अभिव्यक्ती: अभिनयाच्या माध्यमातून…

डॅनियल ए. केलिन हे एक शिक्षक-कलाकार आहेत. एक उत्तम नट, लेखक आणि दिग्दर्शक अशी अमेरिकेत त्यांची ख्याती आहे. पालकनीतीच्या खेळघराच्या मुलांसाठी ते अभिनयाची कार्यशाळा घेऊ शकतात अशी माहिती अनघा कुसुम आणि माधुरी पुरंदरे यांच्याकडून मिळाली. छानच संधी होती… मुलांसाठी तसेच आम्हा तायांसाठी देखील! आम्ही एका पायावर तयार झालो.

‘कार्यशाळा घेताना भाषेचे काय, दुभाषी लागेल का?’ असा प्रश्न मनात आला, तेव्हा माधुरीताईंनी सांगितले, ‘‘त्यांना शब्दांची गरजच लागत नाही. अभिनय हीच त्यांची भाषा आहे.’’ आमच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढली. पुढच्याच बुधवारी दुपारी 4 ते 7 अशी वेळ ठरली. चौथी ते सातवीची सुमारे 30 मुले-मुली या कार्यशाळेत सहभागी झाली.

मुले गोलात बसली. डॅनियल औपचारिक ओळखीच्या फारसे भानगडीत पडले नाहीत. प्रत्येकाच्या जवळ जाऊन, हात हातात घेत हॅलो म्हणत त्यांनी प्रत्येक मुलाशी ओळख करून घेतली. स्पर्शाच्या, डोळ्यांच्या भाषेतून ते मुलांच्या जवळ जाऊन पोचले. ह्यातून मुले आणि त्यांच्यामधील अंतर झपाट्याने कमी झाले. त्यानंतर ते मुलांप्रमाणेच फरशीवर मांडी घालून बसले आणि टाळ्यांचा खेळ चालू झाला. एकानंतर एक अशा टाळ्या वाजवत मुलांनी कमीतकमी वेळात फेरी पूर्ण करायची होती. अशा प्रकारे दोन फेर्‍या झाल्यावर तिसर्‍या फेरीला त्यांनी एक वेगळीच कल्पना सांगितली. बाजूबाजूला बसलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या मुलांनी एकमेकांकडे बघत एकाच वेळी टाळी वाजवायची. नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाने… असे करत फेरी पूर्ण करायची. असे करताना मुले छान जागी झाली, सजग झाली, आणि मनाने कार्यशाळेच्या परिघात आली.

त्यानंतर त्यांनी मुलांना चालायला सांगितले… एकमेकांना धक्का लागू न देता हॉलभर चालायचे. चाला-थांबाच्या या खेळातून त्यांनी मुलांच्या दोन-दोनच्या जोड्या केल्या आणि ते सांगतील त्या विषयावर जोडीतल्या एकाने दुसऱ्याचा पुतळा बनवायचा असे सांगितले. म्हणजे असे, की आपल्या जोडीदाराला मातीचा गोळा मानून त्याला हवा तसा आकार द्यायचा. जोडीदारानेसुद्धा हालचाल न करता ते आकार तसेच राहतील, हे पाहायचे. मुलांनी त्यांच्या आवडीचा खेळ, आवडीची जागा, आवडीची गोष्ट पुतळ्याच्या माध्यमातून दाखवायची होती. आळीपाळीने त्यांनी आपापल्या जोडीदाराचे पुतळे बनवले. जोडीदाराच्या संपूर्ण शरीराचा वापर करा, असे डॅनियल ह्यांनी आग्रहाने सांगितले. बॉलिंग करणारा, पोहणारा मुलगा असे खेळ आणि पुस्तक, झोका अशा वस्तूंचे पुतळे मुलांनी ‘घडवले’. जागा दर्शवणे जरा अवघड गेले मुलांना; पण ती अडली नाहीत. झाडाखालची जागा, घर अशा त्यांच्या आवडत्या जागा दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला.

या कार्यशाळेसाठी डॅनियल ह्यांनी माधुरी पुरंदरेंच्या ‘राजा शहाणा झाला’ या पुस्तकातली ‘वेडा वारा’ ही गोष्ट निवडली होती. गोष्टीतल्या वेगवेगळ्या प्रसंगांवर मुलांनी गटाने अभिनय करायचा होता. याची पूर्वतयारी म्हणून त्यांनी एक कृती घेतली. काही शब्द आणि संकल्पनांचा अर्थ मुलांच्या मनात तयार व्हावा असा यामागे हेतू होता. तीन-तीन मुलांचे गट केले आणि त्यांना एकेक शब्द दिला. या शब्दावर आधारित शिल्प तिघांनी मिळून तयार करायचे होते. दिलेले शब्द होते – गोष्ट, नाटक, स्वच्छता, गटकाम इत्यादी.

सहसा कार्यशाळांमध्ये अभिनय करणे – वैयक्तिक किंवा गटात – अशी कृती अंतर्भूत असतेच; पण या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, एका वेळी फक्त एका गटाने अभिनय करायचा आणि बाकीच्यांनी तो बघायचा अशी रचना इथे नव्हती. सर्व गटांनी एकाचवेळी अभिनय करायचा, आपले शरीर वापरून काहीतरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याची मजा घ्यायची. आपल्याला कुणीतरी पाहते आहे, किंवा कुणी हसेल आणि नंतर त्याबद्दल काहीतरी टीकाटिप्पणी करील अशी भीतीच त्यामुळे उरली नव्हती. या अनुभवामुळे मुले मस्त मोकळी होत होती.

यांनतर मुलांनी त्यांच्या आजूबाजूला त्यांना काय अजिबात आवडत नाही, त्याचे शिल्प तयार करायचे होते. यात त्यांनी मुलांना विषयाच्या दिशेने नेण्यासाठी काही शब्द सुचवले… कचरा, गोंधळ असे.

ज्या गटाने उत्तम काम केले आहे किंवा काही वेगळी कल्पना मांडली आहे, त्यांना आहे त्याच जागेवर पुन्हा एकदा सर्वांसाठी करून दाखवायला सांगतले जाई.

ह्यानंतर एका खेळाच्या माध्यमातून त्यांनी दोन मुली आणि दोन मुलगे असे चार-चार जणांचे गट केले. ‘वेडा वारा’ ही गोष्ट त्यांनी सहा भागांत विभागली होती. गोष्ट थोडक्यात अशी आहे –

  • सुरुवातीला एका स्वच्छ, सुंदर आणि टुमदार गावाचे वर्णन येते.
  • ते एका चेटकिणीला आवडत नाही, त्यामुळे ती या गावावर जादूच्या काठीने वेडा वारा सोडते.
  • या वाऱ्यामुळे माणसे वेड्यावेड्यासारखी वागायला लागतात. नियम पाळेनाशी होतात, आळशीपणा करू लागतात आणि सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण होते.
  • मात्र हा वारा वरवरूनच वाहून गेला असल्याने छोट्या मुलांपर्यंत पोचलेलाच नसतो. आता मुलेच मोठ्यांना शिकवू लागतात; पण मोठी माणसे ऐकतच नाहीत.
  • मग दोन मुली युक्तीने चेटकिणीची काठी हस्तगत करतात आणि जाळून टाकतात. जादू संपते.
  • पुन्हा सगळे गाव स्वच्छ आणि सुंदर होते.

पुस्तकातला गोष्टीचा भाग माधुरीताई वाचून दाखवत होत्या. आणि मुले गटाने मूक अभिनयाच्या माध्यमातून तो-तो प्रसंग जिवंत करत होती. मुलांचा अभिनय अधिकाधिक जिवंत आणि सहज व्हावा याकरता डॅनियल स्वतः एखादी अ‍ॅक्शन करून दाखवत होते. सबंध शरीराचा वापर करत त्यांनी सोसाट्याचा वारा ज्याप्रकारे उभा केला, ते पाहून मुलेही मोकळी झाली.

त्यांच्या हालचालींतला अवघडलेपणा कमी झाला. हालचाली करताना सुरुवातीला मुलांना खूप हसू येत होते. त्यांना वाटत असलेल्या संकोचाचीही ती अभिव्यक्ती असेल; पण हळूहळू हसू कमी होत अभिनयातला नेमकेपणा वाढू लागला. गावभर कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले दाखवताना एक मुलगा रस्त्यावर शौचाला बसला आहे असेही मुलांनी मोकळेपणी दाखवले.

  • तुमचे सगळे शरीर वापरा
  • गटातील सर्वांचा सहभाग आहे ना, याकडे लक्ष द्या.
  • मागे राहणार्‍या मुलांना सामावून घ्या.
  • फक्त उभ्याउभ्या हालचाली करू नका. जास्तीतजास्त काय शक्य आहे ते बघा.

अशा सूचना ते देत होते. सूचना देताना अर्थातच देहबोलीचा सुरेख वापर होता. त्यामुळे खरेच भाषेचा प्रश्नच उद्भवला नाही. दुसऱ्या प्रसंगात चेटकिणीचा प्रवेश झाला आणि धमाल वाढली. मुलींनी केस मोकळे सोडून आणि ओढण्यांचा कल्पक वापर करत चेटकिणी सुरेख साकारल्या.

काही मुले ह्या सगळ्यात अगदी समरस झाली होती; पण काही मुले दंगा करत होती. दंगा करणार्‍या मुलांना त्यांनी पुढे बोलवले. त्यांचे वागणे आणि त्यांच्याकडून असलेली अपेक्षा, ह्याबद्दल त्यांनी मुलांना स्पष्ट शब्दात सांगितले. मुलांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले.

काही मुले मागे-मागे राहत होती, दमली देखील होती. अशा 3-4 मुलामुलींना त्यांनी शेवटी पुढे बोलवून या कार्यशाळेतले काय काय आवडले ते विचारले. सर्वांसमोर येऊन काहीतरी बोलायला, करून दाखवायला मिळावे, सर्वांनी आपले कौतुक करावे असे प्रत्येकालाच वाटते. काही मुलांच्या मात्र हे कधीच वाट्याला येत नाही. अशा मुलांना एकदातरी पुढे येण्याची संधी मिळावी यासाठी ही योजना होती.

या कार्यशाळेतून आम्ही खेळघरातल्या ताई काय शिकलो असा विचार केला, तर मुलांचे घेतले जाणारे खेळ, निरनिराळ्या कृती-पद्धतींबद्दल शिकलोच; पण मुलांबरोबर काम करताना सकारात्मक शिस्तीसंदर्भात देखील काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो.

सलग तीन तास, 30 मुलांना खिळवून ठेवणे अजिबात सोपे नव्हते. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या मुलांबरोबर, मोठ्यांबरोबर केलेल्या कामातूनच ही पद्धत विकसित होत गेली असणार. त्याची छोटीशी का होईना अनुभूती आम्हाला मिळू शकली, त्यातून आमच्या कल्पनांनाही पंख लाभले, असा हा एक अनोखा अनुभव!

Shubhada_Joshi

शुभदा जोशी

shubhada.joshi6@gmail.com

लेखिका पालकनीती परिवारच्या विश्वस्त आणि खेळघर प्रकल्पाच्या समन्वयक आहेत.

लेखिका पालकनीती परिवारच्या विश्वस्त आणि खेळघर प्रकल्पाच्या समन्वयक आहेत.

(डॅनियल ए. केलिन, संचालक, ड्रामा एज्युकेशन होनुलुलू थिएटर फॉर यूथ, ह्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्रिपुरा येथे काम करण्यासाठी मानाची फुलब्राईट नेहरू शैक्षणिक फेलोशीप नुकतीच जाहीर झाली आहे. त्यासाठी डॅनियल सध्या भारतातील विविध कलाक्षेत्रातील कलाकारांशी, कला आणि शिक्षण यांच्या संबंधाविषयी संवाद साधत आहेत. या संदर्भात पुणेस्थित पुरातत्त्वशास्त्रज्ञ व लेखिका डॉ. अनघा भट (कुसुम) आणि लेखिका-कलाकार माधुरी पुरंदरे यांच्याशी त्यांची भेट झाली, आणि पालकनीतीचे खेळघरही या संवादात सामील होऊ शकले.)