चिनी

यात्रेत सजलेल्या झगमगत्या दुकानांकडे अधाशी नजरेने जे-जे दिसेल ते-ते टिपत चिनी चालली होती. एकीकडे आजोबांचा हात गच्च धरलेला होता, तर दुसरीकडे आजोबांच्या पावलांशी स्पर्धा सुरू होती. असा झगमगाट ती प्रथमच बघत होती. मऊ-मऊ खेळणी तिला खुणावत होती. भालू तिला गुदगुल्या करण्यास आतूर होता, कुत्रा लाडात येऊन शेपटी हलवत होता, मांजर डोळे मिचकावत होती. गर्द गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेली निळ्या डोळ्यांची बार्बीची बाहुली तिला आकर्षून घेत होती.

दागिन्यांच्या दुकानांनी तर चिनीला मोहून टाकले होते. रंगीबेरंगी बांगड्या खन्खन् करीत साद घालत होत्या. चमचमणारे खडे तिचे डोळे दिपवत होते. मोत्यांचे, खड्यांचे कंठहार, पिवळेधम्म कंठहार, कानातील सुंदर-सुंदर लहान मोठी लोंबकळती कर्णफुले, रंगीबेरंगी खड्यांच्या अंगठ्या पाहून बालमन हरपून गेले होते.

‘‘आजोबा हे बघा ना, आजोबा ते बघा ना,’’ म्हणून ती एकेका वस्तूकडे बोट दाखवीत होती. तिच्या नजरेत हे सगळे स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा आनंद मावत नव्हता. मात्र आपण त्यातले काहीही घ्यायचे नाही, हे ती ठरवूनच आली होती.

तिला शाळेतील टीचरच्या शब्दांची चांगली आठवण होती. ‘‘यात्रेत लोक मजा करायला जातात, हौसेने वस्तू विकत घेतात, गरज म्हणून घेत नाहीत. म्हणून तिथल्या वस्तूंची किंमतपण जास्तच असते. ते सगळे शोभेचे सामान असते, टिकाऊ नसते.’’

आपल्याला कशाचीच गरज नाही आहे. आपल्याकडे खराखुरा कुत्रा आहे, पोपट आहे, आजीने करून दिलेली सुंदर कापडी बाहुली आहे. आपल्याला नको काही. कानातले घालणे आपल्याला शक्य नाही, कानात असलेली चांदीची बाळी आईची आठवण होती. ती काढायचीच नाही. दागिने नकोतच, तेव्हा तीही आपली गरज नाहीय, प्रत्येक वस्तू बघताना तिच्या मनात असेच येत होते.

आजोबांनी विचारले, ‘‘चिने, तुला यातलं एखादं घेऊया का?’’

चिनी म्हणाली, ‘‘आजोबा, इथल्या सगळ्याच वस्तू सुंदर आहेत. सुंदर वस्तू सगळ्यांना आवडतातच; पण चंद्र सुंदर दिसतो म्हणून आणायचा असतो का घरी? मला नको यातलं काही. हे दुकानातच छान दिसतंय.’’

हे बोलतानाही तिच्या चेहऱ्यावर कुठेही निराशा नव्हती. अगदी आनंदाने ती बोलत होती. तिच्या समजूतदारपणाचे आजोबांना कौतुक वाटले.

फटाफट फुटणारे पॉपकॉर्न, गुलाबी रंगाचे साखरेचे फुगे, पळसाच्या पानात वाढून ठेवलेली उकडलेली बोरे, कढईत मावणार नाही इतका मोठा पापड; सगळे पाहून चिनी एकीकडे खूष होत होती. हे सगळे अगदी जादूच्या नगरीत आल्यासारखे होते. आकाशाला भिडणारा आकाशपाळणा, गोलगोल फिरणारे हत्तीघोडे, हवेच्या गादीवर धबाधब उड्या मारणारी ती बिनधास्त मुले, निशाणा लावून फुगे फोडण्यास मी-मी करणाऱ्या मुलांची ओढाताण, रिंग फेकून बक्षिसे पटकविण्यासाठी प्रयत्न करणारी मुले-माणसे, जादूचा खेळ, जासूस गधा, मौत का कुआ हे सगळे बघण्यासाठी रांगा लावलेली बायकापोरे, सगळे-सगळे नजरेत साठवून घेत होती चिनी.

आपल्याला काहीएक घ्यायला मिळणार नाही आणि आपल्याला त्याची गरजही नाही हे चिनीने पक्के ठरवले होते. फक्त आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत मिळवणे, हेच तिला हवे होते आणि आजोबा आपल्याला आनंदात बघून खूष झालेत, हेही तिला खूप सुखावत होते. ती जादूची नगरी बघून आणि आनंदाने हसणाऱ्या आजोबांकडे बघून ती आनंदित होत होती.

***

चौथ्या वर्गात शिकत होती चिनी; पण खूप समजदार होती. आपल्या घरची परिस्थिती ती जाणून होती. लहानपणीच तिच्यात मोठेपण शिरले होते. आईवडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा अवघी आठ-नऊ वर्षांची होती चिनी. तेव्हापासून आजोबाआजींजवळच राहत असे ती. तेच तिचा सांभाळ करत. दोघेही थकलेले आणि गरीब. गाई राखायचे काम करून आजोबांना थोडे पैसे मिळत; पण तेवढ्यात काहीच भागत नसे. सरकारकडून काही मदत मिळायची.

बँकेत किती रुपये आहेत, सरकारकडून काही पैसे जमा झाले का, हे जाणून घेण्यासाठी आजोबा बँकेत गेले होते. पैसे जमा झाले तर चिनीला यात्रेतून काही घेऊन द्यावे अशी त्यांची इच्छा होती. चिनीला सोबत घेऊन अन् हातात एक रिकामी पिशवी घेऊन आजोबा आशेने निघाले होते. बँकेत गेल्यावर कळले, की खात्यावर फक्त 441 रुपये जमा आहेत. आजोबांचा चेहरा रडवेला झाला. रिकामी पिशवी बँकेतल्या पंख्याच्या हवेने फडफडत होती, हवा भरलेल्या फुग्यासारखी.

चिनीने आजोबांकडे बघितले आणि तिला खूप वाईट वाटले. आपल्याला काही मिळणार नाही ह्यापेक्षा आजोबांचा रडवेला चेहरा तिला जास्त दुखावून गेला. एक शब्द न बोलता चिनी आजोबांचा हात धरून गुपचूप चालू लागली.

आपण लाडक्या नातीला काही घेऊन देऊ शकणार नाही, ह्या कल्पनेने आजोबा हताश झाले होते. आणि आजोबांचे दुःख पाहून चिनी हताश झाली होती.

आजोबांसोबत बँकेत जायचे म्हणून सकाळी चिनी शाळेत गेली नव्हती. दुपारी मात्र खिन्न मनाने जड पावले उचलत चिनीने शाळेची वाट धरली. शाळेत जातानाही आजोबांचा तो रडवेला चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. आपण पैसे कसे कमावू शकतो हा विचार चिनीच्या मनात थैमान घालत होता.

शाळेत एक पुस्तकवाला पुस्तकांची विक्री करण्यासाठी आला होता. त्याच्या पिशवीत, हातात अन् सायकलवर पुस्तके होती. गुरुजींनी सगळ्या मुलांना पटांगणात बसवले. पुस्तकवाला पुस्तकांची माहिती आणि महत्त्व सांगत होता. रांगोळीचे पुस्तक, मेंदीचे पुस्तक, सामान्यज्ञान, इंग्रजी बाराखडी, मराठी बाराखडी, भाषण, निबंधलेखन, थोर पुरुष अशी कितीतरी पुस्तके तो एकामागून एक उलगडत होता. दोन पुस्तके घेतली, तर एक पुस्तक फ्री देण्याचे तो बोलत होता. चिनीचे ह्या कशात मन लागत नव्हते, आपल्याला ह्यांचा काय उपयोग? आपल्याजवळ पैसे कुठे आहेत? चिनीला पुन्हा आजोबांचा चेहरा आठवला.

तेवढ्यात पुस्तकविक्रेत्याने एक घोषणा केली, ‘‘मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे, जो तीनही प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल त्याला पन्नास रुपये बक्षीस मिळेल.’’

चिनीने कान टवकारले. पन्नास रुपये!!! तिच्या चेहऱ्यावर आशेची एक लहर पसरून गेली. खरंच पन्नास रुपये मिळतील… मला हवे हे बक्षीस. चिनीच्या मनात इच्छा जागृत झाली. आजोबा किती खूष होतील, मला त्यांना द्यायचे आहे हे बक्षीस! जणू ते पन्नास रुपयांचे बक्षीस आपण पटकावले अशा आनंदात ती स्वप्न पाहत होती.

नाही हे स्वप्न नव्हते. पुस्तकवाल्याच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे चिनीने बरोबर दिली होती.

पुस्तकवाल्याने पहिला प्रश्न विचारला-

‘वाजते, पण ऐकू येत नाही? काय असेल ओळखा बघू?’

सगळीकडे शांतता पसरली. डोळ्यांपुढे सगळ्या वस्तू येत होत्या, वाजत होत्या, ऐकू येत होत्या. उत्तर जमेना.

चिनीच्या नजरेसमोर आजोबा शेकोटीवर हात शेकताना आले. ‘‘थंडी वाजली की शेकोटी हा उत्तम उपाय,’’ आजोबा म्हणायचे. तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि उत्तर आले, ‘‘थंडी.’’

चिनीने उत्तर दिले होते.

पुस्तकवाल्यासोबत सर्व शाळेने टाळ्या वाजवून चिनीचे अभिनंदन केले.

दुसरा प्रश्न विचारला गेला-

‘अशी कोणती वस्तू आहे जी फक्त वाढत जाते, कमी होत नाही?’

सगळ्या वस्तू वाढतात, कमी होतात, काही वस्तू वाढत नाहीत, कमीपण होत नाहीत.

चिनीच्या नजरेसमोर पुन्हा शेकोटीवर हात शेकणारे आजोबा आले, त्यांच्यात झालेला संवाद तिला आठवत होता.

‘‘चिने, मी तुझ्याएवढा होतो तेव्हा आपल्या गावात शाळा नव्हती.’’

‘‘आजोबा, आता चला माझ्यासोबत शाळेत.’’

‘‘पोरी, माझं काय वय आहे हे?’’

सगळे कसे चिनीला स्पष्ट आठवत होते.

आजोबांचे वय झालेय. ते लहान होऊ शकत नाहीत.

चिनीच्या तोंडून ‘आजोबा’ शब्द बाहेर पडला. सगळ्यांनी चिनीकडे बघितले.

‘‘आजोबा मोठे होऊ शकतात, लहान होऊ शकत नाहीत,’’ ती बोलली.

‘‘… म्हणजे काय आजी, काकू, मामा, मामी लहान होऊ शकतात होय?’’ पुस्तकवाल्याने प्रश्न केला.

‘‘म्हणजे त्यांचे वय.’’

क्षणाचाही वेळ न दवडता चिनीने दुसरे उत्तर दिले. टीचरनी शाबासकी दिली. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. चिनीला अजूनही आनंद झाला नव्हता, तिच्या आणि आनंदाच्यामध्ये तिसरा प्रश्न अजून अडचण म्हणून उभा होता.

तिसरा प्रश्न… शेवटचा प्रश्न… चिनी तुझ्यासाठीच…. पन्नास रुपये खिशातून बाहेत काढत पुस्तकवाला चिनीला प्रेरणा देत होता.

‘पन्नास फुटाच्या शिडीवरून एक मुलगी पडली; पण तिला अजिबात लागले नाही, हे कसे शक्य आहे?’

शिडीकडे नजर वळण्याआधीच चिनीच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘ती मुलगी पन्नास फुटावरून नाही, तर शिडीच्या पहिल्याच पायरीवरून पडली असेल.’’

घराच्या पायरीवरून आपण घसरून पडलो होतो हे तिला आठवले. घराला एकच पायरी होती.

तीनही प्रश्नांची उत्तरे चिनीने दिली होती. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात चिनीला पन्नास रुपयांचे बक्षीस पुस्तकवाल्याने दिले. आपल्या लहानशा शाळेतली ही लहानशी चिनी किती पटापट उत्तरे देत आहे, ह्याचे टीचरना कौतुक वाटले, आणि आपल्या शाळेची चिनीने लाज राखली ह्या आनंदात टीचरनी आपल्या खिशातून पन्नास रुपये काढून चिनीला बक्षीस दिले.

Chini2

चिनीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. तिचे कशातच लक्ष नव्हते. तिच्या डोळ्यापुढे होते ते आजोबांच्या चेहऱ्यावरील भाव….

कधी एकदा आजोबांना हे पैसे देईन आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहीन असे चिनीला झाले. सगळी मुले पुस्तक घेण्यात व्यस्त असताना चिनीचे पाऊल घराकडे वळले.

धावतच आजोबांना मिठी मारीत चिनीने बक्षीस मिळालेले पन्नास-पन्नास रुपये दाखवले. सगळा वृत्तांत सांगितला. आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला… पैसे मिळाल्याचा नाही तर चिनीची हुशारी पाहून.

***

माझी गुणी नात म्हणून आजोबांनी तिला यात्रेत नेले होते.

 

कृतिका बुरघाटे  | krutika.burghate@gmail.com

लेखिका जि.प.उ.प्रा. शाळा, मसाळा (तुकूम) येथे इंग्रजीच्या शिक्षिका असून मुलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात.