खेळघर मित्र

2019 -20 मध्ये कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आता पालकांनी मुलांच्या शिक्षणात लक्ष घालणे गरजेचे आहे  हे जाणवत होते. मुलांच्या शिक्षणाच्यासंदर्भात आपण काय आणि कशी मदत करू शकतो हे पालकांना माहित नाही . त्यामुळे पालकांबरोबर विशेष काम करण्याची गरज जाणवत होती.   लॉक डाऊनच्या संकटाच्या काळात खेळघर किमान पातळीवर चालू ठेवले ते आमच्या वस्तीत राहणाऱ्या शिक्षकांनी आणि खेळघरातील मोठया मुलांनी! आम्ही त्या कामाला पुढचे पाऊल असे नाव दिले होते. या मुलांप्रमाणेच काही शिकलेले पालक देखील असे छोटे वर्ग घेऊ शकले तर किमान प्राथमिकच्या मुलांचे शिक्षण तरी थांबणार नाही असे जाणवले. कोरोना काळ संपल्यावरदेखील या पालकांची खेळघराच्या मुलांबरोबरच्या कामात मदत होऊ शकते अशी कल्पना मनात आली. प्रत्येक आठवड्यात दोन तासांची दोन सत्रे अशी  तीन आठवड्यांच्या प्रशिक्षणाची आखणी केली. 18 महिला पालक या प्रशिक्षणात सहभागी झाल्या. स्वतः पालकांना आत्मविश्वास यावा, मुलांना समजून घेता यावे, त्यांना त्यांच्या मुलांच्या शिकण्यात मदत कशी करता येईल हे समजावे आणि सभोवतालच्या काही मुलांना जमवून त्यांना खेळघराच्या पद्धतींनी कसे शिकवता येईल हेही समजावे अशा टप्प्यांनी काम पुढे गेले. या कामामध्ये पालकांची उत्तम साथ लाभली. खेळ, दृश्य साधनांची मदत, हसून खेळून संवाद, मोकळीक, शैक्षणिक साधनांचे किट यामुळे हे पालक अगदी  उत्साहाने भाग घेतात .प्रशीक्षणानंतर देखील  आठवड्यातून एकदा या खेळघर मित्र गटाबरोबर काम चालू आहे.या पालकांना आता शिकण्याची गोडी लागली आहे, त्यांच्या साठी इंग्लिश चा वर्ग चालू केला आहे. तसेच निरक्षर पालकांसाठी त्यांनी साक्षरता वर्ग देखील सुरू केला आहे.त्यातील 3-4  महिला आता खेळघर च्या वर्गांमध्ये मदतीसाठी येतात.