‘स्व’कार आणि स्वीकार

डॉ. संजीवनी कुलकर्णी

आमिष शिक्षांच्या मुकादमाला दूर सारून मुलामुलींना सजग, चैतन्यपूर्ण, संवेदनशील वातावरणात कसं वाढता येईल, या वाटेवर आपण पावलं टाकत आहोत. लेखांक सहामध्ये सुचवलेली क्षमतांची आपली यादी आपण तयार केलेली असेल. त्यांचं महत्त्वमापन केलेलं असेल आणि त्यांतल्या आंतरसंबंधांचं एक जाळं चितारलं असेल. त्याच्या पार्श्वभूमीवर असणारं स्त्री-पुरुष भिन्नतेचं परिमाण आणि सर्वस्पर्शी लैंगिकतेचा संदर्भ जाणून, तपासून, स्वत:च्या आयुष्याशी ताडून बघितला असेल.

ही यादी कागदावरून प्रत्यक्षात कशी आणायची असा विचारही तुम्ही सुरू केलेला आहे. काही ठिकाणी हा रस्ता आंतरसंबंधांच्या रेषांनी सुचवला, तर काही ठिकाणी, आपण विचारात पडलात, चिंतेत पडलात. शब्दांत मांडता न आलेलं असं काही तुम्हाला म्हणायचंय आणि ते या यादीप्रकारात साधेल की नाही असा प्रश्न पडतो आहे. तशा या यादीतल्या अनेक गोष्टी तुम्ही करताच आहात. काही विस्मृतीत गेलेल्या यानिमित्तानं आठवल्या, तर काही तुम्हाला लिहाव्याशा वाटल्या तरी अशक्य दिसतात. एक खरंच असतं, की कुठल्याही व्यवस्थेत सर्वच गोष्टी एका-दोघा पालकांना साधतात असं नव्हे. काही ठिकाणी मदत घ्यावी लागते. काही वेळा मुलाच्या ठिकाणी आवड तयार असली, की मूलही मदत शोधतं, मिळवतं. काही वेळा ठरवून किंवा न ठरवताही हे पालकत्व घरापलिकडे विस्तारतं आणि आपल्या एकादोघांना न साधणारी बाब सहज साधते. मुलांना असे आईवडिलांशिवायचेही पालक असावेत असं मला नेहमीच वाटतं. ते थोडे दुरून दिसतात त्यामुळे मुलांच्या नजरेला साजरे दिसतात किंवा त्यांनी आपलं घरातल्यांइतकं जीवानं करावं अशी अपेक्षा फार नसताना, तसं घडल्याचा आनंद त्यांना विशेष होतो. थोडं अधिक लक्ष देणारे, प्रेम करणारे शिक्षक मिळाले, की मुलं त्यांच्या आसपास अक्षरश: पिंगा घालतात. ह्या विस्तारलेल्या पालकपणाचा मुलांच्या जीवनात फार चांगला परिणाम दिसतो. अर्थात त्याच्यामागे, मूलपणाबद्दल, मानवजाती-बद्दलच्या विशुद्ध प्रेमाची जाणीव आहे ना, याची सहजपणे खातरजमा करून घ्यावी. इतरही काही शेजारपाजारचे, ओळखीचे लोक मुलांना भावतात. पालकांना कधीकधी यांत मत्सर वाटायला लागतो. पण त्याच्यापुढे आपण जायला पाहिजे. दोन कारणांसाठी- पहिलं, ते मूल आहे. आपल्या ‘मालकीचं’ नव्हे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, नवीन वेगळं माणूस – त्याचं स्वभाव वैशिष्ठ्य, गुण, सहवास अशा अनेक अर्थांनी मुलांसाठी नवं काही शिकवणारं असतं. नव्या ओळखी, नवीन माणसं, यांच्यासह जीवन आहे, याची थोडी थोडी ओळख मुलामुलींना होत रहावी. ‘समाजाशी परिचय’ ही गोष्ट नुसत्या शाळेवर सोडून देऊन पुरणार नाही. आपण स्वत:ही आपल्यापलिकडे इतर मुलांच्या विस्तारलेल्या पालकपणात सामील व्हावं. विस्तारित पालकत्वाचं एक जाळं तयार व्हायला हवं असेल, तर हे आवश्यकच आहे. असं वागताना आपली स्वत:ची मुलगा-मुलगी असल्यास त्यांच्या मनांत तेढीची भावना तयार होत नाही ना, यावर लक्ष असावं. दुसर्‍याबद्दल अशी स्पर्धेची, तेढीची, दुराव्याची भावना वाटणारं मूल एकतर आईवडिलांवरची आपली स्वामित्वाची भावना अधिक करतं किंवा कुढत राहतं, दूर जातं. हे दोन्ही पर्याय नकोसेच आहेत. दोन्ही मुलामुलींसमोर टोचेल असं एकाचं कौतुक किंवा हेटाळणी करायची नाही. या तुमच्या वागण्यानं बाहेरच्या मुलाला निदान ‘तुम्ही आवडला नाहीत’ असं वागायला मुभा असते. घरचाही वागतोच, पण त्याला मुभा नसते.

यानिमित्तानं दुसर्‍या व्यक्तीला स्वीकारण्याचा भागही मनांत येतो. आवडीच्या, गोड वागणार्‍यांना, लाड करणार्‍यांना स्वीकारणं मुलांना सहज असतंच, पण फारशा न आवडणार्‍या, काहीशा कजाग वाटणार्‍या, वेगळे विचार-वृत्ती असणार्‍यांनाही स्वीकारणं हा मला जगण्याचा अपरिहार्य भाग वाटतो.

एक 18-19 वर्षांची मुलगी दुसर्‍या तिच्याच वयाच्या मुलीबद्दल ‘हिच्याशी जुळणं अशक्य आहे’ असं तावातावानं म्हणत होती. मी सहज तिला विचारलं, ‘तुला असं का वाटतं?’ ‘काय तिचे कपडे, तिचा वेश, आवाज, मला नाही आवडत ती!’ मी म्हटलं, ‘ह्याच्या पलिकडे नाही का जाता येणार, निदान तुझ्यासार‘या विचारांवर विश्वास ठेवणार्‍या मुलीला?’ तरी राग सुरूच होता. शेवटी मी विचारलं, ‘किती जुळवून घ्यावं लागतं तुला तिच्याशी? सतत?’

‘तसं काही नाही, ती गु‘पमधल्या आणखी एकदोघांची मैत्रीण आहे. त्यामुळे कधीतरी होते भेट.’

मग तर, ती अगदी आंबट्ट खारट्ट मुलगी आहे असं मानलं तरी, मनुष्यस्वभावाचा एक प्रकार म्हणून स्वीकारता येईल की.

‘‘मला अमुक प्रकारची माणसं आवडतात आणि मी त्याच प्रकारच्या माणसांशी संबंध ठेवतो. इतर माणसं म्हणजे, म्हणजे त्यांनी असावं जगांत, पण माझ्या दृष्टीनं नाहीतच.’’ ‘‘मला स्त्रियांनी अमुकच आणि पुरुषांनी तमुकच पेहराव केलेला आवडतो.’’ (हे नुसत्या कपड्यांबद्दल नसतं, केस, कुंकू, बांगड्या, मंगळसूत्राला धरून टाय, गंजीफ‘ॉक, गॉगल, दाढी हजार गोष्टीबद्दल असतं.) ‘‘मला अमुकच भाज्या तमुक पद्धतीनंच बनवलेल्या आवडतात, इतर भाज्या मी कधीच खात नाही.’’ हाताखालच्या मानलेल्या माणसांबद्दल उदा. मुलं, बायको, कामांतले सहाय्यक नोकर यांच्याबद्दल तर ही मतं अधिकच तीव‘ बनतात. असले हट्टी आग‘ह खरोखर, जीवनाच्या प्रवासांत फार कंटाळा आणतात. इतरांना आणि त्यांना स्वत:लाही.

जगणं आणि त्यांतल्या वैविध्याला जागा ठेवायची असेल, तर स्वत:वर असणार्‍या जबाबदार्‍या आवडीनिवडींना बाजूला ठेवून मनापासून स्वीकारणं आणि पेलणं ह्यांतलं माणूसपणही मुलामुलींना समजावं. विशेषत: आजच्या सामाजिक-राजकीय (यांतल्या प्रत्येक शब्दांच्या भोवती अर्थवलयं आहेत, आणि ती आपल्याला जाणवतात.) परिस्थितीत संधीसाधूपणा आणि स्वत:ची पडशी भरणे ही सर्वात महत्त्वाची भावना मानली जाते, अशाचवेळी त्याच्या उलट प्रकि‘या आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक मुलांच्या मनांत उभवायची आहे. याचा अर्थ आवडनिवड नसावी असं म्हणायचं नाही, परंतु हट्टाग‘ह नसावेत असं मात्र आवर्जून म्हणायचं आहे.

आपल्या मुलामुलींच्या जगण्याला त्यांचा त्यांचा एक अर्थ असावा असं जर आपल्याला वाटत असेल, त्यांचं वर्तुळ नुसत्या ‘मी’नं माखलेलं नसावं हे जर आपल्याला मान्य असेल तर आपण सर्वाधिक महत्त्व या मुद्याला देऊया. याचा अर्थ असे प्रयत्न होत नाहीत, सर्व मुलं स्वत:तच गुरफटलेली असतात असा नाही परंतु तशी शक्यता मात्र आहे आणि आपल्याला तर ती शक्यताही नको आहे.

यासाठी करायचं काय? आपण जागं रहायचं, सर्वप्रथम मूल काय विचार करतंय याचा आदमास घेत रहायचं आणि जे त्याच्याकडून अपेक्षित आहे  ते स्वत:च्याच वागणुकीतून आणायचं.

हे जर आपण जमवलं, तर मुलं आपल्या अपेक्षांहून पुढंच जातात. कदाचित काही वेळा काही ठिकाणी थोडं वेगळं, उलटं वागावसं मुलांना वाटलं तरीही, आपल्या वागण्यांतला खरेपणा जर असेल तर त्यांना भिडतोच. याचा अर्थ स्वत:च्या अस्तित्वाच्या जाणिवेचा संपूर्ण लोप असा आपण मानलेला नाही. इतरांच्या सहअस्तित्वाच्या संदर्भात ‘स्व’ची जाणीव शोधणं म्हणजे स्वत:चं अस्तित्व नाहीसं करणं नव्हे. माणसाच्या ‘स्व’त्वाला आत्मसन्मानाची जोडही निश्चितच आवश्यक असते. पण हा आत्मसन्मान, हा स्वत:च्या आयुष्याचा अर्थ यश, मान, पैशानं मोजायचा की विशुद्ध आनंदाच्या, संवेदनशीलतेच्या, आसपासच्यांच्या जिव्हाळ्याच्या परिमाणानं मोजायचा?

आपल्या यादीतल्या काही गोष्टीसाठी मुलांना सवय करावी लागते. काहींसाठीचं योग्य वातावरण आपण द्यावं लागतं, काही स्वत:च्या वागणूकीनं दाखवायच्या असतात. काही ठिकाणी हे सहज साधत नाही, अशावेळी वेगळे उपाय योजावे लागतात.काही थोडं थांबून पाहिलं की सहज दिसणारे, काही मुद्दाम हुडकून काढावेत असे. ह्या उपायांचं वैविध्य परिस्थितीसापेक्ष असतं. उदाहरणार्थ आमचे एक परिचित खूप सिगारेटी पीत. सिगारेटी पिणे योग्य नव्हे, असा त्यांनाही पटणारा मुद्दा मुलांपर्यंत पोचवणं त्यांना अवघडच जाणार होतं. कुणी म्हणेल की अशा परिस्थितीत स्वत:चं व्यसन सोडणं हाच सर्वोत्तम मार्ग. ते बरोबरही आहे, परंतु अशा सर्वच बाबतीत ते सर्वस्वी शक्य असतंच असं नाही. म्हणून आपल्या मुलांसमोर अशा गोष्टींचं उदात्तीकरण करणं हेही योग्य नाही. अशा वेळी त्यांनी स्वत:वरती टिंगल ओढवून घेतली. ते सांगतात, हेतूपुरस्सर मुद्दाम स्वत:ची टिंगल मी करून घेतली. मुलांना ही टिंगल आवडत नसेच आणि त्यातून सिगारेट ही वाईट असा आवश्यक निरोप मुलांपर्यंत पोचला. नंतर मुलांच्या आग‘हानं त्यांनीही सिगारेट सोडलीच. हाच उपाय सर्वांनी योजावा असं नाही. परंतु इतक्या वैविध्यानं हा विचार होऊ शकतो.

काही क्षमतांची शिदोरी बांधताना प्रथम त्याचं दिवास्वप्न पहावं. दिवास्वप्न म्हणजे जागेपणी पाहिलेलं स्वप्न. सजगपणे जे जे करायचंय त्याची मनोमन केलेली तयारी. आपण काय करणार आहोत? त्यातून मुलामुलींना काय फायदा होणार आहे? आपल्याला काय अपेक्षित आहे? गफलत होण्याच्या शक्यता कुठेकुठे आहेत? कुठल्या टाळता येतील? टाळता येत नसतील तर काय काळजी घेता येईल? तरीही हुकलं तर काय उपाय करता येईल असा सगळा विचार आपल्या मनात करणं. आता कितीही केलं तरी कल्पना आणि प्रत्यक्ष यांच्यात अंतर असतंच. पण हे अंतर कमीत कमी करण्याचा हा प्रयास आहे.

दिवास्वप्नाला चुकण्याची भीती नसते वेळाचा प्रश्न विचारात नसतो. शक्य तेवढ्या मोकळ्या मनानं आपण विचार करत असतो. हे दिवास्वप्न पहाणं अत्यंत वेधक असतं. ते वाटतं तेवढं सोपं नसतं पण मजा मात्र खूप येते.

माझंच एक उदाहरण सांगून हा लेख संपवते. मला स्वत:ला गाण्याबद्दल फारसं प्रेम नव्हतं, कळत समजतही अर्थातच नाही, ‘स्वत: गाणं’ मी स्वप्नांतही पाहिलेलं नव्हतं, पण तरीही माझं मूल तान्हं असतानाच मला वाटलं याला गाणं शिकवायला हवं आपण. मी स्वत:लाच प्रश्न केला, ही अंतर्गत विसंगती नाही वाटत? पण का कुणास ठाऊक तो विचार माझा पिच्छा सोडेना. मी विचार करू लागले, त्यासाठी काय करता येईल? पहिलं सोपं उत्तर समोर आलं, गाण्याचा क्लास लावण्याचं. वेळ, पैसा, बरे शिक्षक एवढं जमवलं, तर मला ते झेपण्यासारखं होतंच. पण तेवढ्यावर मला थांबता आलं नाही. मी विचार करतच राहिले का बरं शिकावं तिनं/त्यानं गाणं? गाणं ही सुंदर गोष्ट आहे हे अनेकांचं म्हणणं मी ऐकलं होतं. इच्छा असो वा नसो, लहानवयापासून गाणं कानावर पडत होतंच. पण मला गाणं आवडतं असा काही माझा समज एव्हापर्यंत नव्हता. तेव्हा आता माझ्या शब्दश: हातातल्या या माणसानं गाणं शिकावं असं का वाटतंय? आणि त्याच्या आवडी निवडीचं काय? मग मी अनेकांशी प्रत्यक्ष बोलले. त्यांच्यातल्या सर्वांनी स्वत:च्या मुलानं संगीत शिकावं असा प्रयत्न केलेला होता किंवा करत होते. गाणं का शिकायचं? या प्रश्नाची बरीच उत्तरं मी गोळा केली.

‘‘कारण तिचा/त्याचा आवाज गोड आहे.’’

‘‘कारण तिला उपजत संगीताची जाण आहे.’’

‘‘कारण संगीत ही श्रेष्ठ कला आहे.’’

‘‘कारण संगीतासाठी खूप शिष्यवृत्या मिळतात.’’

‘‘कारण संगीतातून लौकर प्रसिद्धी, पैसा मिळतो.’’

‘‘त्याला स्वत:ला आनंद देणारं इतकं खात्रीचं दुसरं साधन नाही.’’

मी पार निराशच झाले. आवाज गोड असणं हे गाणं शिकण्यामागचं कारण का असावं? आवाज आत्ता गोड वाटतोय म्हणजे गाणं येईल हे कशावरून? पण ते न पटूनही, तात्पुरतं मानलं तरी येणारी गोष्ट शिकली पाहिजेच का? का? तसं तर जगातलं काहीही कुणालाही प्रयत्नांनी येऊ शकतंच की. शिष्यवृत्त्या मिळतात म्हणून गाणं शिकणं म्हणजे ‘स्कोअरींग विषय म्हणून फें‘च घेण्याइतकं भंपकपणाचं.

संगीत हे जर मानवानं निर्मिलं तर उपजत संगीताची जाण कुठली आलीय? कदाचित थोडं लौकर शिकेल अशी व्यवस्था असू शकेल त्या बालकाच्या बुद्धीत. पण ते काही कारण होऊ शकत नाही.

मला काहीच पटेना. आनंदाच्या मुद्यानं मला क्षणभर थबकवलं, पण क्षणभरच. आनंद देणार्‍या जगात हज्जार इतर गोष्टी होत्या, मी नव्हते का संगीताशिवाय आनंदात जगत?

का कोण जाणे, आपलं आपल्यालाच स्पष्ट नसलं तरी मुलाला संगीत यावं असं आपल्याला वाटण्यांत काहीतरी खोच आहे, असं मला जाणवलं. आणि मग मुलाचं काम जरा बाजूला ठेवून मीच निघाले त्या सुरांचं काय म्हणणं आहे ते ऐकायला. मग मला एकेक बोध व्हायला लागले. सुरांची गंमत कळली, त्यांचा सहवास आवडायला लागला, त्यांतून चांगल्या संगीताचा सहवास घडू लागला त्यातून मिळणार्‍या आनंदाची ओढ लागली. सूर जवळ काही मागू लागले, देऊ लागले आणि स्वत: गाता येत नसून ‘क्लासिक’ (म्हणजे क्लासांतलं) गाणं न शिकताही सूर नावाच्या या चोराजवळ माझं जीवन अधिक सुंदर करण्याची जादू आहे ह्याचा मला अचानक शोध लागला.  येवढे दिवस मला थांग लागू न देण्याबद्दल त्या सुरांसह सगळ्या जगाचा संतापही आला.

तरीही, तरीही, तरीही, याचा अर्थ माझ्या मुलाला सुंदर गाता यावं असा मुळीच निघालेला नाही, पण त्यांला सुरांची ओळखण असावी, जमलं तर मैत्री जडावी, असं मला वाटलं. ते मात्र अगदी समजून, उमजून, पटून वाटलं. 

आता या विचारांशी जुळणार्‍या गुरूचा शोध घेणं असं काम आलं. त्याहून महत्त्वाचं, या संगीत ऐकण्या-अनुभवण्याच्या वाटेवर त्याच्या सोबत त्याला हवं तोवर हात धरून जाण्याचा मोठ्ठा आनंद माझ्या समोर उघडून आला.