चांदोबा रोज फिरायला जातात आणि एके दिवशी चांदोबा खाली पडले
आणि मग काय झाले असेल सांगा रं? चांदोबा खाली पडले पण कुठे पडले माहिती आहे का? मी दुकानला चालले होते, तर ते थेट माझ्यासमोर येऊन पडले. मला भीती वाटली. विद्या तर पळतच गेली. तिला वाटलं की भूतच आहे आणि मलापण खूप भीती वाटली.
मी चांदोबाला विचारलं, ‘‘तू कोण आहेस?’’
चांदोबा म्हणाला, ‘‘अगं, मी चांदण्यासोबतचा चांदोबा.’’
‘‘हो का? तू चांदोबा आहेस. मला तर माहीतच नव्हतं. पण मी जर रात्री आकाशात बघितलं तर मला पांढराशुभ्र चांदोबा दिसतो. पण तुझ्यावर नुसती मातीच आहे.’’
चांदोबा मला म्हणाला, ‘‘मी तर नुसती वरूनच पृथ्वी बघितली होती. मला तर माहीतच नव्हतं, पृथ्वीवर काय-काय असतं.’’
‘‘मी दाखवते की. चल मी तुला माझं घर दाखवते.’’
‘‘चल बरं,’’ चांदोबा म्हणाला.
मी चांदोबाला माझं घर दाखवलं. माझी आई तर चांदोबाच्या पायात पाय अडकून खालीच पडली. आईने चांदोबाला बघितले नव्हते.
आईने विचारले, ‘‘ए वैष्णवी, कोणत्या भुताला आणलं गं घरी?’’
‘‘अगं आई, हे कोणतं भूत नाही. हा तर चांदण्या सोबतचा चांदोबा आहे.’’
‘‘हा चांदोबा आहे का, मला तर माहीतच नव्हतं.’’
चांदोबाने एका हातात तवा उचलला आणि एका हातात वाटी उचलली आणि मला विचारू लागला, ‘‘हे काय आहे? आणि हे काय आहे?’’
मी चांदोबाला सांगितले, ‘‘हा तर तवा आहे आणि ही तर वाटी आहे.’’
चांदोबाने मला अशा खूप गोष्टी विचारल्या. त्याला माहीत नव्हत्या. चांदोबाने जी वस्तू हातात घेतली, मी त्या वस्तूचे नाव सांगत होते. त्याने मला माझे नाव विचारले. मी त्याला माझे नाव वैष्णवी म्हणून सांगितले. अशा प्रकारे चांदोबा माझ्या सोबत राहू लागला. पण एके दिवशी मला न विचारताच तो त्याच्या घरी गेला.
वैष्णवी व्यंकट भोसले | इयत्ता सहावी
जि.प.प्रा.शाळा, बोरगाव काळे, जि. लातूर