भाकर

भयाण थंड अशी ती काळरात्र कशीबशी संपली. सूऱ्याची कोवळी किरणं सर्वदूर पसरली. फुलाफुलांच्या साड्या नेसलेल्या त्या दोन बायका शेतात आल्या. पिवळी फुलं लगडलेल्या मोहरीच्या झाडांना थंडीनं बधीर करून टाकलं होतं. दोघी चूपचाप मोहरीची पानं तोडू लागल्या. दवानं भरलेली ती पानं म्हणजे त्यांच्या म्हशींची ‘भाकर’ होती नं; तीच न्यायला त्या आल्या होत्या.

पानं तोडणाऱ्या त्या बायकांना घारीनं बघितलं. आपल्या राखाडी पंखांवरील दवबिंदूंचा पांढुरका थर तिनं पंख फडफडून झटकून टाकला. घार आपल्या पिल्लांसाठी भाकर शोधत होती.

शेतात साप दिसला, तशी त्या शेतकरी बायका जागेवरच थबकल्या. साप निपचित पडलेला होता. त्या तिथून पुढे निघाल्या. घिरट्या घालणाऱ्या घारीनं झेप घेतली आणि सापाला तिथून उचललं, ते थेट आपल्या घरट्यात नेऊन ठेवलं. साप तिच्या पिल्लांची ‘भाकर’ होता.

थंडीनं जणू निष्प्राण झालेल्या सापामध्ये घरट्यातल्या उबेनं प्राण फुंकले. त्यानं घारीच्या पिल्लांना खाऊन टाकलं. सापाला त्याची ‘भाकर’ मिळाली.

घारीनं किंकाळी फोडली. दु:खानं ती वेडीपिशी झाली. आकाशात वरवर जात आक्रोश करू लागली, ‘माझ्या बाळांसाठी मी भाकर आणली; भाकरीनंच त्यांना खाऊन टाकलं.’

वर आभाळात ढग फाटले, फुलाफुलांच्या साड्या नेसलेल्या त्या शेतकरी बायका शहारल्या. एकदा त्या गडगडणाऱ्या आभाळाकडे बघत होत्या, तर एकदा गव्हाच्या डवरलेल्या शेताकडे. ते शेत म्हणजे त्या शेतकऱ्यांची वर्षभराची ‘भाकर’ होती. त्यावर आता गारांचा मारा होऊ लागला.

साड्यांवरची फुलं त्या माऱ्यानं जणू विदीर्ण होऊ लागली.

मूळ कथा: रोटी

प्रभात

साइकिल’ ह्या लहान मुलांसाठी असलेल्या हिंदी द्वैमासिकातून (एप्रिल-मे 2019) साभार