असं सगळं भयंकर आहे…तर आपण काय करू या ?
साधना नातू
‘मुलांकडे लक्ष देऊ नका.’
‘गप्प बसा’ संस्कृतीचे हे ब्रीद वाक्य आपण तंतोतंत पाळतो. शिवाय हाताची घडी तोंडावर बोट, म्हणजेच चांगले, देवासारखे वागणे; गुरूजी व मोठ्यांची आज्ञा पाळावी, इ. अनेक शब्दांचे बाळकडू नेहमी लहानांना पाजले जातात.
नम्रता, आदर यासार‘या सद्भावना मुलांच्या मनांत रूजवण्यासाठीही पालक लहानांना ही ‘गप्प बसा’ संस्कृतीचे बळी बनवतात. मनांतून मुलांचे भले चिंतून त्यांना गप्प बसवतात, परंतु पुढच्या काळांत ह्याच वास्तवाची विशेषत: मुलींना सवय होते. ‘उलटउत्तर देऊ नकोस,’ ‘वाद घालू नकोस.’ ‘स्वत:ला शहाणा समजू नकोस, गप्प बस!’ ही वाक्य शतकानुशतकं पालक म्हणत आलेले आहेत.
या सर्व सामाजिकीकरणाच्या, मनं घडण्याच्या प्रकि‘येत आपण लहान मुला-मुलींना मोकळेपणानं बोलणं अशक्य केलेलं असतं. मग लैंगिकतेबद्दल, त्यांतही लैंगिक अत्याचार घडले, तसा प्रयत्न झाला, तर त्याबद्दल बोलणं फारच दुरापास्त!
कुटुंबव्यवस्था हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे आणि कुटुंबानं दिलेल्या आधाराचा महत्त्वाचा वाटाही त्यांमधूनच येतो. त्याच बरोबरीनं संयुक्त कुटुंबांमध्ये ‘घराची शांती’ टिकवण्यासाठी गप्प बसलेली मुलं, स्त्रिया यांना काय काय सहन करावं लागलेलं आहे याचाही हिशोब मांडावा लागेल. विभक्त कुटुंबांमध्ये कुठलेही प्रश्न नसतात, असा त्याचा अर्थ जरी नसला तरी संयुक्त कुटुंबाची जी एक कौतुकपूर्ण आठवण काढली जाते, गतेतिहासाच्या रम्य आठवणी काढून ‘गेले ते दिवस!’ असा सुस्कारा सोडला जातो, तेव्हा हे संयुक्त कुटुंब वेगवेगळ्या अनेक लोकांना गप्प बसवून बनलेले असते हे विसरता कामा नये. अशा परिस्थितीत स्वत:चं मन मोकळेपणानं उघड करणं हेच निषिद्ध ठरतं. ह्या ‘निषिद्धां’चा इतका धसका घेला जातो की बहुतांश जण अशा अनुभवांबद्दल बोलतच नाहीत. जे बोलतात त्यांना ‘खोटारडे’ ठरवले जाते, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत. ‘शरम, गुप्तता, गप्प बसणे’ ह्यातच सत्य पुन्हा हरवून जातं. त्यांना स्वत: बद्दलच घृणा येते. ‘आपलीच चूक आहे, आपणच घाणेरडे आहोत, आपल्या मुळेच हे अत्याचार घडत आहेत असं वाटत राहतं.
तेव्हा निर्भीडपणे बोलण्याचे, विश्वासाचे अवकाश आपण आपल्या मुलांना देणार की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. जळगाव-वासनाकांडाच्या वेळेला एक प्रश्न वारंवार विचारला गेला, ‘एवढं सगळं झालं पण ह्या मुली कोणाशी त्याबद्दल बोलल्या कशा नाहीत?’
वयाच्या 17 व्या वर्षापर्यंत ज्यांना ‘‘बोलू नकोस, उगीच आगाऊपणा करू नकोस, कॉलेजमधे जायला लागल्यावर कशी शिंग फुटली आहेत’’ असे प्रोत्साहन (!) मिळाल्यावर मुली बोलतील आणि ते पण भयंकर लैंगिक अत्याचाराबद्दल ही अपेक्षाच अवाजवी आहे.
त्याकरता घरात, शाळेत, महाविद्यालयात त्यांना निर्भय बनण्याचे अभिव्यक्तीचा मोकळा अवकाश मिळायला हवा.
एक तरी व्यक्ती विश्वासाची हवीच प्रत्येक माणसाला स्वत:च्या जीवनांत किमान एक तरी विश्वासाची व्यक्ती हवीच. मग ते पालक, शिक्षक, मित्रमैत्रीण, नातेवाईक कुणीही असो. ह्या व्यक्तीची गरज कुणीही समजू शकेल, विशेषत: अत्याचारांच्या प्रसंगात ती अधोरेखित होते. घडलेलं सर्व व्यक्त करण्यासाठी तर हे विश्वासराव किंवा विश्वासिनीबाई हवे असतातच, पण केवळ ऐकणे प्रत्येक वेळी पुरेसे नसते. त्यापेक्षा जास्त साथ मिळावी, आपल्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी आपली बाजू घेणारा, बाजू लढवून न्याय मिळवणार्या साथीची गरज असते. आपल्या मुली-मुलांसंदर्भात ही गरज शक्यतोवर प्रथम आपणच स्वीकारली पाहीजे, भागवली पाहिजे. अशा प्रकारे स्वीकृती मिळणे हे त्या माणसासाठी – त्या वेळेला जीवनमरणाच्या प्रश्नाइतके गंभीर असते. खरोखरच कुणाशी बोलता न येऊन किंवा बोलूनही सक‘ीय स्वीकृती न मिळाल्यानं अनेकांना आत्महत्येच्या विचारांशी जावं लागलेलं आहे.
नेमके हेच सगळे ‘अत्याचार’ करणार्याच्या पथ्यावर पडते. ते सुरक्षित राहतात, कारण त्यांच्याविरुद्ध फारसे कोणी बोलत नाही. एखादे मूल बोललेच तर त्यावर विश्वास ठेवला जात नाही. कुटुंबातील ‘शांतता’ भंग व्हायला नको म्हणून काहीच केलं जात नाही.
लैंगिकता आणि स्वत:च्या शरीराची
निकोप जाणीव
अत्याचारांबद्दल बोलण्याच्या आधी लैंगिकतेबद्दलच बोलणं आवश्यक आहे, याबद्दल दुमत नसेल.
लैंगिकता शिक्षण याचा अर्थ शरीराच्याच पातळीवर नव्हे, तर मन आणि सामाजिक, सांस्कृतिक संदर्भाच्या पार्श्वभूमीवर त्याचं वर्तनात होणारं रूपांतर अशा सर्वार्थानं घेतला जायला हवा. लैंगिकता-शिक्षण याचा अर्थ, मुलींना मासिक स्राव आणि शरीरांतील पुनरुत्पादन संस्थेची माहिती, फारतर पुढे जाऊन शरीरसंबंधांची ठोकळेबाज माहिती असा ‘माहिती’ देण्याचा कार्यक‘म न ठरता, त्यांतील संवेदनाशील तारुण्यभानाचा प्रयत्न असायला हवा.
त्यांत स्त्री व पुरुष लिंगभाव भूमिकांची चर्चा असायला हवी आणि ती पारंपरिक भूमिकांच्या पलिकडेही पोचायची गरज आहे. स्त्री आणि पुरुष हे वेगळे आहेत, परंतु त्यांत वर-खाली असा पायर्यांचा फरक नाही, ते एकमेकांचे विरोधकही नाहीत यावर भर हवा. त्यातूनच पुढे ‘आक्रमकता’ ‘नात्यांमधील हिंसाचार’, लैंगिक अत्याचार याबद्दलही बोलता येईल.
ह्यात लैंगिकता व स्वत:च्या शरीराची स्वीकृती ह्याबद्दल निकोप स्वयंस्फूर्त अशा अभिवृत्ती तयार होण्यावर भर असेल.
अशा चर्चेमुळे मुलांना लैंगिक शोषण व अत्याचारा विरूद्ध समानता व निवडीवर आधारित नाती (आई-वडिल, पालक-मुलं) ह्यांच्यातील फरक नीट समजेल. शिवाय अशा उदाहरणांमुळे एकतर अत्याचाराबद्दल (झाला तर) बोलण्याचेही बळ येईल, चूक सर्वस्वी अत्याचार करणार्याची आहे हे समजेल. त्यामुळे त्यांच्या स्वप्रतिमेला धक्का पोचणार नाही.
आपण शरीरानी किंवा मनानी मलिन, घाणेरडे झालेलो नाही याची खात्रीही असेल कारण ‘माझ्या शरीरावर माझा हक्क आहे’ ही महत्त्वाची जाणीव त्यांत असेल.
स्त्रीवादी दृष्टीकोण
लहान मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार का घडतो? याचा शोध घेताना स्त्रीवादी विचारसरणी नात्यांमधील सत्तेच्या समीकरणाकडे बोट दाखवते. पुरुषप्रधानता, कुटुंबांतर्गत राजकारण पुरुष-सत्ता तसंच पालक/प्रौढ सत्ता याला कारणीभूत असते. बलात्काराचा मुद्दा विविध संदर्भांतून पहाण्याचीही कल्पना स्त्रीवादी चळवळींनीच आग‘हानं पुढे आणली. समाजामध्ये त्यावर सरळपणानं व पोटतिडीकेनं मोकळं बोलणं होऊ लागलं आणि त्यापुढची पायरी म्हणून लग्नांतर्गत बलात्काराचाही विचार समोर आला. पुरुषाला मालक म्हणणार्या-मानणार्या समाजांत ही क‘ांतीच म्हणावी लागेल.
बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा विषयही जिथे गोपनीय, चारचौघात न बोलण्याचा किंवा अर्वाच्य टिंगलीचा ठरतो, तिथे आजही लग्नांतर्गत मानसिक व शारीरिक बलात्कारांना विरोध करणे अतिशय कठीण आणि फार झालं तरच बोलण्याचा विषय आहे यात शंका नाही.
सहाजिकच अबल-अगतिकता आणि अत्याचारांचं प्रमाण बालिकांमध्ये आणि पुढे स्त्रियांमध्येही दिसतं. या अगतिकतेच्या परिघातच वाढवलेल्या या स्त्री-जीवाला स्वत:च्या वा इतरांच्या शारीरिक-मानसिक शोषणाकडे चिकित्सक दृष्टीनं पहाताच येत नाही. तशी शक्यताच उरत नाही.
अत्याचार कोण करतो
याबद्दलचीही मिथकं आता मोडली गेली आहेत. अत्याचार करणारे वय, जात, वर्ग, धर्म, शिक्षण याच्या पलिकडे गेलेले असतात. ते मनोरुग्ण असतात म्हणून तसे वागतात हेही खरे नव्हे.
विविध सन्माननीय व्यक्तीसुद्धा यात असतात. कधी मुलांना तपासताना, कधी त्यांना घडवताना.. डॉक्टर्स किंवा शिक्षकही.
तेव्हा अशक्य वाटले तरी आपले मूल जेव्हा अशा खात्रीच्या व्यक्तीबद्दल बोलले तर प्रथम त्याचे ऐकून घ्या, तो खरे सांगत असेल (खरे-खोटे नंतर पडताळता येते) त्या वेळी तुम्ही ऐकणे, अत्यावश्यक असते, नाहीतर त्याला पूर्णपणे ‘एकटे व निराधार वाटते.’ हा पालकांच्या कसोटीचा क्षण असतो.
जर हे अत्याचार करणारे ‘आपल्यातीलच’ असतील तर त्याचा शोध घेणे, त्यांना समुपदेशनासाठी सुचवणे आवश्यक असते. पुन्हा अत्याचार घडू न देणेही आपल्याच हातात असते.
अत्याचारी माणूस जर स्वत: एका हिंसक, आक्रमक कुटुंबात वाढला असेल व त्यामुळे तसा बनला असेल तर त्यालाही सहृदय सहाय्याची व समुपदेशनाची गरज असते.
हिंसा, अत्याचार याशिवाय समस्या सोडवण्याचे व जीवन जगण्याचे वेगवेगळे पर्याय असू शकतात व त्यांच्या ‘अमानवी’ वर्तनाचे कोणत्याही मापदंडांनी समर्थन करता येऊच शकत नाही हे त्यांना ठामपणे सांगणे गरजेचे आहे. यामध्येही, स्वत:च्या कमतरतेची जाणीव असणारांना मदत देण्याची व आदराची वागणूक देण्याची आपली भूमिका असावी.
बालकांवर लैंगिक अत्याचार होण्याबद्दलच्या चर्चेत एक मुद्दा अनेकदा व अपरिहार्यपणे येतो ‘बालकाला त्यांत अत्याचार वाटला नसेल तर काय?’ असा. या मुद्याची पुढची पायरी अशी असते की, हा चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या विचारांतल्या त्रुटींचा परिणाम आहे. मूल अत्याचार म्हणत नसताना, तुम्ही का म्हणता? काय म्हणून म्हणणार? याचं पुरेसं उत्तर देताना कार्यकर्त्यांनाही अडचण पडते. खरोखरच काही बालके-विशेषत: मुलगे हा अत्याचार नाहीच उलट मजा वाटली अशीही भावना मोठेपणी नोंदवताना दिसतात.
आम्हांला वाटतं, स्त्रीला ‘अबल अगतिक’ करणार्या समाजरचनेचाच हा एक परिणाम आहे. आपण सबल, संपूर्ण ही भावना जेव्हा मुलग्यांच्या मनांत निर्माण होते तेव्हा लैंगिक कृतीतला सक‘ीय घटक पुरुषच ही कल्पना मुलग्यांना पोहोचते, तेव्हा आपल्याला मजाच येते हीच भावना त्यांतून मनांत घर करून रहाते, व पुढे त्याच प्रकारे व्यक्त होते. तर दुसरीकडे मुलीचं कौमार्य ही भयंकर महत्त्वाची बाब! ती गोष्ट पुरुषासाठी नव्हे, उलट त्याचं कौतुक फिदा होणार्या बायांच्या सं‘येवर मानण्याची वृत्ती. याचाही परिणाम होतो.
पिडोफिलीया किंवा ‘बालकांशीच समागम’ करण्याची वृत्ती हा या विषयांतला एक पैलू अत्यंत गुंतागुतीचा आहे. यामध्ये दोन विचार प्रवाह मानलेले दिसतात. काहींना फक्त बालकांसहच समागमाचा आनंद मिळतो असे एक मत आहे. तर बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे हे पिडोफिलीया या विकृतीने पीडित असतात असे दुसरे मत आहे.
यातील दुसरे मत सामान्यपणे पटण्यासारखे दिसते, तरी त्यांतही एक अंतर्गत विसंगती आहे, म्हणजे लैंगिक अत्याचाराची जाणीव त्यामध्ये असली तरी दोषी व्यक्तीला ‘मानसिक आजारी’ मानून दोषारोपांतून सुटून जाण्यासाठी एक वाट तयार करून दिलेली आहे.
प्रत्यक्षांत काहींबाबत हा ‘आजारीपणा’ खरोखरच असला, तरी सर्वांसाठीचा हा नियम होऊ शकत नाही. येवढेच नव्हे तर अमेरिकेसार‘या देशांत तर या ‘पिडोफिलीया’वाल्यांची संघटना असून त्यांत 20,000 ते 25,000 सदस्य आहेत. हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. याचा एक परिणाम म्हणजे ‘बालक लैंगिक कामगार’ म्हणजे, लैंगिक व्यापारांत ओढली गेलेली मुले, त्यांचे प्रमाण वाढेल. त्यांचे वेगळ्याच पातळीवरील शोषण होईल. काही वर्षापूर्वी गोव्यामधे श्रीमंत परदेशी टूरिस्टना मुले पुरवणारी टोळी उघडकीस आली होती व काही काळापर्यंत वादंग माजले होते. हे लैंगिक अत्याचार प्रश्नाचे सर्वांत टोकाचे, बीभत्स, व्यापारी रूप.
लैंगिक अत्याचारांसंदर्भातील वास्तव परिस्थिती आणि आपल्या मनातल्या कल्पना अनेकदा वेगवेगळ्या असतात. त्या तपासून पहायला हव्यात.
बालकांवरचे हे अत्याचार परक्या अनोळखी व्यक्तींकडून होण्याची भीती आपल्या मनात असते. पण अनेकदा हे अत्याचार नात्यातल्या किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून घरातच होताना दिसतात. घराबद्दलच्या ‘सुरक्षित’ ह्या कल्पनेला ह्यातून सुरूंग लागतो.
अगदी लहान मुलांच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही असं आपल्याला वाटतं पण या संदर्भातले अभ्यास वेगळंच चित्र समोर ठेवतात. तीन महिन्यांपासूनची लहान मुलं ह्या अत्याचारांना बळी पडली आहेत.
आणखी एक समज म्हणजे अत्याचारी हे बर्याचदा गरीब, बेकार, पुरुष असतात. पण सर्वच थरांमधल्या स्त्री-पुरुषांमध्ये ही विकृती असण्याची तेवढीच शक्यता आहे. वरकरणी दिसायला या अतिशय सन्माननीय व्यक्ती असू शकतात.
लैंगिक अत्याचार हा एखादा, क्वचित येणारा अपघातासारखा अनुभव असेल असंही आपल्याला वाटतं. पण समाजात दिसणारं ह्याचं प्रमाण पाहिल्यावर या प्रश्नाचं भयंकर स्वरूप लक्षात येतं. येवढंच नव्हे तर एकदा अत्याचार करणारी व्यक्तीही वेळीच उपाय योजना केली गेली नाही तर वारंवार संधी साधू शकते.
अचानक येणार्या संकटासारखी ही घटना असेल असा समजही योग्य नाही. बरेचदा अत्याचाराची सुरवात मुलावर अधिकार गाजवणे, त्याच्याशी स्पर्शाचे खेळ खेळणे, घाणेरडे बोलणे, चित्रे दाखवणे ह्या क‘मानं होऊन हळुहळू बलात्काराची पायरी गाठते.
अत्याचार हा नेहमीच हिंसक हल्ल्याच्या स्वरूपात असेल असे नाही. बर्याचदा कळत-नकळत सूक्ष्म पातळीवर त्याची सुरूवात घडते व त्याचे प्रमाण वाढत जाते.
असं सगळं आहे.
तर आपण काय करूया?
आपल्याला हे घडू द्यायचं नाही आहे, यासाठी पालक, शिक्षक, समाज आणि काही सामाजिक संस्था किंवा संघटित प्रयत्न अशा पद्धतीनं सर्वांनी उपाय योजून आपण प्रयत्न करूया.
त्यासाठी पालकांनी तर विशेष पुढाकार घ्यायला हवा. मुलामुलींशी या शक्यतेबद्दल बोलायला हवं.
केव्हा? घटना घडायच्या आत!
कोणत्या वयात? वय वर्षं दोनला सुद्धा
कसं सांगायचं? या वयाला साजेशी भाषा वापरून
काय सांगायचं? सोपी उदाहरणे देऊन
आपल्या घराचे दार जसे बंद ठेवतो…. तसंच… (चड्डी काढू नये, दुसर्याच्या घरी शूला जाऊ नये, शू च्या जागी कोणाला हात लावू देऊ नये इ.)
त्यांना कशाचा सामना करायचा आहे? जबरदस्ती (मुलींना व मुलांना ही) करणार्या व्यक्तीचा. ती व्यक्ती परिचितही असेल. तिला ठाम नकार द्यायचा. (जसे दुसर्याला खेळणे द्यायला नाकारता तसे.)
स्वसंरक्षण कसे करायचे? तुमचे शरीर तुमचे आहे हे लक्षात ठेवून, दुसर्यांना घटनेबद्दल सांगून, तुमचा दोष नव्हता हे लक्षात घेऊन.
ह्या गोष्टी अत्याचार घडू नये म्हणून ताबडतोबीने करता येतील – पण ही काही वास्तवाची प्रतिकृती नव्हेच (असे समजणेही भाबडेपणाचे होईल). यात पालक-पाल्य ‘संवाद’ असणे गृहीत धरले आहे. पण अनेकदा त्याचा अभाव दिसतो. तेव्हा कुटुंबात आश्वासक वातावरण निर्माण करण्यापासून सुरूवात करायला हवी.
शिवाय जिथे अत्याचार होऊन गेला आहे तिथे मुलाला/मुलीला बोलते करणे, तिचा भावनिक कोंडमारा समजून घेणे, पुढील आयुष्याशी ती/तो कसे समायोजन करू शकतील हे बघणेही तितकंच महत्त्वाचे आहे.
या विषयाची गंभीरता आणि गुंतागुंत अधोरेखित करण्याचा, एवढेच नव्हे, तर या प्रश्नाला न डगमगता तोंड देण्याची योजना आखण्याचा हेतू मनांत धरून या लेखाची मांडणी केलेली आहे, सुरक्षित आणि आनंदी बालपण कोमेजून जाऊ नये हीच त्यामागची अपेक्षा आहे.
दि‘ीची साक्षी, राही, बंगलोरची संवाद यासार‘या संस्था ह्या मुद्यावर सक‘ीय आहेत, परंतु महाराष्ट्रासार‘या एरवी प्रगत राज्यांत ह्या मुद्यावर वेळ आली की फारसे कुणाचे नावही सुचत नाही. लहान प्रमाणांत काम करणारे गट आहेत, परंतु याच विशिष्ठ हेतूंसाठी संघटना मात्र नाहीत. ही गरजही या लेखानिमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर मांडावीशी वाटते. स्त्रीवादी चळवळींनी ‘मथुरा प्रकरणापासून ते भवरीबाईपर्यंतची मजल मारलेली आहे आणि त्यापासून प्रेरणा घेऊन बालकांवरील लैंगिक अत्याचारांचा समूळ भेद होण्याकडे आपण लक्ष केंद्रित करायला हवेच आहे.
स्त्री आंदोलन संपर्क समितीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मांडलेल्या मागण्यांमध्येही, बालकांवरील लैंगिक अत्याचाराला कायद्यामध्ये वेगळे स्थान हवे असा मुद्दा आहे. (या वर्षीच्या मागण्यात)
आपण सर्वांनी स्वत:च्या कुटुंबाच्या, परिसराच्या पातळीवर आणि एकत्र येऊन संघटितपणे विचार आणि कृती मधून हे अमानुष वास्तव संपूर्णपणे बदलून टाकण्याचा निर्धार करूया, आपल्या मुलांसाठी आपण हे केलंच पाहिजे.