कथुली

आज मला कामावर जायला उशीर झाला. हे सगळं त्या मिनीबसमुळे झालं. आमच्या भागातल्या गल्ल्या आधीच अरुंद आहेत. त्यात नेमकी माझ्यासमोर ती मिनीबस थांबल्यानं मला पुढे जाता येईना. मग चडफडत, इकडेतिकडे पाहत बसले. तेवढ्यात पुढच्या एका घरातून एक बुटका आणि पाठीला भलंमोठं कुबड असलेला माणूस बाहेर आला. त्यानं गणवेश घातलेला होता. त्याचा एक हात जेवणाचा डबा धरण्यात गुंतलेला होता. त्याच्या शरीराचं अवघडलेपण आणि चालताना त्याला होणारा त्रासच सांगत होता, की त्याला मदतीची गरज आहे. ती बस त्याच्यासाठीच थांबलेली होती हे माझ्या लक्षात आलं. त्यानं मागे वळून, अंगणात उभ्या असलेल्या आपल्या म्हातार्‍या आईला हात हलवून अच्छा केलं. नंतर बसमध्ये चढताचढता माझ्याकडे बघून हसला आणि मलाही हात हलवून अच्छा केलं. माझा राग कुठच्याकुठे पळून गेला. प्रत्युत्तरादाखल मी हसून हात हलवला, तेव्हा माझ्याही नकळत माझे डोळे भरून आले होते. ह्या सगळ्या प्रकारात कामावर जायला मला उशीर झाला खरा; पण तो दिवस अविस्मरणीय होता. समोरून येणार्‍या प्रत्येकाकडे मी हसून बघत होते.

https://www.kindspring.org/story/view.php?sid=95253.