टिंकू

सकाळी असो की दुपारी असो, झोपेतून उठल्यावर डोळे उघडण्याआधी पहिलं भोकाड पसरायचं असतं, असं टिंकूला वाटतं. त्याशिवाय तो जागाच होत नाही.

आजही टिंकू सकाळी मिटलेल्या डोळ्यांनीच उठला. उठला म्हणजे उठून अंथरुणावरच बसून राहिला. मग नेहमीप्रमाणे त्यानं गळा काढला.

आई अंघोळीला गेली होती, ती थोड्या वेळानं मोरीतून बाहेर आली. घाईघाईनं तिनं टिंकूला दंडाला धरून उचललं आणि सरळ मोरीत नेऊन उभं केलं. पटापट त्याचे कपडे काढले, बंबाचा नळ बादलीत सोडला आणि ओरडून ती बाबांना म्हणाली, ‘‘ह्येला आंगुळ घालता का? माजी निगायची येळ झालीये!’’

बाबा बुटांना पॉलिश करत होते. ते करून झाल्यावर ते मोरीत आले. बादलीत हात घालून म्हणाले,‘‘मस्त गरम हाये.’’ मग लोटाभर पाणी त्यांनी टिंकूच्या डोक्यावर ओतलं, भुडुश्श!! त्याबरोबर टिंकूनं डोळे उघडले.

काय चाललंय हे टिंकूला कळायच्या आत बाबांनी त्याला खळाखळा धुतलं, टॉवेलनं खसाखसा पुसलं अन् म्हणाले, ‘‘जाय आता, कपडे घाल.’’

टिंकू आता नीट जागा झाला होता, त्यामुळे पहिली गोष्ट त्याला कळली ती म्हणजे आपल्याला भूक लागली आहे. अगदी जोराची भूक. त्यानं ताबडतोब भोकाड पसरलं. रडतच चड्डी घातली, शर्ट घातला, आरशात न बघताच केसांचा भांगही पाडला.

रडतच तो घरापुढच्या ओट्यावर जाऊन बसला. बाबा कामावर गेले. आईही निघाली. तिनं पर्समधून दहा रुपये काढले आणि टिंकूच्या हातात कोंबले. ‘‘हे घे अन् खा जा कायतरी. मग राजूकडं जा आन् दोगं साळंला जा, बरं का!’’

तिनं रडणाऱ्या टिंकूच्या हातात दप्तर दिलं, त्याची पापी घेतली अन् घराला कुलूप लावून ती गेली.

दहा रुपयांच्या नोटेकडे पाहून टिंकूचं रडं थांबलं. काय करावं याचं? त्याच्या डोळ्यांसमोर काही चित्रं तरळली: चॉकलेट, लाडू, चकली, बांबू… तसा तो ताडकन् उठला आणि कोपऱ्यावरच्या मारवाड्याच्या दुकानात गेला.

Tinku1

‘‘दोन बांबू क्यवड्याला दिले?’’

उत्तर न देता मालकांनी दोन बांबू आणि पाच रुपयाचं नाणं टिंकूच्या हातावर ठेवलं.

बांबू पोटात गेल्यावर टिंकूला एकदम भारी वाटलं. तो राजूकडे गेला. दोघं बाजूच्या गल्लीत गोट्या खेळले. खेळताखेळता टिंकूच्या खिशातून पाच रुपयांचं नाणं खाली पडलं. ते पाहून त्याला पुन्हा पोटात छोटा खड्डा पडलाय असं जाणवलं. ‘आलोच’ म्हणत त्याने दुकानाकडे धूम ठोकली.

एक रुपयाची डॉलर चकली घेऊन टिंकूनं दुकानातच कडामकुडुम करत ती खाऊन टाकली. उरलेले पैसे खिशात टाकून हात झटकत तो बाहेर आला. तेवढ्यात त्याचं दप्तर घेऊन राजू आला आणि दोघे शाळेला निघाले. वाटेत दोघांनी एकेक रुपयाची पेप्सी घेतली. शाळेत पोहोचेपर्यंत ती चोखून संपली.

शाळेच्या आत शिरण्याआधी दोघांनीही एकेक रुपयाची चनेमने बोरं घेतली. ‘‘वर्गात खायची, काय!’’ टिंकू म्हणाला.

राजू टिंकूचं सगळंच ऐकतो. मान डोलावत त्यानं ते खिशात भरले.

घंटा झाली. तास सुरू झाला. बाई फळ्यावर लिहिण्यासाठी वळल्या की टिंकू एक चनेमने खायचा अन् राजूला त्याची बी फेकून मारायचा. पुढच्या वेळी राजू टिंकूला मारायचा. मग दोघंही मान खाली घालून खुसूखुसू हसायचे.

शाळा सुटली, दोघं घरी निघाली. राजू म्हणाला, ‘‘मज्जा आली नं आज? भारी एकदम. आईनं पाच रुपये दिलेवते. संपले.’’

टिंकू म्हणाला, ‘‘मला धा दिलेवते, एक हाये अजून, हा बग! चल, कच्चा आम खाऊ.’’

दोघांनी टकल्याच्या टपरीवर जाऊन कच्चा आम घेतला. तो चघळत चघळत दोघं घरी परत आले.

टिंकूची आई घरात होती. साड्यांना फॉल लावत होती. टिंकू पाठीमागून आईच्या गळ्यात पडला.

‘‘आज लय लाडात आलाईस. काय झालं साळंत?’’ आईनं विचारलं.

‘‘मज्जा!’’ टिंकू झुलत झुलत म्हणाला. थोडा वेळ तसाच गेला. मग टिंकूनं हळूच आईच्या कानात विचारलं, ‘‘आये!… आये गंऽऽ! उद्याच्याला किती पैसे देणारेस?’’

Tinku2

 

 

रेशमा लिंगायत

लेखिका पालकनीतीच्या खेळघरातील माजी विद्यार्थिनी असून आता खेळघरात शिक्षिका आहेत.

चित्रे : भार्गव कुलकर्णी