एकच प्याला

एकच प्यालाहे नाटक राम गणेश गडकऱ्यांनी १९१७ साली लिहिले. एक बुद्धिमान तरुण दारूच्या नशेपायी आपली आणि आपल्या कुटुंबाची कशी वाताहत करून घेतो याचे अतिशय हृदयद्रावक चित्रण त्यात केलेले होते. नाटक हा समाजाचा आरसा मानला, तर त्या काळीदेखील दारूच्या प्रश्नाने धारण केलेले रौद्ररूप गडकऱ्यांसारख्या लेखकाला आपल्या आजूबाजूला दिसत होते, खुपत होते आणि त्याला वाचा फोडावी असे त्यांना वाटले होते. आज एका शतकानंतर दारू आणि एकूणच अमली पदार्थांच्या प्रश्नासंदर्भात आपण काय मजल मारली आहे? उपाययोजना करणे लांबच राहिले, किमान हा प्रश्न तरी आपल्याला संपूर्णपणे समजला आहे का? या प्रश्नाचे काही वेगळे पदर पाहूयात.  

अमली पदार्थ उदासी कमी करत नाहीत, वाढवतात

दारू, तंबाखू आणि इतर अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होतात हे तर आपण जाणतोच. म्हणजे कॅन्सर होणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी; पण या पदार्थांमुळे माणसाच्या मानसिक आरोग्यावरही खूप मोठा परिणाम होतो हे अनेकांना ठाऊक नसते. गंमत बघा, दारू आणि तंबाखू घेताना माणूस तेमजेसाठीघेतो. त्यामुळे मोकळे, हलके वाटेल, आपले टेन्शन कमी होईल, आपण अधिक आनंदी होऊ असे व्यक्तीला वाटत असते. काही तासांसाठी हा आनंद ते अनुभवतातही; पण याचे दीर्घकालीन परिणाम काय होतात? संशोधन असे सांगते, की असे पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशन (नैराश्य) आणि  अँग्झायटी (अति चिंता करण्याची प्रवृत्ती) अधिक प्रमाणात दिसून येते. हे का होते ते थोडे समजून घेऊयात

    नैराश्य आणि अँग्झायटी वाढण्याचे पहिले आणि सगळ्यात मोठे, मूलभूत कारण अमली पदार्थांच्या काम करण्याच्या प्रक्रियेत दडले आहे. अमली पदार्थांनी मिळणारा आनंद हा क्षणभंगुर तर असतोच, शिवाय त्यांचा परिणाम कमी झाल्यावर / उतरल्यावर माणूस अधिकच अस्वस्थ होतो. असे का? आपल्या मेंदूमध्येडोपामिननावाचे एक रसायन असते. जेव्हा आपल्याला एखादे यश मिळते किंवा आपल्या मनासारख्या गोष्टी घडतात, तेव्हा मेंदूमध्ये डोपामिनची एक लहर उठते. डोपामिनची अशीच तीव्र लहर व्यक्तीच्या मेंदूत अमली पदार्थांच्या सेवनानेदेखील उठते. यालाच अमली पदार्थांचीकिक बसणेम्हणतात. म्हणजे कुठल्याही कर्तृत्वाशिवाय डोपामिनची किक बसण्याचा, आनंदी होण्याचा राजमार्ग हे अमली पदार्थ लोकांना मोकळा करून देतात. आपण खूप भारी आहोत, आयुष्यात सगळे सुरळीत, मस्त सुरू आहे, असे काहीसे या किकमुळे वाटायला लागते.

अर्थात, हे इथेच संपत नाही. कालांतराने हा अमली पदार्थांनी निर्माण होणारा डोपामिनचा पूर सवयीचा होतो आणि मग पहिल्यासारखी किक बसेनाशी होते. म्हणजे आधी डोपामिनच्या ज्या मात्रेने आनंदाची अनुभूती होई, तेवढ्या डोपामिनने आता आनंद वाटेनासा होतो. म्हणून मग किक बसण्यासाठी अधिक डोपामिन स्रवले पाहिजे. त्यासाठी अधिक दारू पिणे आले. मेंदूमध्ये नैसर्गिकपणे स्रवणारे डोपामिन आता व्यक्तीला पुरेसे वाटत नाही. साध्या गोष्टींमधून आनंद मिळेनासा होतो. खेळ, संगीत, साहित्य, कला यांमधून उठणारी डोपामिनची लहर पुरेनाशी होते. व्यक्ती चिडचिड करू लागते, तिला अस्वस्थ वाटते, झोप लागत नाही, हात थरथरतात. याला विथड्रॉव्हल सिम्प्टम्स (withdrawal symptoms)  म्हणतात. तसे तर सामान्य, निर्व्यसनी माणसेही ताणाला सामोरी जातच असतात. मात्र त्यांच्याकडे ताण हाताळण्याची इतर अनेक कौशल्ये असू शकतात.

खूप वर्षे नित्यनेमाने अमली पदार्थ घेण्याची सवय असल्यास ही लक्षणे अधिक तीव्र असतात हे खरे; पण काही वर्षांच्या सवयीनेदेखील सौम्य लक्षणे (माईल्ड सिम्प्टम्स) निर्माण व्हायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, सिगरेटची सवय असणाऱ्या व्यक्तीला सकाळी सिगरेट प्यायल्याशिवाय उत्साह वाटत नाही, शौचाला होत नाही. असे का होते? त्यांचा मेंदू सिगरेटशिवाय सतत एका माईल्ड विथड्रॉव्हलमध्ये राहतो. सिगरेट प्यायल्यावरच त्यांना थोडे बरे वाटते. या उलट सामान्य, दारू किंवा सिगरेट घेणाऱ्या व्यक्तीला दिवसभर उत्साही, आनंदी वाटू शकते. म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीला कारणाशिवाय आनंदी, उत्साही राहण्यासाठी हळूहळू अमली पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. नाहीतर त्यांना नैराश्य आणि चिंता जाणवत राहते

नैराश्य आणि चिंता निर्माण होण्याचे दुसरे कारण म्हणजे माणूस अमली पदार्थांचे सेवन करायला लागला, की हळूहळू त्याच्या शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात, शारीरिक आजारपणे सुरू होतात. या आजारांना सतत तोंड द्यावे लागल्यामुळे नैराश्य आणि अँग्झायटी वाढते.

 तिसरे म्हणजे व्यसनांमुळे माणसाची कार्यक्षमता हळूहळू कमी होते, कामावर त्याचा परिणाम होतो आणि त्यातून आर्थिक नुकसान होते. सामाजिक प्रतिष्ठादेखील कमी व्हायला लागते. यामुळे व्यक्ती आणखी उदास राहायला लागते

चौथे कारण थोडे वेगळे आहे. व्यसन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण जे करतोय ते चुकीचे आहे, हे माहीत असते. आणि ते सोडण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्नदेखील केलेला असतो. पण बरेचदा त्यात यश मिळाल्याने त्यांना न्यूनगंड वाटायला लागतो, आत्मविश्वास कमी होतो. त्यातून नैराश्य येते. कधीकधी त्याची परिणती आत्महत्येतही होते.

व्यसन आणि आत्महत्या 

WHO ची आकडेवारी सांगते, की जगातील एकूण आत्महत्यांपैकी १८ टक्के आत्महत्या केवळ दारूमुळे घडतात. यात फक्त दारू घेणारेच नाही, तर त्यांच्या घरचे, मुलेदेखील असतात. कुटुंबीय त्यांच्या तब्येतीच्या काळजीने ग्रासलेले असतात. या सगळ्यातून होणारे आर्थिक नुकसान, घरखर्च भागवण्यासाठी होणारी ओढाताण आणि भांडणतंटे या सगळ्यांचा परिणाम मनःस्वास्थ्यावर होतो. मुलांवर याचा खूप वाईट परिणाम होतो. अनेकदा घरातील ताण मुलांना असह्य होतो. हा ताण कमी करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही असे वाटून ती निराश होतात. काही जण आत्महत्येपर्यंत पोचतात. काहींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. आपल्या घरातील प्रश्न / वाद केवळ आपल्या वडिलांच्या / आईच्या व्यसनामुळे निर्माण झाले आहेत हे त्यांना कळत नाही. आपण चांगले नाही, आपले कुटुंबच चांगले नाही असा काहीसा त्यांचा समज होतो. त्यातून त्यांची स्वप्रतिमा खालावते. अश्या मुलांना लहानपणी दारूचा, व्यसनांचा राग येत असला, तरी ताण हाताळण्याची तेवढी एकच पद्धत बघितली असल्यामुळे मोठी झाल्यावर तीदेखील ह्याच पदार्थांचा आधार घेतात आणि फसतात, व्यसन करायला लागतात.    

दारूमुळे उद्भवणाऱ्या इतर मानसिक समस्या  

दारू घेणाऱ्यांमध्ये विविध मानसिक आजार दिसून येतात. विशेषतः पुरुषांना  आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी लैंगिक संबंध असल्याचा संशय यायला लागतो. कितीही पटवून सांगितले, तरी त्याचे समाधान होत नाही. याचे रूपांतर वाद, भांडणे, हिंसेत होते. अनेक वर्षे दारूचे व्यसन असणाऱ्यांचा शरीराच्या हालचालींवरचा ताबा जातो, लक्ष केंद्रित करता येत नाही, उच्चार स्पष्ट येत नाहीत, गोंधळलेपण जाणवते. डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) सारखे आजारदेखील होऊ शकतात. दहा वर्षे सतत दारू घेणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूचा MRI काढल्यास मेंदू लक्षणीयरित्या लहान झाल्याचे दिसून येते.   

व्यसन आणि लैंगिक स्वास्थ्य 

ज्याबद्दल लोक फारसे बोलत नाहीत असा दारू, तंबाखूचा अत्यंत क्लेशकारक परिणाम म्हणजे नपुंसकत्व येणे. याचा परिणाम जोडप्यांच्या लैंगिक स्वास्थ्यावर होतो. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे धमन्यांच्या आतील थर लवकर खराब होतो. यालाअर्टेरिओस्क्लेरॉसिसम्हणतात. यामुळे शरीरातील अनेक अवयवांना नीट रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे स्ट्रोक (पक्षाघात), हृदयविकार तर होतातच; पण पुरुषांच्या शिस्नाला रक्तपुरवठा नीट झाल्यामुळे लिंग ताठ होण्याची समस्या (erectile dysfunction) उद्भवते. मध्यमवयीन पुरुषांमध्ये आढळणारे मधुमेह, उच्च रक्तदाब यामागचे प्रमुख कारण दारू आणि तंबाखू आहे. शिस्नाकडे जाणारी धमनी ही ह्रदयातील धमनीपेक्षा लहान असल्याने बरेचदा हृदयविकाराचा झटका येण्याच्या पाचेक वर्षे आधी erectile dysfunction निर्माण होते. यामुळे लैंगिक आयुष्यावर, स्वास्थ्यावर परिणाम झाल्याने नवराबायकोमध्ये ताण निर्माण होऊन मनःस्वास्थ्य ढळण्याची शक्यता असते

गांजाचे व्यसन आणि मानसिक स्वास्थ्य 

‘तंबाखू, सिगरेट हानिकारक असली, तरी गांजा अगदीच सौम्य असतो आणि तो ओढल्याने फार काही फरक पडत नाही’ असा एक सार्वत्रिक गैरसमज लोकांमध्ये, विशेषतः तरुणाईत, बघायला मिळतो. एवढेच नाही, तर गांजा घेतल्यावर व्यक्ती जास्त सर्जनशील होते, तिची सौंदर्यदृष्टी वाढते असेही मानले जाते. खरे तर होते असे, की गांजा घेतल्यामुळे आपले वास्तवाचे भान हळूहळू सुटत जाते. त्यामुळे सामान्यतः येणार नाहीत असे अनुभव आपला मेंदू निर्माण करायला लागतो. रंग, संगीत अधिक सुंदर भासायला लागतात. काहींना लोक आपल्या वाईटावर असल्याचा भास होतो. सुरुवातीला हे असेवास्तव’, ‘सामान्यअनुभव फक्त गांजा ओढलेल्या अवस्थेतच येतात आणि नशा कमी झाल्यावर ते जातात. पुढेपुढे नशेत नसतानाही भास व्हायला लागतात आणि याचे रूपांतरसायकॉसिसमध्ये होण्याचा धोका वाढतो. म्हणजे वास्तवाचे भान सुटते, भास होतात, कानात आवाज येतात, व्यक्ती स्वत:च्या क्षमतांबद्दल खूप मोठ्या कल्पना करायला लागते. माझ्याच मेडिकल कॉलेजमधला एक विद्यार्थी एकदा गांजाच्या नशेत स्वतःलाक्रिशसमजून छतावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करताना मी पाहिले आहे. दारू, तंबाखू घेणाऱ्यांपेक्षा गांजा ओढणाऱ्या लोकांना सायकॉसिसचा धोका जास्त असतो

१०१५ वर्षे नियमित गांजासेवनाने निर्माण होणारी अजून एक अवस्था म्हणजेअमोटिव्हेशन सिंड्रोम’ (प्रेरणेचा अभाव). या अवस्थेत लोकांना काहीच करायची इच्छा होत नाही. काही करण्याची मनातील प्रेरणाच हरवून जाते. चित्रकारांना चित्रे काढावीशी वाटत नाहीत, खेळाडूंना खेळावेसे वाटत नाही. 

ताण हाताळणे 

दारू, सिगरेट, गांजाचा वापर लोक ताण हाताळण्यासाठी करत असले, तरी मूळ समस्या आहे तशीच राहते. निघते ती फक्त तात्पुरती पळवाट, ताणाचा क्षणभर पडलेला विसर. विसर पडल्यामुळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहीही प्रयत्न केले जात नाहीत. ताणाची कारणे तशीच राहतात; किंबहुना वाढत जातात आणि मग एक दिवस कडेलोट होतो. उदाहरणार्थ एखाद्याने काढलेल्या कर्जाची रक्कम वाढतच जाते आणि त्याचे पर्यवसान आत्महत्येत होते

काही लोक मजा म्हणून हे पदार्थ घ्यायला लागतात पण नंतर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागते. एक जवळचा अनुभव सांगतो. माझ्या इंटर्नशिपच्या फॉर्मवर सही करणाऱ्या मेडिकल ऑफिसरला काही वर्षांनी मी आमच्या परिसरात भीक मागताना पाहिले. लोकांकडून तो सतत पैसे उसने मागत असे. दारूमुळे त्याला अनेक वर्षे पार्ट्यांमध्येमजाकरायला मिळाली; पण पुढे त्यामुळेच नोकरी, प्रतिष्ठा, मनःशांती; सगळेच गमवावे लागले. म्हणून शाश्वत आनंद हवा असेल, तर त्यासाठी खेळ, संगीत, कला, मेडिटेशन अशा सकारात्मक मार्गांचा अवलंब करणेच योग्य. त्यातून आयुष्य अधिक अर्थपूर्ण होते, स्वप्रतिमा उंचावते, आत्मसन्मान वाढतो

कोविडकाळ आणि व्यसने  

कोविडकाळात आर्थिक कारणांमुळे आणि जवळच्या लोकांच्या मृत्यूमुळे अनेक लोकांचे ताण वाढले आहेत. पर्यायाने लोकांच्या व्यसनातही वाढ झाली आहे. कोविडशी सामना करण्याचे एक मोठे शस्त्र म्हणजे आपली प्रतिकारशक्ती. व्यसनाधीन व्यक्तींची रोगांशी लढण्याची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे व्यसनामुळे कोविडकाळात होणारे नुकसान दुहेरी आहे

व्यसनमुक्ती 

व्यसनांतून बाहेर पडणे अवघड असते. तसा प्रयत्न करणारे ९० टक्के लोक एकदा तरी परत व्यसन करायला लागतात, असे निरीक्षण आहे. सातत्याने अनेक प्रयत्न केल्यानंतरही केवळ २०२५ टक्के लोकच व्यसनमुक्त होऊ शकतात. त्यामुळे त्या मार्गाने जाणेच शहाणपणाचे आहे.

अर्थात, व्यसनाधीन झालेल्या लोकांनी लक्षात घ्यावे, की व्यसन सोडवणे कठीण जरूर आहे; पण अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची, समुपदेशकांची मदत होते. तसेच व्यसन सोडण्यासाठी मदत करणाऱ्या गोळ्या, औषधेही हल्ली उपलब्ध आहेत. त्यामुळे व्यसन सोडण्याची प्रक्रिया थोडी सुसह्य होते. अल्कोहोलिक्स अनॉनिमस (Alcoholics Anonymous – AA) ही संस्था व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींच्या मदतीने व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून बाहेर पडण्यास मदत करते. ही संस्था विनामूल्य काम करते. आपल्या नजीकच्या AA शाखेत आपण जाऊ शकता. व्यसनाधीन व्यक्तीची जायची इच्छा नसल्यास तिच्या घरचे AA च्या सभांमध्ये सहभागी होऊन इतर लोकांच्या नातेवाईकांनी हा प्रश्न कसा हाताळला हे शिकू शकतात. त्यासाठी ८०९७०५५१३४  या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल

आनंदाची बाब म्हणजे व्यसन पूर्णपणे सोडणाऱ्या व्यक्तींनाही हा सुखद धक्का असतो. १०२ संशोधनांचा अंतर्भाव असलेला एक मोठा अभ्यास करण्यात आला. ,६९,५०० लोकांचे अनुभव त्यात अभ्यासण्यात आले. त्यातून असे दिसून आले, की सिगरेटचे व्यसन सोडण्याने लोकांमधील अतिचिंता आणि नैराश्य हे आजार कमी झाले. एवढेच नव्हे, तर ते कमी होण्याचा परिणाम डिप्रेशनवर घेतल्या जाणाऱ्या औषधाइतका मोठा आणि सकारात्मक होता. तसेच सिगरेट पिणाऱ्यांच्या तुलनेत त्यांचा ताण कमी झाल्याचे आणि एकूण आयुष्याची गुणवत्ता सुधारल्याचेदेखील दिसून आले. सिगरेट पिणे सोडल्यास आपले मित्रमैत्रिणी दुरावतील अशी काही लोकांना भीती असते. मात्र हा अभ्यास सांगतो, की त्यांचा एकटेपणा कमी झाला, संबंध सुधारले आणि एकूण सामाजिक आयुष्य अधिक समाधानकारक झाले

पालकांसाठी महत्त्वाचे 

आपण सांगून मुले आपले ऐकत नाहीत अशी पालकांची धारणा असते. पण संशोधन सांगते, की ज्या घरांमध्ये व्यसनासंदर्भात मुलांशी वारंवार बोलले जाते, त्या घरांतील मुलांमध्ये व्यसनाचे  प्रमाण खूप कमी असते. दारू, तंबाखू, सिगरेट, गांजा या अमली पदार्थांच्या सेवनाला आता समाजमान्यताच नव्हे, तर प्रतिष्ठादेखील मिळू लागली आहे. चित्रपट, जाहिराती, समाजमाध्यमे, समवयस्क मित्रमैत्रिणी अश्या अनेक माध्यमांतून व्यसन करणे कसेकूलआहे हे संकेत मुलांना मिळत असतात. अश्या वेळी त्यातील धोके समजावून सांगणारे कोणीतरी घरात असणे गरजेचे आहे

वयाच्या १५ वर्षांआधी दारू घेणाऱ्यांपैकी ४० टक्के व्यक्ती पुढील आयुष्यात व्यसनाधीन होतात, तर २१ वर्षांपुढे हे प्रमाण १० टक्के असते असा अभ्यास आहे. २१ वर्षांपर्यंत आपल्या मेंदूची मोठ्या प्रमाणात जडणघडण सुरू असते. त्यावरच दारू परिणाम करते. त्यातून स्वयंनियंत्रणाचा अभाव, लक्ष केंद्रित करता येणे, अभ्यास लक्षात राहणे, सारासार विचार करता येणे, निर्णय घेता येणे अशी बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तसेच वयाच्या १५ वर्षांआधीच गांजा घेणाऱ्या लोकांमध्ये पुढील आयुष्यात सायकॉसिस होण्याची शक्यता बळावते.

आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजेच, ते महत्त्वाचेच आहे. पण जसा अतिशिस्तीचा, धाकाचा मुलांवर विपरीत परिणाम होतो, तसाच अतिस्वातंत्र्याचादेखील होतो. मुलांना आपल्या पालकांकडून एका रचनेची (स्ट्रक्चर), चौकटीची अपेक्षा आणि गरज असते. आपण आपल्या कामाच्या जागी जशी नियमांची चौकट पाळतो, अगदी तशीच. ही चौकट, हे स्ट्रक्चर पालक म्हणतील तसेच हवे असे नाही, विचारविनिमय करून मुलांच्या सहभागाने ते ठरवता येऊ शकते; पण ते असणे गरजेचे असते. १५ ते ४९ या वयात होणाऱ्या मृत्यूंमध्ये दारू हा सर्वातकॉमन रिस्क फॅक्टरआहे. त्यामुळे त्याबद्दल ठामपणे एखादी भूमिका घेताना पालकांनी संकोच करायची गरज नाही. मूल सज्ञान झाल्यावर त्याने / तिने आपापला निर्णय घ्यावा असा विचार पालक म्हणून केल्यास, आपल्याला एक सुवर्णमध्य गाठता येईल.  

शेवटी आपण चांगले मानसिक आरोग्य कशाला म्हणू? आपण आपल्या ध्येयाकडे, स्वप्नपूर्तीकडे सजगपणे, उत्साहाने, उमेदीने मार्गक्रमण करत आहोत, अर्थपूर्ण काम करत आहोत, करू शकतो आहोत या अवस्थेला की आपण आपल्या मेंदूला बधिर करून सारख्या पळवाटा शोधत, कृत्रिम पद्धतीने निर्माण केलेला क्षणभंगुर आनंद उपभोगत सुस्त पडलो आहोत, हातून काहीच अर्थपूर्ण घडत नाहीये या अवस्थेला? तुम्हीच ठरवा

Dharav_Shaha

डॉ. धरव शहा   |  understandingalcohol@gmail.com

लेखक मानसोपचारतज्ज्ञ असून तरुणाईला दारू, तंबाखू आणि इतर अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्याचे काम करतात. समवयस्कांच्या दबावाला बळी पडून युवकांनी आपली वाताहत करून घेऊ नये, यासाठी ह्या विषयावर आजवर त्यांनी ४५० सादरीकरणे (YouTube: ‘Poisons We Love’) केली आहेत. 

अधिक माहितीसाठी poisonswelove.org येथे भेट देता येईल.

शब्दांकन: सायली तामणे