स्पार्टाकस | मिलिंद बोकील

मी ओट्यावर उभं राहून बाबांची वाट बघत होतो.

सहा वाजून गेले होते. एरवी बाबा यायची वेळ म्हणजे सात-सव्वासात; पण आज ते लवकर येणार होते. कारण मला घेऊन ते पुन्हा व्हीटीला जाणार होते; स्पार्टाकस बघायला. तो पिक्चर लागून आता दोन आठवडे होऊन गेले होते. आज बुधवार होता. शेवटचे दोन दिवस राहिले होते. शुक्रवारी तो बदलला असता. खरं तर रविवारी जायचं होतं; पण त्या दिवशी त्यांना नेमकं आत्याकडे जावं लागलं होतं. आमच्या सहावीच्या पुस्तकात स्पार्टाकसचा धडा होता. तो पिक्चर आला तेव्हा तेच म्हणाले, की आपण तुला हा पिक्चर दाखवू.

मी आतमध्ये आलो.

‘‘अजून कसे नाही आले?’’ मी आईला म्हणालो.

‘‘येतील.’’ ती आमटी ढवळता ढवळता म्हणाली. कांदा घातलेल्या आमटीचा वास सगळ्या घरभर पसरला होता. आम्हाला जेवून निघायचं होतं म्हणून तिनं लवकर करायला घेतलं होतं.

मी परत ओट्यावर जायला निघालो. जाता जाता नंदूवर नजर टाकली. तो आईच्या हातचे सटके खाऊन, लाल-रडक्या डोळ्यांनी, कॉटच्या कोपऱ्यात धुमसत बसला होता. दुपारपासूनच त्यानं हट्ट धरला होता की मलासुद्धा न्या म्हणून. त्याला कितीदा तरी समजावून सांगितलं, की आमच्या सहावीच्या पुस्तकात धडा आहे म्हणून मला नेणार आहेत, तरी त्यानं आपला धोशा सोडला नव्हता. तो नेहमीप्रमाणे हातपाय झाडून आरडाओरडा करायला लागला तेव्हा मग आईनं दिले होते सटके. त्याला रडताना पाहून मला वाईट वाटलं होतं. मी त्याला म्हटलं होतं, की परत आल्यावर तुला सगळी स्टोरी सांगेन म्हणून; पण तरीही त्यानं करायचा तो गोंधळ केला होताच. पमी फरशीवर सतरंजी टाकून अभ्यासाचं सोंग करत बसली होती. ती दुसरीत. तिला काही कळत नव्हतं; पण नंद्यानं खाल्लेला मार बघून ती शहाण्यासारखी गप्प बसली होती.

मी परत ओट्यावर गेलो. अंधार पडायला लागला होता. समोरच रस्त्यावरचे आणि पलीकडच्या बिल्डिंगमधले दिवे लागले होते. शो रात्रीचा होता, पण बाबा आल्या आल्या लगेच आम्हाला निघायचं होतं. त्यांचं ऑफिस त्यावेळी हुतात्मा चौकात होतं. तिथून ते व्हीटीला येणार, लोकल पकडणार आणि घरी येऊन मला परत घेऊन जाणार. आई म्हणाली होती, की एवढं करण्यापेक्षा ह्याला सकाळी जातानाच घेऊन जा. संध्याकाळी सिनेमा दाखवून परत आणा. पण बाबा म्हणाले की दिवसभर तो काय करेल? मला मान वर करायला फुरसद नसते आणि आमच्या ऑफिसमध्ये नाही जागा. येणाऱ्या लोकांनाच बसायला मिळत नाही तर हा कुठे बसणार? त्यापेक्षा मी घरी येऊन परत घेऊन जाईन.

मी परत आतमध्ये आलो. फळीवरचा नवशक्ती काढून पुन्हा उघडला. आतल्या पानावर सिनेमाची जाहिरात होती. आधी किती तरी वेळा बघितली होती तरी मी ती पुन्हा बघितली.

‘‘एक्सेलसियर’’ मी नंदूकडे नजर टाकत म्हणालो.

तो काही बोलला नाही. तसाच लाल डोळ्यांनी बघत राहिला.

‘‘कर्क डग्लस.’’ मी म्हणालो. ‘‘काय सॉलिड हिरो आहे.’’

संध्याकाळी आपण स्पार्टाकसला जाणार हे मी वर्गात सगळ्यांना सांगितलं होतं. आणि माझे वडील नेणारेत हेसुद्धा. बापटबाईंच्या तासाला मी त्यांनाही सांगितलं होतं. धडा सगळ्यांना माहीत होता, पण पिक्चर लागल्याचं – एक जळक्या दिघे सोडला तर – कोणालाच माहीत नव्हतं. जळक्या दिघेला माहीत होतं, पण त्यावेळी तो माझा खाजा असल्यानं काही बोलला नव्हता. ‘आल्यावर गोष्ट सांग सगळ्यांना’ बापटबाई म्हणाल्या होत्या. मी ते करणार होतोच. एरवीपण मी सांगायचोच की गोष्टी. मग ही तर सांगणारच.

मी परत ओट्यावर आलो. मात्र मला फार वेळ वाट बघायला लागली नाही. काही वेळात बाबा आलेच. नेहमीसारखा त्यांचा बुशकोट घामानं भिजलेला होता.

‘‘बाबा आले.’’ मी त्यांच्या हातातली बॅग घेत ओरडलो.

बाबा आत आले. त्यांनी दारात सँडल काढले. त्यांची नजर कॉटच्या कोपऱ्यात बसलेल्या नंदूकडे गेली. तो तसाच लाल-ओल्या नजरेनं बघत होता. त्याच्याकडे बघून त्यांनी भुवया उंचावल्या आणि नेहमीसारखा ओठ मुडपून ‘चिवीऽऽऽऽऽऽक चीक’ असा आवाज काढला. नंदू काहीच बोलला नाही; पण खाली बसलेल्या पमीनं मात्र तसाच आवाज काढला. मग उठून ‘बाबा’ म्हणत त्यांच्या गुडघ्याला मिठी मारली.

‘‘अभ्यास चाललाय ना? चालू दे.’’ ते तिच्या केसातून हात फिरवत म्हणाले.

‘‘हाफ डे टाकणार होतात ना?’’ आई म्हणाली.

‘‘नाही जमलं.’’ ते म्हणाले. ‘‘तासभर कसा तरी काढला.’’

‘‘जायचं ना पण?’’ मी म्हणालो.

‘‘हो. जायचं ना.’’ ते म्हणाले. ‘‘नंबर टू का रागावलेत?’’

‘‘नेहमीचंच.’’ आई म्हणाली. ‘‘चहा घेणारात का आधी? जेवणही झालंय.’’

‘‘चहा नको. जेवूनच घेऊ.’’ ते घड्याळाचा पट्टा काढत म्हणाले.

नेहमीप्रमाणे मग त्यांनी बुशकोट काढला. कॉलरमागची रुमालाची पट्टी काढली. पँट काढली आणि पट्ट्यापट्ट्याच्या विजारीवर ते मोरीत गेले.

‘‘आधी कपडे बदलू का नंतर?’’ मी आईला म्हणालो.

‘‘जेवून घे आधी. सांडलं लवंडलं तर पंचाईत.’’ आई म्हणाली.

‘‘मी पण बसणार!’’ पमी म्हणाली.

‘‘तू थांब गं! त्यांचं होऊ दे आधी. आताच सांजा हादडलास ना!’’

आम्ही चटकन जेवून घेतलं. नंतर मी माझी काळी हाफपँट घातली आणि पिवळा शर्ट. शेजारचा अभय त्याला टॅक्सी म्हणतो; पण मला तोच आवडतो. बाबांनी त्यांचा तोच ड्रेस घातला. आई म्हणत होती, वेगळा शर्ट घाला; पण ते म्हणाले, नको. उद्या धुवायलाच टाकू. मात्र आता कॉलरमागे त्यांनी रुमाल घातला नाही.

निघताना नंद्यानं पुन्हा रडका सूर लावलाच.

‘‘तुला आपण दारासिंगचा पिक्चर दाखवू.’’ बाबा त्याला म्हणाले.

‘‘मला एकट्यालाच!’’ तो कॉटवर पाय झाडत म्हणाला. ‘‘आणि त्या एक्सेललाच…’’

मला हसायला यायला लागलं होतं. पण मी सँडलचा बेल्ट बांधायचं निमित्त करून ते दाबून ठेवलं.

‘‘मराठा मंदिरला दाखवू.’’ बाबा त्याला म्हणाले. ‘‘त्याच्यापेक्षा भारी थेटर आहे ते. आता रडू नको. जेवून घ्या आणि आईला त्रास देऊ नका. येतो ग!’’

आम्ही चालत चालत स्टेशनवर आलो. बाबांनी माझं हाफ-रिटर्न काढलं. आम्ही दोन नंबर प्लॅटफॉर्मवर गेलो.

‘‘बाबा, स्लोनं जायचं?’’ मी म्हणालो.

‘‘हो. आता फास्ट नाही.’’ बाबा म्हणाले. ‘‘चल बॉम्बेएन्डला जाऊ. म्हणजे उतरल्यावर जवळ पडेल.’’

आम्ही पुढे जाऊन गाडीची वाट पाहत उभे राहिलो. स्टेशनवर सगळीकडे पांढरे-पिवळे दिवे लागले होते. आमच्या बाजूला फारशी गर्दी नव्हती. समोरच्या प्लॅटफॉर्मवर कसारा आली. तिच्यातून मात्र भराभरा माणसं बाहेर पडली. त्या गाडीनं मोठ्यांदा भोंगा दिला आणि आली तशी निघून गेली.

मग काही वेळातच आमची व्हीटी लोकल आली. गर्दी नव्हती. मी पटकन आत चढलो; पण मला डावीकडे जायचं की उजवीकडे ते कळेना. दोन्हीकडे तसं रिकामंच होतं. पण बाबांनी मला उजवीकडे नेलं. तिथे मुंबईकडे तोंड केलेल्या बाकावर तिसरी सीट रिकामी होती.

‘‘बस तिथं.’’ बाबा म्हणाले.

‘‘तुम्ही?’’

‘‘आहे समोर.’’ ते म्हणाले.

मला खिडकी मिळाली असती तर बरं वाटलं असतं; पण लगेच ती मिळणार नाही हे माहीत होतं. तिथूनच बाहेर बघायला लागलो. आधी इमारतींमधले दिवे दिसत होते. मग मोकळा भाग लागल्यावर काळोख झाला. त्यात लांब कुठे तरी पिवळे दिवे लुकलुकायला लागले. एकदम भराभरा वारा यायला लागला आणि त्याच्यासोबत कसला तरी वेगळा वास. मला माहीत होतं ती दिव्याची खाडी आहे. दिवसा तिथे मस्त निळा-हिरवा पट्टा दिसला असता, पण आता अंधारात काही दिसत नव्हतं. मग ते स्टेशनही आलं. तिथे अजिबात गर्दी नव्हती. मला माहीत होतं, नंतर मुंब्रा येईल, मग कळवा आणि मग ठाणे.

कळव्याला माझ्या शेजारचा माणूस उठला. मी लगेच त्याच्या जागेवर सरकलो. बाबांना म्हटलं, तुम्हीपण इकडे या. ते माझ्या शेजारी येऊन बसले. ठाण्याला खिडकीसुद्धा रिकामी झाली. मी लगेच तिकडे सरकलो. खिडकी मिळाल्यामुळे आता मजा येणार होती. कारण आता खरी मुंबई. माझे पाय खाली टेकत नव्हते. समोरच्या धोतरवाल्या माणसानं मांडी घालून पाय वर घेतले होते. मग मी बिनधास्त पाय हलवत बाहेर बघू लागलो. मोठा भोंगा देऊन गाडी सुटली. आम्ही पुढच्या भागात होतो त्यामुळे तो स्पष्ट ऐकू येत होता.

‘‘आता मुलुंड येईल ना?’’ मी बाबांना म्हणालो.

बाबांनी हसून मान डोलवली. मला एकदा वाटलं त्यांना सांगावं आमच्या वर्गातला भिसे मुलुंडला काय म्हणतो ते. पण मी गप्प बसलो. तरी मला हसायला आलंच.

नंतर मग भांडूप आलं. भांड ऊप, मी मनाशी म्हणालो. भांड आणि ऊप करून बस.

‘‘स्पार्टाकसची तलवार कशी आहे ना?’’ मी एकदम आठवून म्हणालो. ‘‘ती अशी सरळ आहे. आपल्याकडे तशा नाहीयेत. आपल्याकडे अशा वाकड्या असतात. हो ना?’’

बाबांनी फक्त हसून मान डोलवली. ते नेहमी तसंच करतात. जास्त बोलत नाहीत, नुसतं गालातल्या गालात हसतात.

‘‘हुशार आहे.’’ त्यांच्या समोर बसलेला मिशावाला माणूस बाबांना उद्देशून म्हणाला. बाबा त्यावरही फक्त हसले.

‘‘आता कुठं निघालाय?’’ त्या माणसानं आमच्याकडे पाहत विचारलं.

‘‘पिक्चर.’’ मी म्हणालो. ‘‘स्पार्टाकस. व्हीटीला लागलाय.’’

‘‘अरे वा! मजा की!’’ तो हसून मान डोलवत म्हणाला.

मीपण हो म्हणालो आणि मग बाहेर बघत बसलो. आता बाहेरून तो लोखंडाचा वास यायला लागला होता. नंतर गटाराच्या पाण्याचासुद्धा. मागच्या वेळेस आम्ही रविवारी सकाळी चाललो होतो तेव्हा रेल्वे लाइनच्या कडेला ती सगळी माणसं एका रांगेत टमरेल घेऊन बसली होती. आताही असतील पण आता कोणी दिसत नव्हतं. कांजूर मार्ग, विक्रोळी, मग घाटकोपर. तिथे ठाण्यासारखीच गाडी बरीच खाली झाली; पण थोडीशी माणसं चढलीसुद्धा. समोरचा मिशावाला माणूस उतरून गेला; पण तो बसला असता तर बरं झालं असतं.

‘‘बाबा, आमच्या बापटबाई आहेत ना? त्या म्हणतात की पूर्वी इथं कोपर नावाचं गाव होतं. त्याच्यापासून घाटकोपर असं नाव झालं. असेल का हो असं?’’

‘‘शक्य आहे.’’ बाबा म्हणाले.

ते नेहमी असंच म्हणतात, ‘शक्य आहे.’ म्हणजे होसुद्धा आणि नाहीसुद्धा.

मी खिडकीतून बाहेर बघत राहिलो. मला मस्त वाटत होतं. खिडकीतून गार वारा येत होता आणि बाहेरचे मुंबईतले दिवे दिसत होते. मला सगळी स्टेशन्स पाठ होती. विद्याविहार, कुर्ला, सायन, माटुंगा. अभय माटुंग्याच्या कॉलेजमध्ये जातो. तो मला म्हणतो की दहावी झाल्यावर तूसुद्धा त्याच कॉलेजला यायचं. आपण तर जाणारच. ठाण्याच्या कॉलेजला कोण जाईल? माटुंगा म्हणजे खरी मुंबई.

मग दादर आलं. आमच्या डब्यातले बरेचसे लोक उतरून गेले. गाडी साफ रिकामी झाली. एकदोन माणसंच राहिली. समोरचे धोतरवाले काकासुद्धा उतरून गेले. जाताना त्यांनी आम्हाला विचारलं होतं, ‘आलं का दादर?’ आणि मग ते घाईघाईनं उतरून गेले.

‘‘बाबा, त्या पिक्चरमधल्या हिरोला खूप व्यायाम करायला लागतो? त्याची बॉडी कसलीये!’’

‘‘लागत असणार.’’ बाबा म्हणाले.

‘‘आणि त्याला तलवार चालवायला पण शिकवत असणार ना?’’

‘‘शिकवत असणार.’’

‘‘बाबा, तुम्ही मॅटिनी पिक्चर बघायचा पूर्वी?’’

‘‘क्वचित!’’

‘‘अभय म्हणतो, की मॅटिनीला पिक्चर स्वस्त असतात. म्हणून तो तेच बघतो.’’

बाबांनी नुसतीच मान डोलवली. मग त्यांनी खिशातून लांबट प्लॅस्टिकची तपकिरीची डबी काढली. थोडीशी एका हातावर घेतली आणि दुसऱ्या हाताची चिमूट करून नाकात ओढली. त्या तपकिरीचा तो नेहमीचा वास आला. बाबांच्या अंगाला यायचा तसा. त्यांच्या बुशकोटलापण नेहमी तसाच एक वास येतो. तो वास आला की मला एकदम मस्त वाटतं. त्या वासात गुडूप झोपून जावंसं वाटतं.

परळ, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा. मला माहीत होती तशीच एकेक स्टेशनं येत गेली.

‘‘बाबा, तुम्हाला एक जोक सांगू?’’ मी म्हणालो.

‘‘हूं.’’

‘‘इंग्रजांचं राज्य असतं. एका डब्यातून एक इंग्रज माणूस आणि एक भारतीय माणूस जात असतात. ती अशी गाडी नसते. आपण ती पॅसेंजर धरतो ना, तशी असते. वरती झोपायचा बाक असतो ना तशी. तर त्या भारतीय माणसाची बायको वरती झोपलेली असते. तो इंग्रज माणूस भायखळा स्टेशनला चढतो आणि समोर बसतो. तेव्हा तो भारतीय माणूस त्याला विचारतो, की तुम्ही कुठून कुठे जाणार? तेव्हा तो इंग्रज माणूस म्हणतो, भायखोला तू खल्याण! तेव्हा तो भारतीय माणूस एकदम चिडतो आणि इंग्रज माणसाला एक ठोसा देतो ठेवून. त्याच्या नाकातून रक्त येतं. तेव्हा तो म्हणतो, का? काय झालं. तेव्हा तो भारतीय माणूस म्हणतो, तू असं का म्हणला की बायकोला तू खाली आण?’’

मग मलाच हसायला यायला लागलं. भायखोला टू खाली आण. हा भिशानं सांगितलेला जोक. बाबासुद्धा गालातल्या गालात हसले.

‘‘सॅन्डर्स्ट रोड!’’ मी बाहेर बघत म्हणालो.

मला माहीत होतं, की आता पुढचं एकच स्टेशन आहे मस्जीद बंदर. ते गेलं की आलंच व्हीटी. मस्जीद बंदरला सगळे मसाल्याचे वास येतात. दोन्ही बाजूंना उंच उंच बिल्डिंगी आहेत. त्यांच्यामधून गेल्यावर खरोखर आपण मुंबईत शिरल्यासारखं वाटतं. आता सगळ्या बिल्डिंगी दिसत नव्हत्या, नुसते त्यांच्यामध्ये लागलेले लाइट दिसत होते. तिथे गाडी एकदम स्लो झाली आणि मग एकदम थांबलीच. दोन्ही बाजूंना सगळे रूळच रूळ दिसत होते. त्यावर गाड्यांचे डबे मोकळे सोडून दिल्यासारखे. पलीकडून एक इंजिन नुसतंच घडघड आवाज करत गेलं.

‘‘काय झालं?’’ मी बाबांना विचारलं.

‘‘यार्डात थांबलीये.’’ बाबा म्हणाले.

मी दचकून त्यांच्या हातावरच्या घड्याळात पाहिलं. नऊला पाच मिनिटं कमी होती. माझी छाती धडधडायला लागली. ही गाडी जर इथंच थांबली तर? झालं कल्याण मग.

गाडी अनंत काळ थांबली, पण मग एकदाची सुरू झाली.

‘‘चला, उठूया.’’ मी बाबांचा हात ओढत म्हणालो.

‘‘स्टेशन तर येऊ दे!’’

पण स्टेशन आलंच. प्लॅटफॉर्म’ दोन्ही बाजूंना होते. तिथे थोडी थोडी माणसं उभी होती. गाडी थांबल्यावर त्यातले दोघे-तिघे एकदम आत चढले. आम्ही उतरलो. प्लॅटफॉर्मवरून चालायला लागलो. मी बाबांचं बोट धरलं होतं. उंचच उंच स्टेशन. सगळीकडे दिवे लागलेले होते. अनाउन्समेंट चालू होती. प्लॅटफॉर्म नंबर तीन की लोकल टिटवाळा के लिेये जानेवाली धीमी गाडी है. पण आम्हाला तिकडे लक्ष द्यायचं कारण नव्हतं. आम्हाला आता जायचं होतं ते म्हणजे एक्सेलसियर.

प्लॅटफॉर्म संपल्यावर गुळगुळीत फरशी लागली. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट होता. माणसं होती. भराभरा इकडेतिकडे जात होती. एवढी रात्र झाली होती तरीही त्या स्टेशनवर धावपळ होतीच.

आम्ही त्या कमानीच्या दरवाजातून बाहेर पडलो. काळ्या फरशीच्या पायर्‍यांवरून रस्त्यावर आलो. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट होता. हवेला मुंबईचा गरम वास. फुटपाथवरून चालत आम्ही सिग्नलपाशी आलो. तिथे रस्ता क्रॉस केला.

‘‘कुठं ते थेटर?’’ मी म्हणालो.

‘‘इथंच आहे.’’ बाबा म्हणाले. ‘‘चल, चटचट.’’

मी त्यांचं बोट धरून फुटपाथवरून भरभर चालायला लागलो. आमच्या मराठीच्या त्या कवितेत सांगितली होती तशी मला खूप उत्कंठा वाटत होती. आता ते थेटर येणार.

बाबा चालताना एका गल्लीत वळले. ती गल्ली संपली आणि एकदम दिव्यांचा लखलखाट समोर आला. मी वर पाहिलं तर समोर तो ढाल-तलवार घेतलेला स्पार्टाकस! त्याच्या डोक्यावर लोखंडाचं शिरस्त्राण होतं. अंगावर लोखंडी चिलखत. आणि तशीच ती त्रिकोणी टोक असलेली सरळ तलवार. त्यावर चमकदार पिवळा प्रकाश पडला होता. त्याच्या कडेला सिंहाशी युद्ध खेळतानाचं चित्र होतं आणि त्याच्याशेजारी लढाईचं. थेटरच्या अख्ख्या भिंतीवर ती चित्रं लावली होती आणि त्याच्यावर ती लाल अक्षरं चमकत होती. ‘एक्सेलसियर’.

मी नुसता डोळे विस्फारून पाहत राहिलो.

‘‘चल, पलीकडे जायचं.’’ बाबा माझ्या दंडाला धरत म्हणाले.

आम्ही दुसऱ्या बाजूला गेलो. थेटरभोवती पुष्कळ गर्दी होती. सगळ्या मुंबईतले लोक पिक्चर बघायला आले होते बहुतेक. एका बाजूला तिकिटाच्या खिडक्या होत्या. त्यासमोर उभे राहून बाबा खिशातून पैसे काढायला लागले.

‘‘बाबा, द्या! मी काढतो.’’ मी त्यांच्यासमोर हात करत म्हणालो.

बाबांनी माझ्या हातात पाचची नोट दिली. मी त्या खिडकीसमोर गेलो. आधी पाच-सहा माणसं होती. त्यांचं झाल्यावर माझा नंबर आला.

‘‘स्टॉलची दोन तिकिटं द्या.’’ मी पाय उंच करत म्हणालो. जाळीतून आतल्या माणसाचा चेहरा दिसत होता.

त्यानं मला भुवया उंचावून काय म्हणून विचारलं.

‘‘दोन स्टॉल.’’ मी जोरात म्हणालो.

‘‘कोण पाहणारे?’’

‘‘आं?’’

‘‘पिक्चर कोणाला पाह्यचाय?’’

‘‘मला! आणि माझ्या वडलांना.’’ मी म्हणालो.

त्याची मान ‘नाही’ अशी हलली. मग त्यानं माझ्यामागे कोण उभं आहे ते पाहिलं.

‘‘लहान मुलं ‘अलौड’ नाहीत.’’ तो म्हणाला.

मला काहीच कळलं नाही. मी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिलो. मग मागे वळून बाबांकडे पाहिलं. बाबांनी माझ्या हातातून नोट घेतली आणि ते खिडकीपाशी वाकले.

‘‘अ‍ॅडल्ट ओन्लीये काका!’’ खिडकीतला माणूस त्यांना म्हणाला. ‘‘लहान मुलांना नाही सोडणार.’’

‘‘कसं काय?’’ बाबाही काही न कळून म्हणाले.

‘‘हां. बगा ना तिथं. ‘ए’ लावलाय.’’

बाबांनी तिथूनच मान उंचावून थेटरच्या दरवाज्याकडे पाहिलं. काही क्षण ते तसेच बघत राहिले.

‘‘तीन बाल्कनी.’’ मागचा माणूस त्यांच्या मागून हात लांबवत म्हणाला.

बाबांनी माझ्या हाताला धरलं आणि काही न बोलता ते बाजूला सरकले.

मी काही न कळून नुसताच बघत राहिलो. बाबाही माझ्या हाताला धरून मान उंचावून थेटरच्या पाट्यांकडे बघत राहिले.

‘‘आपल्याला तिकीट का नाही देत?’’ मी विचारलं.

‘‘मुलांसाठी नाहीये म्हणे.’’ बाबा म्हणाले. मग त्यांनी जिथून आत सोडत होते तिकडे बोट केलं. ‘‘ते बघ. तिथे ‘ए’ लिहिलंय. ते म्हणजे फक्त मोठ्या माणसांसाठी.’’

ते दाखवत होते तिकडे मी पाहिलं. पोस्टरच्या खाली लाल वर्तुळात इंग्रजी ‘ए’ काढला होता.

‘‘लहान मुलांसाठी का नाही? आम्हाला तर धडा आहे.’’

बाबा त्यावर काही बोलले नाहीत.

मी थेटरवरच्या चित्रांकडे बघत राहिलो. सगळीकडे तशीच लढाईची चित्रं होती. एका कडेला तो स्पार्टाकस एका बाईचं चुंबन घेताना दिसत होता.

‘‘मग आता काय करायचं?’’ मी म्हणालो.

बाबा त्यावरही काही बोलले नाहीत.

‘‘तुम्ही त्या मॅनेजरना भेटून सांगता का, की आम्हाला धडा आहे म्हणून.’’

बाबांनी एकदा माझ्याकडे नजर टाकली.

‘‘त्याचा काही उपयोग नाही व्हायचा.’’ ते म्हणाले. ‘‘त्याच्या हातात नसतं ते.’’

आम्ही काही वेळ तसेच उभे राहिलो. थेटरच्या बाहेरची गर्दी आधीसारखीच होती. लोक घोळक्या घोळक्यानं उभे होते. काही काही स्कर्टमधल्या बाया होत्या. काही कॉलेजमधली अभयसारखी मुलं; पण बाकी सगळी मोठी माणसं होती. माझ्यासारखं हाफ पँटमधलं कोणीच नव्हतं.

‘‘आता काय करायचं?’’ मी म्हणालो.

बाबा त्यावर कसनुसं हसले.

‘‘परत जायला लागेल.’’ ते म्हणाले.

पण आम्ही लगेच तिथून हललो नाही. काही वेळ त्या सगळ्या लोकांकडे बघत राहिलो. आता त्यांना आत सोडायला सुरुवात झाली होती. बाहेरची गर्दी कमी झाल्यासारखी.

‘‘चल.’’ बाबा माझ्या दंडाला धरत म्हणाले.

थेटरच्या एका बाजूला आइस्क्रिमची गाडी उभी होती.

‘‘तुला आइस्क्रिम घ्यायचं?’’ बाबांनी विचारलं.

‘‘नको.’’ मी म्हणालो.

आम्ही आलेल्या रस्त्यानं व्हीटी स्टेशनला आलो. वाटेत बाबा काहीच बोलले नाहीत. मी त्यांचं बोट धरलं नव्हतं तरीही.

कर्जत गाडी लागत होती. आम्ही चटकन् डब्यात चढून घेतलं. गर्दी नव्हती. डबा रिकामाच होता. मला खिडकीशेजारची जागा मिळाली. बाबा समोरच्या जागेवर बसले.

आपल्याला काय होतंय तेच मला कळत नव्हतं. मनात काहीच विचार येत नव्हते. घरी जाईपर्यंत नंदू आणि पमी झोपले असतील. उद्या वर्गात गोष्ट सांगता येणार नव्हती. काय सांगणार?

आधीसारखीच एकामागनं एक स्टेशनं येत गेली. पण मी त्यांची नावं उच्चारली नाहीत. नुसता खिडकीतून बाहेर बघत राहिलो. मग माझ्या लक्षात आलं, की बाबा एकटक माझ्याकडेच बघत राहिलेले आहेत. सबंध प्रवासभर.

मला मात्र त्यांच्या चेहऱ्याकडे बघताच आलं नाही.

मिलिंद बोकील

समाजशास्त्रीय संशोधक, कथाकार, कादंबरीकार अशी मिलिंद बोकील यांची ओळख आहे. तसेच त्यांच्या वैचारिक लेखनाचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. सामाजिक चळवळी, पर्यावरण, शिक्षण अशा अनेक विषयांवर अतिशय सर्जक पद्धतीने डॉ. बोकील लिहितात. तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनाचा त्यात संवेदनशीलपणे वेध घेतलेला दिसतो.

चित्र: भार्गवकुमार कुलकर्णी