चुचू मांतूची चॉकलेटांची बरणी

‘‘चुचू मांतू, तिकडं बघ काय आहे!’’

Chu-Chu1चुचू मांतूनं लगेच प्रीत बोट दाखवत होती त्या दिशेनं बघितलं. त्याची नजर वळताक्षणी तिनं पटकन त्याच्या ताटलीतल्या बटाट्याच्या चिप्स फस्त केल्या! बिचारा चुचू मांतू*, नेहमीच तिच्या या युक्तीला फशी पडायचा!

प्रीतनं लाडानं त्याचं नाव चुचू ठेवलं होतं. प्रीतला आपल्या छोट्या जगातला सगळ्यात प्रेमळ माणूस म्हणजे चुचू मांतू आहे असं वाटे! तो तिचा सर्वात जवळचा मित्रसुद्धा होता.

ChuCHu5

एके दिवशी प्रीतनं एक विलक्षण दृश्य बघितलं. चुचू मांतू गोळ्या-चॉकलेटांच्या एका बरणीमधून मुठी-मुठी भरून चॉकलेट-गोळ्या काढत होता आणि त्याच्या खोलीच्या खिडकीमधून खाली रस्त्यावर टाकत होता. ती थक्क होऊन ते बघतच राहिली. तो मात्र हसतहसत, पटकन खाली वाकून खालच्या कुणाला दिसणार नाही अशा बेतानं खिडकीच्या कठड्याखाली लपला.

त्याचवेळी रस्त्यावरून आनंदाच्या आरोळ्या ऐकू आल्या!

त्या गल्लीच्या टोकाशी एक शाळा होती. शाळेची मधल्या सुट्टीची घंटा वाजली, की चुचू मांतू हळूच खिडकीखालून जात असलेल्या शाळकरी मुलांच्या अंगावर गोळ्या-चॉकलेटं टाकायचा.

ChuChu6

दुपारच्या जेवणानंतर चुचू मांतू आपली ब्रीफकेस घेऊन ऑफिसला परत जाई. खेळत असलेल्या मुलांच्या बाजूनं तो जायचा, तेव्हा तो त्यांच्याकडे जरासुद्धा बघत नसे. त्यामुळे हा पांढरे-स्वच्छ कपडे घालणारा, काटकुळा, गंभीर दिसणारा माणूसच त्यांना रोज गोळ्या-चॉकलेटं देत असतो, हे त्या मुलांना कधीच कळलं नाही!

एके दिवशी चुचू मांतूचं पोट खूपच दुखायला लागलं. त्याला दवाखान्यात घेऊन जायला लोक आले, तेव्हा मांतूनं प्रीतचा हात एकदा आपल्या हातात घेऊन हळूच प्रेमानं दाबला… तो शेवटचाच.

उदास झालेली प्रीत मग चुचू मांतूच्या रिकाम्या खोलीत जाऊन बसली. तिथल्या जमिनीवर तिला त्याची योगासनांची चटई पसरलेली दिसली.

तिला पूर्वीचा एक दिवस आठवला. त्या दिवशीही प्रीत अशीच मांतूच्या खोलीत आली असताना दोन लांब, काटकुळे पाय तिला हवेत तरंगत असलेले दिसले होते!

ते पाहून ती जोरात ओरडली, ‘‘धावा, धावा. लौक्कल या. इकले चुचू मांतू उलटापालटा झालाय!’’

ते ऐकून आई आणि मावी धावत त्या खोलीत आल्या खऱ्या; पण मग तिथलं दृश्य पाहून त्यांना हसू आवरेना.

ChuChu7

‘‘अगं प्रीत, चुचू मांतू उलटापालटा झालेला नाहीये काही,’’ आई म्हणाली.

‘‘तो योगासनं करतोय,’’ मावीनं समजावून सांगितलं होतं.

‘‘गोगा,’’ तो नवा शब्द कसाबसा उच्चारत प्रीत डोळे विस्फारून चुचू मांतूकडे पाहत राहिली होती. आपल्या दोन हातांच्या तळव्यावर त्यानं शरीर कसं तोललं होतं. जणू उडायच्या तयारीत असलेला एखादा पक्षीच!

प्रीतनं दु:खानं क्षणभर डोळे मिटून घेतले. चुचू मांतूच्या जाण्यानं तिच्या मनात तयार झालेली पोकळी कशानंच भरून निघणार नव्हती.

‘‘कुठं गेला असेल चुचू मांतू? आणि त्याचा प्रेमळपणा…?’’ प्रीतला प्रश्न पडला.

तिनं योगासनांची चटई वर उचलून पाहिलं. पलंगाच्या बाजूचे ड्रॉवर तपासले. खोलीतलं कपाट उघडून हुडकलं…

‘‘अरेऽ हे काय?’’

तिच्या डोक्यावर वरून एक पांढरा शर्ट पडला. चुचू मांतूकडे दोनच पांढरे शर्ट आणि जोडीला दोन पांढऱ्या पँट होत्या. तो आलटून पालटून रोज एकेक जोड घालायचा.

आता मात्र त्याच्या कपाटात शर्ट-पँटचा एकच जोड उरलेला होता नीट इस्त्री करून ठेवलेला…

प्रीतनं शर्टची नीट घडी केली आणि तो पुन्हा कपाटात ठेवला.

तितक्यात तिला दिसली चुचू मांतूची गोळ्या-चॉकलेटांची बरणी!

Chu-Chu4

प्रीतचे डोळे भरून आले. तिचे अश्रू ओघळून बरणीत पडले.

टण्ऽटण्ऽऽटण्ऽऽऽ तेवढ्यात जवळच्या शाळेची घंटा वाजली. आता मधली सुट्टी झाली होती. आता मुलं चुचू मांतूच्या खोलीच्या खिडकीखालून जातील.

पण त्यांना आता गोळ्या-चॉकलेटं कोण देणार?

आहे ना आहे. अजून कोणीतरी आहे! प्रीतनं चटकन उडी मारली.

तिनं बरणीतून मूठभर गोळ्या घेतल्या. त्या खिडकीतून खाली टाकल्या आणि पटकन वाकून ती कठड्याखाली लपली. तिच्या गालांवर समाधानाचं हसू उमललेलं होतं.

ChuChu4

तिकडं खाली रस्त्यावरून आनंदाच्या आरोळ्या उमटत होत्या!

 

अदिती राव

स्टोरीवीव्हर’वरून साभार

स्टोरीवीव्हर हे प्रथम बुक्सचे कथांचे इ-भांडार आहे. इथे लहान मुलांसाठीच्या विविध भारतीय भाषांमधील कथा वाचायला मिळतात, त्याचबरोबर नव्या कथाही लिहिता येतात, त्यांची चित्रे काढता येतात किंवा दुसऱ्या भाषेत अनुवादही करता येतात. प्रथम बुक्स ही ना-नफा तत्त्वावरील प्रकाशन संस्था मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी ह्यासाठी प्रयत्नशील आहे. https://storyweaver.org.in