मित्र भेटला

संजू आणि राजू हे दोघं पाठचे भाऊ होते हे त्यांच्या नावांवरूनच लक्षात यायचं. दोघांमध्ये जेमतेम दीडेक वर्षाचं अंतर असेल. संजूला उशिरा, म्हणजे राजूबरोबरच शाळेत घातलं होतं. दिसायला इतके सारखे, की कोण थोरला आणि कोण धाकटा ते पटकन ओळखू यायचं नाही. शिवाय, त्यांचं खाणं, खेळणं, शाळेत जाणंयेणं, अभ्यास करणं, दंगा करणं असं सगळं बरोबरच चालायचं. रस्त्यात खेळत असले, की तिथून येणारेजाणारे लोक, ओळख नसली तरी, ‘तुमी जुळी हाएत का रे?’ असं विचारल्याखेरीज पुढं जायचेच नाहीत.

दोन घरं सोडून पलीकडे बाळू राहत होता. संजू-राजूचा दोस्त, अगदी सख्खा. संजूपेक्षा थोडासाच मोठा, तरीही तिसरीतच आणि त्यांच्याच वर्गात होता. तिघं सतत एकमेकांना चिकटलेले असायचे. दोन वेळा जेवणं आणि रात्री झोपणं एवढंच आपापल्या घरी. तिसरीत जाईपर्यंत तिघांची अंघोळही जवळच्या नळकोंडाळ्यावर एकत्रच चालायची. मग सगळ्यांसमोर चड्डी काढायची लाज वाटायला लागल्यापासून ते काम तेवढं घरच्या मोरीत व्हायला लागलं. बाळू दिसायला संजू-राजूपेक्षा अगदीच वेगळा होता म्हणून, नाही तर लोकांनी ‘तुमी तिळी हाएत का रे?’ असंच विचारलं असतं.

शाळेतल्या खांडकेमॅडमनी मात्र हे त्रिकूट फोडायचंच असं ठरवलं होतं. त्यांनी वर्गातल्या तीन टोकांच्या जागा त्या तिघांना दिल्या होत्या; पण तिथूनही संधी मिळेल तेव्हा त्यांच्या खाणाखुणांच्या भाषेत गप्पा चालायच्याच. तशी संजू-राजूला शाळा आवडायची. खांडकेमॅडम, विशाखाताई, दाभाडेसरही आवडायचे; पण अभ्यास… अं हं! तो का करायचा हेच त्यांना कळायचं नाही. वह्यापुस्तकांचा उपयोग पिंपळाची पानं, फुलांच्या पाकळ्या, पक्ष्यांची पिसं ठेवण्याकरता जास्त चांगला होतो असं त्यांचं मत होतं.

बाळूचं मात्र तसं नव्हतं. त्याला शाळाही आवडायची आणि अभ्यासही आवडायचा. त्याला सगळ्यात काय आवडत असेल? गणित! गणिताच्या दाभाडेसरांचं अक्षर म्हणजे काय सांगावं! त्यांनी फळ्यावर लिहिलेलं गणित एकट्या बाळूलाच वाचता यायचं आणि मग त्याचे काळेभोर आणि चमकदार डोळे लकाकायचे; दूध दाखवल्यावर मांजराचे लकाकतात ना, तसे. मग तो फटाफट गणित सोडवून टाकायचा. संजू-राजूला त्याचं हे काही केल्या कळायचंच नाही. गणित कसं काय आवडतं कुणाला!

पण ते काहीही असलं, तरी एकमेकावाचून तिघांचं चालायचं नाही.

एके दिवशी सकाळी घराजवळच्या एका बंद दुकानाच्या ओट्यावर तिघं गोट्या खेळत होती. संगीतानं – संजू-राजूच्या आईनं – एकदा हाक मारून जेवायला येण्याची आठवण केली; पण ‘आलो की गं!’ म्हणून मुलं खेळतच राहिली. पलीकडे चौकात काहीतरी गडबड चालली होती तिकडेही त्यांचं लक्ष नव्हतं.

काही मिनिटं गेली आणि एक मोटरसायकल ओट्यापाशी येऊन थांबली. बाळूनं मान वर करून पाहिलं, तर दोन पोलीस! पाठोपाठ माणसांचा घोळका आला. मोटरसायकल चालवणाऱ्या इन्स्पेक्टरनं गाडी बंद केली. तिन्ही मुलांकडे आळीपाळीनं नीट पाहिलं. मग बाळूकडे बोट करून मागल्या सीटवर बसलेल्या हवालदाराला विचारलं, ‘‘हा?… काय रे, हाच का तो?’’

हवालदार पुटपुटल्यासारखं म्हणाला, ‘‘अं… म्हणजे दिसतोय तरी तसाच की!… आसल… हाबी आसल…’’

इन्स्पेक्टरनं खुणेनं बाळूला जवळ बोलावलं. बाळू हळूहळू पावलं टाकत जवळ गेला.

‘‘घरी कोण असतं तुझ्या?’’ इन्स्पेक्टरनं दरडावून विचारलं.

‘‘आई… कामावर गेलीय…’’

‘‘ह्याला घेऊन ये चौकीवर. आईला बोलावून घे,’’ असं हवालदाराला सांगून इन्स्पेक्टरनं गाडी सुरू केली आणि तो भर्रकन निघून गेला. हवालदारानं बाळूची मानगूट पकडली. ‘‘चल रे! पळून जायाचं न्हाई, नाय त माझ्याशी गाठ आहे, काय! ह्याच्या आईला कुणीतरी चौकीवर पाठवा?’’ असं गर्दीकडं पाहून तो ओरडला आणि बाळूला ढकलत नेऊ लागला.

Mitra2

‘‘काय झालं वो, हवालदार?’’ पानटपरीवाल्या करीमनं बसल्या जागेवरूनच ओरडून विचारलं.

‘‘चोरी न् काय?’’ हवालदार म्हणाला.

‘‘आं? एवढ्या लहान्या लेकरानं केली?’’

हवालदारानं काही उत्तर दिलं नाही.

संजू आणि राजू गोंधळून हा प्रकार बघत होते. वस्तीत पोलीस येणं, त्यांनी माणसं धरून नेणं हे काही त्यांना नवीन नव्हतं; पण बाळूला? त्याला तर शाळा आवडते, अभ्यास आवडतो, गणितसुद्धा आवडतं. त्याला का?

संजूनं राजूचा हात धरला आणि दोघं घरी आले. आईला पाहताच राजू ओठ काढून रडायला लागला.

‘‘आलात? वाजले किती बगा!… तुला काय झालं रडायला? शाळंची वेळ झाली की तुमची नाटकं सुरू?’’ आई ताटं मांडत म्हणाली, ‘‘हात धुवा, जा?’’

मुलं जागची हलेनात. संजूचेही डोळे भरून आले होते. काहीतरी वेगळंच झालंय हे आता संगीताच्या लक्षात आलं. ‘‘आरं बोला की तोंड उघडून! काय झालंय काय?’’

आता संजूनंही गळा काढला. ‘‘बाळूला पोलिसांनी नेलंऽऽऽ!?’’

थोडा वेळ संगीता मुलांकडे नुसतंच बघत राहिली. काय बोलावं ते तिला कळेना. मग उठून ती मुलांजवळ आली. पदरानं दोन्ही मुलांचे डोळे पुसत म्हणाली, ‘‘तुम्ही जेवा जा पट्दिशी आन् शाळंला जा. रडू नगा; बाळूला काही होत नाही. तुमचं होस्तंवर मी आलेच.’’

चौकातल्या ‘अंजली मिनी मार्केट’मध्ये सुधाभाबी गल्ल्यावर बसलेल्या होत्या. दुकानाच्या पायऱ्या चढून संगीता आत गेली.

‘‘भाबी, पोलीस आलेवते? दुर्पदीच्या बाळूला नेलं म्हनत व्हती पोरं.’’

‘‘पाह्यलं ना बाई मी! काय करंल दुर्पदी आता? ह्ये लोक गरिबाच्याच मागं लागतात,’’ भाबी म्हणाल्या.

‘‘पन झालंय काय? का नेलं त्येला?’’

‘‘डहानूकर कालनीत चोरी झाली. त्या चोरट्यांसंगं बाळू व्हता म्हनत व्हते.’’

‘‘वाट्टंल त्ये!… झाली कवा चोरी?’’

‘‘काय की!… तो बग, सागर येतोय बोराट्यांचा. त्याला ठावं आसल. तोच दुर्पदीला बोलवाय गेलावता.’’

संगीतानं सागरला हाक मारली. तो आला.

‘‘परवा, म्हंजे सोमवार होता नाय का… सोमवारी झाली चोरी,’’ सागरनं सांगितलं, ‘‘दुपारची वेळ आन् तळमजल्यावरचं घर बंद. बिल्डिंगीच्या मागल्या बाजूनं चोरटे गेले, खिडकीच्या जाळीतून लहान पोराला आत सोडलं न…’’

‘‘कुनी पाह्यलं का? तो बाळूच व्हता कशावरून?’’ संगीता म्हणाली.

‘‘क्यामेरे आसतात न लावलेले, त्यात दिसलं म्हनतात.’’

‘‘आरं कर्मा! बाळू न्हाई रे त्यातला,’’ असं पुटपुटत संगीता दुकानातून बाहेर पडली. घरात शिरेपर्यंत तिची बडबड चालूच होती. ‘‘सरळ चौकीवरच? चौकशी करनं न्हाई, कुनाला विचारनंपुसनं न्हाई… पोरगं भेदरून नसंल गेलं?’’

‘‘आये, बाळूला का गं नेलं पोलिसांनी?’’ संजूनं हात धुताधुता विचारलं.

‘‘चोरी केली म्हने त्यानं,’’ संगीता ताटं उचलत म्हणाली. मग एकदम वळून तिनं मुलांकडे रोखून बघितलं. संजूसमोर येऊन ती गुडघ्यावर बसली आणि संजूचे खांदे पकडून तिनं जरा करड्या आवाजात विचारलं, ‘‘बाळूनं केली आसल चोरी? शाळंत कुनाचं काय उचललंवतं कधी त्येनं? खरं सांगा. तसं आसल तर यापुढं त्येच्यासंगट बोलनं, खेळनं बंद… माज्याशी गाठ हाय, सांगून ठेवते.’’

संजूनं झटक्यात खांदा सोडवून घेतला न् तो ओरडला, ‘‘कधी गं केली चोरी? लबाड बोलतात ते पोलिसवाले?’’

‘‘सोमवारी दुपारी, त्या डहानूकर कालनीत…’’

‘‘खोटं! बाळूनं तसलं कायपण कधीपण केलं नाहीये,’’ संजू पुन्हा ओरडला. धाकट्या राजूचे डोळे पुन्हा भरून आले.

संगीता एकदम विरघळली. राजूला जवळ ओढून तिनं त्याचे डोळे पुसले. ‘‘बरं बरं, रडू नगं, आं! तुम्ही जावा बरं शाळंला?’’

‘‘आये, पोलीस मारत्याल का गं बाळूला?’’ राजूनं रडवेल्या सुरात विचारलं.

‘‘जेवलात न नीट? जावा आता,’’ संगीता उत्तर देण्याचं टाळत म्हणाली. मुलं माना खाली घालून निघाली. ‘‘आन् ऐका, संजू-राजू, कुनी बाळूबद्दल इचारलं तर ‘म्हाइत नाई’ म्हनायचं, बरं का! न्हाई तर तुमालाबी नेत्याल चौकीत चौकशीला. आपल्याला नगं त्ये. पळा आता.’’

खांडकेमॅडमच्या पाठोपाठच संजू-राजू वर्गात शिरले. हजेरी घेताना मॅडमनी बाळूच्या जागेकडे पाहत विचारलं, ‘‘आज जतकर आला नाही का रे? आजारीबिजारी नाहीये ना?’’

संजू-राजूनं एकमेकांकडे पाहिलं. संजू हळूच म्हनाला, ‘‘म्हाइत नाही, मॅडम.’’

‘‘अरे, रोज बरोबर येता ना तुम्ही? माहीत कसं नाही? मित्राची चौकशी करावी. आज शाळा सुटल्यावर जा त्याच्याकडे, बरं का?’’

मॅडम किती चांगल्या आहेत! त्यांना खरं कारण कळलं तर? एकदम संजूच्या घशात दुखलं. आपल्याला रडू येणार असं वाटलं. राजू त्याच्याकडेच पाहत होता. आपण रडलो तर राजूही रडेल अन् मग सगळ्यांना सगळं कळेल. संजूनं ओठ घट्ट आवळले आणि डोळ्यांतलं पाणी आवरलं.

तिसरा तास भूगोलाचा अन् मग छोटी सुट्टी.

‘‘सोमवारी घेतलेल्या चाचणीचे पेपर तपासून आणलेत मी,’’ असं म्हणून भूगोलाच्या तांबटसरांनी पेपर वाटायला सुरुवात केली.

‘‘बाळू जतकर! सरांनी नाव घेतलं.’’

‘‘गैरहजर हाये, सर?’’ मुलं एकाच सुरात ओरडली.

‘‘बरं. तू… काय रे नाव तुझं?’’

‘‘संजू, सर?’’ मुलं पुन्हा ओरडली.

‘‘हां, तेच. देशील का त्याला पेपर? जवळ राहता नं तुम्ही?’’

काही न बोलता संजूनं पेपर घेतला. जागेवर बसल्यावर त्यानं तो पाहिला. पुन्हा एकदा पाहिला. बाळूचं सगळं अगदी नीटनेटकं असायचं. पेपरवर पूर्ण नाव, इयत्ता, सोमवार, तारीख, विषय… सोमवार… तारीख…

‘डहानूकर कालनीत… सोमवारी दुपारी… चोरी केली म्हनं त्यानं… सोमवारी…’ संजूला आईचे शब्द आठवले… ‘बाळूनं केली आसल चोरी?… त्याच्यासंगट बोलनं, खेळनं बंद…’

संजूच्या डोक्यात काहीतरी चमकून गेलं आणि तो छोट्या सुट्टीची वाट पाहायला लागला. बाळूच्या पेपरची नीट घडी घालून त्यानं ती खिशात ठेवली.

सुट्टीची घंटा झाली. राजूला काही कळण्याआत संजू वेगानं वर्गाबाहेर पळाला. शाळेच्या मुतारीमागच्या कुंपणाच्या तारा मोठ्या वर्गांमधल्या मुलांनी वाकवल्या होत्या. तिथून ती मधल्या सुट्टीत बाहेर सटकायची. संजू मुतारीमागं पोचला; पण त्याआधीच मुलांचं एक टोळकं तिथं उभं होतं.

‘‘ए बारक्या, कुठं चालला? सांगू का चौकीदाराला?’’ एकानं संजूला हटकलं. एरवी तो बिचकला असता; पण आज तो कुणालाही घाबरणार नव्हता.

‘‘गनिताचं पुस्तक घरीच राह्यलंय. सर वर्गाबाहेर काढत्याल. दोन मिंटात आनतो,’’ असं म्हणून त्या मुलाला जवळजवळ ढकलून संजू कुंपणातून बाहेर निसटला.

कुठल्याही रस्त्यानं गेलं तरी घर शाळेपासून जवळच होतं. त्यात जीव खाऊन पळत सुटलेला संजू तीन मिनिटांतच घरी पोचला. घर बंद! आता?

त्यानं आजूबाजूला पाहिलं, तर बाळूच्या घराचं दार उघडं दिसलं. तो तिकडे धावला. आत बाळूची आई डोकं धरून भिंतीशी बसली होती न् भोवती तिघीचौघी शेजारणी बसल्या होत्या. त्यात संगीताही होती.

‘‘काय रे? मधीच असा आलास शाळा सोडून…?’’

तिचं वाक्य पुरं होण्याआत संजूनं खिशातला पेपर काढून तिच्यापुढं धरला आणि धापा टाकत तो म्हणाला, ‘‘सोमवारी चाचणी… बाळूचा पेपर हाये… सोमवारी तो शाळेत व्हता… पोलिसान्ला दाखव… मी पळतो, सुट्टी संपल पाच मिंटात…’’

Mitra1

आणि तो शाळेच्या दिशेनं पळत सुटला. आता त्याला वाऱ्याच्या पंखावर उडत असल्यासारखं हलकंहलकं वाटत होतं.

कुंपणापाशी मोठ्या मुलांचं टोळकं होतंच; पण त्यांची कुंपणाकडं पाठ होती. संजू हळूच कुंपणाच्या फटीतून आत शिरला आणि वर्गाकडं निघाला. तेवढ्यात मागून मघाच्या मुलाची हाक आलीच. ‘‘काय रे, ए बारक्या, आणलं का गणिताचं पुस्तक? कुठाय, दाखव?’’ संजूनं लांबूनच त्याला हाताचा अंगठा नाचवून दाखवला आणि तो सुसाट वर्गाकडं पळाला.

संध्याकाळी संजू-राजूचे बाबा वस्तीतल्या चार मोठ्या माणसांना घेऊन चौकीवर गेले. पोलिसांना बाळूचा पेपर दाखवला.

‘‘त्यानंच लिहिलाय हा पेपर?’’ इन्स्पेक्टरनं कागद उलथापालथा करून पाहिला.

‘‘हवं तर शाळंत चौकशी करून खात्री करून घ्या, साहेब. पोरगं हुशार हाये, लय गुनाचं हाये…,’’ संजू-राजूचे बाबा म्हणाले.

‘‘ते बघतो आम्ही, गुणाचं आहे की गुण उधळणारं आहे ते. आत्ता त्याला घेऊन जा. सकाळी पुन्हा हजर करा, नाही तर रिमांडहोममध्ये…’’

‘‘करतो की हजर, साहेब. चल, बाळा.’’

दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन पोलिसांनी खांडकेमॅडमकडे, तांबटसरांकडे चौकशी केली; मग चोरी झालेल्या घरी बाळूला नेलं. तिथं त्यांच्या लक्षात आलं, की घराच्या खिडक्यांच्या जाळ्या इतक्या लहान होत्या, की त्यातून बाळू आत शिरणं शक्यच नव्हतं. वस्तीतल्या सगळ्यांनीच बाळूची बाजू घेतल्यावर मग कुठं त्यांची खात्री पटली आणि त्यांनी त्याला सोडलं.

झाल्या प्रकारानं बाळू हबकून गेला होता. आपल्याला चोर ठरवलं, वस्तीतल्या लोकांदेखत ओढत चौकीवर नेलं, हवालदारानं कान पिरगळला ह्या अपमानानं त्याचं मन खोल जखम झाल्यासारखं ठणकत होतं. तो संजू-राजूशीही बोलला नाही; शाळेचं तर नावही घ्यायला तयार नव्हता. त्याची आईही घाबरली होती.

अखेर तिनं बाळूला गावी त्याच्या मामाकडं सोडून यायचं ठरवलं. ते दोघे निघाले तेव्हा रडवेल्या झालेल्या संजू-राजूला जवळ घेऊन दुर्पदी स्वत:च खूप रडली. म्हणाली, ‘‘पोरांनो, तुमच्यामुळं माजा बाळू वाचला. तुम्हीच त्याचे खरे भाऊ हाएत. धास्तावला हाये त्यो आत्ता; पर थोड्या दिसांनी समदं नीट व्हईल, आत्ता जाऊ द्या त्येला.’’

आणि बाळू गेला. मान खाली घालून, कुणाशीही न बोलता गेला. त्यानं मागं वळूनही पाहिलं नाही. संजू-राजूला ते समजत होतं अन् तरीही समजत नव्हतं.

तीन आठवड्यानंतर दुर्पदी परत आली, स्वत:च्या घरी जाण्याआधी ती संजू-राजूकडेच आली. घरच्या शेतातली भाजी, शेंगा, जांभळं भरलेली पिशवी संगीतापुढं ठेवली. मग संजू-राजूला जवळ घेऊन तिनं दोघांचेही चेहरे कुरवाळले. दुसऱ्या पिशवीतून एक कागदाचं पाकीट काढून संजूच्या हातात दिलं अन् म्हणाली, ‘‘हे तुमच्यासाठी, बाळूनं दिलंय.’’

ते चुरगळलेलं पाकीट उघडून संजूनं पाहिलं आणि त्याचा चेहरा एकदम खुलला.

‘‘मला दे की रे?’’ राजूनं दोन्ही हात पुढे केले.

संजूनं पाकीट उलटं केलं. चिमुकल्या, सुंदर रंगीबेरंगी नाजूक पिसांचा पाऊसच राजूच्या ओंजळीत पडला.

‘‘ऑऽऽऽ?’’ आनंदानं मोठे डोळे करून राजूनं ती हवेत उधळली. हरवलेला मित्र दोघांनाही पुन्हा भेटला होता.

mitra3.jpg

shubhada_joshi.jpg

शुभदा जोशी  | shubhada.joshi6@gmail.com

लेखिका पालकनीती परिवारच्या विश्वस्त आणि खेळघर प्रकल्पाच्या समन्वयक आहेत.

चित्रे: भार्गव कुलकर्णी