शेत विकलं

मी फक्त शेत विकलं.

धाकट्याचं शिक्षण, वडलांचं आजारपण,

ताईचं लग्न, आईचं म्हणणं,

म्हणून मी शेत विकलं.

शेतासोबत शेतावरचं आभाळही गेलं,

कसं सांगू आभाळानं सोबत काय नेलं…

पावसाचं पाणी, पक्ष्यांची गाणी,

मातीचा वास, चिंब भिजलेला श्वास…

माझ्याजवळ ह्यातलं काहीच नाही,

शेतच नाही तर नांगरणी नाही

बियाणाची पेरणी नाही, आकाशच नाही

म्हणून आकाशाला गवसणी नाही.

आठवण आहे उरलेली

आकाशाची, शेताची,

बांधावरल्या झुडपाची

विहिरीकाठच्या वेताची.

वास्तवाचा आधार नाही

त्या आठवणींना शाप असतो,

काळासोबत पुसटायचा

त्यांचा रिवाज असतो.

आभाळातले पक्षी उडाले

गेलेले परत येत नाही

वडील पुन्हा आजारी

विकायला आता

माझ्याजवळ शेत नाही…

 

संजीवनी कुलकर्णी | sanjeevani@prayaspune.org

बुकवर्मच्या टॉर्चलाईट ह्या इ-अंकातील नरेश सक्सेना ह्यांच्या ‘इस बारिशमें कवितेचा स्वैर अनुवाद