनारपट्टीवर मुंबई हे केंद्र धरून विस्तृत सलग भू भागावर ब्रिटिशांनी आपले राज्य स्थापन केले. 1818मध्ये पेशवाई बुडाली आणि खर्‍या अर्थाने कंपनीचा अंमल सुरू झाला. आता राज्यकारभार, सारा वसुलीसाठी जमीन मोजणी करणे, राज्य चालविण्यासाठी पोस्ट, टेलिग्रफ इ. साधने उभी करणे इत्यादीसाठी खर्‍या अर्थाने आधुनिक धर्मनिरपेक्ष शिक्षणाची ब्रिटिशांना गरज पडणार होती. तेव्हा काय झाले? कोणते वाद पुढे आले? कोणी कोणती भूमिका बजावली? या प्रश्‍नांचा उहापोह आपण पुढील लेखात करूया !